ग्रीन कॉरिडॉर

By admin | Published: June 25, 2016 02:33 PM2016-06-25T14:33:45+5:302016-06-25T14:33:45+5:30

आपल्याकडे जवळपास मिनिटाला एकाचा अपघाती मृत्यू होतो. त्यातले दीड लाख ब्रेनडेड होतात. अवयव दान होतं केवळ १०० जणांचं. हृदयासारखे महत्त्वाचे अवयव एकतर दानच होत नाहीत किंवा ते योग्य स्थळी पोहोचवण्याची पुरेशी व्यवस्थाच नसते. जीवनदानाच्या प्रवासाची ही व्यवस्था आता मात्र आकार घेऊ लागली आहे.

Green Corridor | ग्रीन कॉरिडॉर

ग्रीन कॉरिडॉर

Next

- पवन देशपांडे


दरवर्षी भारतात होणाऱ्या अपघातात चार ते पाच लाख लोक मृत्युमुखी पडतात. म्हणजे जवळपास प्रत्येक मिनिटाला एकाचा अपघाती मृत्यू. त्यातले जवळपास १.४ लाख अपघातग्रस्त ब्रेनडेड होतात. 
दीड लाख अपघातग्रस्त ब्रेनडेड व्यक्तींपैकी ८० हजार जणांचे अवयव दान करण्याजोगे असतात, पण आपल्या देशात त्यातले केवळ १०० जणांचेच अवयव दान होतात. म्हणजे केवळ ०.३ टक्के!
दुसरीकडे अवयव निकामी होऊन ते बदलण्याची वेळ येणाऱ्या रुग्णांची संख्या देशात १० लाख आहे.. पण त्यातल्या केवळ साडेतीन हजार रुग्णांचं दरवर्षी अवयव प्रत्यारोपण होतं... दरवर्षी दहापेक्षा अधिक रुग्णांचा जीव प्रत्यारोपणासाठी अवयव न मिळाल्यानं होतो... आणि प्रत्यारोपणासाठी अवयव हवा असणाऱ्या रुग्णाची नावनोंदणी होण्याचं प्रमाण दर दहा मिनिटाला एक आहे... 
...आणि अवयव दान करणाऱ्यांचं?
नगण्य... दिवसाला एकही नाही... 
अवयव दानासाठी पुढे न येणाऱ्या किंवा त्यासंबंधी माहिती नसणाऱ्यांमुळं अनेकांची जिवंत राहण्याची इच्छाही अखेरच्या श्वासासोबतच संपतेय... 
त्यामुळेच अवयव दानाचं आणि त्यानंतर हे अवयव योग्य वेळी योग्य रुग्णापर्यंत पोहोचण्याचं महत्त्व अनन्यसाधारण. त्यासाठीच उपयोग होतो ग्रीन कॉरिडॉरचा. 
नेहेमीचा प्रवास आपल्या साऱ्यांच्याच परिचयाचा असतो. साध्या प्रवासाचीही कोण यातायात असते, त्यामुळेच ब्रेनडेड झालेल्या व्यक्तीच्या‘जिवंत’ अवयवांचा प्रवास खूपच महत्त्वाचा आणि त्याचं नियोजनही अत्यंत कौशल्यानं करावं लागतं. अनेक लोकांची टीम त्यासाठी कार्यरत असते. वाहतुकीचे सारे अडथळे तर दूर करावे लागतातच, पण संभाव्य अडचणी आधीच लक्षात घेऊन त्यासाठीचंही पूर्ण नियोजन आधीच करून ठेवावं लागतं. तसं केलं नाही, तर केलेले सारे प्रयत्न वाया जाऊ शकतात, शिवाय दोन जिवांचाही प्रश्न असतो. एक एक क्षण महत्त्वाचा असतो. नियोजनात कुठेही गफलत झाली तर जीवदान देऊ शकणारे हे अवयव वाया जाऊ शकतात.
एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ग्रीन कॉरिडॉर केला जातो. रस्त्यावर जागोजागी वाहतूक पोलीस तैनात असतात. शिवाय कमीत कमी वेळेत पोहोचवू शकणारा रस्ता निवडला जातो आणि त्या रस्त्यावरील सिग्नल यंत्रणा ‘मॅन्युअली’ हाताळली जाते. त्यामुळे रुग्णवाहिकेचा स्पीड वाढून अवयव पोहोचायला लागणाऱ्या वेळेत मोठी घट होते. आतापर्यंत पुणे-मुंबई, मुंबई विमानतळ ते मुलुंड येथील रुग्णालय अशा मार्गावर अनेकदा ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. त्यासाठी वाहतूक पोलिसांचा मोठा ताफा कार्यरत असतो; शिवाय रुग्णवाहिकेच्या मागे-पुढे वाहतूक पोलिसांचीही गाडी असते. 
लोकांचे जीव वाचवण्यासाठी जगभर ‘ग्रीन कॉरिडॉर’ या संकल्पनेचा उपयोग केला जातो. रस्ते वाहतुकीबरोबरच विमान प्रवासाचं नियोजनही अत्यंत काटेकोर असावं लागतं. 
विमानाद्वारे हृदयाचा प्रवास करण्याचा अनुभव गाठीशी असणारी आणि वेळोवेळी रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणारी एमएबी एव्हिएशन ही कंपनी सध्या याचसाठी चर्चेत आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मंदार भारदे यांना या साऱ्या प्रक्रियेबद्दल विचारलं. ते म्हणाले, खरं तर ब्रेनडेड झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांची भूमिका यात सगळ्यात महत्त्वाची. कारण त्यांचं मन वळवणं.. त्यांना आपल्या रुग्णाच्या हृदयदानासाठी राजी करणं जिकिरीचं काम असतं. ते तयार व्हावेत यासाठी रुग्णालयातले कौन्सिलर चांगली कामगिरी बजावतात. 
