हाका
By Admin | Published: December 6, 2015 12:53 PM2015-12-06T12:53:47+5:302015-12-06T12:53:47+5:30
पुरस्कार मिळाले म्हणून इथंच का थांबू? अजूनही मला नव्या जागा हाका मारतात, नव्या गोष्टी शिकाव्याशा वाटतात, त्या मी शिकतोही, संगीत कुठं थांबतं का? ख्यातनाम संगीतकार ए. आर. रहमान यांच्याशी संवाद
>- मुलाखत आणि शब्दांकन - संदीप आडनाईक
माझं संगीत कधीच पुरस्कारासाठी नव्हतं आणि नसेलही! माझा आत्माच संगीताचा आहे. त्यामुळे एक संगीत सोडलं तर माझ्या लेखी मोठं काही नाही. मात्र तरीही चित्रपटांसाठी संगीत देताना काही गोष्टी सांभाळायला लागतात. केवळ रहमानचं संगीत आहे म्हणून ते कधीच त्या चित्रपटाच्या कथानकापेक्षा वरचढ ठरणार नाही, ते त्या कथेचा भाग बनेल. अगदी संगीतप्रधान चित्रपट असला तरीही, संगीत चित्रपटाला पूरक ठरावं अशीच माझी स्वत:चीही इच्छा असते!’ - ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित संगीतकार ए. आर. रहमान अत्यंत सादगीनं आपल्या संगीताविषयी, आपण संगीत दिलेल्या चित्रपटांच्या संगीत प्रक्रियेविषयी सांगत होते.
गोव्यातील 46 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळामार्फत भरविण्यात आलेल्या फिल्म बाजारमध्ये रहमान सहभागी झाले होते. तिथे पत्रकार परिषदेत तर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिलीच, पण नंतर ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीतही त्यांनी मनमोकळा संवाद साधला.
रहमान नावाच्या अत्यंत साध्या आणि तरीही मनस्वी, प्रतिभाशाली संगीतकाराशी अगदी थोडा वेळ बोलणं हादेखील मोठय़ा आनंदाचा भाग होता.
बोलता बोलता विषय निघालाच नव्या आणि जुन्या संगीताचा, सिनेमासाठी संगीत देण्याच्या नव्या अत्याधुनिक आणि तांत्रिक मदतीच्या प्रक्रियेचा! आणि नव्या दिग्दर्शकांचा संगीताकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचाही!
‘मला नव्या आणि ताज्या दमाच्या दिग्दर्शकांसोबत काम करणं नेहमीच आवडतं’ असं सांगून रहमान म्हणाले, ‘त्यांच्यासोबत काम करताना खरं सांगतो माझाही उत्साह वाढतो. कारण त्यांची काम करण्याची पद्धत आणि दृष्टीही नवीन असते. उत्साह असतो प्रयोग करून पाहण्याचा! पूर्वी गीत आधी लिहिलं जायचं आणि नंतर त्यासाठी संगीत तयार केलं जायचं. पण आता तसं नाही. आता सिनेमाला संगीत देण्याचेही वेगवेगळे मार्ग तयार झाले आहेत. आता आधी धून तयार केली जाते आणि नंतर त्यावर गीत लिहिलं जातं. शब्दांवर चाल बांधणं आणि आधी चाल बांधून, धून तयार करून मग त्याला अनुसरून शब्द येतात. त्यामुळे तालासुरांसह-शब्दांचाही तोल या सा:या प्रक्रियेत फार महत्त्वाचा असतो.’
हे सारं ते अत्यंत सादगीनं सांगतात. मग प्रश्न येतोच त्यांच्याही व्यक्तिगत प्रवासाचा. करिअरच्या सुरुवातीला अनेक निर्मात्यांची आपणही भेट घेतलीये, चाली दाखवल्या आहेत, सामान्यत: सगळ्यांचा होतो तसाच आपलाही प्रवास झाला आहे असं ते अत्यंत थोडक्यात नमूद करतात.
‘काही जणांबरोबर चांगलं काम करता आलं, तर काही जणांनी वाईट अनुभवही दिले. पण त्याविषयी काय बोलायचं? माझं नाव झालं तेव्हा मात्र मी कधीतरी ऑस्कर जिंकेन अशी खात्री अनेकांनी बोलून दाखवली होती,’ असंही ते नम्रपणो नमूद करतात. आणि सांगतात,
‘मी अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम केलं. मिक जॅगर, देमियन मर्ले हे त्यातलेच काही. मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा एका स्टुडिओमध्ये बोलावलं तेव्हा पहिले दोन दिवस काय सुरू आहे, तेच मला समजत नव्हतं. मला वाटत होतं की ते माङयासाठी गाणी गात आहेत. परंतु तो एक गमतीचा भाग असावा. स्वान्तसुखाय चाललंय सगळं! परंतु नंतर मिक जॅगर मला म्हणाला की, त्याला सत्यमेव जयतेसाठी गायची इच्छा आहे. आणि नंतर तो गायलाही. सगळ्यांना ते आवडलं हे वेगळंच! असे अनुभव फार सुखावून जातात आणि कळतं, संगीताची भाषा कशी सर्वसूर आनंदच देते!’
‘आणि म्हणूनच संगीत फार मोठं आहे. जेवढं आपण शिकू, जेवढं करू तेवढं कमीच आहे’ असं सांगून रहमान म्हणतात, ‘मला संगीत क्षेत्रतील सर्वोच्च स्थान मिळवायचे होते. आणि ते मी मिळविलेही आहे. मात्र म्हणून मी इथंच का थांबू? मला नेहमीच नव्या जागा शोधायच्या असतात. त्यामुळे मी प्रयोग करत असतो. ते प्रयोग, ते संगीत हेच मला प्रेरणा देत राहतं! ब्रॉडवेवरच्या बॉम्बे ड्रीम्ससाठी सर्वप्रथम मला आंतरराष्ट्रीय ब्रेक मिळाला. अॅण्ड्रय़ू लॉईड वेबर यांनी तो दिला. जे. आर. आर. टॉकिन यांच्या लॉर्ड ऑफ द रिंगच्या नाटकासाठी मी संगीत दिलं. स्लमडॉग मिलेनियरने तर इतिहास घडविला. मला ऑस्कर मिळवून दिलं, हे सारं तर सगळ्यांनाच माहिती आहे. आता बॉलिवूड-हॉलिवूडसाठी काम करतो. पण खरं सांगतो, हॉलिवूडमधलं तंत्र अर्थात तंत्रज्ञान हादेखील सुरुवातीला आव्हानाचा भाग होता. त्याच्याशी मीही झगडलो. पण आता जमतंय जरा जरा!
आजही नवनवीन तंत्रज्ञानाला आत्मसात करण्यासाठी मी रोज झगडतो. चांगल्या संगीतासाठी, ते शिकण्यासाठीची प्रक्रिया, त्यासाठीची मेहनत आणि चिकाटी ही कधी संपत नाही, संपू नये!’
- असं रहमान सांगतात, तेव्हा वाटतं आपल्यासमोर मोठा क्यातनाम संगीतकार नाही, तर संगीताचा एक साधक बसलेला आहे, जो अजूनही शिकण्या-शिकवण्याविषयीच बोलतोय.!
(लेखक ‘लोकमत’च्या कोल्हापूर
आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)
sandip.adnaik@gmail.com