गरजांचा सुवर्णमध्य

By admin | Published: September 2, 2016 04:16 PM2016-09-02T16:16:58+5:302016-09-02T16:16:58+5:30

अती समृद्धी, चैनीतून मग पुन्हा साधेपणाकडे परत वळावेसे वाटणे, जाहिरातींच्या माऱ्यात, मार्केटिंगच्या भूलभुलय्यात सरभरलेल्या मनावर नको झालेल्या, जगण्यात अडगळ वाटू शकणाऱ्या वस्तूंचे ओझे असहनीय झाल्यावर मिनिमलिझमचा शांत, साधा रस्ता माणसाला निर्वाणाकडे नेणारा वाटणे हे साहजिकच. - पण हे सगळ्यांच्या बाबतीत खरे नसतेच!

Gold of needs | गरजांचा सुवर्णमध्य

गरजांचा सुवर्णमध्य

Next
- शर्मिला फडके

साधेपणाने, कमीत कमी वस्तूंसोबत जगण्यात जो एक अंतर्भूत शांतपणा आहे, सौंदर्य आहे, निसर्गाच्या जवळ जाणे आहे त्याकडे आकर्षित होऊन ‘मिनिमलिस्ट’ जीवनशैलीकडे माणसे वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या वळत राहिली. मिनिमलिझमचे विचार, साधने, शिकवण पिढ्या, संस्कृतीनुसार बदलत राहिली. पण त्यामागची मूळ तत्त्वे सारखीच होती. आपल्या मुळांकडे, जगण्यातल्या सोपेपणाकडे वळण्याचे मानवामधले मूलभूत आकर्षण मिनिमलिझममधून प्रतिबिंबित होत राहिले. प्राचीन काळापासून वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये ‘मिनिमलिझम’चे उदयास्त होत राहिले. माणसांच्या जीवनशैलीमध्ये, संगीतापासून ते साहित्य, कलेमध्ये मिनिमलिझमच्या पाऊलखुणा उमटत राहिल्या. 
आधुनिक जगात तर हे आकर्षण किती तीव्र झाले, त्याकरता नवनवीन वाटा कशा आणि कोणत्या शोधल्या गेल्या व जाताहेत हे आपण पाहिलेच आहे. लहान, साधी घरे बांधून त्यात केवळ जीवनावश्यक वस्तूंसोबत जगणे असो, पर्यावरणप्रेमी जीवनशैली अंगीकारणे असो, झेन तत्त्वांचा वापर असो, पाठीवरच्या पिशवीत मावेल इतकेच सामान सोबत घेऊन जगभरात भटकणे असो, चैनीच्या वस्तू, खरेदीचा त्याग करणे असो.. अनेक पद्धती, अनेक कहाण्या... 
साधेपणाने, अडगळविरहित जगण्यात असे काहीतरी विलक्षण प्रेरणादायी आहे ज्याचे प्रत्येक थरातल्या, संस्कृतीतल्या माणसाला सातत्याने आकर्षण वाटत राहिले. पैसे वाचवणे, वेळ वाचवणे अशा भौतिक फायद्यांपासून ते मन:शांती, एकाग्रता वाढणे अशा मानसिक फायद्यांपर्यंत अनेक असल्याने त्याचा स्वीकार होत राहिला. जगण्याचा झगडा ते अतिमुबलकता या दोन टोकांच्या दरम्यान हा मिनिमलिझम सातत्याने हेलकावत राहिला. अती समृद्धी, चैनीतून मग पुन्हा साधेपणाकडे परत वळावेसे वाटणे, जाहिरातींच्या माऱ्यात, मार्केटिंगच्या भूलभुलय्यात सरभरलेल्या मनावर नको झालेल्या, जगण्यात अडगळ वाटू शकणाऱ्या वस्तूंचे ओझे असहनीय झाल्यावर मिनिमलिझमचा शांत, साधा रस्ता माणसाला निर्वाणाकडे नेणारा वाटणे हे साहजिकच. अर्थात असे सर्वांनाच वाटले नाही. कोणत्याच पिढीत, कोणत्याच संस्कृतीत मिनिमलिझम सर्वार्थाने स्वीकारला गेला नाही. मिनिमलिझम काही वर्षांनंतर, पिढ्यांनंतर पुन्हा पुन्हा डोकं वर काढत राहिला, याचाच अर्थ तो वेळोवेळी अस्तंगतही होत राहिला. उपभोगवाद पुन्हा पुन्हा मिनिमलिझमवर मात करत राहिला.
