‘हेडमास्तर’!
By Admin | Published: July 22, 2016 05:07 PM2016-07-22T17:07:23+5:302016-07-22T17:59:52+5:30
दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या पाठिंब्यावर शंकरराव दोनदा मुख्यमंत्री झाले. नोकरशाही आणि राजकारण्यांतही त्यांचा चांगलाच दरारा होता़ ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि आणीबाणी लागली.
दिनकर रायकर
दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या पाठिंब्यावर
शंकरराव दोनदा मुख्यमंत्री झाले.
नोकरशाही आणि राजकारण्यांतही
त्यांचा चांगलाच दरारा होता़
ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले
आणि आणीबाणी लागली.
त्याच्या अंमलबजावणीसाठी
त्यांच्यासारख्या कडक शिस्तीच्या
माणसाचीच गरज होती़
केवळ प्रशासकीय बाबतीतच नव्हे,
राजकीय निर्णयांच्या बाबतीतही
ते कमालीचे कठोर होते़
अर्थात त्याचे राजकीय परिणाम
त्यांना झेलावे लागलेच.
तरीही ते अडगळीत मात्र
कधी पडले नाहीत.
गेल्याच आठवड्यात १४ जुलैला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग नांदेड मुक्कामी आले होते़ त्यामागचे कारण हे महाराष्ट्रासाठी विशेष होते़ शंकरराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि त्यांच्याच स्मृत्यर्थ उभारलेल्या संग्रहालयाचे लोकार्पण असा तो सोहळा होता़ अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या नेत्याच्या पुतळ्याच्या अनावरणाचा हा समारंभ अनेक अर्थाने आगळा ठरला़ तसे पाहिले तर सोनिया गांधींची उपस्थिती ही शंकररावांच्या गांधी-नेहरू घराण्याप्रती असलेल्या निष्ठेची पावती होती़ शंकररावांनी कधीही संवैधानिक मूल्यांच्या पलीकडे जाऊन काम करण्याचा विचारही केला नाही़ यानिमित्ताने शंकररावांची राजकीय कारकीर्द माझ्या डोळ्यांपुढे तरळली़
लौकिकार्थाने लोकनेता नसतानाही शंकररावांनी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविले. केंद्रात गृहमंत्री आणि इतर महत्त्वाची पदे सांभाळली़ कधी महाराष्ट्रात, तर कधी दिल्लीत ते सतत सत्तेत राहिले़ त्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजेच त्यांच्यावर इंदिरा गांधींचे आणि नंतर राजीव गांधींचे कृपाछत्र राहिले़ हा माणूस तसा वेगळा़ त्यांची ओळख मराठवाड्याचा सुपुत्र इतकी सीमित राहिली नाही़ कारण ते विधिमंडळात जात तेव्हा अवघ्या महाराष्ट्राचा विचार करत़ संसदेत असताना संपूर्ण देशाबद्दल बोलत़ गांधी-नेहरू घराण्यासाठी ते कायम विश्वासपात्र राहिले़ इंदिरा गांधी यांच्या हत्त्येनंतर आकस्मिकपणे देशाचे नेतृत्व राजीव गांधी यांच्याकडे आले़ त्यावेळी दहशतवादाची अंतर्गत समस्या आ वासून उभी होती़ तिला तोंड देण्यासाठी राजीव गांधी यांनी शंकररावांची निवड केली़ केंद्रीय गृहमंत्री या नात्याने देशात शांतता बहाल करण्यासाठी शंकररावांनी दिलेले योगदान मोठे होते.
गंमत म्हणजे, इतर राजकारण्यांना सहसा लावलं न जाणारं विशेषण शंकररावांना कायमचे लागले. त्यांना नेहमी हेडमास्तर असे म्हटले जायचे़ दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या पाठिंब्यावर दोनदा मुख्यमंत्री झालेल्या शंकररावांचा नोकरशाहीत आणि राजकारण्यांवरही दरारा होता़ १९७५ आणि १९८६ असे दोनदा ते मुख्यमंत्री झाले. यातील एक योगायोग असा की, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी चारदा चव्हाण हे आडनाव विराजमान झाले. यशवंतराव, शंकरराव, अशोक आणि पृथ्वीराज. यापैकी दोनदा मुख्यमंत्री होणारे शंकरराव एकमेव. शंकररावांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, करड्या शिस्तीचा हा माणूस स्वभावाच्या बाबतीत सातत्य राखून राहिला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याने कधीही न केलेली एक कठोर कृती त्यांनी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत करून दाखवली़ शिस्तीचा अभाव असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना वेळ पाळण्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी त्यांनी एक दिवस मंत्रालय सुरू होण्याच्या वेळेला मंत्रालयाचे दरवाजेच बंद करून टाकले. लेटलतिफ कर्मचाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले़ त्यांच्या कडक स्वभावाला सत्तेचा काळ पोषकही ठरला. कारण ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि आणीबाणी लागली. वीस कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी