स्वर-भावगंधर्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:03 AM2019-10-20T06:03:00+5:302019-10-20T06:05:06+5:30
पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या ‘भावसरगम’चे अनेक कार्यक्र म मी ऐकले होते. प्रत्येकवेळी वाटायचं, बाळासाहेबांशी माझी कधी ओळख होईल? तो योग यायला पुढे दहा वर्षे गेली. दीनानाथ व माई मंगेशकर यांच्या ओरिजिनल पेंटिंगवरून मोठे फोटो करायच्या निमित्ताने पहिल्यांदा त्यांची प्रत्यक्ष भेट झाली आणि त्यानंतर त्यांच्यातला कलावंत, त्यांची चिकित्सक नजर, परिपूर्णतेचा ध्यास, त्यांची प्रगाढ विद्वत्ता आणि त्यांच्यातला ‘साधू पुरुष’ प्रत्येक वेळी भेटत गेला.
- सतीश पाकणीकर
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातला एक गौरव पुरस्कार प्रदान सोहळा. तसे पुण्यात पुरस्कारांचे सोहळे खूपच असतात. पण हा जरा विशेष होता. प्रसिद्ध बासरीवादक, कॉपीरायटर, संगीताचे जाणकार व प्राध्यापक र्शी. अजित सोमण यांच्या नावे देण्यात येणार्या ‘स्वर-शब्द-प्रभू’ या पुरस्काराचा सोहळा होता तो. पुरस्कारार्थी होते र्शी. अरु ण काकतकर आणि प्रमुख पाहुणे होते प्रतिभावान संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर. पुरस्कार वितरणानंतर पं. हृदयनाथ मंगेशकर बोलण्यास उभे राहिले. प्रमुख वक्ते अशावेळी पुरस्कारार्थीबद्दल गौरवाचे शब्द बोलतातच. इथे तर बर्याच वर्षांपासूनचे त्यांचे मित्न असलेले काकतकर पुरस्कारार्थी होते. त्यांच्या बरोबरच्या आठवणी तर पंडितजींनी खास हृदयनाथी शैलीत जागवल्याच; पण मंत्नमुग्ध झालेल्या र्शोत्यांवर आश्चर्य करण्याची वेळ आली ती पंडितजींच्या एका महत्त्वाच्या वाक्याने. पंडितजी म्हणाले- ‘‘मला लोकप्रिय करण्यात, माझे संगीत रसिकांपर्यंत पोहोचण्यात व आज मी जो काय प्रसिद्ध आहे त्यात 80 टक्के वाटा हा अरु ण काकतकर यांचा आहे. त्यांनी मला आग्रह करून दूरदर्शनवर नेले नसते, तर मी आज कोणीच नसतो.’’
त्यांच्यासारख्या व्यक्तीचे हे प्रामाणिक उद्गार ऐकून सगळे प्रेक्षागृह स्तब्धच झाले. असे उद्गार जाहीरपणे तोंडून येण्यासाठी लागणारी पारदर्शकता, मनस्वीपणा व दुसर्याला त्याचे र्शेय देण्याची वृत्ती रसिक अनुभवत होते. हे आठवण्याचे कारण म्हणजे हेच नव्हे तर पं. हृदयनाथ मंगेशकर या असामान्य कलावंताची अशी अनेकानेक वैशिष्ट्य त्यांच्या बर्याच वर्षांच्या ओळखीमुळे मला अनुभवता आली. त्यांचा स्नेह लाभला, संगीताशिवाय इतरही अनेक कलांचा त्यांचा अभ्यास जाणून घेता आला. एखादी व्यक्ती वेगवेगळ्या अंगाने किती र्शेष्ठ आहे याचा जेव्हा आपल्याला उलगडा होऊ लागतो त्यावेळी आपल्याला नशिबाने मिळालेल्या या आयुष्यात किती बहार आहे, किती ज्ञान आहे याचा साक्षात्कार होऊ लागतो. मग तो साक्षात्कार ही माझ्यासारख्यांच्या आयुष्याची न संपणारी पुंजी बनून जाते.
साधारण 1987 सालच्या एका कार्यक्र माची आठवण माझ्या मनात आजही ताजी टवटवीत आहे. पुण्यातल्या लक्ष्मी क्र ीडा मंदिरचा हॉल तरु णाईने खचाखच भरलेला. स्टेजवर अगदी मोजकीच वाद्ये. साथीदार मंडळी आपआपली वाद्यं सुरात जुळवीत असतानाच कडेच्या पॅसेजमधून हृदयनाथ मंगेशकर आणि त्यांचे काही शिष्य यांचे आगमन झाले. उत्सुक माना आपोआप मागे वळल्या. पांढर्याशुभ्र कपड्यातील हृदयनाथ त्यांच्या टिपिकल अशा शैलीत दाट केसातून कपाळाकडून मागे हात फिरवीत स्वरमंचावर स्थानापन्न झाले. काही क्षणातच ‘भावसरगम’ या मैफलीला सुरुवात झाली. निवेदन, गाण्यांचे अप्रतिम शब्द आणि हृदयनाथांचे भावगर्भ गायन यातून एक संपूर्ण ‘स्वर-शिल्प’ उभे राहिले. भावसमाधीच होती ती !
