जीवन-मृत्यूच्या प्रवासाचा 'हिरवा' थरार...

By Admin | Published: June 25, 2016 02:36 PM2016-06-25T14:36:54+5:302016-06-25T14:36:54+5:30

श्वासोच्छ्वास तर सुरू आहे, तरीही जिवंत म्हणता येत नाही.. मृत तर नक्कीच नाही. ‘ब्रेनडेड’! त्या व्यक्तीला खरोखरच जिवंत ठेवायचं तर एकच पर्याय. त्याच्या अवयवांचं लवकरात लवकर दुसऱ्या कोणातरी गरजूच्या शरीरात प्रत्यारोपण करायचं आणि त्याचं हृदय धडधडत ठेवायचं. हातात वेळ अत्यंत मोजका आणि प्रवास तर अत्यंत जिकिरीचा. मग क्षणाक्षणाला पुन्हा सुरू होतो जीवन-मरणाचा प्रश्न...

'Green' thrill of life-death journey ... | जीवन-मृत्यूच्या प्रवासाचा 'हिरवा' थरार...

जीवन-मृत्यूच्या प्रवासाचा 'हिरवा' थरार...

googlenewsNext

 पवन देशपांडे

तरुण वय. सळसळतं रक्त. श्वास सुरू आहे; पण मेंदूनं साथ सोडलेली. म्हटलं तर जिवंत, म्हटलं तर मृत.. अचानक झालेला अपघात आणि सारं काही होत्याचं नव्हतं झालेलं.  ब्रेनडेड!
डॉक्टरांनी हे सांगितलं आणि घरच्यांवर आभाळच कोसळलं. त्याही स्थितीत छातीवर दगड ठेवून त्यांनी निर्णय घेतला आणि देहानं नाही तरी अवयवांच्या रूपात त्याला जिवंत ठेवायचं ठरवलं.
त्याच्या स्वत:च्या शरीरात जरी नाही तरी दुसऱ्या कुणाच्या तरी शरीरात त्याचं हृदय धडधडत राहावं यासाठी त्यांनी ब्रेनडेड झालेल्या आपल्या तरुण मुलाचं हृदय दान करण्याचं ठरवलं.
त्यानंतर खऱ्या अर्थानं सुरू झाला एक वेगवान प्रवास..
हृदयाची गती वाढावी तशी पुढील सारी चक्र वेगानं धावायला लागली.
सुरतमध्ये रात्र चढत होती तशी नातेवाईक-नर्स-वॉर्डबॉय-डॉक्टर-अ‍ॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर यांच्यापासून ते एअरपोर्ट-रस्ते वाहतूक व्यवस्थापन करणाऱ्या पोलिसांच्या यंत्रणा अशा साऱ्यांचीच धावपळ सुरू झाली. कारण अपघातानंतर ब्रेनडेड झालेल्या तरुणाचं हृदय काढून ते थेट मुंबईत मुलुंडमध्ये न्यायचं होतं. जिवंत राहण्यासाठी धडपडणाऱ्या एका रुग्णासाठी.
हृदयाचा हा प्रवास होता सुरतपासून ते मुंबई-मुलुंडपर्यंतचा. कोठेच थांबलो नाही तर रस्ते मार्गे जवळपास पाच ते सहा तासांचा. त्यानंतर शस्त्रक्रिया. म्हणजे आणखी एखादा तास. पण हृदय काढून घेतल्यापासून ते हृदय पुन्हा एका नव्या शरीरात प्रत्यारोपीत करण्याची ही प्रक्रिया तब्बल चार ते सहा तासांच्या आत करायची होती. 
कमीत कमी वेळेत ही सगळी प्रक्रिया पार पाडणं हे हृदय बसविण्यात येणाऱ्या रुग्णासाठी आवश्यक होतं. पण प्रवास लांबचा होता. पर्याय एकच होता. विमानाचा. सुरतहून हृदय हवाईमार्गे थेट मुंबईत आणायचं. पुढे रस्ते मार्गे शक्य तेवढ्या वेळेत मुलुंडच्या रुग्णालयात पोहोचवायचं. त्यासाठी रस्ताही मोकळा असणं महत्त्वाचं होतं. ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली.
डॉक्टर पोहोचले होते. रुग्णवाहिका सज्ज होती. शिवाय सुरत आणि मुंबईतही ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला होता. हवाई वाहतूक नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेनं मार्ग मोकळा करून दिला होताच.
शस्त्रक्रिया पार पाडून हृदय निघालं. सुरतच्या रुग्णालयापासून ते मुंबईत मुलुंडच्या रुग्णालयापर्यंत त्याचा प्रवास केवळ ५५ मिनिटांत झाला. ही किमया साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी जवळपास ५०० जणांची टीम कार्यरत होती...
कसं शक्य झालं हे?
अलीकडच्या काळात असे काही आश्चर्यकारक प्रसंग आपण अनुभवले. भरमसाठ ट्रॅफिक असलेल्या एखाद्या गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायलाही बऱ्याचदा तास, अर्धा तास निघून जातो. अशा परिस्थितीत इतक्या लांबचा प्रवास आणि तोही काही मिनिटांत!
पण असं झालं खरं.
त्यामुळे ‘मृत’ व्यक्ती तर आपल्या अवयवांच्या रूपानं जिवंत राहिलीच; पण मृत्यूशय्येवरच्या रुग्णालाही जीवदान मिळालं!
इंदूर-दिल्ली, इंदूर-मुंबई, नाशिक-पुणे, औरंगाबाद-मुंबई, औरंगाबाद-पुणे.. असे अनेक ‘जिवंत’, थरारक आणि यशस्वी प्रवास अलीकडच्या काळात घडले, घडू शकले.
त्याचं प्रमुख कारण ‘ग्रीन कॉरिडॉर.
ही खरं तर युरोपियन संकल्पना; पण आता सगळीकडेच तिचा उपयोग केला जातोय. ग्रीन कॉरिडॉर म्हणजे वाहतुकीचा असा खास मार्ग, ज्यात सारे सिग्नल्स मॅन्युअल मोडनं आॅपरेट केले जातात आणि आपल्या गरजेनुसार वाहतुकीचं नियंत्रण केलं जातं.
हाच ग्रीन कॉरिडॉर आता अनेकांसाठी संजीवनी ठरतोय..
पण या ‘ग्रीन कॉरिडॉर’वरचा हा जिवंत प्रवास नेमका होतो तरी कसा? कोण कोण त्यात, कसं सहभागी होतं?
ती कहाणीही गंभीर, तरीही तितकीच रोचक आहे.

Web Title: 'Green' thrill of life-death journey ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.