गुंफण

By admin | Published: November 4, 2016 04:04 PM2016-11-04T16:04:50+5:302016-11-07T10:57:02+5:30

गळ्यातून निघणारे स्वर आणि सतारीच्या स्वरांत जिवाभावाचे सख्य नाही. दोघेही आपल्या जागी खणखणीत आणि स्पष्ट.

Gubunty | गुंफण

गुंफण

Next

 - देवप्रिया अधिकारी, समन्वय सरकार

गळ्यातून निघणारे स्वर आणि 
सतारीच्या स्वरांत 
जिवाभावाचे सख्य नाही. 
दोघेही आपल्या जागी 
खणखणीत आणि स्पष्ट.
पण तरीही आम्ही 
एकाच स्टेजवर आहोत आणि 
सहसादरीकरण करतोय.
एकाच वेळी दोन दिशांनी 
वाहत असलेले, तरीही 
हातात हात गुंफून चाललेले 
स्वरांचे हे प्रवाह.
एक अद्भुत आनंद
आम्हाला त्यातून मिळतो.


एकमेकांवर कुरघोडी करीत स्वत:ला सिद्ध करण्याच्या स्पर्धेत धावण्याचे जे वय असते त्या वयातील आम्ही कलाकार आहोत. आम्ही म्हणजे देवप्रिया अधिकारी आणि समन्वय सरकार. विदुषी गिरिजादेवी यांचे गंडाबंध शिष्य. जेमतेम वयाच्या तिशीच्या आसपासचे पण तरीही एकत्र मैफली करणारे, आणि तीही गायन आणि सतार अशी. म्हणजे, गिरिजाजींनी शिकवलेल्या एखाद्या ठुमरीमधील भाव जेव्हा देवप्रिया आपल्या गायनाच्या माध्यमातून शोधत असतो तेव्हा तोच शोध समन्वय सतारीवर उमटणाऱ्या सुरांच्या माध्यमातून घेत असतो. भले ठुमरीचे स्वर तेच असतील पण त्यातील भाव शोधणाऱ्या वाटा मात्र अगदी वेगळ्या. आणि या दोन वेगळ्या वाटा चालणारे दोन कलाकार आपापल्या जागेवरून, आपल्या नजरेतून आणि आपल्या माध्यमाच्या मदतीने एखादा राग त्यातील बंदिश किंवा एखादा टप्पा-ठुमरी-दादरा कसा दिसतोय हे समोरच्या रसिकांना दाखवत असतात. या वळणावरून, त्या झाडाच्या सावलीत किंवा त्या धावणाऱ्या झऱ्याच्या निवांत काठावरून आम्हाला दिसणारे ते स्वर असतात. 
खरे म्हणजे गळ्यातून निघणारे स्वर आणि सतारीचे स्वर यामध्ये फारसे जिवाभावाचे नाते नाही, नक्कीच नाही. दोघेही आपल्या जागी खणखणीत आणि स्पष्ट. तसे नाते असेलच तर गळ्याचे जवळचे नाते सारंगीशी आहे, व्हायोलिनशी आहे आणि बासरीच्या सुरांशीसुद्धा ही जवळीक होऊ शकते. पण असे असूनही आम्ही स्टेजवर एकत्र आहोत आणि जगभरातील कित्येक गाजलेल्या संमेलनात आम्हाला आमंत्रित केले जाते ते सहसादरीकरण करण्यासाठीच. एकाच वेळी दोन दिशांनी वाहत असलेले आणि तरीही हातात हात गुंफून चाललेले हे स्वरांचे प्रवाह बघणे, एकाच स्वराचे दोन वेगळे पोत अनुभवायला मिळणे हा आनंद रसिकांना वेगळा आनंद देत असेल का? अगदी आम्हाला मिळतो त्याच अद्भुत पातळीवरचा? 
