एकत्र येणे सज्जनांचे आणि दुर्जनांचे

By admin | Published: June 14, 2014 06:19 PM2014-06-14T18:19:53+5:302014-06-14T18:19:53+5:30

कुकर्मामध्ये होत असलेल्या फायद्याने वाईट माणसे एकत्र येताना दिसतात खरी; पण त्या एकत्र येण्याला फारसा अर्थ नसतो. सज्जन एकत्र यायला वेळ लावत असले, तरी त्याने निराश न होता सर्वांच्या सत्प्रवृत्ती एकत्र आणण्याचे कार्य करीत राहणे गरजेचे आहे.

The gatherings of the righteous and the wicked | एकत्र येणे सज्जनांचे आणि दुर्जनांचे

एकत्र येणे सज्जनांचे आणि दुर्जनांचे

Next
>भीष्मराज बाम
 
वाईट माणसे पटकन एकत्र येतात, तशी चांगली माणसे का येऊ शकत नाहीत ? 
उत्तर : एक संस्कृत सुभाषित आहे- खळांची मैत्री दिवसाच्या पूर्वार्धातल्या सावलीसारखी असते. म्हणजे ती सुरुवातीला मोठी असते, तर दिवस चढत जाईल तशी ती लहान होत जाते. सज्जनांची मैत्री दिवसाच्या उत्तरार्धातल्या सावलीसारखी असते. म्हणजे सुरुवातीला ती लहान असते आणि नंतर दिवस उतरत जाईल, तसतशी ती मोठी होत जाते. वाईट माणसे फक्त स्वत:चा फायदा पाहत असतात. त्यामुळे जिथे फायदा असेल, तिथे ती पटकन जवळ जातात. ‘समान शीले व्यसनेषु सख्यं’ या नात्याने वाईट माणसे आपल्यासारखे लोक शोधत असतात आणि ते त्यांना सापडतातसुद्धा; पण त्यांची मैत्री टिकत नाही, हा समाजाच्या दृष्टीने एक प्रकारचा फायदाच आहे. अन्यथा, समाज टिकलाच नसता. 
चांगली माणसे आणि वाईट माणसे हा चोर आणि पोलीस यांसारखा फार ढोबळ विभाग आहे. लहान मुले चोर-पोलीसचा खेळ खेळतात, त्यात ती अतिशय रमून जातात. त्यांच्या अबोध मनात हे पक्के बसलेले असते, की समाजात चोर हे वेगळे असतात. त्यांना पकडून शिक्षा दिली, की सगळे आबादीआबाद होऊन जाईल, याबद्दल त्यांची खात्री असते. प्रत्यक्षात तसे होऊ शकले असते तर किती चांगले झाले असते; पण वास्तव अगदी वेगळे आहे. वाईट हे चांगल्यात मिसळूनच समोर येते. कित्येक वेळा तर चांगले हे वाईटाच्या संरक्षणासाठी उभे राहिलेले दिसते. महाभारतात भीष्म, द्रोण आणि कर्ण हे इतके चांगले होते, की त्यांची वागणूक समाजात आदर्श समजली जाई; पण वैयक्तिक थोरवीबद्दल त्यांच्या मनात गोंधळ होता म्हणूनच ते अन्यायी आणि अत्याचारी दुर्योधनाच्या बाजूने लढायलादेखील उभे राहिले. अर्जुनालाही समजेना, की त्यांना मारून विजय मिळविणे हे चांगले की वाईट. क्षमा या गुणाचा अतिरेक झाला, की असे होते. परत आपल्या नात्यातल्या लोकांबद्दल प्रेमाची भावना असते, त्यामुळे त्यांना शासन करण्याची कल्पनासुद्धा सहन होत नाही. 
बहुतेक सर्व लोकांमध्ये चांगले आणि वाईट यांचे मिश्रण असते. आपल्यासमोर चांगली बाजू मांडली गेली, तर ते संपूर्ण चांगले आहेत, असा आपला भ्रम होतो. आणि वाईट बाजू समोर आली, तर आपण त्यांच्यावर वाईट असा शिक्का मारून मोकळे होतो. स्वत:चाच विचार करीत राहणे हे समाजाकरिता वाईट आणि इतरांच्या भल्याचे चिंतन करणे हे केव्हाही चांगले. आता जे चांगले असतात ते आपल्या तत्त्वांना घट्ट धरून असतात. त्यांच्याशी तडजोड करणे त्यांना मान्य नसते. वाईट लोक आपल्या भल्याचाच विचार करीत असल्याने ते कोणत्याही तडजोडी लगेच करून टाकतात. म्हणून त्यांना एकत्र येणे सोपे जाते; पण चांगल्यांचे तसे नसते. 
