अबोल, मिश्किल इलाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 06:00 AM2021-02-07T06:00:00+5:302021-02-07T06:00:02+5:30

सुरेश भट यांच्या निधनानंतर अनेकांनी ‘आता गझल संपली,’ असे म्हटले असले तरी भट यांचे काही शिष्य आपली स्वतःची वाट चोखाळत राहिले. आपल्याला आजमावत राहिले. त्यापैकी एक इलाही जमादार. गझलेवर त्याचे अफाट प्रेम होते. निवृत्तीनंतरचे आयुष्य त्याने गझलेत घालवले. मोगऱ्याचे वार विसरून वाळूचे घर बांधून सुगंधी जखमांना कुरवाळत तो निघून गेला. कायमचाच.

Ghazalkar Ilahi Jamadar | अबोल, मिश्किल इलाही

अबोल, मिश्किल इलाही

Next
ठळक मुद्देसरकारी खात्यातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून केवळ गझलेसाठी जगण्याचे इलाहीने ठरविले. सांगलीकडचे वादळात उडालेले घर, पत्नी व मुलाचा अकाली मृत्यू या साऱ्यातून बाहेर येण्यासाठी त्याने लिखाणावर लक्ष केंद्रित केले.

- प्रदीप निफाडकर

गझलसम्राट सुरेश भट यांचे पहिले जे ‘पंचप्यारे’ शिष्य होते, त्यातील दोन गळाले. एक अनिल कांबळे दीड वर्षापूर्वी गेला आणि आता ‘किती ‘इलाही’ सांगू तुजला आयुष्याचे रडगाणे तेच तेच ते गिरवत बसणे पुरे इलाही पुरे आता’ - असे म्हणत इलाही जमादारही अनंताच्या प्रवासाला गेला. सुरेश भट यांच्या निधनानंतर अनेक गायकांनी ‘आता गझल संपली,’ असे म्हटले असले तरी भट यांचे काही शिष्य आपली स्वतःची वाट चोखाळत राहिले. आपल्याला आजमावत राहिले. त्यापैकी एक इलाही होता. २५ हून अधिक पुस्तके, शेकडो गझला-दोहे मागे ठेवून हा गझलकार अत्यंत विकल अवस्थेत गेला. विकल यासाठी की अलीकडे त्याची स्मृती गेली होती. त्याच्याच गझला त्याला आठवत नसत. वयोमानाने ताकद कमी झाल्याने एक पाऊल टाकणे अशक्यप्राय होत होते. एक हृदयनाथ मंगेशकर यांनी उपचारासाठी इस्पितळात केलेली मदत वगळता इतर कोणत्याही गायकाने वा त्याच्या चाहत्याने मदत केली नाही. कधी कामशेतच्या किनारा वृध्दाश्रमात तर कधी गुरूद्वाराच्या आश्रमात त्याला दिवस काढावे लागले. त्यावेळी मंगेश रुपटक्के, गणेश पवार यांच्याव्यतिरिक्त फारसे कोणी फिरकलेही नाही. त्याचा त्याला त्रास होत होता. तसाही पहिल्यापासून इलाही हा अबोल आणि मिश्किल होता. त्याची मिश्किली इतकी की गालिबचा एक शेर आहे-

‘हम हैं मुश्ताक और वो बेजार

या इलाही ये माजरा क्या है?’

(आम्ही उत्सुक आहोत व ती उदासीन. हे देवा, ही काय भानगड आहे?)

