जिनिअस फॅक्टरी
By admin | Published: June 10, 2016 04:50 PM2016-06-10T16:50:28+5:302016-06-10T17:41:28+5:30
मूल जन्माला येण्यापूर्वी गर्भसंस्कार आणि ते जन्मल्या दिवसापासून त्याच्या मेंदूचा विकास करत सुटलेल्या घाब-याघुब-या पालकांच्या ध्यासग्रस्त जगात सुरू होतंय शाळेचं नवं वर्ष!
Next
>मेघना ढोके
(लेखिका लोकमत वृत्तसमुहात मुख्य उपसंपादक आहेत.)
मूल जन्माला येण्यापूर्वी गर्भसंस्कार आणि ते जन्मल्या दिवसापासून त्याच्या मेंदूचा विकास करत सुटलेल्या घाब-याघुब-या पालकांच्या ध्यासग्रस्त जगात सुरू होतंय शाळेचं नवं वर्ष!
- म्हणजे आता ‘बाजार’ गरम होणार! मुलांची भाषा, गणित, बोलणं, विचार करणं सारं सारं
‘विक्रीयोग्य’ बनवण्यासाठी गरगरते आहे एक गिरणी! मुलांचे मेंदू आणि आईबाबांचे खिसे हलके करत सुटलेल्या त्या गिरणीची खबर..
बाजारचक्रानं विकायला काढलेली स्वप्नं पालकांना मोहात पाडत भीती घालताहेत की,शिकवा सारं तुमच्या मुलांना, नाहीतर भविष्यात त्यांचं काही खरं नाही!
नुसतं पुस्तकी शिक्षणानं काय होतंय आजकाल? ते तर पाहिजेच. पण ‘डेव्हलपमेण्ट’ कशी ऑलराउण्ड’ पाहिजे! उद्याचं जग काय सोपं असणारेय का? आपलं निभलं कसंबसं, या मुलांची ‘स्पर्धाच’ वेगळी आहे.’ - अशी चारचौघात स्वत:ची उघड समजूत घालून इतर पालकांनाही एकदम ‘डिफेन्सिव्ह मोड’वर जायला भाग पाडणारे ‘सजग’ आणि ‘सुजाण’ आईबाबा हल्ली सर्रास भेटतात. ते कुठकुठल्या क्लासबाहेर उभे असतात, पार्किगमध्ये मुलांची वाट पाहत असतात, मुलांना या क्लासहून त्या क्लासला सोडायला जात असतात, स्वत: ऑनलाइन जाऊन जाऊन, काहीबाही शोधून अपडेट राहत कसकसले होमवर्क आणि प्रोजेक्ट्स स्वत:च करत सुटतात. त्यांचे मुलांसोबत वाढीस लागलेले ‘सजग पालक व्हॉट्स अॅप’ ग्रुप असतात. त्यावर ते मुलाच्या प्रत्येक लहानसहान कृतीचं बारीक डिसेक्शन करतात. आणि आपल्या मुलाच्या मेंदूच्या वाढीसाठी नी विकासासाठी जे जे म्हणून त्यांना माहिती होतं, ते सारे प्रयोग मुलावर करत राहतात. मुलांच्या एवढुशा मेंदूत शक्य ती सारी माहिती कोंबत सुटतात आणि मुलांना बजावतात की, आमच्या वेळी नव्हतं असलं काही, आता तुला मिळतंय ना, तर घे. शिक. नाहीतर काही खरं नाही हं तुझं! ‘.तर तुझं काही खरं नाही’ या एका जरतरी वाक्याच्या पोटातली सारी भीती, सारी असुरक्षितता हे पालक स्वत:च्याच नाही तर मुलांच्याही जगण्यात अशी काही ओततात की आनंददायी शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, अष्टपैलू जडणघडण, निसर्गस्नेही मानवी संवेदनांसह जगणं या बडय़ा बडय़ा शब्दांच्या वारुळात दडपत आपण मूल नाही एक ‘प्रॉडक्ट’ डेव्हलप करत आहोत याचं भानही अनेक पालकांना राहत नाही, इतकं ते स्वत:ला आणि मुलांना जिनियस घडवण्याच्या फॅक्टरीत ढकलून देतात!
त्यातून जिनियस खरंच घडतात का?
घडतील का?
