आकाशवाणीच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार
By admin | Published: November 8, 2014 06:22 PM2014-11-08T18:22:24+5:302014-11-08T18:22:24+5:30
आकाशवाणीचा सुवर्णकाळ प्रत्यक्ष अनुभवलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्रीराम मांडे. या काळात अनेक दिग्गजांच्या भेटीने त्यांचे आयुष्य समृद्ध झाले. अशा या कलाप्रेमी माणसाचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मुलाने जागविलेल्या त्यांच्या आठवणी.
Next
डॉ. दीपक मांडे
' सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख,’ असं जरी रामदासस्वामींनी सांगून ठेवलेलं असलं, तरी हा मूर्खपणा मी आज जरूर करणार आहे. कारण, स्वत:ला आयुष्यभर ‘लो-प्रोफाईल’ ठेवणार्या आणि कायम पडद्यामागे राहून अनेक गुणी कलाकारांना सतत प्रोत्साहन देणार्या माझ्या वडिलांविषयी त्यांच्या निधनानंतरसुद्धा काही सांगितलं नाही, तर तो एक मोठाच मूर्खपणा ठरेल!
माझे वडील श्रीराम मांडे यांचे ४ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले. आम्ही सर्व जण त्यांना ‘भाऊ’ म्हणत असू. १९४९ ते १९८७ यादरम्यान आकाशवाणीच्या सुवर्णकाळात मुंबई आणि पुणे केंद्रांवर ड्रामा व्हॉईस, निवेदक, नाट्य विभाग सहायक, सिनि. प्रॉडक्शन असिस्टंट अशा विविध पदांवर काम करीत ‘प्रसारण अधिकारी’ या पदावरून ते नवृत्त झाले.
आकाशवाणीचा हा काळ मोठा मंतरलेला होता. नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. जनसामान्यांपुढे नाटक, चित्रपट आणि आकाशवाणी ही तीनच साधनं करमणुकीसाठी, प्रबोधनासाठी उपलब्ध होती. त्यामुळे रेडिओवर काम करणार्या कलाकारांभोवतीही वलय निर्माण झालेलं असे. त्याला अजूनही एक कारण होतं. ते म्हणजे, त्या काळी मोठमोठय़ा दिग्गज कलावंतांना आकाशवाणी खास, सन्मानानं आपल्याकडे काम करण्यास आमंत्रित करीत असे. या काळातच पु. ल. देशपांडे यांच्या नाट्य विभागात भाऊंची, साधारण १९५२ ते ५६ पर्यंत, पु. लं.चे सहायक म्हणून नेमणूक झाली. याच काळात पु. लं.चे वार्यावरची वरात, बटाट्याची चाळ आदींचे प्रयोग सुरू होते. ‘तुझे आहे तुजपाशी’चे लेखन-दिग्दर्शनही चालू होते. ‘तुझे आहे तुजपाशी’चे अनेक प्रसंग लिहिण्यासाठी भाऊ पु. लं.चे लेखनिक झाले होते. साहित्य संघात चालणार्या या नाटकाच्या बहुतेक सर्व तालमींना भाऊंची हजेरी असे. या तालमी बारकाईनं बघता-बघताच भाऊंना नाटकाचे, आवाजाचे, लेखनाचे, नाट्यदिग्दर्शनाचे धडे मिळत गेले. भाऊंच्यासाठी पु. लं.चा सहवास, तुझे आहे तुजपाशी’च्या लेखन-दिग्दर्शनाची प्रक्रिया नाटकाच्या तालमी ही जणू नाट्यशिक्षणाची कार्यशाळाच ठरली. त्यांचं जणू नाटकाच्या सर्व अंगांचं शिक्षणच इथं
झालं. रवींद्र पिंगे यांनी पु. लं.वर लिहिलेल्या एका लेखात भाऊंचं ‘पु. लं.चा उजवा हात’ असं यथार्थ वर्णन केलं आहे.