आमच्या दोघांच्याही घरात गाणे. आईचे अंगाई गीत प्रत्येकाच्याच आयुष्यात तान्हेपणी येते, आमच्या बाबतीत घडले ते थोडे वेगळे. आईच्या गाण्याच्या निमित्ताने स्वरांनी लहान वयात पकडलेले आमचे बोट त्यांच्या हातून सुटलेच नाही. अंगाई गीताचे वय सरले तरीही स्वर आमच्या मनातून आणि आयुष्यातून हटायलाच तयार नाहीत आणि मग गुरूही भेटत गेले ते त्या स्वरांचे वेड लावणारे असेच. आधी ही भूमिका केली ती आमच्या दोघांच्या आयांनी आणि हे करीत असताना आमचा जीव त्या स्वरांमध्ये गुंतलाय हे जाणले पण आमच्याही आधी त्यांनीच. मग त्यांनीच आमच्यासाठी गुरू शोधले. देवला भेटले समरेश चौधरी आणि जयपूर अत्रौली घराण्याचे कुमार प्रसाद मुखर्जी. 
समन्वयला आईने सोपवले ते गुरू मणिलाल नाग, मग श्यामल चटर्जी, त्यानंतर कुमार प्रसाद मुखर्जी यांच्याकडे. विदुषी गिरिजादेवी आणि त्यांचे गाणे हे मात्र आमचे दोघांचे वेड. त्या गाण्यातील स्वरांचे लगाव आणि बंदिशीच्या भावाचे त्यात उमटणारे प्रतिबिंब आणि या सगळ्या प्रयत्नांतून रोजच्या जगण्याशी त्या स्वरांनी जोडलेले नाते हे आमच्यासारख्या तरुण कलाकारांनासुद्धा त्यांच्याकडे खेचून घेणारे होते. त्या गाण्यात असे काही होते ज्याच्यावर काळाची किंवा वयाची जरासुद्धा सावली पडलेली दिसत नाही. पण आपाजी (गिरिजाजींची ही खासगी वर्तुळातील ओळख) नावाचे भाग्य आयुष्यात येणे हे असे सोपे नव्हते. त्यापूर्वी होती भली थोरली मेहनत. 
आम्ही दोघं आमच्या रियाजाचा एक भाग असल्याप्रमाणे एकत्र भरपूर गाणे ऐकत होतो. बुजुर्गांचे गाणे त्यात असत केसरबाई केरकर आणि मोगूबाई कुर्डूकर, शिवाय अली अकबर खान साहेब आणि निखिल बॅनर्जी आणि मग त्या पुढच्या पिढीच्या किशोरीतार्इंसारख्या कलाकार ओघाने आल्याच. हे असे सतत गाणे ऐकणे म्हणजे स्वरांचे अहोरात्र पोषण घेण्यासारखे होते. प्रत्येक गायकीचे सुंदरपण शोधणे आणि ऐकताना त्या जागांचा सतत वेध घेत राहणे याचे त्या काळात वेड लागले होते. पण हे ऐकताना त्या बंदिशींच्या रचना फार क्वचित लक्ष वेधून घेत होत्या. सुंदर गाणे हे निव्वळ त्यातील स्वरांमुळे सुंदर होत नाही त्याची बंदिश आणि त्या बंदिशीतील साहित्य, त्यामागील भाव हा पण त्याचे सौंदर्य खुलवत असतो हा धडा प्रथम शिकवला तो आपाजींनी...! 
हे म्हणजे, सुंदर दिसणाऱ्या फुलाच्या तलम पाकळ्या आणि तजेलदार रंग याच्याकडून आतल्या मधापर्यंत पोचण्यासारखे होते. हा मध जेवढा मधुर तेवढा त्या रचनेचा भाव मधुर कोवळा, तो तुमच्या स्वरांमधून रसिकांपर्यंत जातोय का? आपाजी सतत फक्त हा प्रश्न विचारीत असतात जो आम्हाला आत, आमच्या आत असलेल्या संगीताकडे वळवत असतो..! या प्रवासात आणि रियाजात एक खूप वेगळे सूत्र मिळाले.. कलाकाराचे वय जितके अधिक तेवढे त्याचे गाणे अधिक तरुण आणि ताजे. 