मिनिमलिझमचा विचार समाजातल्या सर्व स्तरांमधे कधीही सार्वत्रिकतेनं का स्वीकारला गेला नाही याचीही कारणे पाहणे गरजेचे ठरते. 
मिनिमलिझम सार्वत्रिकरीत्या स्वीकारला न जाण्याचे मूलभूत कारण अर्थातच आर्थिक असमतोल आणि त्यातून रु जणारी भिन्न सामाजिक मानसिकता. 
माझ्याकडचे शंभर शर्ट्स, हजार पुस्तके, हजार स्क्वेअर फूट घरातले दोन ट्रकांमध्ये मावेल इतके सामान कमी करून आता मी फक्त पाच शर्ट्स, दहा पुस्तके आणि पिशवीत मावेल इतक्याच सामानावर दीडशे स्क्वेअर फूट जागेमध्ये राहतो आहे असे एखाद्याने मिनिमलिस्ट जीवनशैली जगायचे ठरवल्यावर लिहिणे हे त्या व्यक्तीच्या दृष्टीने खरोखरच कष्टसाध्य आणि कौतुकास पात्र असणारे ठरत असले, तरी अनेक बेघर, गरीब स्तरातील व्यक्तींच्या तुलनेत असे मिनिमलिस्ट अवस्थेतील जगणेही चैन ठरू शकते. जीवनावश्यक वस्तू ही संकल्पना अनेकदा सापेक्ष असते. त्यामुळे मिनिमलिझमची चळवळ अनेकांच्या दृष्टीने ‘स्टंटबाजी’ किंवा ‘फॅड’ अशा अर्थाने घेतली गेली. 
मिनिमलिझम ही संकल्पना मुबलकतेच्या अतिरेकातून आली असल्याने त्याचा वापर समाजाच्या एका विशिष्ट स्तरापर्यंतच मर्यादित असतो. मिनिमलिझम संकल्पना ही श्रीमंत, जास्त पर्याय निवडण्याची मुभा असलेल्यांकरताच आहे आणि आर्थिकदृष्ट्या गरीब गटाला मिनिमलिझमची गरजच नाही, कारण अभावात साधे जगायला लागणे ही मजबुरी असते. त्यामुळे या स्तरामध्ये मिनिमलिझमची गरजच नाही. अशी समजूत हा मुळातच एक महत्त्वाचा गैरसमज आहे. तुमच्या जवळ असलेल्या वस्तू हा मिनिमलिझमच्या गरजेचा मानक नाही. गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटुंबाला अनेकदा स्वस्त किमतीच्या अनेक लहानसहान वस्तू जवळ बाळगाव्या लागतात, त्या लवकर खराब होत असल्याने त्यांची खरेदी वारंवार होत राहते. त्या उलट श्रीमंत व्यक्ती कमी संख्येच्या पण अधिक किमतीच्या वस्तू दीर्घकाळ टिकणाऱ्या वापरू शकते. त्यांना वस्तूंचा साठा करून ठेवण्याचीही आवश्यकता नसते. 
ग्राहककेंद्रित समाजामध्ये जाहिरातींच्या भडिमाराचा सर्वाधिक परिणाम होणारा वर्ग हा आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरावरचाच असतो. आपल्याला परवडू न शकणाऱ्या, हव्याश्या वाटणाऱ्या वस्तूंचा सातत्याने केला जाणारा त्यांच्या मनातला विचार हा प्रसंगी जीवनावश्यक गरजा बाजूला सारून चैनीच्या वस्तू जमवण्याच्या मागे लागण्याइतका प्रबळ ठरतो. टिकावू पण महाग वस्तू न परवडल्याने हा वर्ग स्वस्त, तकलादू वस्तूंच्या बाजारपेठेच्या जाळ्यात अडकतो. 
