‘डॉग थेरपी’ घ्या, आजार पळवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 06:03 AM2021-03-07T06:03:00+5:302021-03-07T00:35:10+5:30
कुत्रा हा अनंत काळापासून माणसाचा मित्र आणि त्याचा सोबती मानला जातो. अनेक गुन्हे आणि गुन्हेगार शोधून काढण्यात तर प्रशिक्षित कुत्र्यांचा हातखंडा आहे. अनेक आजारांवरील उपचारांसाठीही कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा मित्र ठरू शकतो असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.
एकटेपणा वाटणं, नैराश्य येणं, कमी वयातच हृदयाचे प्रॉब्लेम्स सुरू होणं, ही गोष्ट आता संपूर्ण जगासाठीच नवीन राहिलेली नाही. अनेकांना लहान वयातच हे त्रास होताहेत आणि त्याचं प्रमाणही जगभर वाढत आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे.
हे आजार कसे कमी करता येतील, त्यावर प्रभावी उपचार कोणते आहेत, याबाबत निरंतर संशोधनही सुरू आहे. पण याचसंदर्भात स्वीडनमध्ये झालेल्या एका आगळ्यावेगळ्या संशोधनानं अनेकांना दिलासा दिला आहे.
एरवी या आजारांवर अनेक औषधोपचार, पैसा खर्च करावा लागतो, पण या स्वीडिश संशोधनानं केवळ औषधांवरचंच अवलंबित्व कमी होऊ शकतं हे शोधून काढलं आहे.
कुत्रा हा अनंत काळापासून माणसाचा मित्र आणि त्याचा सोबती मानला जातो. अनेक गुन्हे आणि गुन्हेगार शोधून काढण्यात तर प्रशिक्षित कुत्र्यांचा हातखंडा आहे. या आजारांवरील उपचारांसाठीही कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा मित्र ठरू शकतो असं त्यांनी सिद्ध केलं आहे आणि कुत्रा पाळण्याचा सल्लाही दिला आहे. कुत्र्याशी दोस्ती केली तर अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता, किमान ते आजार कमी करू शकता असं या संशोधकांचं म्हणणं आहे.
थोडाथोडका नव्हे, तर तब्बल १२ वर्षे त्यांनी यावर संशोधन केलं आहे आणि आपला निष्कर्ष प्रसिद्ध केला आहे.
ज्यांना पूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांच्यासाठी कुत्रा हा सर्वेात्तम मित्र ठरू शकतो, असं या संशोधकांचं म्हणणं आहे.
त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षानुसार ज्यांना अगोदर हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, त्यांनी कुत्र्याशी दोस्ती केली तर या आजारामुळे येऊ शकणाऱ्या मृत्यूचं प्रमाण तब्बल ३३ टक्क्यांनी कमी होऊ शकतं. जे आपल्या कुटुंबासोबत राहतात आणि सोबत कुत्राही पाळलेला आहे, अशांचाही मृत्यूचा धोका १५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. याशिवाय नैराश्य आणि एकटेपणावरही कुत्र्यांची सोबत खूपच फायदेशीर ठरु शकते, अनेकांचे विविध आजार सुसह्य होऊ शकतात आणि त्यांचं आरोग्य तुलनेत चांगल्या वेगानं सुधारु शकतो असं संशोधकांचं म्हणणं आहे.