सागराच्या कुशीत शिरण्यापूर्वी...

By admin | Published: April 29, 2017 09:05 PM2017-04-29T21:05:55+5:302017-04-29T21:05:55+5:30

समुद्राची ती धीरगंभीर गाज, वाळूचे किनारे, सूर्यप्रकाशात बदलत जाणारं त्याचं मोहक रुपडं आणि कोणालाही आपल्याकडे आकर्षून घेण्याची त्याची अफाट ताकद..

Before heading into the ocean ... | सागराच्या कुशीत शिरण्यापूर्वी...

सागराच्या कुशीत शिरण्यापूर्वी...

Next

 - महेश सरनाईक

समुद्राची ती धीरगंभीर गाज, वाळूचे किनारे, सूर्यप्रकाशात बदलत जाणारं त्याचं मोहक रुपडं आणि कोणालाही आपल्याकडे आकर्षून घेण्याची त्याची अफाट ताकद.. त्यामुळेच समुद्रकिनाऱ्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय..
 
जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी, डोळ्यांत मावणार नाही इतकं त्याचं अथांग रूप, त्याची ती धीरगंभीर गाज, वाळूचे किनारे, सूर्यप्रकाशात बदलत जाणारं त्याचं मोहक रुपडं आणि कोणालाही आपल्याकडे आकर्षून घेण्याची त्याची ती प्रचंड ताकद..
त्यामुळेच समुद्र दिसल्यावर कोणताही सर्वसामान्य माणूस त्याच्या कवेत शिरायला बघतो. अगोदर त्याच्या त्या विराट रूपानं तो थोडासा भांबावतो, पण एकदा का त्या पाण्याशी लगट झाली की मग आपण आपले राहत नाही..
समुद्रकिनाऱ्यावर त्याच्या पाण्यात कितीही डुंबलो, कितीही मौजमजा केली, तरीही काही केल्या समाधान होत नाही. समुद्र आपल्याला त्याच्या कुशीत येण्यासाठी खुणावत राहतो आणि त्याच्या स्पर्शानं मग कोणालाच वेळकाळाचं भान राहत नाही..
खरी गडबड होते ती इथेच.
आणि त्यामुळेच समुद्रस्नानासाठी गेलेल्या लोकांपैकी परत येणाऱ्यांची संख्या बऱ्याचदा कमी भरते. समुद्रानं त्यांच्यापैकी काही जणांना आपल्या अथांग प्रवाहात सामावून घेतलेलं असतं..
समुद्रस्नानाच्या मोहाला आवर घालणे तसे जिकिरीचे काम आहे. परंतु अपघातांपासून पर्यटकांना लांब ठेवणे, अपघात न होण्याबाबतची काळजी घेणे अशा सागरी सुरक्षेच्या उपायांवर मंथन होणे आवश्यक आहे. समुद्रस्नानाचा आनंद लुटणाऱ्यांना सागरी सुरक्षेबाबतचे महत्त्व पटवून दिल्यास आनंदाच्या मोहापाटी समुद्रात डुंबताना बुडून होणारे मृत्यू रोखणे सहज शक्य आहे. सिंधुदुर्गातील समुद्रात पर्यटक बुडून मृत्यू होण्याच्या घटना मालवण तालुक्यात जास्त आहेत. किनारपट्टीवरील पर्यटक, व्यावसायिक आणि मच्छिमार यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून नियमित प्रशिक्षण होणे गरजेचे आहे. 
खरे तर आपत्कालीन व्यवस्थापनाकडे संपर्क साधण्यासाठी अनेक यंत्रणा उपलब्ध आहेत. मात्र, पावसाळ्यानंतर बऱ्याचदा ती नुसतीच कार्यालयात पडून असते. किनारपट्टीवर त्याचा उपयोग केल्यास अनेकांचे जीव वाचविण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. 
२00९ साली महाराष्ट्र शासनाने सागरी सुरक्षेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्या निधीतून महाराष्ट्रातील पर्यटकांनी गजबजलेल्या पाच समुद्रकिनाऱ्यांची काळजी घेतली जाणार होती. यामध्ये सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील देवबाग, तारकर्ली, रत्नागिरी किनारपट्टीवर गणपतीपुळे, रायगड किनारपट्टीवर हरिहरेश्वर आणि मुरूड, तर पालघर किनारपट्टीवर बोरडी या समुद्रकिनाऱ्यांचा समावेश होता. त्याबाबतचा अ‍ॅक्शन प्लॅनही शासनाकडे तयार झाला होता. परंतु फारसे काही घडले नाही. त्यातून पाच कोटींचा प्लॅन तब्बल ४५ कोटींवर गेला. दरम्यान, पर्यटकांच्या बळींची संख्या वाढतच गेली. गेल्या दहा वर्षांत सिंधुदुर्गात ६७ जण बुडाले. सर्वपातळीवर प्रयत्न झाले तर ही परिस्थिती बदलता येईल.
 
धोकादायक किनारे
रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, भाट्ये, आरे-वारे, दापोली तालुक्यातील मुरुड, हर्णै, गुहागर तालुक्यातील गुहागर, वेळणेश्वर, हेदवी हे समुद्रकिनारे धोकादायक आहेत. गणपतीपुळेत समुद्रात भोवरे असल्याने हा समुद्रकिनारा अतिशय धोकादायक आहे.
 