साधेपणाचे तत्त्व स्वीकारून भौतिक सुखांचा, चैनीच्या वस्तूंचा त्याग करून आयुष्य सोपेपणाने, साधेपणाने जगणारे अनेक जण वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये पाहायला मिळतात. मात्र ते कायमच अपवाद ठरलेले आहेत. 
चैनीच्या, सुखकारक वस्तू आजूबाजूला विखरून असताना, त्या विकत घेणे सहजसाध्य असताना त्यांच्याकडे पाठ फिरवून साधे जगायला खूप मोठा मनोनिग्रह लागतो, ते जास्त कष्टप्रद आहे. मिनिमलिझमचे तत्त्व आयुष्यभर निभावणे सोपे नाही. मिनिमलिझमकडे स्वत:हून वळलेल्या आणि या विचारसरणीशी आयुष्यभर प्रामाणिक राहिलेल्या व्यक्ती मोजक्याच आहेत. 
संन्यस्त वृत्ती स्वीकारणे हे या साधेपणाचे आध्यात्मिक टोक. अर्थातच ते संसाराचा पसारा मुळातच फार न मांडलेल्यांनाच साध्य. मिनिमलिझम ही संकल्पना त्या अर्थाने व्यक्तिवादी ठरते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला या संकल्पनेचा स्वीकार मान्य असेलच असे नाही. आणि तसा तो नसेल तर मिनिमलिझम लादणे हा फार मोठा अन्याय, तिचा टिकावही अशक्य. आपल्या कुटुंबाला जास्तीत जास्त सुखसोयी पुरवण्याचा प्रयत्न करण्याच्या मूलभूत मानवी प्रेरणेच्या विरोधात जाणारी मिनिमलिझम संकल्पना आहे असे अनेकांना वाटते. 
ग्राहक-संस्कृतीचा, खरेदीचा अतिरेक आणि त्याचा एकंदरीतच पर्यावरणावर होणार दुष्परिणाम, नैसर्गिक स्रोतांवर पडणारा ताण, विल्हेवाटीची समस्या आणि सर्वात महत्त्वाचे अधिक कमवा-अधिक खरेदी करा या दुष्टचक्र ात अडकल्यावर उद्भवणारा शारीरिक आणि मानसिक तणाव टाळायचा असेल तर मिनिमलिझम संकल्पनेला शरण जाण्यावाचून पर्याय नाही, या विचाराला पाठिंबा देणारी आणि त्याचा प्रतिवाद करणारी मते टोकाची असू शकतात. 
पण दोन्हींचा मध्य साधण्याचा प्रयत्न सातत्याने चालू ठेवण्यावाचून सध्या तरी पर्याय नाहीच. 

आद्य मिनिमलिस्ट म्हणून ज्याचे नाव घेतले जाते ते हेन्री डेव्हिड थोरो ज्याने आपल्या आयुष्याचा बराचसा उत्तरार्ध वाल्डेनच्या तळ्याकाठी, एका लहानशा घरामध्ये, गरजेपुरत्या वस्तूंच्या सोबतीने एकांतात व्यतित केला त्यानेही नंतर बरीच वर्षे आपल्या पिढीजात, भल्यामोठ्या, सुखसोयींनीयुक्त अशा घरामध्ये घालवल्याचे इतिहास सांगतो. म्हणजे मग मिनिमलिझम हा आपण असेही जगू शकतो इतक्याच साध्यापुरता मर्यादित ठेवायचा का? आयुष्यभर हे व्रत निभावणं विनाजबाबदारी, स्वतंत्र, एकटेपणाने राहणाऱ्यांनाच जमू शकत असेल का?

(लेखिका ख्यातनाम कलासमीक्षक आहेत)
 

sharmilaphadke@gmail.com

Web Title: Gold of needs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.