त्याची मरणातून सुटका झाली...खऱ्या अर्थाने जिंदगी वसूल झाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 07:25 PM2019-07-08T19:25:49+5:302019-07-08T19:29:12+5:30
हरवलेली माणसं : त्याच्या जवळ त्याच्या आईशिवाय कुणी फिरकले तरी तो त्रागा त्रागा करायचा.कुणाशी बोलायचे नाही, कुणी दिलेले खायचे नाही, अंगावर कपडे घालायचे नाहीत. स्वत:ला कसलातरी त्रास करून घेण्याचेच जणू त्याला वेड लागले होते.
- दादासाहेब श्रीकिसन थेटे
त्याचे नाव हरी..! वय साधारण पंचवीस वर्षे..! काही वर्षांपूर्वी बैलाने मारल्यामुळे अंथरुणाला खिळला. अंथरुणावर एकाकी पडलेला हरी प्रेम आणि साहचर्याच्या अभावामुळे मनातूनही एकाकी पडत होता. त्या घटनेपासून त्याच्या मनावर कसला तरी आघात झाला. बरा झाल्यानंतरही तो एकटा एकटा राहायला लागला. ना कुणाशी बोलायचा, ना कुणाला मनातले दु:ख सांगायचा. अचानकच गुमसुम झाला होता तो. सुरुवातीला अनवाणी पायाने फिरू लागला. शेतशिवारात काट्याकुट्यात रक्ताळलेल्या पायांनी चालू लागला. स्वत:ला त्रास करून घेण्याचा जणू त्याने निर्धारच केला होता. कालांतराने कपडे फाडून मंदिराच्या ओट्यावर बसू लागला. त्याच्या अर्धनग्न अवताराकडे पाहून गावातल्या बायका तक्रार करू लागल्या. तिरस्काराची नजर त्याच्या एकाकी मनाला घाव मारून गेली. त्याने मंदिराच्या त्या ओट्याबरोबरच अंगावरच्या कपड्याचाही त्याग केला. त्याची नखे शिकारी पंजासारखी दिसायला लागली होती. त्यामुळे त्याच्या जवळ जाण्याचीही भीती वाटायची. हिवाळ्याच्या कडाक्याच्या थंडीतही त्याने अंगावर काहीच घातलेले नव्हते. थंडी, ऊन, पाऊस आणि अंगावर साचलेल्या ढीगभर मळामुळे त्याच्या शरीरावर पडलेले त्वचेचे खवले खवले पाहिले की, मनात कालवाकालव झाली. इंच-इंचभर वाढलेल्या त्याच्या तीक्ष्ण नखांनी त्या खवल्यांना खाजवल्यामुळे अंगावर ठिकठिकाणी जखमा झालेल्या होत्या.
पहिल्या दिवशी त्याच्या जवळ जाताच त्याने हातात दगड उचलले. त्याला वाटले आम्ही घाबरून पळून जाऊ; पण आम्ही त्याच्यासाठीच आलो होतो! त्याच्या पूर्ण अस्ताव्यस्त शरीराचे निरीक्षण करून त्याच्याशी बोलण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. त्याच्याबद्दल माहिती विचारत होतो; पण तो काहीच बोलत नव्हता. त्याच्या शरीरात बोलण्याबरोबरच, उभे राहण्याचेही अवसान शिल्लक नव्हते. जर आठवडाभरात त्याच्यावर उपचार झाला नाही, उन्हातून त्याला बाहेर काढले नाही तर तो जगेल याची शाश्वती नव्हती. नग्नावस्थेत त्रेचाळीस डिग्रीच्या तापमानात उघड्यावरच झोपणे, इंच इंच नखांनी शरीरावर जखमा करून घेणे, चार चार दिवस उपाशीपोटी झोपणे, अंगावर कपडे चढवले की, त्या कपड्यांना फाडणे नाहीतर जाळून टाकणे..! एकूणच सर्वच भयंकर होते. त्याहीपेक्षा माणसे पाहून त्याने डोळ्यातून गाळलेले अश्रू आणि केलेला आक्रोश मनाला चिरून टाकणारा होता. आमच्याबद्दल त्याच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, म्हणून मधल्या दोन दिवस त्याच्याशी बोलत राहण्याचा आम्ही प्रयत्न केला.