मी नुकतीच प्रकाशचित्नण व्यवसायास सुरु वात केली होती. बरोबरीने मला सर्वच प्रकारच्या संगीतामध्ये रु ची असल्याने अशा मैफलीत माझ्याबरोबर माझ्या कॅमेर्यानेही प्रवेश केलेला. हृदयनाथ मंगेशकरांच्या काही भावमुद्रा टिपण्याचा इरादा होताच. माझे कान आणि डोळे आपापले काम करू लागले होते. एक से एक खुलत जाणार्या त्या गाण्यांबरोबर हृदयनाथांच्या काही भावमुद्रा मी कॅमेराबद्ध केल्या. ज्येष्ठ कवयित्नी शांताबाई शेळके याही तेथे आलेल्या. त्यांचेही एक दोन छान फोटो मला मिळाले; पण या सगळ्यात प्रामुख्याने मनावर ठसल्या त्या हृदयनाथांच्या त्यादिवशीच्या कार्यक्र मातील स्वर-मुद्राच ! त्यानंतर ‘भावसरगम’चे अनेक कार्यक्र म मी ऐकले आणि प्रत्येकवेळी हृदयनाथांचा नवनवा आविष्कार अनुभवण्याची संधी मिळाली. मनात विचार येत की त्यांच्याशी माझी कधी ओळख होईल का?
तो योग यायला पुढे दहा वर्षे गेली. मार्च महिन्यातील एके दिवशी माझे एक मित्न र्शी. प्रकाश रानडे यांचा फोन आला. ‘24 एप्रिलला मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने होणार्या कार्यक्र मासाठी दीनानाथ व माई मंगेशकर यांच्या ओरिजिनल पेंटिंगवरून मोठे फोटो करायचे आहेत. त्या कामासाठी मंगेशकरांनी तुम्हाला घरी बोलावले आहे.’ मला काम मिळण्यापेक्षाही आपल्या आवडत्या गायक-संगीतकाराची ओळख होणार हा आनंद जास्त होता.
त्या आनंदातच मी पुण्यातील सारसबागेजवळील ‘र्शी मंगेश’ या इमारतीतील मंगेशकरांच्या घरी पोहोचलो. आतल्या दिवाणखान्यात डाव्या हाताला असलेल्या सोफ्यावर हृदयनाथ व समोरच्या सोफ्यावर सौ. भारती मंगेशकर बसलेल्या. त्यांनी माझं स्वागत केलं. माझ्या समोरील भिंतीवरच ती दोन्ही पेंटिंग्ज लावलेली होती. त्यापैकी मा. दीनानाथांचे चित्न सुप्रसिद्ध चित्नकार र्शी. एस.एम.पंडित यांनी चितारलेले, तर माई मंगेशकर यांचे चित्न कोल्हापूरच्या एका नवोदित चित्नकाराने रेखाटलेले. दोन्ही शैलीत जमीन आस्मानाचा फरक. एकात ब्रशचे एकदम बोल्ड स्ट्रोक्स, तर दुसरे गुळगुळीतपणाकडे झुकलेले. चित्नातील पार्श्वभूमीही पूर्णपणे वेगळ्या. साधारण एकाच आकाराच्या असलेल्या दोन्ही चित्नांवर काचा असल्याने त्यामध्ये समोरील गोष्टीचे प्रतिबिंब दिसत होते. हृदयनाथ मला म्हणाले, ‘‘24 तारखेच्या कार्यक्र मासाठी मला ही चित्ने मोठी करून हवी आहेत. त्यांचा परत फोटो काढायला लागेल ना? काचा काढायला लागतील का? आणि कधीपर्यंत तुम्ही ते देऊ शकाल?’’ मी त्यांना प्रतिबिंबाची अडचण सांगून म्हणालो, ‘ही पेंटिंग्ज मला माझ्या स्टुडिओत न्यावी लागतील. ज्यायोगे अनावश्यक प्रतिबिंबे टाळता येतील व रंगांचाही अचूकपणा साधता येईल.’ त्यांनी क्षणभरच विचार केला व म्हणाले - ‘ती व्यवस्थितपणे घेऊन जाण्याची व परत आणून देण्याची जबाबदारी तुमची.’ मी होकार दिला.