वाढत्या वयाबरोबर गाणे मात्र अधिकाधिक तरुण होत जाते. कारण? स्वत:ची नीट ओळख होत जाते, मोठ्या परिश्रमाने स्वरांच्या खजिन्यात जमवलेल्या बेहतरीन चीजा घाईघाईने सतत दाखवण्याची लगबग गरजेची वाटेनाशी होते, गाणे अधिक स्वस्थ होते आणि निव्वळ तंत्राची ओढ वाटेनाशी होते... आम्ही भले वयाने तरु ण असलो तरी त्या पक्व, कसलीच घाई नसलेल्या गाण्याची ओढ हे आम्हा दोघांना सतत एकत्र बांधणारे सूत्र आहे. राग म्हणजे काही चार-पाच स्वरांची पुरचुंडी नाही, घेतली आणि बांधली कशीतरी हे ऐन तरु ण वयात समजणे यासारखे दुसरे कोणते भाग्य असणार? 
हे संस्कार मिळत असताना आपाजींनी आम्हाला आमच्या मुक्कामाचे ठिकाण दाखवले. त्या म्हणाल्या, ‘ऐसी डाली पकडो जहाँ तक कोई पहुच न सके...’ फार अवघड आहे अशा आवाक्याबाहेरील उंचीपर्यंत पोचणे पण अशक्य मात्र नाही असा विश्वास देणाऱ्या घटना या प्रवासात घडत असतात. अल्बेनियासारख्या छोट्याशा देशात मदर तेरेसा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्र माचे आमंत्रण मिळाले तेव्हा समजले हे आमंत्रण मिळालेले आम्ही एकमेव भारतीय कलाकार. आॅपेरा आणि बॅले महोत्सवाची आमंत्रणे मिळतात तेव्हा संयोजकांना आमचे सहसादरीकरण हा वेगळा प्रयोग वाटत असतो. पण दुसरीकडे शास्त्रीय संगीताच्या महोत्सवातूनही आमंत्रणे येतात तेव्हा भारतीय संगीताचा एक नवा आयाम श्रोत्यांना ऐकायचा-बघायचा असतो. या टप्प्यावर अनेकदा एकत्र रियाज होत नाही. पण आमच्या मनाच्या खिडक्या एकमेकांसाठी आता इतक्या उघडल्या आहेत की आत कोणते वारे वाहतायत हे न बोलता आम्हाला एकमेकांना समजत असते. 
रंगमंचावर जेव्हा समन्वयाच्या तारा एखाद्या रागाचे स्वर छेडतात तेव्हा देवप्रिया चमकतो, आपल्या मनातील राग याच्यापर्यंत कसा पोचला? या प्रवासातील सर्वात सुंदर आठवण ही आपाजींवर केलेल्या डॉक्युमेण्टरीची. आमच्याच गुरूंवर कृतज्ञ भावनेने केलेले हे काम. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर परंपरेची डहाळी त्यांनी ज्या समर्थपणे हातात धरून बनारसच्या मातीत असलेले गाणे सांभाळले आहे ते बनारसच्या भूमीत जाऊन ऐकण्याचा हा अनुभव ही आम्हाला आमच्या गुरूकडून मिळालेली एक कधीच न कोमेजणारी भेट आहे. 
आमच्या सहसादरीकरणातील नोकझोक, सहजता, एकाने सहज सोडून नेलेली स्वरांची आकृती दुसऱ्याने तेवढ्याच सहजतेने पूर्ण करणे हे सगळे काही या ओंजळीत पडलेल्या त्या भेटीची कमाल आहे...

एकत्र कार्यक्र म करायला लागल्यावर आमच्या नात्याला आलेली कलाटणी बघणे हा एक चकित करणारा अनुभव. लहान वयात आधी आम्ही मित्र होतो, मग कलाकार होतो. पण एकत्र प्रवास सुरू झाला तसे या नात्याला नवे रंग चढत गेले. आता आम्ही कलाकार आधी आहोत आणि त्यानंतर एकमेकांचे मित्र आहोत. कारण आता आमची उद्दिष्टे बदलली. आपल्यामध्ये जे संगीत आजवर उतरले आहे आणि अजून झिरपते आहे ते चोख स्वरूपात रसिकांसमोर मांडणे हे आता आमचे दोघांचे मक्सद आहे.

 

Web Title: Gubunty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.