काही महत्त्वाच्या उपाययोजना
१) संपूर्ण किनारपट्टीवर लक्ष ठेवणे.
२) समुद्रकिनाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘वॉच टॉवर’ची आवश्यकता.
३) वॉच टॉवरमुळे माणसांचे जीव घेणारा ‘रिप’ करंट उंचावरून दिसण्यास मदत होईल. ‘रिप’ करंट आपली जागा बदलत असतो. वॉच टॉवरच्या माध्यमातून त्या जागेत जाण्यापासून पर्यटकांना रोखता येईल. 
४) जीवरक्षकांची पुरेशी संख्या.
५) समुद्रकिनाऱ्यांवर पेट्रोलिंगसाठी वाहनांची उपलब्धता.
६) एखाद्या पर्यटकाला इजा झाली असेल तर त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे ‘जेट स्कील’.
७) रेस्क्यू बोट, रेस्क्यू ट्यूब, आॅक्सिजन सिलिंडर्स.
८) जीवरक्षकांचे अधिकार वाढवणे.
९) जीवरक्षकांचे वेळोवेळी प्रशिक्षण. 
१०) जीवरक्षकांचे मानधन वाढवणे. त्यांना आता सहा हजार रुपये महिना मानधन दिले जाते. 
११) सुरक्षारक्षकांबाबतची कार्यवाही त्या-त्या भागातील ग्रामपंचायतींकडे वर्ग करणे.
१२) काही सरकारी संस्था उत्कृष्ट कामे करतात, त्यांच्याकडे याबाबतची जबाबदारी देणे.
१३) या क्षेत्रातील तज्ज्ञांना समाजसेवा म्हणून प्रोत्साहन देणे.
 
आणखी काय?
 
समन्वय आवश्यक
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तारकर्ली, गणपतीपुळे आदी सागरी पर्यटनाची केंद्रे विकसित झाली आहेत. तारकर्ली येथील स्नॉर्कलिंग, स्कुबा डायव्हिंग अशा स्वरूपाच्या सुविधांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यात समन्वय साधणे गरजेचे आहे. 
 
सागरी सुविधा केंद्रांची गरज
तारकर्ली, गणपतीपुळे, गुहागर, दापोली, मुरूड, हरिहरेश्वर, दिवेआगर, काशीद, अलिबाग, कोहीम, वसई, कळवे-माहीम, बोर्डी या लोकप्रिय समुद्रकिनाऱ्यांवर दरवर्षी लाखो पर्यटक येतात. येथे सागरी सुविधा केंदे्र आवश्यक आहेत. 
 
बॅकवॉटर, टुरिझम सेंटर्स
कोकणात नितांतसुंदर बॅकवॉटर्स आहेत. तारकर्ली, आरोंदा, विजयदुर्ग, जयगड, दाभोळ, बागमांडला, दिघी, वसई येथे बॅकवॉटर टुरिझमची केंद्रे विकसित व्हायला हवीत. 
 
समुद्र सफर सुविधा
रायगड जिल्ह्यात मुरूड-जंजिरा, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे मुरूड, गणपतीपुळे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली, भोगवे, वेळागर या समुद्रकिनाऱ्यांवर जेटी विकसित करणे, चांगल्या दर्जाच्या बोटी पुरवणे, स्थानिकांना बोटींवर सबसिडी देणे असे उपाय योजले तर प्रोत्साहनही मिळेल आणि जागरूकताही निर्माण होईल.
 
गोव्यातील दुर्घटनांत घट
सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या नजीक असलेल्या गोवा राज्यात शासनाने मुंबईतील ‘दृष्टी लाइफ सेव्हिंग’ कंपनीकडे सागरी सुरक्षेची जबाबदारी दिली आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून ही कंपनी १0५ किलोमीटर अंतर असलेल्या संपूर्ण गोवा राज्यातील किनारपट्टीवर सुरक्षा यंत्रणा पुरवित आहे. या कंपनीने कंत्राटी कामगार म्हणून जीवरक्षकांची नेमणूक केली आहे. 
 
गोव्यातील कळंगुट, बागा, फिचेरी, मोरजी, हरमल, कोलवा, अस्नोडा, बेतालभाटी, क्युरीम, मांद्रे, वागातोर, अंजुना आदी प्रमुख किनाऱ्यांसह इतर ठिकाणी ६00 पेक्षा जास्त जीवरक्षक नेमले आहेत. महत्त्वाच्या किनाऱ्यांवर वॉच टॉवर उभारण्यात आले असून, किनाऱ्यांवर जीपची व्यवस्था करण्यात आली आहे. १0८ क्रमांकावर रुग्णवाहिका तैनात करण्यात आलेली असते. सुरक्षेबाबतची ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर समुद्रात बुडून मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत हे जीवरक्षक प्रत्येक समुद्रकिनाऱ्यावर कडक नजरेने सेवा देत असतात. काळोख पडण्याच्या वेळी जीवरक्षक समुद्रात कोणालाही जाऊ देत नाहीत. जर कोणी या वेळेत समुद्रात असला तर त्याला बाहेर काढतात, समजावतात.
 
(लेखक ‘लोकमत’च्या सिंधुदुर्ग आवृत्तीचे प्रमुख आहेत. mahesh.sarnaik@lokmat.com)
 

Web Title: Before heading into the ocean ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.