गुबुगुबु़ गुबुगुबु़
By admin | Published: June 17, 2016 05:36 PM2016-06-17T17:36:59+5:302016-06-17T18:03:15+5:30
पाऊस पडेल का? घरधन्याला बरकत येईल का?.. नंदीबैलही मग मान डोलवायचा़ आई पसाभर धान्य सुपात घेऊन यायची, नंदीबैलाला ओवाळायची, नंदीबैलवाल्याच्या झोळीत धान्य टाकायची़ तोही घरधन्याचे आभार मानायचा, त्याला आशीर्वाद द्यायचा आणि एकेक घर, गाव ओलांडत या वेशीवरून त्या वेशीवर भटकत राहायचा.. कुठे गेलेत हे नंदीबैल? ती माणसं? भारताच्या नकाशावर कुठलाही कायमचा पत्ता आणि नागरिकत्वाचा पुरावा नसलेली ही माणसं मग गेलीत तरी कुठे?..
साहेबराव नरसाळे
नंदीबैल आला़,
गुबुगुबु़,
असं म्हणत लहानपणी खेळ रंगायचा़ तो खेळ वर्षभर चालायचा़ पण नंदीबैल वर्षातून एकदाच यायचा़ नंदीबैलवाला गुबुगुबु वाजवायचा आणि त्या नंदीला ‘पाऊस पडेल का, घरधन्याला बरकत येईल का’, असे विचारायचा़ नंदीबैलही होकारार्थी मान डोलवायचा़.
..मग आई पसाभर धान्य सुपात घेऊन यायची, नंदीबैलाला ओवाळून ते धान्य नंदीबैलवाल्याच्या झोळीत टाकायची़ नंदीबैलवाला घरधन्याला सुयश चिंतित पुढच्या घराकडे निघायचा़ पण लहान मुलांचा गुबुगुबुचा खेळ मात्र नंदीबैल परत येण्याची वाट पाहत वर्षभर सुरू राहायचा़
लहानपणी प्रत्येकालाच या नंदीबैलांचं आणि त्यांना घेऊन येणाऱ्यांचं आकर्षण असायचं. पण हळूहळू नंदीबैल दिसेनासे झाले. त्या बैलांचा घुंगुरनाद ऐकू येईनासा झाला आणि नंदीबैलाला सोबत घेऊन गावंच्या गावं पायाखाली तुडवणारी माणसं कुठे गेली, आता कुठे राहतात याचा तर पत्ताही कळेनासा झाला.
अशातच कळलं, नगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती या गावात नंदीबैलवाल्यांची वस्ती आहे. तब्बल तीन हजार नंदीबैलवाले तिथे राहतात. मग लगोलग ठरवलं, जायचं तिथे आणि बोलायचं त्यांच्याशी..
गावात पोहोचलो..
चुकचुकलोच..
पाल नाही, बैलं आहेत, पण नंदी नाही़.
प्रत्येकाचे सीमेंटचे पक्के घर..
काहींच्या घरापुढे दुचाकी, तर काहींच्या घरापुढे चारचाकी गाडी..
काहींचे किराणा दुकान..
काहींची पिठाची गिरणी..
काहींचे हॉटेल, तर काहींची बँजो पार्टी !..
सारेच सुखी जीवन जगणारे़.
लहानपणी आपण साऱ्यांनीच अनुभव घेतलेले, पोटापाण्यासाठी गावंच्या गावं तुडवणारे हेच ते नंदीबैलवाले, यावर विश्वासच बसेना !
न राहवून एका वयस्कर आजोबांना शेवटी विचारलंच, नंदीबैलवाले कुठे राहतात हो आजोबा?..
