सरकारे बदलली, कोकण उपेक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 12:30 AM2019-06-02T00:30:19+5:302019-06-02T00:31:14+5:30

कोकण हा आजवर उपेक्षित राहिलेला भाग. राजकीयदृष्ट्या या भागाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे आणि राज्यस्तरावर कोकणाची छाप पाडण्यात इथले राजकीय नेते अयशस्वी झाल्यामुळे कोकणात अनेक प्रकल्प सुरूच झाले नाहीत किंवा सुरू होऊन वर्षानुवर्षे रखडले. काम ठप्प झालेल्या सिंचन प्रकल्पांसाठी जवळजवळ सहा वर्षे

 Governments changed, Konkan neglected | सरकारे बदलली, कोकण उपेक्षितच

सरकारे बदलली, कोकण उपेक्षितच

Next
ठळक मुद्देती मागणी कोकणातून कंठ फोडून केली जात असली, तरी सरकारचे कान बंदच आहेत.

मनोज मुळ््ये

कोकण हा आजवर उपेक्षित राहिलेला भाग. राजकीयदृष्ट्या या भागाकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे आणि राज्यस्तरावर कोकणाची छाप पाडण्यात इथले राजकीय नेते अयशस्वी झाल्यामुळे कोकणात अनेक प्रकल्प सुरूच झाले नाहीत किंवा सुरू होऊन वर्षानुवर्षे रखडले. काम ठप्प झालेल्या सिंचन प्रकल्पांसाठी जवळजवळ सहा वर्षे काहीच हालचाली नाहीत. १२ प्रकल्प चौकशीमुळे ठप्प झाले आहेत आणि उर्वरित प्रकल्प निधी नाहीत म्हणून ठप्प झाले आहेत.

कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी निर्णयाअभावी प्रलंबित आहे. कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठाची मागणी दुर्लक्षित आहे. फक्त सरकारे बदलली. कोकणाचे प्रकल्प आहेत तिथेच आहेत. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार असताना जलसिंचन विभागात मोठा घोटाळा झाला. लाचलुचपत खात्याकडून या घोटाळ्याची चौकशी सुरू झाली. त्यासाठी आघाडी सरकारनेच राज्यातील काही पाटबंधारे प्रकल्पांना स्थगिती दिली. त्यात रायगड जिल्ह्यातील कोंडाणे, बाळगंगा, काळू प्रकल्प, शाई, सुसरी, काळ जलविद्युत प्रकल्प, रत्नागिरी जिल्ह्यातील गडगडी मध्यम, जामदा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरसिंगे, गडगडी मध्यम, शीळ लघु प्रकल्प अशा १२ प्रकल्पांचा समावेश आहे. चौकशीसाठी म्हणून या प्रकल्पांची कामे बंद करण्यात आली. सहा वर्षे झाली तरीही ही कामे सुरू झालेली नाहीत.

१२ प्रकल्पांची कामे चौकशीसाठी म्हणून बंद झाली; पण त्याखेरीजही अनेक कामे निधीअभावी बंद आहेत. राजापूर तालुक्यातील अर्जुना प्रकल्पाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. आता केवळ कालव्याच्या कामासाठी हे धरण रखडले आहे. पाटबंधारे प्रकल्पच अपूर्ण आहेत असे नाही, तर या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे प्रश्नही अजून तसेच आहेत. या धरणग्रस्तांनी मध्यंतरी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ४३ दिवस आंदोलनही केले. मात्र, आश्वासनाखेरीच त्यांच्या पदरात काहीच पडले नाही. आधी पुनर्वसन, मग प्रकल्प हे धोरण फक्त कागदावरच राहते.

कोकणासाठी विशेषत: रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी आणखी दोन महत्त्वाचे विषय म्हणजे कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ. नियमित विद्यापीठ आणि मत्स्य विद्यापीठ. या दोन्हीबाबत विद्यमान सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मुंबई विद्यापीठावरील ताण वाढला आहे. कोकण खूप मोठ्या प्रमाणात बदलतोय. मोठमोठे प्रकल्प येत आहेत. महामार्ग रुंदीकरण सुरू झाल्यामुळेही कोकणात बदल होणार आहेत. अशावेळी शिक्षण क्षेत्रातही बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ मिळावे, ही मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे मात्र अजून मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सक्षम करण्याच्याच घोषणा करत आहेत. तशीच अवस्था आहे मत्स्य विद्यापीठाची. ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा असलेल्या कोकणाऐवजी समुद्रापासून हजारो कि.मी. लांब असलेल्या नागपूरला मत्स्य विद्यापीठ आहे. ती मागणी कोकणातून कंठ फोडून केली जात असली, तरी सरकारचे कान बंदच आहेत.

Web Title:  Governments changed, Konkan neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.