सखी
By admin | Published: October 21, 2016 06:51 PM2016-10-21T18:51:12+5:302016-10-21T18:51:12+5:30
आम्ही सहाजणी. प्रत्येकीची कलेची ओंजळ भरलेली. सावनी तळवलकरचा दमदार तबला, महिमा उपाध्यायचा सणसणीत पखवाज, देबप्रिया चटर्जीची सुरेल-व्याकूळ बासरी, नंदिनी शंकरचे तरल व्हायोलीन, भक्ती देशपांडेचे डौलदार कथक आणि या सर्वांना एकत्र गुंफणारा कौशिकी चक्र वर्तीचा तयारीचा, पण जातीने कोवळा असलेला स्वर. आमच्यातील मैत्रीच्या, परस्परांच्या कलेचा सन्मान करण्याच्या भावनेतूनच जन्माला आला, ‘ऑल गर्ल्स इंडियन क्लासिकल परफॉर्मिंग बॅण्ड!’
Next
>वन्दना अत्रे
आम्ही सहाजणी. संगीताच्या एकाच अवकाशात पण आपल्या-आपल्या कक्षेत आणि आपली-आपली धांदल घेऊन जगणाऱ्या. त्यामुळेच एकत्र, एका व्यासपीठावर येण्याची अगदी क्षीण शक्यता असलेल्या आम्ही सहाजणी. उभ्या होतो एका रंगमंचावर, आपल्या कलेची ओंजळ भरून घेऊन. सुगंधी फुलांची नाजूक माळ एकमेकींच्या गळ्यात घालीत आमच्यातील मैत्रीचा, परस्पर कलेचा सन्मान करण्याच्या सखीपणाच्या निर्मळ भावना मनात घेऊन. त्यात होता सावनी तळवलकरचा दमदार तबला, महिमा उपाध्यायचा सणसणीत पखवाज, देबप्रिया चटर्जीची सुरेल-व्याकूळ बासरी, नंदिनी शंकरचे तरल व्हायोलीन, भक्ती देशपांडेचे डौलदार कथक आणि ह्या सर्वांना एकत्र गुंफणारा कौशिकी चक्र वर्तीचा तयारीचा पण जातीने कोवळा असलेला स्वर.
हा शोध होता एकमेकींच्या कलेचे सामर्थ्य आणि सौंदर्य ह्याचा शोध घेत ती सगळी एकत्र गुंफून रसिकांसमोर मांडण्याचा. संगीतातील फ्युजन वगैरे करण्याचा आमचा अभिनिवेश अजिबातच नव्हता. कारण आम्हा सर्वांचीच मुळे परंपरेत खोलवर, घट्ट रु जलेली, आणि तेच पोषण घेत सशक्त झालेली. ह्या समृद्ध अशा परंपरेने आम्हा प्रत्येकीला जे दिले ते एकत्र, एका फ्रेममध्ये मांडून बघण्याचा हा प्रयत्न. आमच्या प्रत्येकीच्या एकल (सोलो) मैफलीतून व्यक्त होणारी आमची कला जेव्हा तिच्याच परिवारातील दुसऱ्या कलेच्या हातात आपले हात गुंफून उभी राहते तेव्हा नव्या तऱ्हेने खुलते का? आजवर त्यातून व्यक्त न झालेले सुंदरतेचे नवे पैलू त्यात उजळून निघतात का हे बघूया असा विचार प्रथम कौशिकीच्या मनात आला. आणि त्यासाठी आम्ही भेटू लागलो तेव्हा जाणवत गेले, तिच्या मनात असलेली सखी आमच्या प्रत्येकीच्या मनात खोलवर कुठेतरी होतीच, तिला प्रतीक्षा होती आमच्या एका स्पर्शाची. आणि मग, पहाटेच्या वाऱ्याच्या एका झुळकीने एखादी सुगंधी कळी हलकेच उमलावी तसा जन्माला आला आमचा हा ‘सखी’ नावाचा ‘आॅल गर्ल्स इंडियन क्लासिकल परफॉर्मिंग बॅण्ड!’