‘अरे हे काय.. इथे सगळेच नंदीबैलवाले आहेत’ -आजोबांचं उत्तर ऐकून अनेक प्रश्नांनी डोक्यात पिंगा घालायला सुरुवात केली़
पुढचे प्रश्न विचारणार तेवढ्यात तेच म्हणाले, ‘गावात आज जे लग्न आहे ना, ते पण नंदीबैलवाल्याच्या मुलीचं़ ते हॉटेल दिसतंय ना, त्यांच्या मुलीचं आज लग्न आहे़ तिचा नवरा कुठल्या तरी दुसऱ्या देशात नोकरी करतो. चांगला बक्कळ पैसा कमावतो.आता आमच्याकडे कोणीच नंदीबैल घेऊन भिक्षा मागत नाही़ परंपरा जपायची म्हणून करतात अजूनही काही जण तेच काम़, पण आता त्यात राम राहिलेला नाही.’
खोलात विचारायला लागलो तर म्हणाले, ‘थांब, ही एवढी गडबड संपू दे, लग्न लागू दे, नंतर बोलतो तुझ्याशी मायंदाळ. वस्तीत कोणाचंही लग्न असलं तरी घरातलं समजूनच आम्ही पाहुण्यांची सरबराई करतो़’
थांबणं भाग होतं़ थांबलो़ सगळ्या वस्तीनं मुलीला निरोप दिला़ लग्नघरासमोरच आमची गप्पांची मैफल रंगली़ रावसाहेब फुलमाळी सांगत होते, ‘भिक्षेकऱ्याची झूल आम्ही कधीच उतरवली़ आता आम्ही कष्ट करून स्वाभिमानाने जगतो़ आमच्यात हिंमत आहे़ अनेकदा उपाशीपोटी झोपण्याची वेळ आली, पण हिंमत हारलो नाही़ अमुक शेतकऱ्याने आत्महत्त्या केल्याचं ऐकताना अनंत वेदना होतात़ आमचा पोशिंदा, ज्याला आम्ही आदरानं पाटील म्हणतो, माय-बाप म्हणतो, तो शेतकरी इतका कमजोर कसा असू शकतो? ज्यांच्या पसाभर धान्याने आमच्या घरात बरकत आली त्या धन्याला जीवन कळलेच नाही, बाप्पा!’
‘आम्ही पूर्वी घरोघर भिक्षा मागायचो़ आत्ताही आमच्यातील काहीजण महाराष्ट्रभर फिरतात़ शंभूदेवाच्या नंदीचे पाय पाटलाच्या वाड्याला लागले, आता पाऊस पडल, बरकत व्हईल, धानधान्य
पिकल अशी स्वप्ने शेतकऱ्याच्या डोळ्यात पेरून त्याची उमेद वाढवायची़ ज्या गावात जायचे, त्या गावातील पोलीसपाटलाला भेटून आमची सर्व माहिती सांगायची, पोलीस ठाण्यात आमची सर्वांची नावे लिहून द्यायची, मगच गावात भिक्षा मागायची हा आमचा नित्यनेम़ पण तरीही आम्हाला चोर ठरवलं, जेलमध्ये बसवलं. पाल हेच घर असलेल्या आमच्यावर पोलिसांनी चोराची झूल चढविली़ आम्हाला जामीनही मिळत नव्हता़ घरातील कर्ता जेरबंद झाला की माय, बाय, पोरं उपाशी राहायची़ पण कोणी आत्महत्त्या केल्याचं ऐकलं नाही़ सावकाराच्या घरी सालं धरली, पण कोणी माय, बाय अन् पोरांना पोरकं नाही केलं़ येईल त्या संकटांचा सामना करीत आम्ही जगण्याची जिद्द बांधायला शिकलो, तेही बळीराजाकडूनच! पण आता वाढत्या आत्महत्त्या ऐकून आमचा जीव तीळतीळ तुटतो़’
‘आम्ही हिमतीने उभे राहिलो़ भिक्षा मागून जगण्याची, दारूच्या नशेत बुडण्याची झूल आम्ही कधीच फेकून दिली़ हवं तर कात टाकली म्हण ना’ - तात्या फुलमाळीनं पुष्टी जोडली़
