गणपुले
By admin | Published: February 15, 2015 02:45 AM2015-02-15T02:45:21+5:302015-02-15T02:45:21+5:30
अलका टॉकीजशेजारच्या रवि बिल्डिंगमध्ये खूप वर्षे स्टुडिओ होता. ह्या बिल्डिंगमध्ये असताना फार मजा. पुष्कळ कायकाय घडलं, वेगळी-वेगळी माणसं भेटली, वेगळे अनुभवही आले,
Next
अलका टॉकीजशेजारच्या रवि बिल्डिंगमध्ये खूप वर्षे स्टुडिओ होता. ह्या बिल्डिंगमध्ये असताना फार मजा. पुष्कळ कायकाय घडलं, वेगळी-वेगळी माणसं भेटली, वेगळे अनुभवही आले,
त्याबद्दल नंतर कधीतरी.
आज गणपुल्यांबद्दल.
गणपुले होते तिथले वॉचमन. बिल्डिंगच्या मागेच एक टपरी बांधून घेतली होती. डय़ूटी संपली की, तिथेच मुक्काम. वयस्कर होते. मिलिटरीतून रिटायर होऊनही पुष्कळ वर्षे झालेली, तरी अंगावर कपडे मात्र अजूनही मिलिटरीचेच. डोक्याला पांढरी गांधी टोपी.
एखादा शिल्पकार शिल्प तयार करताना आधी मॉडेलच्या चेह:याचा सांगाडा तयार करतो. मॉडेलच्या चेह:याच्या जडणघडणीप्रमाणो त्यावर तो आधी मातीचे गोळे हातात घेऊन मातीचेच फराटे मारतो. चेह:याच्या उंचसखल भागाप्रमाणो दाब देतो. मातीचा ओबडधोबड, खडबडीत चेहरा पहिल्या सिटिंगमध्ये तयार होतो, तसा कच्चा चेहरा!!
बरेचसे दात पडलेले, त्यामुळे त्या खडबडीत आणि राकट चेह:यावर एक आपोआपच मंद असा मृदुपणा आलेला.
ग्रे-निळे डोळे!
अतिशय गोड हसत. लहान मुलासारखे निरागस दिसत हसताना. होतेही तसेच.
पोटी मूलबाळ नव्हतं. त्यामुळेच की काय कोण जाणो, पण अंगाखांद्यावर, आजूबाजूला असंख्य मांजरं लगडलेली! पायातले बूट जणू व्हॅनगॉगच्या चित्रनं उचलून आणलेले. पाय घासत घासत सगळ्या बिल्डिंगभर चालू लागले, की पायात मांजरं मांजरं !
बायको भारी होती. सारखी भांडी घासताना दिसे. मोठं कुंकू, मोठे डोळे. अतोनात लठ्ठ. डोळ्यात फरक, आणि नव:यासारखंच चेह:यावर भाबडं हसू! त्यामुळे कुणाकडे बघून हसतायत, ते लक्षात यायचं नाही. अक्षरश: एक शब्द बोलायची नाही म्हातारी. नुसती हसायची फक्त. भांडी घासणा:या माणसाला सगळ्यांकडे मान वर करून बघावं लागतं, तशा त्या सारखी मान वर करून हसत असायच्या अधांतरी बघत सदोदित.
बिल्डिंगमध्ये, आजूबाजूला बांधकाम चालू असायचं काही ना काही. गणपुल्यांची खासियत म्हणजे तिथं येणा:या लमाणी बायांवर गणपुल्यांचा वरदहस्त असायचा. त्या बायांची शेंबडी पोरं इथंतिथं नाचत. हातात बिस्कीट घेतलेलं एखादं पोरगंही कधीमधी गणपुल्यांच्या बखोटीला दिसे. म्हणायचे, ‘‘मला स्वत:ला मूल नसलं म्हणून काय झालं कुलकर्णी साहेब, ही सगळी माझीच पोरं. नाव लावत नाहीत एवढंच!’’. बोलता बोलता मांजरांना गोंजारत.
मजबूत तब्येत होती. वृद्ध, तरी कांबीसारखी बॉडी. हातपाय अक्षरश: लोखंडी. जाडजूड पंजे. नटय़ांची कॅलेंडरं जमावायचा फार नाद. झोपडीत सगळीकडे नटय़ांची कॅलेंडरं लटकवलेली. श्रीदेवी, जयाप्रदा.