डॉक्टरांना हृदय मिळतेय, अशी शक्यता दिसली की मग हृदयाची सर्वाधिक गरज कोणत्या रुग्णाला आहे याचा तपास घेतला जातो. हे सारं जुळलं की मग प्रवासाचं प्लॅनिंग. 
हाती केवळ सहा तास!
हृदय प्रत्यारोपण ही प्रक्रिया केवळ सहा तासांच्या आत करायची असते. त्यामुळेच हवाई मार्गाचा अवलंब करणं हा पर्याय समोर आला. हवाई मार्गात ‘ग्रीन कॉरिडॉर’ निर्माण करण्याचा एमएबी एव्हिएशनने यशस्वी प्रयत्न केला. विमानतळावर उतरण्यासाठी किंवा त्याची परवानगी मिळण्यासाठी जाणारा वेळ कमी केला. त्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रण यंत्रणेनंही मदत केली. वेळ वाचवणं हाच यामागचा उद्देश. कारण जो काही वेळ हाती असतो ते केवळ जिवंत राहू शकणाऱ्या रुग्णाचा असतो. उपलब्ध झालेलं हृदय वाया न जाता त्याला मिळावं असा त्यामागे हेतू असतो, असं भारदे यांचं म्हणणं.
औरंगाबाद येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. आनंद निकाळजे यांनी सांगितलं, परदेशात रुग्णाला एकदा ब्रेनडेड घोषित केलं की त्यानंतर त्याच्या नातेवाइकांना अवयव दानासाठी प्रोत्साहित केलं जातं. त्यामुळे इतर देशांमध्ये अवयव दानाचं प्रमाण अधिक आहे. आता कुठे आपल्याकडे याबाबत जागरूकता वाढत आहे. काही दिवसांपूर्वी आमच्याकडेच ब्रेनडेडचे दोन रुग्ण होते. त्यांच्या नातेवाइकांनी लगेच अवयव दानाची परवानगी दिली. आपल्याकडे हृदय उपलब्ध होण्याचं प्रमाण कमी आहे आणि जेव्हा केव्हा ते मिळतं तेव्हा सगळी यंत्रणा उपलब्ध असणं गरजेचं असतं. एकदा आम्हाला हृदय उपलब्ध झालं, पण ते न्यायचं कसं हा प्रश्न होता. कारण प्रवास चेन्नईपर्यंतचा होता. त्या प्रवासासाठी विमानच उपलब्ध होऊ शकलं नव्हतं. 
या घटनेनंतर मात्र हृदय प्रत्यारोपण करणाऱ्या आणि त्यासाठी साहाय्य करणाऱ्या देशभरातल्या विविध यंत्रणांनी धडा घेतल्याचं मंदार भारदे सांगतात. आता सगळ्याच यंत्रणा हृदय प्रत्यारोपणाच्या काळात ‘झिरो टॉलरन्स’ म्हणजे एकही चूक होऊ न देण्याच्या दृष्टीनं काम करतात. या काळात चूक करायला संधीच नसते. कोणत्याही नव्या चमत्काराला सामोरं जावं लागू नये याचे पूर्णपणे प्रयत्न असतात. मुळात हाती वेळच कमी असतो. कारण हृदय मिळावं यासाठी दुसऱ्या टोकाला एक रुग्ण आॅपरेशन थिएटरमध्ये वाट पाहत असतो. 
अशा स्थितीत अडचण येऊन लगेच त्यातून वाट काढायची संधी नसते. म्हणून पंतप्रधानांसाठी जशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, जवळपास त्याच तुलनेच्या सुविधा एखाद्या हृदयाच्या प्रवासादरम्यान उपलब्ध केलेल्या असतात. हवाई वाहतुकीशी संबंध असणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी पदापासून ते शिपाई पदापर्यंतचे जवळपास दीडशे जण यासाठी युद्धपातळीवर काम करत असतात. तसेच डॉक्टर, वॉर्डबॉय-अ‍ॅम्ब्युलन्स चालक यांच्यापासून ते विविध ठिकाणी ग्रीन कॉरिडॉरसाठी उभं राहणाऱ्या पोलिसांपर्यंत एकूण जवळपास ५०० जण काम करत असतात. यांच्यातल्या प्रत्येकानं चोख कामगिरी बजावणं गरजेचं असतं. त्यासाठी प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेशी चांगला समन्वय असतो. ते झालं नाही तर हृदयाचा तसेच रुग्णाला जीवदान देऊ शकणाऱ्या इतर महत्त्वाच्या मानवी अवयवांचा प्रवासच होऊ शकत नाही. 
हा प्रवास आता तुलनेनं सोपा झालाय म्हणून मृत्यूशय्येवरील अनेक रुग्णांना आतापर्यंत जीवदान मिळालं आणि पुन्हा नव्या उमेदीनं त्यांच्या आयुष्याचा प्रवास सुरू झाला आहे. 