त्या वेळी मुंबई आकाशवाणी केंद्राचा दरबार अनेक लखलखत्या कलावंतांनी भरलेला होता. कविवर्य मंगेश पाडगावकर, केशवराव भोळे, पं. गजाननराव जोशी, पं. नरेंद्र शर्मा, कविवर्य राजाभाऊ बढे, पं. जितेंद्र अभिषेकी, आदी त्या काळातही काव्य-साहित्य-नाटक-संगीत अशा सर्व कलाक्षेत्रांतील मातब्बर कलावंत मंडळी आकाशवाणी मुंबईच्या दरबारात होती. या सर्व उदात्त माहोलाचे भाऊंच्या कलासक्त मनावर नकळतच
मोठे संस्कार झाले, जाणिवांचं क्षितिज विस्तारलं, मन प्रगल्भ झालं आणि त्यांच्यातल्या कलाकाराची जडणघडण झाली.
साधारण १९५९नंतर भाऊ पुणे आकाशवाणी केंद्रावर बदली होऊन आले. इथंदेखील गोपीनाथ तळवलकर, सई परांजपे, व्यंकटेश माडगूळकर, ज्योत्स्ना देवधर, रवींद्र भट, जयराम कुलकर्णी, पुरुषोत्तम जोशी, राम फाटक यासारखे प्रतिभावंत कलाकार गोतावळ्यात होते. त्या वेळी डॉ. अनंत फाटक इथं ‘नाट्य विभागाचे निर्माते’ होते आणि भाऊ त्यांचे निर्मिती सहायक. रात्री ९.३0 वाजता प्रसारित होणारी नभोनाट्यं आणि दिवाळीच्या निमित्तानं सादर केलं जाणारं एखादं संगीत नाटक हे श्रोत्यांच्या प्रथम पसंतीचे कार्यक्रम असत.
संगीत रंगभूमीचे दिवस मावळत चाललेले होते. आकाशवाणीवरून होणार्या नभोनाट्य रूपांतरामुळे संगीत रंगभूमीचे काहीअंशी तरी पुनरुज्जीवन होत असे. अनेक नामवंत नाट्यकलावंत या वेळी आकाशवाणीवर हजेरी लावून गेलेले आहेत.
भाऊ नेहमी सांगत, की आकाशवाणीच्या नभोनाट्यात आणि रंगमंचावरील नाटकात सादरीकरणाच्या आणि अभिनयाच्या दृष्टीनं खूप फरक असतो. इथं आकाशवाणी या माध्यमाचं वेगळेपण ठळकपणे अधोरेखित होत असे.
रेडिओतील मायक्रोफोनपुढे कसं बोलायचं, आवाजाचा, खासकरून ‘व्हिस्पर’चा उपयोग कसा करून घ्यायचा, ध्वनिमुद्रण चालू असताना ‘लाल दिवा’ लागल्यावर कसं थांबायचं, हातात धरलेल्या कागदांचादेखील आवाज न करता पानं कशी बदलायची, नाटकाच्या ध्वनिमुद्रणासाठी अनेक कलावंत एकाच वेळी हजर असतील, तर इतरांनी कसं शांत राहायचं इत्यादी सर्व बारीकसारीक गोष्टी भाऊ कलावंतांना अत्यंत मन लावून समजावून सांगत असत. त्यामुळेच भाऊ आकाशवाणीवर येणार्या कलावंतांचे खूपच लाडके झाले होते.
भाऊंनी कित्येक वृद्ध किंवा नवृत्त नाट्यकलावंतांना आकाशवाणीवर काँट्रॅक्ट मिळवून देण्यासाठी खूप मदत केली आहे. कित्येकदा या काँट्रक्टमधून मिळणारं मानधन हे त्या-त्या कलाकारांच्या उदरनिर्वाहाचं साधन ठरत असे.