याचं उत्तर आज वर्तमानाकडे नाही, पण वर्तमानात आहेत फक्त कसेबसे ‘ट्रेण्ड’ होत असलेले, काही लहानगे जीव आणि त्यांचे घाबरेघुबरे आणि डेस्परेट पालक! आपलं एकच एक मूल,
त्याचं सारं उत्तमच करायचं असा ध्यास घेतलेल्या या पालकांना मग बाजारपेठ अनेक पर्याय सुचवते आहे, आणि त्यांच्या ध्यासग्रस्तीचा पुरेपूर उपयोग करत एक बाजारचक्र जोरदार वेग धरतं आहे.
जिनिअस घडोत, ना घडोत, ते घडवण्याची फॅक्टरी मात्र उत्तम ‘घडते’ आहे.
त्या जिनिअस फॅक्टरीच्या जगात लहानग्यांच्या क्लासेसमधून फिरलं तर असे काही पालक, विशेषत: आया भेटतात. जे आपण लावलेलं रोप किती वाढलं हे रोज उपटून पाहावं तसं रोज होणारी मुलाची ‘वाढ’ मोजत राहतात. जाहिरातीतली आई जशी मुलाला सोबत घेऊन पळते तशाही अनेकजणी सतत पळतात. भविष्यातल्या स्पर्धेत मूल मागे पडायला नको या ध्यासग्रस्त धास्तीनं मूल जन्मताच त्याचं रूपांतर ‘असामान्य’ यशस्वी माणसात करण्याची प्रक्रिया सुरू होते.
पण हे सारं मुलांसाठी आनंददायी असतं का? - विचारतंय कोण?
मोठय़ा होत जाणा:या छोटय़ा शहरातल्या सुसंस्कृत उपनगरातलं समाजमंदिराचं आवार.
एक तिशीतली आई, तीन-चार लहानगी मुलं उभी.
समोर उभ्या एका धिटुकल्या मुलाला ती आई विचारते,
‘किती वेळ करतो तू प्रॅक्टिस? किती वेळ पाहतो मिररमध्ये?’
‘रोज वीस मिण्टं’ - तो मुलगा.
‘रोज? रोज करतोस ना प्रॅक्टिस?’ - आई.
‘हो, रोज. माझी मम्मा म्हणते, तू रोज मिरर कॉन्सन्ट्रेशन केलं नाहीस ना, तर मी तुला जेवायला देणार नाही’ - मुलगा.
‘त्यामुळे तुझ्या अभ्यासात काही फरक पडलाय?’ - आई.
‘हो, खूप फरक आहे. माझे टेस्टचे स्कोअर खूप चांगले आले.’ - मुलगा.
हे संभाषण संपताच, शेजारी उभ्या आपल्या मुलाकडे वळून ती आई म्हणते, ‘बघ, बघ. शिक जरा.
किती करतो तो, नाहीतर तू. !’
आईचा मुलगा गप्पच. आई वैतागानं चिडचिडलेली. आणि लांब उभं राहून हे सारं ऐकणारी त्या धिटुकल्या पाच-सहा वर्षाच्या मुलाच्या आईच्या नजरेत अभिमानाची चमक.
विचारलंच की, हे नक्की काय?
तर त्या धिटुकल्याच्या आईनं सांगितलं की, ‘मेंदू चांगला तरतरीत, अॅक्टिव्ह राहावा म्हणून मेंदूचे व्यायाम करवून घेणा-या एका क्लासला तिनं मुलाला घातलंय. त्यातला हा व्यायाम. रोज सकाळी आरशात स्वत:च्याच नजरेत नजर घालून पाहायचं. जास्तीत जास्त वेळ. त्यातून मेंदू अॅक्टिव्ह होतो. म्हणून ती रोज मुलाकडून हे करवते.
आणि आठवडय़ातून तीनदा मुलाला त्या क्लासला घेऊन जाते. मुलाच्या अशा सर्वागीण विकासाकडे लक्ष देता यावं म्हणून डेंटिस्ट असूनही आपण सध्या आपल्या करिअरमधून पूर्ण वेळ ब्रेक घेतला असल्याचंही तिनं अभिमानानं सांगितलं.
***
संध्याकाळची चारची वेळ.
आईबाबा ऑफिसला.
आजी, सांभाळणारी ताई आणि पाच वर्षाची मुलगी अशा तिघीच घरात.
रोज सायंकाळी पाच वाजता या मुलीला एक फोन येतो. त्या फोनवर तिची इंग्रजी उच्चारांची शिकवणी चालते. रोज एक तास.