तो नेहमी खालची ओळ म्हणताना, ‘या इलाही, तू माजला का आहे?’ असे म्हणून मिश्किल हसत असे. अलीकडे ते हसूही हरवले होते. एकूणच त्याची साऱ्या व्यथावेदनांमधून सुटका झाली. वास्तविक गुरूवर्य भट हे अमरावती-नागपूरचे. पण विदर्भात सुरुवातीला त्यांना शिष्य कमी लाभले. पुण्यात आम्ही एकदम पाच शिष्य मिळाल्याने ते खूश होतेे. ही गोष्ट १९८० च्या दरम्यानची. पण झाले काय, इतरांना व्यासपीठ देण्याच्या नादात अनिल कांबळेने स्वतः गझला कमी लिहिल्या. याउलट इलाहीचे होते. किमान रोज एक गझल लिहिण्याचा जणू काही त्याने चंगच बांधला होता. तो ऐकवायचाही पोटभर. अर्ध्याहून अधिक आयुष्य घालवलेल्या येरवड्याच्या त्याच्या छोट्याशा घरात असो की मैफिलीत असो तो भरपेट ऐकवायचा. त्याची ऐकवायची शैलीही ठरलेली होती. तर्जनीच्या झोक्यावर तो मात्रा वृत्तांचा ठेका धरायचा. आपल्याला गळा नाही हे त्याने ओळखून तरन्नुममध्ये (गाऊन) गझल ऐकविण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. उर्दू भाषेत गझलचे चौतीस प्रकार असून त्यातील तेरा प्रकार या भाषेने टाकलेले आहेत. त्यापैकी काही प्रकार मराठीत आणण्याचा बराच प्रयत्न इलाहीने केला. केवळ हे प्रकार नव्हे तर उर्दू गझलांमधील सौंदर्य मराठीत यावे, यासाठी त्याने काही प्रयत्नही केले. त्याबद्दल ‘लोकमत’च्याच अंकात गझलकार श्रीकृष्ण राऊत यांनी एकदा लिहिलेही होते. त्यापैकी एखादेच उदाहरण द्यायचे तर-

‘देर लगी आने में तुमको शुक्र हैं फिर भी आये तो

आस ने दिलका साथ न छोडा वैसे हम घबराये तो’ (अंदलीब शादानी)

इलाहीने मराठीत भाषांतर अगदी सहीसही केले-

‘उशीर झाला तुला यायला अखेर तू आलास तरी

तगमग झाली जरी जिवाची तुटली नाही आस तरी’

सरकारी खात्यातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून केवळ गझलेसाठी जगण्याचे इलाहीने ठरविले. सांगलीकडचे वादळात उडालेले घर, पत्नी व मुलाचा अकाली मृत्यू या साऱ्यातून बाहेर येण्यासाठी त्याने लिखाणावर लक्ष केंद्रित केले. त्याला एकट्याला निवृत्ती वेतनाचे पैसे कसेबसे पुरत असे, पण त्याच्या व त्याच्यासारख्या गझलकारांच्या जीवावर मोठे झालेल्या गझलगायकांनी मात्र त्याला नेहमीच व्यवहारात मागे ठेवले. कधी नाते लावून तर कधी गोड बोलून त्याला मानधन दिले नाही किंवा दिले तरी ते अल्पसे दिले. जवळपास प्रत्येक कवीला हे अनुभव असतात, इलाही त्याला अपवाद नव्हता. पण त्याबद्दलची तक्रार तो काही अगदी जवळचे मित्र सोडले तर कोणाकडे करीत नसे. तो त्याचा स्वभाव नव्हता. त्याला फक्त लिखाण करायचे असे. त्यासाठी शांतता लागायची. मग त्याचा मित्र व अकाली गेलेला गझलकार मलिक नदाफ याने त्याला एकदा पिंपळे सौदागरजवळील एका हॉटेलमध्ये नेले. तिथे तो रमला. नंतर त्या गच्चीवर खास इलाहीसाठी खुर्ची टाकली जायची. तिथे तो लिहित बसायचा. अनेकदा आमच्या भेटी नदाफसह तिथे झाल्या. माझे शिष्य असलेले प्रशांत दिंडोकार, दशरथ दोरके, पोपट खारतोडे त्याला मी मदतीसाठी देत असे. इगतपुरीला आम्हा दोघांचा एक ‘कॉमन’ चाहता होता, डॉ. सुनील मोरे. ते अकाली गेले. पण त्यांनी आम्हा दोघांवर भरभरून प्रेम केले. इलाहीचीही त्याने मैफल इगतपुरीला ठेवली. इलाही तिथल्या निसर्गाच्या प्रेमात इतका पडला की बऱ्याच दिवस तो तिथे राहिला होता. निसर्गावर त्याचे प्रेम होते, तसे मांजरावर होते. घरात तो मांजरी पाळायचा. माणसं, निसर्ग, प्राणी या साऱ्यांच्या आवडीत तो रमला आणि निवृत्तीनंतरचे आयुष्य गझलेत घालवले. मोगऱ्याचे वार विसरून वाळूचे घर बांधून तो सुगंधी जखमांना कुरवाळत निघून गेला. कायमचाच.

kavyavidyavarg@gmail.com

Web Title: Ghazalkar Ilahi Jamadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.