हातकागदाचा उद्योग
By Admin | Published: October 8, 2016 04:37 PM2016-10-08T16:37:49+5:302016-10-08T16:37:49+5:30
सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज, घर, बँक, एटीएम.. कितीतरी कागद याठिकाणी वाया जातो. काही सरकारी विभागांना तर कागद रीतसर नष्ट करावे लागतात. त्यामुळे हे कागद रद्दीमध्ये न देता सरसकट जाळले जातात. काही शाळांत याच कागदापासून हातकागद आणि कलात्मक वस्तू बनवल्या जातात. खरेतर हा खूप मोठा व्यवसाय आहे आणि त्यात रोजगाराच्या बऱ्याच संधीही दडलेल्या आहेत.
- बसवंत विठाबाई बाबाराव
वाया जाणारे कागद हा एक मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे आपण आपली मोठी साधनसंपत्ती वाया घालवतो. पण वाया जाणाऱ्या याच कागदांचा जाणीवपूर्वक पुनर्वापर केला तर त्याची नासाडी तर थांबू शकतेच, पण याच रद्दी कागदांमधून खूप मोठा उद्योगही उभा राहू शकतो. सरकारी कार्यालये, शाळा-महाविद्यालये, घर, बँक, एटीएम यामधून खूप मोठ्या प्रमाणात कागद निघतो. अनेकदा हे कागद त्या त्या विभागाला रीतसर नष्ट करावे लागतात. म्हणून हे कागद रद्दीमध्ये न देता जाळले जातात. खरेतर हा कागद हातकागद व कागदापासून कलात्मक वस्तू बनविण्याच्या कामी वापरता येऊ शकतो. गेल्या काही वर्षांत हातकागदाला प्रचंड मागणी असून, उच्चभ्रू वर्गात या कागदापासून बनविलेल्या पत्रिका, फोल्डर्स, लेटरपॅड, शोभिवंत वस्तूंचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आहे. मात्र मागणीच्या तुलनेत कागद निर्मितीचे प्रमाण खूप कमी आहे. भविष्यात सेवा क्षेत्रातील संधी पाहता हातकागदसारखा व्यवसाय कुशलतेने केल्यास या क्षेत्रात रोजगाराच्या खूप संधी आहेत. शेतात तन म्हणून फेकले जाणारे आणि शेतीतून निघणाऱ्या कचऱ्याचाही वापर हातकागद बनविण्यासाठी केला जाऊ शकतो. कोणकोणत्या वनस्पतीचा चोथा/फायबर वापरून हातकागद बनविता येतो हेही संशोधनाचे क्षेत्र आहे. पॉँडीचरीमधील अरोव्हिले या जागतिक गावात (ग्लोबल व्हिलेज) हातकागदासंबंधी प्रशिक्षण घेऊन ‘सीईई’च्या माध्यमातून यासंबंधी कार्यशाळा सामग्री विकसित करण्यात आली आहे. हातकागदसंबंधी प्राथमिक माहिती आणि मागणीनुसार याविषयी कार्यशाळा घेतली जाते. शाळा, महाविद्यालये, अनेक संस्था, सोसायट्यांमध्ये अशा कार्यशाळा घेण्यात येतात. एका अर्थाने कागद वाचवणे किंवा त्याचा योग्य वापर आणि पुनर्वापर करणे म्हणजे वृक्षारोपण आहे. या उपक्र माला आम्ही हातकागद उपक्र म म्हणत असलो तरी वापरलेल्या कागदावर प्रक्रि या करून हातांनी बनवलेला हा कागद आहे. हातकागद उद्योगात कोणतेही मोठे यंत्र न वापरता प्रामुख्याने वनस्पतीमधून सेल्युलोज काढून त्याचे कागद बनविले जातात. जसे, केळीचा बुंधा, अंबाडीची साल, बांबू, घायपात, कपाशी इत्यादि भिजवून, शिजवून, बडवून यातील तंतू वेगळे करून त्याचे कागद बनविले जातात. हातकागदाच्या वेगवेगळ्या वस्तू बनविता येतात. ग्रीटिंग कार्ड्स, वॉलपेपर म्हणूनही हा कागद खूप आकर्षक दिसतो. कागदी लगद्यापासून मुखवटे व इतर वस्तू बनविणे हाही खूप मोठा व्यवसाय आहे. जव्हारमधील रामखिंड हे एक छोटेसे आदिवासी पाडे आहे. येथील सुदाम काशीनाथ भेये हे या भागातील शाळांमधून, सरकारी कार्यालयांतून वापरून झालेला कागद गोळा करून मुखवटे बनवतात. त्यांच्या मुखवट्यांना देशभरातून मागणी असते. शिक्षक प्रशिक्षणातून या सर्व माहिती अनेक शाळांमध्ये पोहचली. यातून शाळेतील विद्यार्थ्यांनी कागदाचे साठवण करण्यास सुरु वात केली. खराब कागदाचे लगदे करून हातकागद बनविण्यास मुले शिकली. या कागदापासून गणितासारखा अवघड समजला जाणारा विषय सोपा करून शिकविण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूही तयार केल्या आहेत. अलीकडेच रत्नागिरीमधील न्यू इंग्लिश स्कूल, पाग चिपळूण या शाळेला वाया जाणारा कागद साठवून त्यापासून उपयुक्त वस्तू