आजी सोडून गेली; पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 09:30 AM2018-12-30T09:30:00+5:302018-12-30T09:30:03+5:30

हरवलेली माणसं :बेवारस आजीची कित्येक वर्षांनंतर आम्ही घडवली मुलीशी भेट! दोघीही सुखावल्या. त्यांच्या आनंदाला आम्ही आनंद मानलं! अलीकडं आजी गेली म्हणून समजलं. ऐकून वाईट मानावं की, समाधान हेही कळत नव्हतं. तिच्या बेवारस जगण्याची ही गोष्ट. 

The grandmother left; But ... | आजी सोडून गेली; पण...

आजी सोडून गेली; पण...

googlenewsNext

- दादासाहेब श्रीकिसन थेटे

भर व्यापाऱ्याच्या वस्तीत गेल्या सालभरापासून रुक्मिणीबाई साखरे नावाच्या आजी बेवारस अवस्थेत राहत होत्या. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडून भेटेल ते खाऊन, हनुमान मंदिरात निवारा अन् रस्त्यालाच घर समजून दिवस ढकलणं हेच त्यांचं आयुष्य! आपली मुलगी आज ना उद्या भेटेल, ही एकच आशा!

कडाक्याच्या थंडीत काही दिवसांपूर्वी दोन्ही पायांना झालेल्या जखमांमुळं जिवाच्या आकांतानं, ही आजी ओरडत सडत पडलेली होती. श्रीमंतांच्या या रस्त्यावर म्हातारी अनवाणी एकाकीपणानं रडत होती, विव्हळत होती. जखमा अळ्या पडल्यामुळं आतून ठणक मारत असल्यानं, म्हातारीच्या जिवाची तडफड होत होती. ही वेदना पाहून योगेश दादांनी फोन करून मला म्हातारीचा सविस्तर वृत्तांत कळवला. मी, दत्ताभाऊ आणि रफत गाडी घेऊन म्हातारीजवळ पोहोचलो. तिचे दोन्ही पाय सुजून फुगले होते. एका पिंढरीतून रक्तस्राव होत होता, तर दुसऱ्या पंजातून जखम चिघळली होती. शरीराची हालचाल न करता आल्यामुळे कपड्यातच झालेल्या मलमूत्रामुळे अंगातून दुर्गंधी येऊ लागली होती. त्याच अवस्थेत आम्ही तिला उचलून गाडीत टाकलं अन् दवाखान्यात दाखल केलं. 

म्हातारी जसजशी बोलू लागली, तसे तिच्या आयुष्यातील वेगवेगळे पैलू आमच्यासमोर उलगडू लागले. ‘मरण सोपं, जगणं कठीण,’ असं का म्हणतात हे म्हातारीला पाहून कळत होतं आणि तितकंच छळतही होतं. एखादं म्हातारं दुभतं जनावर रस्त्यावर सापडलं असतं, तर त्याच्यापासून होणाऱ्या फायद्यासाठी त्याला कुणीही ठेवून घेतलं असतं; पण बेवारस माणसाला या जगात काडीची किंमत नाही, हे म्हातारीच्या या अनवाणी जगण्यातून कळत होतं. तिच्या पूर्वायुष्यातल्या कष्टी जीवनाचा आणि वैभवाचा तिला कसलाच विसर पडलेला नव्हता. माणूस मरणावस्थेतही भूतकाळातल्या वैभवाच्या आठवणींना जपताना स्वत:ला किती पोखरत असतो, हे म्हातारी तिच्या प्रत्येक शब्दातून व्यक्त करीत होती. 

तिच्या सांगण्यावरून मी तिच्या नातेवाईकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. सोशल मीडियाच्या सकारात्मक वापरामुळं वडवणीचे शिवाजी तौर नेकनूरला (जि. बीड) चौकशीसाठी गेले. तिच्या सांगण्यावरून त्यांच्या समाजातील काही लोकांशी आम्ही संपर्क केला. शेवटी रमेश काका सोनवणे (अंबड) यांच्या मदतीनं तिच्या नातेवाईकांचा आम्हाला शोध लागला.

नातेवाईकांकडून तिच्या मुलीशी संपर्क करण्यात आम्हाला यश आलं. ती घरची खूप गडगंज. एकच मुलगा होता. तोही वारला. दोन मुली. एक गेवराईला, तर दुसरी जालन्यात दिली. आधी काही दिवस ही आजी या दोन्ही मुलींकडं राहिली. नंतर मात्र दोन्ही जावयांनी तिला घराबाहेर काढलं. हे सर्व आम्हाला समजलं. त्यांच्या मुलीशी केलेल्या दीर्घ चर्चेनंतर जालना इथं राहणाऱ्या तिच्या मुलीशी आजीची कित्येक वर्षांनंतर भेट घडविण्यात आम्हाला यश आलं. कालपर्यंत बेवारस म्हणून फिरणाऱ्या आजीला तिची पोटची लेक पाहून खूप भरून आलं होतं. तिच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रू ओघळत होते. लेकीलाही आईला पाहून आनंद झाला होता. त्या आजीनं काही दिवसांपूर्वीच या जगाचा निरोप घेतला. समाधान याचंच की, तिनं आपला अंतिम श्वास लेकीच्या घरात घेतला.  
 

Web Title: The grandmother left; But ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.