भाऊंनी आकाशवाणीतील बदलत्या तंत्रज्ञानाची अनेक स्थित्यंतरं पाहिली होती. सुरुवातीच्या काळात ध्वनिमुद्रणाचं तंत्रज्ञानच अवगत नव्हतं. त्यामुळे नाटकांच्या, श्रुतिकांच्या २-२ दिवस कसून तालमी चालत आणि मग ते नभोनाट्य ‘प्रत्यक्ष प्रसारित’ (ऊ्र१ीू३ इ१ूंिं२३) होत असे. नंतर ध्वनिमुद्रण तंत्रज्ञान आलं; पण ते आजच्यासारखं ‘डिजिटल’ नव्हतं, तर ‘अँनॅलॉग’ पद्धतीचं, अतिशय कठीण-किचकट असं होतं. आकाशवाणी पुणे केंद्रात ध्वनिमुद्रणाची चार मोठमोठाली मशिन होती. एका मशिनवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण झालेलं स्पूल-टेप लावायचे, दुसर्यावर साऊंड इफेक्टचे किंवा पार्श्वसंगीतातले आणि तिसर्यावर दोन्हींचे ‘मिक्सिंग’ झालेले फायनल टेकचे. त्यामुळे एखादा कलाकार वाक्य चुकला असेल वा अडखळला असेल किंवा खाकरला/ शिंकला वा खोकला असेल, तर हे सर्व दोष फायनल टेपमध्ये येऊ न देता त्याचं पुनध्र्वनिमुद्रण-मिक्सिंग करावं लागे. भाऊ या कामात अतिशय निष्णात होते. हे काम त्यांनी आकाशवाणीच्या ताफ्यात नव्यानं सामील होणार्या त्यांच्या कित्येक ज्युनिअर सहकार्यांना मोठय़ा आनंदानं समजावलं, शिकवलं आहे.
त्या काळी एखादा विशिष्ट कार्यक्रम-संगीताची मैफल, नभोनाट्य, मुलाखत वा भाषण- आकाशवाणीच्या एखाद्या केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम इतर केंद्रानींही त्याच वेळी सहक्षेपित करायचा असेल, तर त्याच्या सात-आठ वेगवेगळ्या टेप तयार कराव्या लागत आणि त्या केंद्रांना तातडीनं पाठवाव्या लागत. पुणे केंद्राची निर्मिती असलेला असा कार्यक्रम आकाशवाणीवरून प्रसारित होईपर्यंत भाऊ घरी रेडिओला कान लावून, जागचेही न हलता शब्दन् शब्द ऐकत असत. आपल्या कामाच्या जबाबदारीची
जाणीव आणि कामावर असलेलं आत्यंतिक प्रेम यामुळेच कार्यक्रम यथासांग पार पडेपर्यंत ते अत्यंत टेन्शनमध्ये असत.
त्या काळी आकाशवाणीवर जी नभोनाट्यं चालत, त्यासाठी ‘ड्रामा ऑडिशन टेस्ट’ द्यावी लागे. आमच्या कसबा पेठेतल्या घरी अनेक तरुण-तरुणी भाऊंच्याकडे रेडिओवर कसं बोलायचं, हे शिकायला येत आणि भाऊदेखील संध्याकाळी घरी आल्यावर अशा सर्वांना मोठय़ा मनमोकळ्या पद्धतीनं शिकवीत असत. हौसेखातर नाटकातून काम करणार्या मला नाट्यशिक्षणाचे पहिले धडे हे असे अप्रत्यक्षपणे, भाऊ इतरांना शिकवीत असताना मिळत गेले.
भाऊंच्या एकंदरीत स्वभावातच विलक्षण भारावलेपण होतं. कोणतीही कविता, चित्र, नाटक, लेख, गाणं, सिनेमा काहीही चांगलं दिसल्यास स्वत:च्या वयाचा, ज्येष्ठत्वाचा कोणताही अहंभाव न ठेवता, ते त्या-त्या कलाकाराचं कौतुक करीत असत. ते नेहमी म्हणत, ‘अरे टीकाकार व्हायला काही लागत नाही; पण दुसर्याच्या गुणांचं कौतुक करायला, शाबासकी द्यायला, ‘सिंहाचं काळीज असावं लागतं.’ आणि याच धोरणानुसार ते आकाशवाणीत येणार्या नवोदित कलाकारांचं स्वागत करीत असत.
