हमटा पास

By admin | Published: August 26, 2016 04:41 PM2016-08-26T16:41:41+5:302016-08-26T17:23:58+5:30

हिमालय दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा दिसतो, भासतो. कधी आक्राळ विक्राळ, तर कधी सौंदर्याने नटलेला. कधी भीतिदायक, तर कधी आनंदी. हमटा पासचा ट्रेक तर अशा अत्यंत सुंदर आणि कष्टप्रद गोष्टींची खाण आहे..

Hamta Pass | हमटा पास

हमटा पास

Next

 - अनिल नेने

हिमालय दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी 
वेगवेगळा दिसतो, भासतो. 
कधी आक्राळ विक्राळ, 
तर कधी सौंदर्याने नटलेला.
कधी भीतिदायक, तर कधी आनंदी.
हमटा पासचा ट्रेक तर
अशा अत्यंत सुंदर आणि कष्टप्रद
गोष्टींची खाण आहे..


हिमालय विराट आहे. विक्राळ आहे, अफाट आहे आणि अगाध आहे ! यात्रेकरूंना, भटक्यांना, ट्रेकर्सना साद घालत; गिर्यारोहकांना आव्हान देत, निसर्गप्रेमींना आकर्षित करत, ‘नगाधिराज’ ही बिरुदावली उंचावत आज हजारो वर्षे भव्यतेनं उभा आहे ! या नगाधिराजाच्या सादाला प्रतिसाद दिला की तुम्ही हिमालयाचे होऊन जाता. जणू काही हिमालय तुम्हास पछाडतो. सतत हिमालयात जाण्याची, हिमालयाच्या महानतेच्या दर्शनाची आस लागते आणि तुम्ही हिमालयात जाण्याची संधी शोधत राहता, आणि जाता !
हेच विचार १२००० फुटावरच्या हमटा पासमध्ये उभे राहिल्यानंतर माझ्या मनात येत होते. ‘हमटा ऋषी’ असा फलक वाचत असताना आपल्याला हिमालयाचं वेड लागलं आहे हे कळत होतं. जवळजवळ नऊ तास खडतर चालल्याचे परिश्रम एका क्षणात नाहीसे झाले आणि जमदग्नी ऋषींनी तपस्या केलेल्या त्या स्थानास मी साष्टांग दंडवत घातले. होय, येथेच जमदग्नी ऋषींनी तपश्चर्या केली होती. तिबेटन लोक जमदग्नी ऋषींना ‘हमटा ऋषी’ म्हणतात. विलक्षण शांत, मोठमोठ्या दगडांनी भरलेला, विविध ‘अलपाइन’ फुलांनी नटलेला, दुधाळ थंडगार पाण्याच्या ओढ्यांनी धावत असलेला, देखण्या प्रपातांच्या संगीताने भारलेला ‘हमटा पास’ भटक्यांना म्हणजेच ट्रेकर्सना सदैव आकर्षित करत राहिला आहे !
१७ जुलैला सकाळी दिल्लीच्या विमानतळावर पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील डॉक्टर्स धनंजय केळकर, केदार जोशी, मंजिरी रानडे, पद्मा कर्वे व विक्रम ओक उतरले. मी त्यांना भेटलो आणि आमची बस मनालीला जाण्यासाठी निघाली. १८ जुलैला मनाली दर्शनास निघालो. आणि मला पहिला आश्चर्याचा धक्का बसला गर्द वनराजीतील ‘हिडिंबा’चं देऊळ बघून ! भीमाची राक्षस कुळातील पत्नी हिडिंबा हिचं देऊळ ! मनालीला लागूनच असलेल्या किंवा आता मनालीचाच भाग झालेल्या ‘डुंगरी’ खेड्यात ‘हिडिंबा’चं लाकडी देऊळ आहे. तिथेच घटोत्कचाचं वास्तव्य होतं. ‘कामकांतका’ ही घटोत्कचाची पत्नी. ‘शक्ती’ची प्रखर उपासक होती. घटोत्कच जेथे बसून पूजाअर्चा, तपस्या करत असे तेथे घटोत्कचाचं देऊळ आहे. 
मनसोक्तपणे मनाली बघून १९ जुलैला ‘जोबडिनाल’ ह्या ९००० फुटांवर असलेल्या आमच्या ट्रेकच्या सुरुवातीच्या टप्प्यावर जाऊन पोचलो. मनाली ते जोबडिनाल हा दोन अडीच तासांचा मोटारीचा प्रवास अत्यंत रम्य होता. हिमालयाच्या अंगाखांद्यावरून आजूबाजूच्या देवदार, सुचिपर्ण आणि पाइन्सच्या गच्च झाडीतून मस्तीत चाललो होतो. जोबडिनालला आम्ही उतरून गरमगरम चहाचा, गुडदाणीचा, राजगिऱ्यांच्या वड्यांचा आस्वाद घेत होतो तोपर्यंत पोर्टर्सनी आमचं सामान खेचरांवर चढवलं आणि आमच्या ट्रेकला सुरुवात झाली. गणपती बाप्पा मोरया असा गजर करत प्रत्येकाने आपल्या काठ्या सरसावल्या आणि चालायला सुरुवात केली. अदमासे १०५०० फुटांवर असणाऱ्या ‘चिका’ येथे आम्ही रात्री मुक्काम करणार होतो. साधारणपणे ११००० फुटापर्यंत हिमालय गच्च वनराजीने भरलेला आहे. त्यानंतर मात्र जसं जसं वर जावं तसतसं झाडांचं जंगल मागे मागे राहतं आणि उघडा बोडका हिमालय चालणाऱ्याची साथ करायला लागतो. माझ्या बरोबरची सर्व डॉक्टर मंडळी तरुण होती. माझ्यापेक्षा विसेक वर्षांनी लहान होती. त्यामुळे संपूर्ण ट्रेकभरच ती लोकं झरझर मार्ग कापत. त्यातून मधुमेह माझा जोडीदार ! अर्थातच मी मात्र हळूहळू चालत होतो. चिकाला हा तरुण वर्ग अडीच तीन तासात पोचला, तर मला चार तास लागले ! श्रीपादने मात्र माझी साथ कधीही सोडली नाही. मी विनोदाने म्हणतो तुम्ही तरुण पोरं-पोरी नीट राहत आहात की नाही हे बघण्यासाठी मी मुद्दामच हळू चालून तुमच्या मागे राहतो. तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ! माझ्या पाचही ट्रेक्समध्ये मात्र एकानेही माझ्या हळू चालण्याविषयी कधीही तक्रार केली नाही. प्रत्येकाने मला सतत प्रोत्साहनच दिलं.
विलोभनीय सूर्यास्तानंतर काळोखाने अख्ख्या हिमालयास स्वत:च्या दुलईत घेतलं आणि एका वेगळ्या, अनोख्या वातावरणाचा आनंद परत लुटायला मिळाला. हिमालय दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा दिसतो, भासतो. कधी आक्राळ विक्राळ, तर कधी सौंदर्याने नटलेला. कधी भीतिदायक, तर कधी आनंदी, विलोभनीय. कधी पावसात न्हालेला, तर कधी बर्फात बुडालेला. हिमालयाचं प्रत्येक रूप आगळं, प्रत्येक रूप वेगळं. सर्व भावनांनी, रंगांच्या सर्व छटांनी निसर्गाचा आविष्कार कधी स्पष्टपणे, तर कधी हळुवार उलगडणारं !
या जादूबद्दल पुढल्या रविवारी..

Web Title: Hamta Pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.