तयार केल्याबद्दल पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासनाचा ‘सृष्टी मित्र पुरस्कार’ मिळाला आहे. शाळेने कागदी लगदा व हातकागद यापासून भूमिती शिकताना उपयोगी पडतील अशा आकृत्या, फाइल्स, फोल्डर, पेन होल्डर, बांगड्यांचा बॉक्स, फुलदाणी, भेटकार्ड, विविध आकाराची भांडी इत्यादि वस्तू बनविल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे, या शाळेने प्लॅस्टर आॅफ पॅरीसचे गणपती बनविण्याचे टाळून कागदी लगद्याचा गणपती बनविला होता. ‘पश्चिम घाट विशेष इको क्लब’ योजनेतील नंदुरबार ते सिंधुदुर्ग या पश्चिम घाटात येणाऱ्या १३ जिल्ह्यांतील एकूण २४३ शाळांनी हातकागद हा उपक्र म केला. यातून जाळल्या व फेकल्या जाणाऱ्या कागदाचे महत्त्व विद्यार्थी आणि शिक्षकांना कळाले. याचा परिणाम म्हणून इको क्लबने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. एक म्हणजे कागदाचा संपूर्णपणे वापर करायचा आणि दुसरे म्हणजे टाकाऊ कागद जाळणे किंवा कंपोस्ट खड्ड्यात टाकण्याचे टाळून त्याचा संग्रह करायचा. त्यासाठी प्रत्येक वर्गखोल्यांमध्ये कचरा पेटीशेजारी एक कागद संकलनाची पेटी ठेवण्याचाही निर्णय क्लबने घेतला. शाळा परिसर, सर्व वर्गखोल्या, कार्यालय यामधील टाकावू कागद एकत्रित करून त्याचे वजन करण्यात येऊ लागले. इतर काही शाळांनी साठवलेला कागद विकून त्यातून मुलांसाठी वह्या विकत घेतल्या. कागदाचा असा उपयोग झाला तर वाया जाणाऱ्या कागदाचा अर्थपूर्ण उपयोग करता येईल आणि विद्यार्थ्यांनाही त्यातून खूप काही शिकायला मिळेल. कसा तयार होतो हातकागद? हातकागद तयार करण्याच्या उपक्र मामध्ये सर्वात पहिल्यांदा शाळेत महिन्याला किंवा वर्षाला वापरलेला कागद किती तयार होतो याचा अंदाज बांधला जातो. नंतर प्रत्यक्षात संग्रह करून मोजमाप केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांना वर्गातील साफसफाईचे महत्त्व समजून येते. कागदाचे आकारमान आणि वस्तुमान याचा अंदाज येतो. वजन व मापे यांची माहिती मिळते. वर्षभर किंवा सहा महिने साठलेला कागद हातकागद बनविण्यासाठी पुरेसा असतो. शाळेमध्ये इयत्ता किती आहेत, शाळेतील वातावरण कसे आहे यावरून कागद कचऱ्याचे प्रमाण कमीअधिक होऊ शकते. हातकागद करण्यासाठी जमवलेल्या कागदाचे वर्गीकरण करावे लागते. त्यासाठी रंगीत कागद, वह्यांचे कागद, पुस्तकांचे कागद किंवा वह्यांचे पुठ्ठे वेगळे करून ठेवावे. सर्वच प्रकारचा कागद वापरून हातकागद बनविता येतो. या कागदामध्ये चुकून आलेले प्लॅस्टिकचे तुकडे, पिना, टाचणी, स्टेपलर पिना इत्यादि काळजीपूर्वक काढून घ्यावे लागतात. हे सर्व कागद साधारणत: दीड ते दोन इंच असे बारीक फाडून घ्यावे. या सर्व गोष्टी करताना विद्यार्थी खेळकरपणे आनंद घेतील आणि यातून ते बरंच काही शिकतील हे शिक्षकांनी ध्यानात घेतलं पाहिजे. तुकडे करून घेतलेले कागद मोठ्या टब/बादली/बकेटमध्ये भिजत ठेवावे. भिजलेला कागद लाकडाच्या मदतीने किंवा हाताने बारीक करून घ्यावा. भिजलेला कागद ढवळून किंवा चुरगळून त्याचा पातळ लगदा तयार होतो. पीठ चाळावयाची चाळणी असेल तर उत्तम, नसेल तर खास यासाठी चौकोनी आकाराची बारीक छिद्रांची चाळणी बनवून घ्यावी. तयार झालेल्या लगद्यापैकी थोडासा लगदा दुसऱ्या टबमध्ये टाकून घ्यावा. त्यामध्ये अधिकचे पाणी टाकून कपडे भिजत घालण्यासाठी निरमा/डिटर्जंट टाकून जसे ढवळतात तसे हातानी ढवळून घ्यावे. मग लगदा संथपणे खाली बसण्याआधी त्या पाण्यात चाळणी बुडवून सरळ धरून वर काढावे. चाळणीच्या जाळ्यामध्ये कागदातील सेल्युलोज एकमेकांत गुंततात. त्यातून पाणी खाली निघून जाते व कागद फक्त उरतो. या चाळणीवर साध्या धोतरासारखा कापड अंथरून, उलटवून काढून घ्यावे. धोतरावर पापड वाळत टाकतात तसा कागद अलगदपणे कापडावर पडतो. वाळल्यानंतर हा कागद खूप आकर्षक दिसतो. चित्रकलेसाठी हा कागद चांगला असतो.
dbaswant@gmail.com