गेट सेट गोल...

By admin | Published: June 7, 2014 07:25 PM2014-06-07T19:25:06+5:302014-06-07T19:25:06+5:30

जगभर खेळला आणि तेवढय़ाच उत्कंठतेने पाहिला जाणरा खेळ म्हणजे फुटबॉल! त्याची जागतिक स्पर्धा ही क्रिडाप्रेमींसाठी पर्वणीच! थरारकताआणि वेग यामुळेच फूटबॉलला ‘खेळांचा राजा’ हा मान मिळाला आहे. जगभरच्या क्रिडाशौकिनांचे लक्ष लागलेल्या फुटबॉल विश्‍वचषकाच्या निमित्ताने या खेळाविषयी.

Gate set round ... | गेट सेट गोल...

गेट सेट गोल...

Next

 विश्‍वास चरणकर

फूटबॉल म्हणजे वेगाचा थरार. फुटबॉल म्हणजे पदलालित्याची बहार. फुटबॉलवर प्रेक्षकांचे प्रेम अपरंपार.. आणि म्हणूनच फुटबॉलला खेळाचा राजा म्हटले जाते. अशा या फुटबॉलचा कुंभमेळा म्हणजे वर्ल्डकप. यंदाचा वर्ल्डकप फुटबॉल पंढरी ब्राझीलमध्ये होतोय. आतापर्यंत झालेल्या १९ विश्‍वचषकांपैकी ब्राझीलने सर्वाधिक पाच वेळा विश्‍वविजेतेपद मिळविले आहे. म्हणूनच यंदाच्या स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झालं आहे. 
दि फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन (फिफा) यांच्यामार्फत दर चार वर्षांनी फुटबॉल विश्‍वचषक भरविला जातो. या स्पर्धेची सुरुवात १९३0मध्ये झाली. खरं तर याची चर्चा त्याच्या पूर्वी दहा वर्षे सुरू होती. १९३0ला या स्पर्धेला मूर्त रूप आले आणि उरुग्वेला पहिल्या स्पर्धेचे यजमानपद बहाल करण्यात आले. स्वीडन, हॉलंड, स्पेन, इटली हे इतर देशही त्या वेळी यजमानपदाच्या स्पर्धेत होते; परंतु देशाच्या स्वातंत्र्याचा शतकमहोत्सव साजरा करणार्‍या उरुग्वेने सर्व संघांचा प्रवास खर्च आणि निवासाचा खर्च करण्याची तयारी दर्शविली, शिवाय स्पर्धेसाठी नवीन स्टेडियम्सही बांधण्याचे मान्य केल्यानंतर त्यांना हा मान देण्यात आला. या पहिल्या स्पर्धेत १३ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचे विजेतेपद यजमान उरुग्वेने जिंकून आपला स्वातंत्र्याचा शतकोत्सव द्विगुणीत केला. अंतिम सामन्यात त्यांनी अर्जेंटिनाला ४-२ गोलने पराभूत केले होते. १३ ते ३0 जुलै १९३0 दरम्यान झालेल्या या पहिल्या स्पर्धेला सुमारे ६ लाख प्रेक्षकांनी हजेरी लावली. स्पर्धेत एकूण १८ सामने खेळविले गेले आणि यात ७0 गोल डागले गेले. 
दक्षिण आफ्रिकेत २0१0मध्ये झालेल्या मागील स्पर्धेचे विजेतेपद स्पेनने मिळविले होते. १९३0 पासून २0१0पर्यंत एकूण १९ वेळा ही स्पर्धा भरविण्यात आली. दुसर्‍या महायुद्धामुळे १९४२ आणि १९४६ या वर्षीच्या दोन स्पर्धा होऊ शकल्या नाहीत.  दर चार वर्षांनी होणार्‍या या स्पर्धेत एकूण ३२ संघ सहभागी होतात. त्यासाठी प्रदीर्घ पात्रता फेर्‍या होतात आणि यातून जगभरातील ३२ संघ निवडले जातात. यजमान संघाला मात्र आपोआप पात्रता मिळते. आतापर्यंत ब्राझीलने पाच वेळा, इटलीने ४, र्जमनीने ३, अर्जेंटिना आणि उरुग्वे यांनी दोनदा, तर फ्रान्स व स्पेनने एकदा विजेतेपद मिळविले आहे.
२0वी विश्‍वचषक स्पर्धा १२ जून ते १३ जुलै या कालावधीत ब्राझीलमध्ये होत आहे. १९५0नंतर दुसर्‍यांदा ब्राझील या स्पर्धेचे आयोजन करीत आहे. १९७८मध्ये अर्जेंटिनामध्ये झालेल्या स्पर्धेनंतर ३६ वर्षांनी पहिल्यांदाच दक्षिण अमेरिकेत ही स्पर्धा होत आहे. 
ब्राझीलमधील १२ शहरांतील १२ मैदानांवर ही स्पर्धा होणार असून, त्यासाठी जुन्या मैदानाची डागडुजी करण्यात आली आहे. ही स्पर्धा मैदानावर यशस्वी होईल की नाही, याचे उत्तर भविष्याच्या पोटात दडले असले, तरी मैदानाबाहेर मात्र यंदाच्या स्पर्धेला खूप विरोधाला सामोरे जावे लागले आहे. ब्राझील हा विकसनशील देश आहे. त्या देशात अनेक गंभीर समस्या आहेत. 
जागतिक मंदी आणि कुमकुवत अर्थव्यवस्था यांमुळे स्पर्धेसाठी पुरेसा निधी उभा करण्यास सरकार कमी पडले आहे. देशात गरिबी, बेरोजगारी आणि आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत असताना या स्पर्धेवर पैसा खर्च पडत असल्याने तेथील एक मोठा वर्ग या स्पर्धेच्या विरोधात आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक वेळा निदर्शने करून आपला विरोध दर्शविला आहे. प्रत्यक्ष स्पर्धेवेळी हा विरोध आणखीनच तीव्र होण्याची लक्षणे आहेत.
 