एक डोळा बायकोकडे ठेवून गंमतीनं म्हणायचे, ‘‘कशा सवती राज्य करतायत बघा भिंतीवर!’’
बायको काय, कायमच हसरी! भाबडी!
मुख्य म्हणजे वाचायची फार आवड. फक्त रहस्यकथा.
अंगाखांद्यावर मांजरं, बखोटीला एखादं कळकट लमाणी पोर आणि पार्किंगमधल्याच एखाद्या स्कूटर नाहीतर मोटरसायकलवर बूड टेकलेलं, एक पाय सीटवर लोंबकळत आणि दुस:या पायावर उभे राहून हे महाराज (चष्मा न लावता) वाचनात गर्क झालेले असं दृश्य परिचयाचं झालेलं. स्टुडिओची साफसफाई करण्याचं काम त्यांच्याकडेच असायचं. त्यामुळे माङयाकडच्या सगळ्या पुस्तकांची माहिती त्यांच्याकडे असायची. कठोर समीक्षक होते! म्हणायचे,
‘‘काय हो ही पुस्तकं? एका ओळीचा अर्थ लागेल तर शपथ. नाही म्हणायला ते नवल तेवढं बरं असतं! ’’
..
एका सकाळी स्टुडिओच्या दारातच महाराज ठाण मांडून बसलेले दिसले.
विचारलं तर म्हणाले, ‘‘तुमचा निषेध.’’
म्हटलं , ‘‘का?’’
म्हणाले, ‘‘इतकी भारी भारी चित्र काढता, पुस्तकांवर, मासिकावर. मोठीमोठी पोश्टरं काढता.’’
म्हटलं, ‘‘मग?’’
‘‘गरिबाचं काढावंसं वाटलं का कधी?’’
च्यायला, मनात म्हटलं, चूक झाली खरी. लक्षातच नाही आलं कधी.
म्हटलं, ‘‘बरोबरेय गणपुले तुमचं.’’
विचार केला, करू पोट्रेट. चार-पाच तास जातील, एक-दोन कामं द्यायचीत, पण त्याचं बघू दुपारी नाहीतर रात्री.
म्हटलं, ‘‘चला, बसा.’’
म्हणाले, ‘‘आज नको. तुम्हाला सांगायचं होतं फक्त. आज अजून पाणी पण नाही भरलंय. झाडून बिडूनपण नाही झालेलं अजून. उद्या काढा. शिवाय आज दाढीपण नाहिये केलेली. तुमचं कामपण असेल.’’
मी म्हटलं, ‘‘बरं, पण उद्या नक्की ना?’’
इतकं छोटं संभाषण होता-होता एकीकडे माङया नकळत मी म्हाता:याचा चेहरा निरखूसुद्धा लागलो होतो खरं तर.
गडद वर्ण. ग्रे-निळ्याचं कॉम्बिनेशन असलेले मिश्किल डोळे. तरतरीत नाक. गालावरच्या सुरकुत्या, कपडय़ांचा मिलिटरी ग्रीन नि माथ्यावर सहज अडकवलेली पांढरी, मळकट टोपी. एक-दोन दिवसांच्या वाढलेल्या दाढीचे ग्रे खुंट.
सकाळच्या साडेनऊ वगैरेचा झकास उजेडही होता.
म्हटलं, राहू द्या ती साफसफाई आणि पाणी आजच्या दिवस.
बसले बूटबीट काढून, पाय मोकळे करून, ऐसपैस.
दोनअडीच तासात एखादा चहा आणि बिडीकाडी होऊन चित्र पूर्ण झालं.
कागदावर, पोस्टर कलर्स.
गणपुल्यांनी चित्र लांब ठेवलं. मग स्वत: चित्रपासून मागे-मागे लांब सरकत वाकडी मान करत लहान मुलासारखे खुदुखुदू हसत हसत मला म्हणाले,
‘‘जरा वेळ घेऊन जातो हे. बाईसाहेबांना दाखवतो.’’
अख्खा ड्रॉइंग बोर्डच उचलला.
त्यांचे ते व्हॅनगॉगच्या पेंटींगमधून उचलून आणलेले बूट घातले आणि पाय घासत घासत जिने उतरून खाली कधी गेले, हे कळलंदेखील नाही !!