भाऊंनी आकाशवाणीच्या निवेदन, श्रुतिका, आऊट ब्रॉडकास्टिंग, भाषण इ. अनेक विभागांत काम केलं. ‘वाणी’ (श्राव्य नियतकालिकाचा कार्यक्रम), चिंतन, गांधीवंदना अशा कार्यक्रमांसाठी भाऊ त्यांच्या इतर नेमलेल्या कामांतून वेळात वेळ काढून नियमानं निवेदन करीत असत. भाऊंच्या निवेदन केलेल्या गांधीवंदना, चिंतन या कार्यक्रमांवर हे कार्यक्रम लिहिणारे अनेक लेखक उदा. बाळासाहेब भारदे, प्रा. स. शि. भावे, डॉ. गं. ना. जोगळेकर बेहद्द खूष असत. ‘आमचे आम्ही’ या दैनंदिन घटनांवर आधारित कौटुंबिक श्रुतिकामालिकेतील भाऊंनी केलेली ‘स्टॉक कॅरॅक्टर’ श्रोत्यांच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहिली आहे.
आकाशवाणीच्या कामाव्यतिरिक्त भाऊ एक उत्तम कवीही होते. ‘अंतर्साद’ आणि ‘चक् चक् चकली’ (बालकवितांचा संग्रह) असे त्यांचे २ संग्रह प्रकाशित झाले आहेत. भाऊंच्या अनेक बालकविता नियमानं प्रसिद्ध होत. ते पाहून खुद्द मंगेश पाडगावकरांनीच भाऊंना बालकवितांवर लक्ष केंद्रित करायला सांगितलं होतं. आणि योगायोग असा, की प्रकाशनही त्यांच्या हस्तेच २00८मध्ये झालं.
भाऊ पुरुषोत्तम करंडकासारख्या अनेक नाट्यस्पर्धांचे परीक्षक म्हणूनही काम करीत. भाऊ खूप सुंदर ‘नकला’ करीत. त्यांचा हा ‘न’ कलागुण आकाशवाणीतील त्यांच्या सहकार्यांना चांगलाच ठाऊक आहे. दुपारी जेवणाच्या वेळी, रवींद्र आपटे, चंद्रकांत कामत, लालजी गोखले, आबा तुळशीबागवाले, शुभदा अभ्यंकर, अगरवाल मॅडम इ. ‘डबा-कंपू’त हा नकलांचा कार्यक्रम चालत असे.
कविवर्य मंगेश पाडगावकर आणि भाऊ हे दोघेही मुंबई आकाशवाणी केंद्रातील एकमेकांचे सहकारी, सोबती. ‘चक् चक् चकली’च्या प्रकाशनासाठी आलेले असताना पाडगावकरांनी त्यांनी ३0 वर्षांपूर्वी केलेली, गायक आर. एन. पराडकरांची नक्कल करायला आवर्जून सांगितले आणि ३0 वर्षांपूर्वीची ती नक्कल कॅन्सरमुळे झालेल्या देहाच्या कृश अवस्थेतही भाऊंनी मोठय़ा सराईतपणे केली होती. ते पाहून पाडगावकर आणि प्रा. माधव वझे दोघेही हसून हसून बेजार झाले होते. त्यांची स्मरणशक्ती शेवटपर्यंत अत्यंत तल्लख होती. फेब्रुवारी २0१४च्या पहिल्या आठवड्यात आठवडाभर आयसीयूमध्ये अँडमिट होऊन ते घरी आले; पण घरी आल्यावर त्यांना कळलं, की १३ फेब्रुवारी हा ‘रेडिओ दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांनी दिवसभरात चार फुलस्केप भरून ‘आकाशवाणी मुंबई’ केंद्राच्या आठवणी स्वत:च्या वळणदार अक्षरात लिहून काढल्या आणि त्या प्रसिद्धही झाल्या.
‘आकाशवाणी’ हे भाऊंसाठी ‘ज्ञान, माहिती आणि कला’ यांचं मोठं विद्यापीठच होतं. आकाशवाणीच्या सुवर्णकाळाच्या या साक्षीदारानंदेखील तेवढय़ाच भक्तिभावानं शेवटपर्यंत आकाशवाणीवर नितांत प्रेम केलं आणि आकाशवाणीविषयीचा सार्थ अभिमान उरी बाळगला!
(लेखक डॉक्टर आहेत.)