ब्राझील, स्पेन हॉट फेव्हरिट.
फुटबॉलमधील दादा समजल्या जाणार्‍या ब्राझीलला यंदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार समजले जाते. अ गटात यजमान ब्राझीलचा समावेश आहे. या संघात आधुनिक पेले समजला जाणारा नेमार हा मॅचविनर खेळाडू आहे. मेक्सिको, क्रोशिया आणि कॅमेरुन या बलाढय़ संघांसह यजमान ब्राझील अ गटात असून हा ग्रुप ऑफ डेथ समजला जातो.
ब गटात गतविजेत्या स्पेनकडे अनेक गुणवान खेळाडूंची खाण आहे. झावी, फर्नांंडो टोरेस, आंद्रे इनिएस्टा, झाबी अलान्सो यांच्यासोबत वर्ल्डक्लास गोलकिपर इकर कॅसिलास ही नावे या संघाचे मोठेपण सिद्ध करतात. गेल्या चार वर्षांतील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्यांना यंदाही विजेतेपदाचे दावेदार समजले जाते. चार वेळेचा विश्‍वविजेता आणि दोन वेळेला उपविजेता असणार्‍या इटलीची नजर यंदा विजेतेपदावर असणार आहे. २00६च्या विश्‍वविजेत्या संघाचा गोलकिपर आणि गोलकिपर बुफान हा या संघातील अनुभवी खेळाडू आहे. आंद्रे रानोच्चिया आणि मिडफिल्डर मार्को वेराट्टी हे तरुण जोषिले खेळाडू संघात आहेत. मारिया बाल्टोली आणि पाब्लो ओसवाल्डो यांची कामगिरी संघाला पाचवे विजेतेपद मिळवून देऊ शकते. या संघाचा ड गटात समावेश आहे. 
जागतिक मानांकनात तिसर्‍या स्थानावर असलेला र्जमनीचा संघ तीन वेळेचा विश्‍वविजेता आहे. जी गटातील र्जमनीला या गटात पोतरुगालचे प्रबळ आव्हान असेल. विश्‍वचषकात सर्वाधिक ९९ सामने खेळण्याचा, सर्वाधिक २२२ गोल नोंदविण्याचा विक्रम र्जमनीच्या नावावर आहे. फुलबॅक फिलीफ लाम्ह आणि थॉमस मुलर हे दोघे र्जमनीचे किप्लेअर आहेत.
(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)
 

Web Title: Gate set round ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.