इंग्रजी उच्चर सुधारून, स्पेलिंग उत्तम समजावेत, सांगता यावेत म्हणून फोनवरून ही रोज शिकवणी चालते.
आईबाबांशी यासंदर्भात बोलणं झालं तर बाबा म्हणाले, ‘आपण जे रिसोर्सेस मुलांना देऊ शकतो, ते तर द्यायलाच हवेत. ती गरज आहे या काळाची आणि आपण कमावतो कशासाठी?’
***
जिम्नॅस्टिकचा क्लास.
आठवडय़ातून तीन दिवस. संध्याकाळी.
एक दृश्य तिथं नेहमीचंच.
एक मुलगी आईबरोबर येते. खूप रडते. पण मारून मुटकून आई तिला जिम्नॅस्टिक करायला भाग पाडते. शिकवणा:या सरांना विचारलं की, ही एवढी रडते, नसेल तिला आवडत हे करायला तर कशाला बळजबरी?
ते म्हणाले, ‘बळजबरी कशाची? काही मुलं रडतातच. पालकांनीच पेशन्स ठेवला पाहिजे.’
आणि आईचं म्हणणं तर त्याहून वेगळं, ‘पुढे स्कोप आहे जिम्नॅस्टिक्सला, आत्ता नाही शिकणार तर केव्हा शिकणार? रडेल काही दिवस, पण करेल. न करून सांगते कुणाला!’
***
फिरत राहावं लहानग्यांच्या क्लासेसमधून तर असे अनेक किस्से, अनेक पालक भेटतात. काही पालकांच्या मुलांना ते क्लास मनापासून आवडत असतात. काहींना नसतातही. काही ठिकाणी पालक अगदी चौकीदार असल्यासारखे क्लासच्या बाहेर बसून राहतात. आपण लावलेलं रोप किती वाढलं हे रोज उपटून पाहावं तसं रोज मुलाची ‘वाढ’ मोजत राहतात. शिक्षकांना प्रश्न विचारतात की, अमक्याला जमतं, तेवढं का नाही जमत? किंवा, इतकं चांगलं जमतंय, तर अजून चांगलं जमावं, अजून चांगल्या स्पर्धाना पाठवायचं तर काय करायला हवं? आणि जाहिरातीतली आई जशी मुलाला सोबत घेऊन पळत राहते तशाही अनेकजणी पळत राहतात. एकामागून एक मुलांचे क्लासेस सुरूच.
चित्रकला, तबला, फोनिक्स, स्केटिंग,
कथक-भरतनाटय़म, जिम्नॅस्टिक्स, क्रिकेट, नाटक,
योगा, गाणं, मेंदूविकास, वैदिक गणित, कराटे, शूटिंग,
अबॅकस, परदेशी भाषा, संस्कृत, बुद्धिबळ.
असे किती क्लासेस. यादी करू तेवढी मोठी आहे.
त्यात साहस शिबिरं, व्यक्तिमत्त्व विकास, मेंदूचे व्यायाम, मेडिटेशन, ग्राउण्ड सराव असे कितीतरी पर्याय.
करू तेवढं कमी, निवडू तेवढं कमीच. त्यात शाळाही आता पुस्तकी शिक्षणाबरोबरच एक्स्ट्रा करिक्युलर अॅक्टिव्हिटीवर भर देतात. स्पर्धा कुठलीही असो, कार्यक्रम काहीही असो, आपलं मूल सगळ्यात झळकलं पाहिजे असा आग्रह (की अट्टहास) पालकांच्या मनात उसळी मारतो. आणि मग मुलांच्या मागे ‘शिक-शिक’चा लकडा लागतो. अर्थात आपण मुलांना जरा अतीच ‘पळवतो’, हे न कळण्याइतपत आजचे पालक अंधारात नाहीत. मात्र तरीही आपण जे करतो ते योग्यच आहे, असं ते स्वत:ला समजवतात ते एकाच तर्कावर की, आजच्या स्पर्धेत हे सारं आवश्यकच आहे. थोडा येईल ताण, पण नाइलाज आहे.
आणि हा नाइलाज अडीच वर्षाचं मूल ‘प्ले स्कूल’मध्ये टाकताना जन्माला येत नाही.