दुसर्या दिवशी जाऊन मी ती पेंटिंग्ज माझ्या स्टुडिओत घेऊन आलो. त्यावेळी मी ‘सिनार’ हा जगप्रसिद्ध आणि मोठय़ा फॉरमॅटचा कॅमेरा वापरीत होतो. इतर कामांप्रमाणेच एखाद्या आर्टवर्कची तंतोतंत कॉपी करण्याचे काम या कॅमेर्याने अप्रतिम साधता येत असे. तो माझ्या व्यवसायाचा नेहमीचाच भाग होता. त्या दोन्ही चित्नांचे मी कलर निगेटिव्ह व कलर स्लाइडच्या फिल्मवर कॉपिंग केले. दुसरेच दिवशी त्या चित्नांच्या 8 इंच बाय 10 इंच आकाराच्या एकेक प्रिंट्स तयार केल्या. दोन्ही पेंटिंग्ज व तयार असलेले त्यांचे प्रिंट्स घेऊन मी परत एकदा ‘र्शी मंगेश’वर दाखल झालो. यावेळी दिवाणखान्यात इतरही काही पाहुणे मंडळी होती. मी ती पेंटिंग्ज परत त्यांच्या मूळ जागेवर लावली आणि हृदयनाथांकडे प्रिंट्सचे पाकीट सोपवले. त्यांनी ते पाहिले. मूळ चित्नातील रंग आणि त्यांच्या प्रिंट्समधील रंगांचे साम्य पाहून ते एकदम खूश झाले. मग शेजारीच असलेल्या एका ब्रीफकेसमधून त्यांनी एक पाकीट काढले. माझ्याकडे देत म्हणाले, ‘आता हे पहा.’ त्यात काही प्रिंट्स होते. मुंबईतल्या एका नामवंताने त्याच पेंटिंग्जची आधी केलेली ती कॉपिंग्ज होती. पण कितीतरी निराळीच! मी ती पाहत असतानाच हृदयनाथांनी मला अभिप्राय दिला की, ‘पाकणीकर, तुमचे फक्त तुमच्या कामावरच प्रेम आहे असे नाही तर संगीतावरही तुमचे खूपच प्रेम असले पाहिजे. म्हणूनच तुम्ही इतका चांगला रिझल्ट आणू शकलात.’
त्यानंतर त्यांनी त्या फोटोंचे चार फूट बाय सहा फूट आकारात प्रिंट व फ्रेम करण्याचे काम माझ्यावर सोपवले. या काळात त्यांचा व सार्या मंगेशकर कुटुंबीयांचा माझा परिचय होत गेला. कोणत्याही कामात अचूकतेचा ध्यास ही त्या सर्वांची खासियत मला उमगत गेली.
दीनानाथ व माई मंगेशकर या दोघांच्याही पेंटिंग्जमधील पार्श्वभूमी वेगळी असल्याने ती स्टेजवर शेजारी शेजारी लावल्यास मोठय़ा आकारामुळे त्या खूपच वेगवेगळ्या दिसतील, तर आपल्याला माईंच्या पेंटिंगमधील पार्श्वभूमी बदलता येईल का? अशी विचारणा करणारा बाळासाहेबांचा फोन आला. ‘कॉम्प्युटरच्या साहाय्याने आपण ते करू शकतो, पण ते तितके परिणामकारक होईलच असे वाटत नाही’, असे माझे उत्तर होते. कारण त्यावेळी माझ्याकडे असलेला कॉम्प्युटर व त्यावर वापरल्या जाणार्या फोटोशॉपसारख्या प्रणाली प्राथमिक अवस्थेत होत्या. पण बाळासाहेब म्हणाले - ‘आपण प्रयत्न तर करून पाहू.’ मग मी त्या स्लाइड्सचे ‘स्कॅनिंग’ करून आणले व त्यावर काम सुरू केले. उषाताई उत्तम चित्नकार असल्याने त्यांनीही एका प्रिंटवर ते काम सुरू केले. पार्श्वभूमी बदललेले ते प्रिंट्स मग आम्ही एकत्रितपणे बघितले. लगेचच सर्वांच्या हे लक्षात आले की माईंच्या पेंटिंगमधील बदललेली पार्श्वभूमी परिणामकारक वाटत नाही. ती दीनानाथांच्या चित्नातील पार्श्वभूमीबरोबर जुळत नाही. या चर्चेत मी अनवधानाने असे म्हणून गेलो की, ‘‘काहीही झालं तरी ती दोन वेगवेगळ्या शैलीच्या चित्नकारांनी काढलेली चित्ने आहेत. आणि त्या खाली सह्या करणार्या व्यक्तींच्या अनुभवातील फरक आहे तो.’’ माझ्या या वाक्यावर खूश होत बाळासाहेबांनी मला टाळी देत म्हणाले, ‘खरंय तुम्ही म्हणता ते. सही करणार्यातला फरक आहे तो !’