तेवढ्यात अरुण मिसाळ आमच्यामध्ये सामील झाले़ अगोदर मिसाळांशी फोनवरून संपर्क करीत होतो़ पण संपर्क झाला नव्हता़ लग्नाचा इरापिरा उरकल्यानंतर तेही आमच्यात सामील झाले़ त्यांच्यासोबत भिल्ल समाजातील काही लोकांचा लवाजमा होताच़ गायरान जमिनीवर केलेले अतिक्रमण नियमित करण्यासाठी़ हे मिसाळ म्हणजे एक मिसालच! विकासापासून दुरावलेल्यांचा कार्यकर्ता़ बेघरांना घर देणारा, भूमिहिनांना भूमी देणारा! नंदीबैलवाल्यांमध्ये परिवर्तन घडविणारा माणूसही हाच़
१९७६ साली कर्नाटकातून १०० नंदीबैलवाले फिरत फिरत जेऊरच्या गावकुसात आले़ पालं ठोकली़ चुलांगणं पेटली़ गावातून एक टोळकं आलं बघ्यांचं़ त्या टोळक्यातलाच हा कार्यकर्ता़ नंदीबैलवाल्यांनी सरकारच्या गायरानावर अतिक्रमण केल्याचा फुत्कार जोर धरू लागला़ त्यावेळी वेड्या बाभळींच्या अतिक्रमणापेक्षा या माणसांचे अतिक्रमण चांगले असे सांगत मिसाळांनी नंदीबैलवाल्यांच्या अतिक्रमणाचे समर्थन केले़ नंदीबैलवाल्यांना माणूस म्हणून स्वीकारण्यास गावाला आणि प्रशासनालाही भाग पाडलं़
नंदीबैलवाले हे भारताचे नागरिक़ मात्र, नागरिकत्वाचा पुरावाही त्यांच्याकडे नव्हता़ म्हणून त्यांना हक्काचे घर मिळावे, कायमचा पत्ता मिळावा आणि भारत देशाचे रहिवासी म्हणून किमान त्यांची नोंद व्हावी, यासाठी लढा सुरू केला़ तो यशस्वी झाला़ सरकारच्या जमिनीवर अतिक्रमण केलेली जागा नंदीबैलवाल्यांची झाली़ सातबारा उतारा नंदीबैलवाल्यांच्या नावाने निघाला़ रहिवासी दाखला, रेशनकार्ड आले़ मतदार यादीत नाव लागले आणि ते खऱ्या अर्थाने भारताचे नागरिक झाले़ ‘इदे उरकाडा शारतोंडोम’ (आम्ही इथले रहिवासी झालो), असं सांगताना त्यांची छाती अभिमानाने फुलतेय़
नंदीबैलवाल्यांची भटकंती थांबली़ पण मिसाळांचे काम थांबले नव्हते़ या नंदीबैलवाल्यांनी भिक्षा मागण्यापेक्षा काम करावे, व्यापार करावा, व्यवसाय वाढवावा, सन्मानाने जगावे, मुलाबाळांसमोर रात्री महिला-पुरुषांनी दारूचे ग्लास भरणे थांबवावे यासाठी मिसाळांनी काम सुरू केले़ त्यातही यश आले़ दारू पाडणे आणि पिणेही बंद झाले़ नंदीबैलवाल्यांनी किराणा दुकान, पिठाची गिरणी, हॉटेल, सनई चौघड्याचा ताफा असे विविध व्यवसाय या वस्तीवर सुरू केले़ आता हाच सनई चौघड्यांचा ताफा अनेक मंत्री, नेते आणि बड्या आसामींच्या लग्नाचा साक्षीदार असतो़ त्यांच्या महिला आजही बाळ्याबुगड्या विकत असल्या, तरी परिसरातील शेतात त्या मजूरही असतात़ नंदीबैलवाले पूर्वी सर्रास दोन-तीन बायका करायचे, पण आता एकपत्नी झाले सारे़ बहुतेकांनी कुटुंबनियोजन केलेलं़ अडाणी असलेल्या