तर तो त्यापूर्वी कितीतरी आधी म्हणजे आपण मूल जन्माला घालायचं आहे, हे नियोजन करतानाच मनात रुजू लागतो. गर्भधारणोपूर्वी बीजशुद्धी करून घेणं त्यामुळेच आता अनेकांना अत्यावश्यक वाटतं. मग त्यासाठीचे हमखास यशस्वी उपचार करणा:या डॉक्टरांकडे रीघ लागते. गर्भसंस्कार तर जोडीनं आणि हिरीरीनं केले जातात. गर्भसंस्कार करणा:या वर्गाचा सुकाळ म्हणून तर सर्वत्र दिसतो.
त्यानंतर येतो पुढचा टप्पा. कोवळ्या पालकांना बाजारपेठेसह मुलं आणि देशाच्या भवितव्याचा विचार करणारे वारंवार सांगतात की, शून्य ते तीन वर्षे हा कालावधी फार मोठा. यात त्या मुलावर भाषेचे, रंगगंधाचे जेवढे संस्कार होतील ते महत्त्वाचे. त्यामुळे पाच-पाच दिवसांच्या बाळाला घेऊन असे संस्कार करणा:या वर्गानाही काही पालक जातात.
मग पुढचा टप्पा 3 ते 6 वयातला. या टप्प्यातही मुलांना काय अनुभव, संस्कार द्यावेत हे सांगणारे अनेक वर्ग, कार्यशाळा सर्रास चालतात. त्यांनाही अनेक पालक जातात.
आणि त्यापुढचा टप्पा 6 ते 12 वर्षे वयाचा.
या वयात तर मुलांना विविध छंदवर्गाना आणि क्लासेसना सर्रास घातलं जातं. याच वयात ‘शिकणो’ नामक एका मोठय़ा गिरणीत मुलं दामटली जातात, आणि शिकण्याशिकवण्याच्या चक्कीत पिसलीही जातात.
शून्य ते तीन वयाची बस चुकली तर पुढचा टप्पा गाठण्यासाठी पालक धडपडतात. आपल्या हातचा महत्त्वाचा काळ वाया गेला म्हणून स्वत:च्या जिवाला खातात. आणि ज्यांनी दुसराही टप्पा पार केला ते मग पुढच्या 6 ते 12 या वयातल्या आपल्या मुलांना काय शिकवू नी काय नको असं करत सुसाट सुटतात.
हे सारं जे पालक उतावीळ होऊन करतात. अत्यंत कष्टानं पै पै कमवत, ते पैसे महागडय़ा क्लासेसना देतात, त्याचं एकजात सारंच चुकतं का?
चूक-बरोबरचा न्याय करण्याचं तागडं हातात घेण्याची घाई न करता पाहिलं तर एका तागडय़ात एकेक किंवा दोनच मुलं असलेले, ब:यापैकी कमावते पालक दिसतात. दुसरीकडे बाजारचक्रानं विकायला काढलेली स्वप्नं आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी आवश्यक सोयीसुविधा आणि मार्ग दिसतात.
आणि ती स्वप्नं पालकांना मोहात पाडतात की, या, शिकवा मुलांना. ही शेवटची संधी. नाहीतर भविष्यात तुमच्या मुलांचं कसं होणार? सामान्यांच्या गर्दीत आपलं मूल उभं करू नका, त्याच्यात जिनिअस होण्याची ताकद आहे, तुम्ही जिनियस घडवा!
या भावनिक आव्हान आणि आवाहनासमोर पालक झुकू लागलेत तो हा काळ.
समाजाच्या वरच्या स्तरात सरकण्यासाठी धडपडताना आपल्या मुलांचं आयुष्य बहुरंगी, बहुआयामी आणि अतिकुशल बनवण्याचा ध्यास हा काळच देतोय. आणि म्हणून मग मुलांसाठी हे सारं करण्याची इच्छा आधी ध्यास बनते आणि पुढे त्या ध्यासाचं रूपांतर अतिरेकी अट्टहासात कधी होतं हे पालकांच्या लक्षात येत नाही.
सध्याच्या शाळा सुरू होण्याच्या टप्प्यावर तर शाळा निवडीपासून ते क्लासेस लावण्यार्पयत सारं अतिचिकित्सेने शोधलं जातं. नर्सरीत जाणा:या वय वर्षे साडेतीन असलेल्या मुलांना शिकवणी लावणारे पालक सध्या भेटतात.