हार्ट इन दी बॉक्स
जेव्हा ब्रेनडेड रुग्णाच्या शरीरातून हृदय काढून घेतलं जातं तेव्हा ते एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे बंद केलं जातं. एका विशिष्ट थंड बॉक्समध्ये त्याचा प्रवास होतो. जिथे त्याचं प्रत्यारोपण करायचंय, अशा ठिकाणी ते रिस्टार्ट केलं जातं. सध्या भारतात अशीच पद्धत वापरात आहे, असं डॉ. आनंद निकाळजे यांनी सांगितलं. पण परदेशात आता नवं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलंय. शरीरातून काढून घेतल्यानंतरही हृदयाची धडधड न थांबवता त्याचा प्रवास होतो. त्यासाठी एका खास बॉक्सची निर्मिती करण्यात आली आहे. शरीरामध्ये हृदय जसं कार्यरत असतं तीच क्रिया या बॉक्समध्ये कृत्रिमरीत्या पार पाडली जाते. यामुळे शरीराबाहेर हृदय राहू शकण्याचा कालावधी किमान दोन तासांनी वाढला आहे. पर्यायानं ज्याला हृदयाची गरज आहे असा रुग्ण थोडा दूर जरी असला तरी त्याला हृदय मिळण्याच्या शक्यता वाढतात. सध्याच्या परिस्थितीत केवळ ब्रेनडेड व्यक्तीचं चालू स्थितीत असलेलं हृदयच आपण प्रत्यारोपणासाठी घेता येतं, पण या बॉक्स तंत्रज्ञानामुळं बंद पडलेलं हृदयही प्रत्यारोपणासाठी जिवंत करणं शक्य होण्याची चिन्हे आहेत. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, या बॉक्समध्ये विविध प्रमाणात आॅक्सिजन आणि रक्तपुरवठा केला की हृदय पुन्हा चालू करून त्याचा प्रवास रुग्णापर्यंत केला जातो. ही यंत्रणा जर यशस्वी झाली तर हृदय प्रत्यारोपण करण्याच्या शस्त्रक्रियांचे प्रमाण ३० टक्क्यांनी वाढेल.

