‘गँग ऑफ ससून’
By संतोष आंधळे | Published: June 9, 2024 10:45 AM2024-06-09T10:45:06+5:302024-06-09T10:47:46+5:30
Sassoon Hospital News: देशभर गाजत असलेले पाेर्शे अपघात प्रकरण तर एखाद्या वेबसिरीजच्या कथानकाला लाजवेल असेच आहे. विशेष म्हणजे त्या कथानकाच्या केंद्रस्थानी ससून रुग्णालय आहे. या रुग्णालयातील डॉक्टरांनी ज्या पद्धतीने अपघात प्रकरणातील आरोपीला वाचविण्याचे प्रयत्न केले, ते त्यांचे कृत्य त्यांच्या पेशाला आणि रुग्णालयाच्या परंपरेला काळिमा फासणारे आहे. डॉक्टरांच्या या कृत्यामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
- संतोष आंधळे
(विशेष प्रतिनिधी)
वैद्यकीय विश्वात जगभरात अनेक डॉक्टर्स आहेत जे अभिमानाने पुण्यातील ‘बीजे’मधून पासआऊट झालो असे सांगतात, त्यांची आज काय स्थिती होत असेल? कारणही तसेच आहे. गेल्या काही वर्षांत ससून सर्वोपचार रुग्णालय आणि त्याला संलग्न असणाऱ्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये विविध गैरप्रकारांची मालिका सुरू आहे. ससून हे केवळ घोटाळ्यांचे उगमस्थान आहे की काय, असे चित्र गेल्या वर्षभरापासून आहे. वृत्तपत्रांतील बातम्यांचे मथळे पाहिले तर हेच दिसते. ‘ससून’चा नावलौकिक सातासमुद्रापार असला, तरी अलीकडे गैरप्रकारांचा संसर्ग झालेल्या या रुग्णालयाची वाताहत होत असल्याचे दिसते. ‘प्राउड ऑफ ससून’पासून सुरू झालेला या रुग्णालयाचा प्रवास आता ‘गँग ऑफ ससून’पर्यंत येऊन पोहोचला आहे की काय, अशी शंका येते.
रुग्णालयातील महत्त्वाच्या पदांवरील व्यक्ती काळाच्या ओघात बदली होऊन बाहेर गेल्या, सक्तीच्या रजेवर पाठवल्या गेल्या किंवा नियमित रजेवर गेल्या. तरीही काहींनी बाहेरून रुग्णालयाच्या कामकाजात हस्तक्षेप सुरूच ठेवल्याने हे रुग्णालय गैरकृत्यांचे उगमस्थान आणि आश्रयस्थान बनले आहे. दिव्यांगांचे खोटे प्रमाणपत्र प्रकरण, अमली पदार्थ प्रकरण, किडनी रॅकेट असो, रुग्णाचा पाय उंदराने कुरतडण्याची घटना असो, हॉस्टेलमध्ये डॉक्टरांनी थर्टी फर्स्ट साजरा करून सरकारी मालमत्तेचे केलेले नुकसान असो या आणि अशा अनेक गैरप्रकारांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. काही घडले की चौकशी समिती नेमून विषय मिटवायचा, हे समीकरणच बनले. राजकीय आशीर्वादाने महत्त्वाच्या पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसायचे आणि पुन्हा राजरोसपणे आहे तेच पुढे सुरू ठेवायचे, हे ‘ससून’मधील आजकालचे विदारक वास्तव आहे.
या सगळ्या गैरमार्गांच्या पार्श्वभूमीवर ‘ससून’चा कानोसा घेतला तर या कॉलेजमध्ये ‘गँग ऑफ ससून’ नावाची टोळी कार्यरत असल्याचे सांगितले जाते. या टोळीतील काहींचा पोलिस शोध घेत आहेत.
अपघात प्रकरण हे एक उदाहरण आहे. या रुग्णायातील काही बेजबाबदार डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कुणाचाच वचक नाही. कुणीही यावे आणि भ्रष्टाचार करून मलई खाऊन जावे, अशी या रुग्णालयांची अवस्था आहे.
या रुग्णालयाचे काही डॉक्टर्स आणि कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याने रुग्णालयाची बदनामी झाली असली, तरी अनेक डॉक्टर्स, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी तन्मयतेने रुग्णसेवा करीत आहेत.
ससून रुग्णालयाची आब राखायची असेल तर शासनाला मोठी ‘सर्जरी’ करावी लागेल. खासगी रुग्णालयांत होणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया आणि अत्याधुनिक उपचार या रुग्णालयात मोफत केले जातात. मध्यमवर्गीय, गरीब घरांतील रुग्णांसाठी ‘ससून’ हे वरदान आहे; मात्र त्याची विश्वासार्हताच धोक्यात आली तर गरीब रुग्णांचा त्याच्यावरील विश्वास उडण्यास वेळ लागणार नाही.
ससून आणि महात्मा गांधी
केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही ‘ससून’मधील विद्यार्थ्यांनी आपला ठसा
उमटवला आहे.
सिनेक्षेत्रात ज्याचे नाव आदराने घेतले जाते ते दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, प्रसिद्ध अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि त्यांच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांनी या कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.
अनेक विद्यार्थी आरोग्य व्यवस्थेतील मोठ्या पदांवर आहेत. गोरगरीब रुग्णांसाठी हक्काचे स्थान असलेल्या या रुग्णालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे अपेंडिक्सचे ऑपरेशन १२ जानेवारी १९२४ रोजी झाले होते. ससून रुग्णालयातील ती खोली वारसा म्हणून जतन करून ठेवली आहे.
सामान्यांचा या रुग्णालयावरील विश्वास उडाला तर त्यांना किंवा त्यांच्या नातलगांना कर्ज काढून नाइलाजाने खासगी रुग्णालयांत उपचार घ्यावे लागतील. धनदांडगे खासगी रुग्णालयात उपचार घेतील; पण गरिबांनी कुठे जायचे हे सरकारला ठरवावे लागेल.