या नंदीबैलवाल्यांची पोरं शिकली़ या वस्तीत एकही मूल शाळाबाह्य नाही़ काहींची मुले सैन्यदलात गेली, तर काही इंजिनिअर, काही वकील, काही डॉक्टर होताहेत़ सुखी जीवन जगतात़ त्यांच्यातीलच बाळासाहेब फुलमाळी हे ग्रामपंचायत निवडणुकीला उभे राहिले़ निवडूनही आले़ आता पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी आटवतात स्वत:ला! हे सारं गप्पांच्या ओघात उलगडत गेलं
गप्पा सुरूच होत्या़ ‘आता कोण जातं नंदीबैल घेऊन’, असं विचारताच रावसाहेब तात्या पुढं आले़ तिकडल्या वर्तमानपत्रामध्ये नंदीबैलासह छापून आलेले त्यांचे फोटो दाखवत म्हणाले, ‘मी जातो़ दरवर्षी़ विदर्भ, मराठवाडा पिंजून काढतो़ दोन महिने तिकडंच असतो़ फिरूनफिरून घरं पाठ होतात़ एखाद्या महिलेचं कपाळ सुनं दिसलं की मन पिळवटतं़ गुबुगुबु वाजणारी ढोलकी मुकी होते़ मन कापतं़ कारण आम्हाला अपेक्षित असते कपाळभर कुंकू घेऊन नंदीबैलाची पूजा करणारी, पसाभर धान्य सुपाने माझ्या झोळीत भरणारी लक्ष्मी़ पण पतीनं आत्महत्त्या केल्यानंतर कुंकवाऐवजी बुक्का भाळी भरलेली, कपाळावरचं काळंठिक्कर पडलेलं गोंदण पाहून झोळी पुढं करण्याएवढं काळीज उरत नाही माझ्याकडं़ सुन्न मनानं आम्ही पुढच्या घराकडे वळतो़ तिला तिचं सर्वस्व गमावल्याचं, तर मला माझा पोशिंदा गेल्याचं दु:ख रात्री झोपू देत नाही़ परंपरा आहे म्हणून मागतो घरं़
पण आता वाटतं, बस्स झालं़ दुसऱ्याची घरं भरवणाऱ्या बाप्पा, तुझं घर उसवू नको़, आत्महत्त्या करू नको’, असं म्हणताना त्यांचा आवाज गदगदला होता़ गुबुगुबु वाजविणारा नंदीबैलवाला पाहायला गेलो आणि तो भेटला असा़ त्यानं आता काळाची गती धारण केलीय़ तरीही परंपरा सोडली नाही़ तो आता स्थिरावलाय़ शारतोंडोम (स्थानिक) झालाय़ गावं घेणं सोडतोय तरीही शेतकऱ्याच्या बरकतीसाठी मुंबादेवीला रुपया लावतोय़
भटक्यांचं गाव..
नंदीबैलवाला येतो कोठून, जातो कोठे याचं आम्हा लहानग्यांना मोठं कुतूहल असायचं़ वडीलधाऱ्यांना ते विचारायचोही़ ‘भटक्यांचं कोणतंही गाव नसतं, वीस गावं-तीस गावं नंदीबैलवाल्याला चाळीस गावं’ असं आम्हाला सांगितलं जायचं़ पुढेपुढे नंदीबैलवाले येईनासे झाले़ हे नंदीबैलवाले कोठे गायब झाले या प्रश्नानं घेरलं आणि सुरू झाला शोध नंदीबैलवाल्यांचा़ नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती या गावात सुमारे तीन हजार नंदीबैलवाल्यांची वस्ती असल्याची माहिती मिळाली़ गावठाण हद्दीत पालं ठोकलेले, पालांसमोर झूल चढविलेले नंदी, असे चित्र मनात रंगवत कॅमेरा घेऊन पोहोचलो नंदीबैलवाल्यांच्या वस्तीत़ पण तेथील दृश्य पाहून फुटला एकदाचा भ्रमाचा भोपळा़.