त्यानंतर काही दिवसांनी त्यांना काही प्रिंट्स हवे होते, ते देण्यासाठी संध्याकाळी मी व माझी पत्नी वैशाली त्यांच्या घरी गेलो. प्रिंट्स दिले. आम्हा दोघांकडे पाहत सौ. भारतीमामी चेष्टेच्या स्वरात म्हणाल्या, ‘पाकणीकर, आज एकतर अगदी जोडीने आला आहात आणि तेही इतकं आवरून आला आहात. कुठल्या फंक्शनला जायचे आहे वाटतं?’ मी ही हसत उत्तर दिलं की, ‘हो, एका कार्यक्र माला जाणार आहोत. भरत नाट्यमंदिरमध्ये कार्यक्रम आहे. ‘भावसरगम’ म्हणून.’ यावर सगळ्यांच्या चेहर्यावर हास्य पसरले. काही वेळात आम्ही तेथून निघालो. कार्यक्र माला वेळ असल्याने निवांत जेवून आम्ही भरत नाट्यमंदिरवर पोहोचलो. कार्यक्र म ‘हाउसफुल’ होता. मी स्कूटर पार्क करून तिकिटांच्या खिडकीकडे वळलो, तर पाठीमागून हाक ऐकू आली. वळून पाहिले तर र्शी. दत्ता ढवळे मला बोलावत माझ्याकडेच येत होते. ते बाळासाहेबांचे फार जुने आणि विश्वासू मित्न. माझ्याजवळ येत त्यांनी माझ्या हातात एक पाकीट ठेवले आणि म्हणाले, ‘बाळासाहेबांनी तुम्हाला द्यायला सांगितले आहे. मी तुमची वाटच पाहत होतो. मी पाकिटात पाहिले तर त्यात पहिल्या रांगेमधील मधली दोन तिकिटे होती. आमचे पुढील साडेतीन तास हे स्वर्गीय अशा सुरांच्या आनंदात गेले हे सांगणे न लगे.
गेल्या काही वर्षात कॉम्प्युटर प्रगत होत गेले, त्याच्या प्रणाली वेगवान व अचूक होत गेल्या आणि मुख्य म्हणजे फोटोशॉपबद्दलचे माझे आकलन थोडेफार वाढले. त्यामुळे परत एकदा मी नव्याने माईंच्या पेंटिंगमधील पार्श्वभूमी बदलता येईल का याचा विचार माझ्या ‘स्वर-मंगेश’ या थीम कॅलेंडरच्यावेळी केला व त्यात यशस्वी झालो. बदललेल्या पार्श्वभूमीचे ते प्रिंट्स मी बाळासाहेबांना दिल्यावर त्यांना आनंद झाला. आज ती दोन्ही चित्ने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या नव्या इमारतीच्या तळ मजल्यावर विराजमान आहेत. त्या चित्नांवर संतर्शेष्ठ ज्ञानेश्वर यांच्या अभंगातील एक ओळ लिहिली आहे. ‘बापरखुमादेवीवरू सहज निटु जाला’. खरोखरीच ती गोष्ट अगदी सहजच घडून गेली आहे.
पं. हृदयनाथ व मंगेशकर कुटुंबीय यांचं प्रेम नंतरच्या काळात आजपर्यंत मी अनुभवत आलो. त्यांच्यासाठी प्रकाशचित्नण करता आले. त्यांच्या घरगुती, जाहीर कार्यक्र मात मग तो दीनानाथांच्या पुण्यतिथीचा असो, बाळासाहेबांना मिळालेल्या डी.लिट.चा समारंभ असो, हॉस्पिटलचे उद्घाटन असो वा आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळाल्यावर घरी आयोजित केलेल्या सत्काराचा कार्यक्र म असो, मला त्यांनी नेहमीच निमंत्रित केले.
मा. बाळासाहेबांना मी जेव्हा जेव्हा भेटलो त्या प्रत्येक वेळी मला प्रकर्षाने जाणवत गेले की, या प्रतिभावंत कलाकाराकडे आहे एक अनोखी चिकित्सक नजर, कोणत्याही कामात अचूकता, परिपूर्णता कशी येईल याचा सदोदित ध्यास, प्रचंड वाचनातून आलेली प्रगाढ विद्वत्ता; पण त्याबरोबरच आलेलं कमालीचं साधेपण. उगीच नाही भारतरत्न लता मंगेशकर त्यांना ‘साधू पुरुष’ असे संबोधतात !.
sapaknikar@gmail.com
(लेखक प्रसिद्ध प्रकाशचित्रकार आहेत.)