कौशिकीच्या मनातील सखीची मोघम आकृती आमच्या एकत्र भेटींमधून अधिकाधिक रेखीव होत गेली. स्त्रीवादाचा करकरीत अभिनिवेश नसलेली, उलट स्त्री नात्यातील मैत्रीच्या मृदू बंधाचा शोध घेणारी ही सखी. आमच्या प्रत्येकीत असलेल्या स्त्रीत्वाचा गौरव करणारी. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अभिजात हिंदुस्थानी संगीत जेव्हा यवनांच्या आक्र मणाच्या क्रूर टाचेखाली चिरडले जात होते तेव्हा आपल्या कोठ्यावर ते मोठ्या असोशीने सांभाळून ठेवणाऱ्या कित्येक अनाम तवायफ स्त्रियांच्या कामगिरीला सलाम करणारा हा प्रयोग. त्यांनी सांभाळून ठेवलेले अनेक पारंपरिक सुरेल झुले, चैती, बंदिशी, ठुमरी, तराणे हे वैभव तेवढ्याच अलवारपणे रसिकांना दाखवण्याचा प्रयत्न.
सखीची कल्पना सर्वांपुढे मांडून झाली. काय ही कल्पना? अगदी ढोबळ मानाने सांगायचे, तर हिंदुस्थानी आणि कर्नाटक संगीतातील निवडक बंदिशींचे असे सादरीकरण, ज्यात काहींना नृत्याची जोड आहे आणि काहींमध्ये तबला, पखवाज, बासरी, व्हायोलीन ह्या एकेका वाद्याची अशी साथ आहे की त्या कलाकाराच्या व्यक्तिगत साधनेची लख्ख ओळख व्हावी. एकदा कौशिकीने कल्पना मांडल्यावर रात्री दोन-दोन वाजेपर्यंत चर्चेचे फड रंगले. कोणत्या बंदिशी गायच्या ते ठरवताना, त्यांचे राग, ताल ह्यांची निवड करताना ज्यामध्ये सगळ्या कलाकारांचे सामर्थ्य अधिकाधिक व्यक्त करता येईल त्याचीच निवड केली गेली. पण एक बाब प्रत्येकीला स्पष्ट ठाऊक होती, प्रत्येक बंदिशीमध्ये सहाही जणींची ठळक हजेरी असेलच असे नाही. प्रत्येक बंदिशीवर कोण्या एक-दोघींचीच ठसठशीत सही असणार होती. ह्यामध्ये आव्हाने दोन पातळीवर होती. एक, सतत स्वत:लाच केंद्रस्थान मिळणार नाही हे मान्य करून कधी गरज पडेल तेव्हा साथीदाराची भूमिका निभावण्याची मानसिक तयारी करण्याची. एरवी एकल मैफलीत कायम स्वत:वर असणारा फोकस अन्य कलाकारांवर जाऊ शकतो हे मान्य करण्याची. आणि दुसरे, प्रत्येक बंदिश तेवढीच सुंदर करण्यासाठी त्यात आपले वैचारिक योगदान देण्याची. इथे केवळ स्वत:चा कार्यक्र म चांगला करण्याचा विचार करून चालणार नव्हते, तर त्यापलीकडे जाऊन सहाजणी मिळून मांडल्या जाणाऱ्या संगीताच्या परिणामांकडे बघण्याची गरज होती. त्या संगीताला एकत्र बांधणाऱ्या सूत्राला केंद्रस्थानी ठेवणारे, त्यातील आशय रसिकांपर्यंत नेणारे एवढेच प्रत्येकीने द्यायचे होते पण विचार मात्र समग्र करायचा होता.