पोलीस स्टेशनकडून रीतसर परवानगी मिळवणे, ज्या संस्थेत त्याला दाखल करावयाचे होते, त्यांच्याशी हितगुज करणे या सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला स्वच्छ करण्यासाठी एका सायंकाळी आम्ही त्याच्याजवळ पोहोचलो. तो नग्नावस्थेत एक लिंबाच्या झाडाखाली पडलेला होता. मी सोबत आलेल्या सर्वांना आवश्यक त्या सूचना दिल्या. कारण तो आक्रमक होण्याचा संभव होता. अपेक्षेप्रमाणे घडलेही तसेच. त्याला जाग येताच आमच्या कृतीला प्रतिकार करण्याचा तो प्रयत्न करू लागला; पण अशक्तपणामुळे आमच्या ताकदीपुढे त्याची ताकद शरण आली. त्याही वेळी आम्ही त्याला आपुलकीने आणि प्रेमाने विश्वास देण्याचा प्रयत्न करीत होतो. त्याचे वाढलेले एक एक नख म्हणजे एखाद्या धारदार हत्यारासारखे झाले होते. त्या नखांना कापताना मोठे आव्हान पार पडल्यासारखे वाटत होते. नखे कापण्याच्या निमित्ताने आमचा त्याला स्पर्श होत होता. त्या स्पर्शाने त्याच्या डोळ्यातून पुन्हा अश्रुधारा वाहू लागल्या. त्याच्या केसांना कापताना त्याने विरोध केला; पण प्रेमाच्या दोन शब्दांनी तो विरोधही लगेच मावळला. प्रत्येक केस कापल्यानंतर त्याच्या डोक्यावरून फिरणारा माझा हात बहुधा त्याच्या मनात ममतेची आठवण जागवत होती. आंघोळ करून कपडे घातल्यानंतर तो एखाद्या निरागस बालकाप्रमाणे वाटू लागला. आता गडद अंधार झाला होता. या अंधारात मोबाईलच्या उजेडात त्याच्यावर आम्ही माणुसकीचे प्रयोग करीत होतो. त्याच्या आणि आमच्या दरम्यान एक बंध निर्माण होत होता. त्याला आमच्याप्रती विश्वास निर्माण होत होता. त्याने आज कपडे फाडले नाहीत, जाळलेदेखील नाही. आजवर नुसता रडताना दिसलेला हरी कपडे घातल्यानंतर हसायला लागला. तो कित्येक दिवसांनी हसला होता. त्या हास्यात जीवनाचा आनंद लपलेला होता. त्याच्या हास्याने आम्हाला ऊर्जित केले, आम्ही विजयाचा जल्लोष करू लागलो. आता अर्ध्यापेक्षा जास्त लढाई आम्ही जिंकलेली होती...!
दाढी-कटिंग केलेला, नखे कापलेला, स्वच्छ इस्त्रीचे कपडे घातलेला हरी आता ओळखायलाही येत नव्हता. त्या वातावरणात एक नितळ आणि ऊर्जादायी परिवर्तन घडून आले होते. तो नुसता माणसासारखा दिसायलाच लागला नाही, तर माणसासारखा बोलायलाही लागला. मला लडिवाळपणे म्हणाला. ‘फॅटमधी बसून बानेगावला चला...’ मीही लगेच हो म्हणालो. आम्हाला पाहिजे तसे घडले होते. बानेगाव म्हणून अमृतवाहिनी प्रकल्पात आम्ही त्याला घेऊन जाणार याची त्याला कल्पनाही कळू दिली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून त्याला गाडीत बसवताना सगळे गाव जमा झाले होते. गाव उसने अवसान आणून दु:ख व्यक्त करीत होते. त्याच्या आईच्या डोळ्यांत पाणी आणि आशा एकदाच दाटल्या होत्या. त्यांची आशा अमृतवाहिनी ग्रामविकास संस्थेच्या सहकार्याने आम्ही पूर्ण करणारच होतो! गाडीत बसताना त्याच्या नजरेत एक अबोला व दुरावा दाटला होता. गाडी नगरच्या रस्त्याने निघाली, तेव्हा नजरेआड जाईपर्यंत गाडीकडे एकटक पाहणारे गावकरी मात्र हरीच्या डोळ्यांत स्पष्टपणे उमटताना दिसत होते...!हरी आता माणूसपणाचा प्रवास करतोय. माणूसपण हरवलेल्या लोकांत राहून...! शहाण्याच्या परिघात राहून झालेल्या जखमा वेड्या लोकांत राहून त्याला भरायच्या आहेत. द्वेष, तिरस्कार, अपमान, एकलेपणा या सर्वांपासून दूर जात आपल्याच माणसात तो आता दाखल झाला होता. एक वेगळी दुनियादारी अनुभवायला! या मोहिमेसाठी सहकार्य करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याला मानाचा सलाम! या निमित्ताने मानवतेच्या अनेक ज्योती भायगव्हान गावात निर्माण झाल्या. त्या पेटलेल्या ज्योतीने माणुसकीचे प्रकाशमय शिलेदार निर्माण होतील अशी आशा...