आगरकर आणि टिळक हे दोन्ही समाजधुरीण समाजाच्या भल्यासाठीच प्रयत्नशील होते; पण 
अग्रक्रम कशाला द्यायचा, याबद्दल त्यांच्यामध्ये मतभेद होते. आगरकर हाडाचे समाजसुधारक असल्याने, त्यांना ‘समाजसुधारणे’च्या कार्याला प्राधान्य द्यावे, असे वाटे. तर, टिळकांना इंग्रजांच्या ‘गुलामगिरी’चे जोखड आधी झुगारून द्यायला हवे होते. पुढे पुढे त्यांचे मतभेद इतके विकोपाला गेले, की शेवटच्या आजारात टिळक आगरकरांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी मान फिरवून घेतली आणि आपल्या पूर्वाश्रमीच्या मित्राकडे 
बघितलेसुद्धा नाही.
ज्यांना मोठे कार्य करायचे असेल, त्यांना लोकसंग्रह करावाच लागतो. चांगली-वाईट माणसे जवळ करावी लागतात, त्यांच्यावर विश्‍वास टाकावा लागतो आणि प्रसंगी त्या माणसांचे दुर्वर्तनदेखील सहन करावे लागते. नेताजी पालकरांसारखे जिवाभावाचे कर्तबगार सहकारी आपत्धर्म म्हणून मुस्लिम धर्म स्वीकारून मोगलांना मिळाले, तेव्हा शिवाजी महाराजांना काय वाटले असेल? पण त्यांनी लोकसंग्रहाचे व्रत सोडले नाही. नेताजी पालकरांना परत हिंदू धर्मात घेऊन आपल्या सैन्यात मानाची 
जागासुद्धा दिली. म्हणून तर स्वामी रामदासांनी शिवरायांची सलगी देणे आदर्श असल्याचा उल्लेख केला.  कुकर्मामध्ये होत असलेल्या फायद्याने वाईट माणसे एकत्र येताना दिसतात खरी; पण त्या एकत्र येण्याला फारसा अर्थ नसतो. कारण, त्यांची एकी केव्हाही मोडू शकते. चांगल्या माणसांचे एकत्र येणे सहज घडत नसते, तरी ते दीर्घकाळ टिकू शकणारे असते आणि त्याचा उपयोगही समाजमनावर टिकाऊ परिणाम साधणारा असतो. त्यामुळे त्यासाठी सतत प्रयत्न होत राहायला हवेत. 
कोणीही माणूस संपूर्ण चांगला किंवा संपूर्ण वाईट नसतो. प्रत्येकामध्ये ईश्‍वरी अंश असतोच. त्यामुळे स्वत:बरोबर इतरांचेही भले करण्याची ओढ प्रत्येकामध्ये असते. या तत्त्वाचा अवलंब करून, पूज्य श्री पांडुरंगशास्त्री आठवले यांनी ‘स्वाध्याय परिवारा’चे केवढे प्रचंड कार्य उभे केले. त्या कार्यात आलेली चांगली माणसे तर टिकून राहिलीच; पण जे वाईट म्हणून समाजात हलके लेखले जात त्यांनीही आपली दुष्प्रवृत्ती टाकून देऊन ‘स्वाध्याया’च्या कार्याला उत्तम हातभार लावला. त्यामुळे सज्जन एकत्र यायला वेळ लावत असले, तरी त्याने निराश न होता सर्वांच्या सत्प्रवृत्ती एकत्र आणण्याचे कार्य करीत राहणे गरजेचे आहे, असे वाटते. 
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

Web Title: The gatherings of the righteous and the wicked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.