पण नुस्ती मुलाला शिकवणी लावून भागत नाही, तर अनेक आया (आणि काही थोडे बाबाही) स्वत:ला कस्यरू रायटिंगच्या क्लासला नेऊन बसवतात. मुलांनी कस्यरू लिहिलेलं आपल्याला कळावं आणि त्यांचा गृहपाठ करून घेता यावा म्हणूनची धडपड इथूनच सुरू होते. त्यामागची तगमग, कळकळ सच्ची असते, यात शंका नाही; पण ती जिवाला जो घोर लावते, जी ससेहोलपट होते ती अनेकांसाठी असह्य करणारी असते.
आर्थिकदृष्टय़ा तर ती होतेच, पण मानसिक-शारीरिकदृष्टय़ाही अनेक पालकांच्या क्षमतांचाही ती अंत पाहताना दिसते.
अनेक पालकांशी यासंदर्भात बोललं आणि विचारलं की, कशासाठी ही एवढी तगमग? चारदोन गोष्टी नाही आल्या मुलाला तर काय बिघडेल?
यावर त्यांचं उत्तर एकच, ‘बिघडलंच तर? भविष्यात असं लक्षात आलं की, आपण जे करू शकत होतो, ते आपण केलं नाही म्हणून आपलं मूल आयुष्यात मागे राहिलं तर?’
या ‘जर-तर’ असुरक्षिततेचं आज उत्तर देता येत नाही. पण पालकांच्या मनात ही असुरक्षितता पेरत आणि ती मूळ धरेल यासाठीचे प्रय} आजची बाजारपेठ करत सुटली आहे.
त्या बाजारपेठेत नक्की काय काय आणि कसं कसं विकलं जातंय, त्याबद्दल पुढच्या अंकात.
आई काय करते?
हल्ली काही नामवंत शाळा मुलांना शाळेत प्रवेश देताना हा प्रश्न हमखास विचारतात, आई काय करते?
आई जर गृहिणी असेल (आणि अर्थातच वडील गडगंज कमावणारे) तर मुलांचा प्रवेश सुकर होतो अशी माहिती या अभ्यासात हाती आली.
खातरजमा करताना लक्षात आलं की, मुलांना शाळेसह अन्य छंद, अॅक्टिव्हिटी, प्रोजेक्ट्स यासाठीची ने-आण आणि वेळ नोकरदार आई सहजी देऊ शकत नाही. म्हणून मग आई गृहिणी असलेली बरी, असा तर्क सांगितला जातो.
अनेक नोकरदार, करिअरिस्ट आया बालसंगोपनासाठी हल्ली ब्रेक घेतात. काम थांबवतात असा ट्रेंड तर आहेच; मात्र याचबरोबर आईवर एक प्रकारचा सामाजिक दबावही वाढवला जातो आहे की, अष्टपैलू, जिनिअस मूल घडवायचं तर आईनंच संपूर्ण वेळ त्याला द्यायला हवा.
हा निर्णय ऐच्छिक असेल तोवर ठीक, पण समाजासह बाजारपेठेचा दबावही आगामी काळात वाढीस लागला तर?
सोशल स्टेटसवाली स्पर्धा
विविध क्लासला जाणा:या मुलांच्या आयांचे अनेक व्हॉट्सअॅप ग्रुप असतात. त्या ग्रुपवर आपापल्या मुलांच्या अॅक्टिव्हिटींचे पाढे वाचले जातात.
आणि आपलं मूल, त्याचा आनंद, त्याची त्या खेळातली गती, त्याचा रस हे सारं राहतं बाजूलाच आणि आपल्या मूल नामे प्रॉडक्टच्या परफॉर्मन्सचीच चर्चा अनेकदा केली जाते.
मुलाला अमुक गोष्ट शिकायला आवडते का, यापेक्षाही अमुक स्तरातली मुलं ती गोष्ट शिकतात म्हणून आपण शिकायची असा काही पालकांचा आग्रहही दिसतोच.
एकटेपणावर उतारा
एकेकटं मूल, त्याला घरात करमत नाही. खेळायला कुणी नाही. आजी-आजोबाही काही ठिकाणी स्वतंत्र राहतात, आपल्या निवृत्त आयुष्यात व्यस्त असतात. अशावेळी मुलांचा जीव कशात तरी रमावा, त्यांना मुलांसोबत खेळता यावं म्हणूनही अनेकदा क्लासेस लावले जातात.
काही मुलांना त्यातून आपापापली आवड सापडते, पण काहीजण मात्र निव्वळ मित्र भेटतात म्हणून क्लासला जात राहतात. आणि आपण एवढे पैसे खर्च करतो तरी मुलाची त्या गोष्टीत प्रगती नाही म्हणत पालक खंतावतात.