कसं होतं नियोजन?
१. ब्रेनडेड व्यक्तीच्या नातेवाइकांची त्या रुग्णाचे अवयव दान करण्यासाठी तयारी असली पाहिजे. 
२. हृदय दान करण्याचा नातेवाइकांनी निर्णय घेतल्यानंतर रुग्णाच्या हृदयाशी सुसंगत असा कोणता रुग्ण आहे, ज्याला हृदयाची गरज आहे, याचा शोध घेतला जातो. ज्या रुग्णाला हृदयाची गरज आहे त्याची नोंद आधीच केलेली असते. 
हृदयदात्याचं वय, रक्तगट, वजन हे सर्व ज्या गरजू रुग्णाशी जुळत असेल त्याची निवड केली जाते. प्रौढ व्यक्तीचे हृदय लहान मुलाला किंवा लहान व्यक्तीचे हृदय प्रौढ व्यक्तीला देता येत नाही. 
३. हृदय काढण्याची शस्त्रक्रिया सुरू होण्याआधी हृदय प्रत्यारोपणाच्या ठिकाणी नेण्याची सारी व्यवस्था करून ठेवावी लागते. त्यासाठी साऱ्या प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. हॉस्पिटल, डॉक्टर्स, वाहतूक पोलीस, याशिवाय एअर ट्रॅफिक कंट्रोलर, सुरक्षा यंत्रणा, एअर फोर्स यांच्यात समन्वय असावा लागतो. ग्रीन कॉरिडॉर करायचा असेल, तर त्यासाठीही परवानगी घ्यावी लागते.
४. आता पुढच्या प्रक्रियेसाठी उरतात केवळ ४ ते ६ तास. या कालावधीत हृदय प्रत्यारोपण करावे लागते. हाच काळ अत्यंत महत्त्वाचा असतो.
५. प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया लवकर पार पडावी यासाठी गेल्या अनेक घटनांमध्ये हृदयाची हवाई वाहतूक करण्यात आली. सुरत येथून मुंबईत ५५ मिनिटांत आणले गेलेले हृदय लातूरच्या तरुण जिवाला नवं आयुष्य देऊन गेलं. हा वेळ वाचवणारे हात महत्त्वाचे ठरतात.

प्रत्येक पाचशे किलोमीटरवर मदत
भारतामध्ये एकाही राज्याकडे आपत्ती काळात वापरता येईल यासाठी एकही एअर अ‍ॅम्ब्युलन्स नाही. भारतीय रेल्वेकडेही नाही. त्यामुळं भारतात प्रत्येक पाचशे किलोमीटरवर एक विमान उपलब्ध करून देण्याचा एमएबी एव्हिएशनचा मानस आहे. त्या विमानाचा वापर रुग्णांसाठी केला जाणार असून, आपत्ती काळातही ते लगेच मदतीला येऊ शकणार आहे. रुग्णांना कमीत कमी खर्चात अवयव मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकार आणि एमएबी मिळून प्रयत्न करत आहोत. 
प्रवासासाठी येणारा खर्च कमी करण्यासाठी राज्य सरकारनंही पुढाकार घेतला आहे आणि या प्रवासावर लावण्यात येणारे कर माफ करण्यासंदर्भात त्यांचा विचार सुरू आहे. सध्या रुग्णांसाठी अवयवाचा होणारा विमान प्रवास आणि त्यासाठी येणारा खर्च हा विम्यामध्ये गृहीत धरला जात नाही. त्यामुळं हा सारा बोजा रुग्णाच्या नातेवाइकावर पडतो. 
हा खर्चही कमी व्हावा आणि तो विम्यात कव्हर व्हावा असाही प्रयत्न सुरू आहे.

(लेखक मुंबईच्या लोकमत आवृत्तीत 
मुख्य उपसंपादक आहेत.)

pavan.deshpande@lokmat.com

Web Title: Green Corridor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.