ह्या सगळ्या प्रक्रि येत प्रत्येकीचा स्वतंत्र रियाज, सराव स्वत:च्या वेळेत सुरू झाला आणि एकत्र अशी दोन-दोन दिवसांची आठ-आठ तास चालणारी अशी आठ-नऊ सत्रं. काय नव्हते ह्या सत्रांत? खूप गंभीरपणे केलेल्या एखाद्या बंदिशीवर आणि त्याच्या अर्थावरील चर्चा त्यात होत्या. त्या निमित्ताने कोठ्यावरील तवायफचे आयुष्य आणि संगीतातील त्यांचे जाणतेपण, पण ते मांडण्याचा अवकाश न देणारी समाजव्यवस्था ह्यावर आम्ही आजची स्त्री म्हणून जिव्हाळ्याने बोलत होतो आणि दुसरीकडे कार्यक्र माचे दृश्य रूप अधिक सुंदर करणारे पडदे, कुशन्स, त्यावरील खास पारंपरिक हाताच्या कामाची कलाकुसर हे जोखत होतो, निवडत होतो. सुरेल संगीताला सुंदर रूपात मांडण्याचा हा खटाटोप होता. पण ह्या झाल्या गंभीर, विचारपूर्वक वगैरे करायच्या गोष्टी ज्या फार काळ करणे आमच्या वयाला शोभत नव्हते आणि कधी झेपतही नव्हते...! मग अर्थातच वयाला शोभेल अशी धमाल, मस्ती, थट्टा, चटक-मटक खाणे आलेच...! पण आमच्या सखीमधील उत्कटता, तरलता टिकवण्यासाठी गंभीर चर्चा जेवढी गरजेची होती तेवढी ही मस्ती पण गरजेची होती, जी आम्हाला परस्परांची अधिक ओळख करून देत होती, एकमेकींना समजून घ्यायला मदत करीत होती...
पहिल्या काही दिवसांतच ‘सखी’ अमेरिका आणि युरोप फिरून आणि पदरात भरपूर दाद घेऊन आली तेव्हा मग आम्ही त्यात कार्यक्र माच्या स्वरूपानुसार नव्या-नव्या बंदिशी जोडत गेलो आणि अशा नव्या बंदिशी निवडण्याचे, बसवण्याचे काम आम्ही जेव्हा दौऱ्यावर जातो तेव्हा हमखास सुरू असते. बनारसमध्ये साक्षात शिवरात्री महोत्सवाचे आमंत्रण सखीला मिळाले तेव्हा आम्हाला जाणवले, आमच्याकडे शिवस्तुती करणारी बंदिशच तयार नव्हती. मग अर्थात शिवतांडवाचा विचार सुरू झाला...! सखीला मिळणारे प्रत्येक आमंत्रण हे आमच्यासाठी नव्या बंदिशीचा विचार करण्याची संधी असते, बसवलेल्या बंदिशीची निवड करण्याची संधी असते. आणि प्रत्येक कार्यक्र म ही आमच्यासाठी बकुल फुलांची ओसंडून वाहणारी ओंजळ असते, आपल्या मंद सुगंधाने मन प्रसन्न करणारी...
शिकागोत ऐन दुर्गापूजेच्या दिवशी सखी रंगमंचावर होती. अजय चक्र वर्ती ह्यांची खास बंदिश, जय जग जननी देवी, कौशिकी म्हणत होती आणि भक्ती आपल्या नृत्यातून महिषासुर मर्दिनीचे उग्र रूप दाखवत होती. देवीने असुराचा वध केला आणि सभागृहातील सगळ्या भारतीय स्त्रियांनी गुडघे टेकून, माथा जमिनीला लावीत ह्या दुर्गेला नमस्कार केला... ते वंदन होते कौशिकीच्या स्वरांमधून, भक्तीच्या पदन्यासातून, सावनी-महिमाच्या बोलांमधून, आणि देबप्रिया-नंदिनी छेडीत असलेल्या आलापांमधून आकाराला येत असलेल्या स्त्रीशक्तीच्या विराट स्वरूपाला...
‘सखी’चा पहिला प्रयोग. संगीताच्या अभिजाततेला जराही धक्का लागेल असे आम्ही ह्यात काहीही केले नव्हते पण तरी मनात धाकधूक होती. आम्हाला प्रत्येकीला मनोमन आमच्या ह्या प्रयोगामागचा हेतू पक्का ठाऊक होता. ह्या दृक्श्राव्य अशा प्रयोगाच्या निमित्ताने अभिजात संगीतापासून दूर जात असलेला श्रोता परत ह्या संगीताकडे वळावा अशी इच्छा होती. पण हा निखळ हेतू जाईल का लोकांपर्यंत? आमच्या मनातील शंकेला जराही थारा मिळू नये असे आमंत्रण आम्हाला सखीच्या मुहूर्ताच्या प्रयोगालाच मिळाले आणि ते होते अतिशय प्रतिष्ठित अशा, अमेरिकेतील कार्नेजी हॉलमध्ये सखी सादर करण्याचे...! सलामीलाच मिळालेली ही घसघशीत पावती आमचा उत्साह ओसंडून वाहण्यासाठी पुरेशी होती की...!
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)