त्यांच्यासारख्या कडक शिस्तीच्या माणसाची गरज होती़ त्यांची कठोरता केवळ प्रशासकीय बाबतीत नव्हती़ राजकीय निर्णयांच्या बाबतीतही ते कमालीचे कठोर होते़ म्हणूनच, मुख्यमंत्री होताच ते त्याकाळातील दिग्गज असलेल्या वसंतदादा पाटील आणि मधुकरराव तथा बाळासाहेब चौधरींचा पत्ता मंत्रिमंडळातून कापू शकले़ अर्थात याचे काही राजकीय परिणाम त्यांना स्वत:ला झेलावे लागले़ आणीबाणीनंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसची देशभरात धुळधाण उडाली. भलेभले नेते पराभूत झाले़ स्वत: इंदिरा गांधीही पराभूत झाल्या़ या परिस्थितीत शंकररावांना असलेले दिल्लीच्या पाठिंब्याचे कवच बाजूला पडले़ मात्र परिस्थितीने कितीही हेलकावे खाल्ले तरी शंकररावांची कारकीर्द कधी अडगळीत पडली नाही़ १९८० च्या दशकात म्हणजे जनता राजवटीच्या नंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्याच्या काळात देशाच्या इतर भागांप्रमाणेच महाराष्ट्रातही काँग्रेस जोरात होती़ पण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मात्र या काळात स्थिर नव्हते़ बॅरिस्टर ए़ आऱ अंतुले, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले, वसंतदादा आणि शिवाजीराव पाटील-निलंगेकर असे चार मुख्यमंत्री महाराष्ट्राने सहा वर्षांच्या काळात पाहिले. प्रतिभा प्रतिष्ठानच्या प्रकरणात अंतुले पायउतार झाले. पोलिसांच्या बंडानंतर दादा मुख्यमंत्री झाले. पक्षश्रेष्ठींनी प्रभा राव यांना महाराष्ट्राचे प्रभारी नेमले म्हणून दादांनी राजीनामा दिला. मुलीच्या गुणवाढ प्रकरणाचा फटका निलंगेकरांना बसला. निलंगेकर पायउतार झाले आणि शंकरराव पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शंकररावांनी कधी कुठल्या पदाचा हट्ट केला नाही. ठेविले अनंत तैसेची राहावे ही त्यांची वृत्ती होती. म्हणूनच, १९८६ मध्ये औरंगाबादच्या जाहीर सभेत राजीव गांधींच्या उपस्थितीत शरद पवारांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला तेव्हा पवारांच्या सोयीसाठी शंकरराव केंद्रात गेले. वेगवेगळ्या वेळी त्यांच्याबाबतीत झालेले निर्णय त्यांनी त्यांच्यापुरते ठेवले. त्यांची राजी-नाराजी ही आम्हा पत्रकारांपर्यंत कधीच येऊ शकली नाही. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शंकरराव पत्रकारमित्र नव्हते़ इंग्रजी-हिंदी आणि मराठी अशा तीनही भाषांवर प्रभुत्व असलेला हा नेता पत्रकारांच्या जवळ कधी आलाच नाही.
हेडमास्तर किंवा तत्सम विशेषणांनी त्यांच्या कठोर स्वभावाचे वर्णन केले गेले खरे; पण त्याच शंकररावांच्या सहृदयतेचे किस्से समकालीन आणि सर्वपक्षीय नेते जाहीरपणे सांगतात. माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे विद्यमान राज्यपाल राम नाईक यांनी त्यांच्या ताज्या पुस्तकात शंकररावांविषयी लिहून ठेवलेला किस्सा वेगळा आहे. रामभाऊ आमदार असताना बोरिवलीला स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारला गेला. या पुतळ्याच्या अनावरणासाठी शंकररावांनाही निमंत्रण होते. पण सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या त्या कार्यक्रमाला हजर राहणं शंकररावांना राजकीयदृष्ट्या मान्य नव्हतं त्यामुळे त्यांनी निमंत्रक रामभाऊंना सांगून टाकलं, ‘कार्यक्रमाला येणार नाही, दुसरं काही काम असेल तर सांगा.’ त्यावर त्यांना खरोखरच दुसरं काम सांगितलं गेलं. ते होतं विवेकानंदांचा पुतळा साकारणाऱ्या आणि तेव्हा गोराईच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या शिल्पकार उत्तम पाचारणे यांच्या व्यावहारिक उद्धाराचे. हा गुणी शिल्पकार झोपडीत राहतो. त्याला मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छानिर्णय कोट्यातून घर द्या. ही रामभाऊंची मागणी शंकररावांनी क्षणार्धात मान्य केली. इतकंच नव्हे तर स्वत:च्या शिस्तीला मुरड घालून कागदपत्रांची पूर्तता होण्याच्या आधीच फ्लॅट सॅन्क्शन करून टाकला.
काँग्रेसचे निष्ठावंत नेते असूनही काही बाबतीत राजकीय भूमिकेपेक्षा गुणवत्तेला अधिक मान देण्याच्या कृतीही त्यांच्याकडून घडल्या. जलतज्ज्ञ माधवराव चितळे हे महाराष्ट्र सरकारच्या सेवेत होते़ त्यांची संघनिष्ठा जगजाहीर होती़ तरीही आणीबाणीच्या काळात शंकररावांनी माधवरावांना अप्रत्यक्षरीत्या अभय दिले होते. अशा शंकररावांना काही वेळा अंतर्गत राजकारणाचा फटकाही बसला. पण तो सहसा व्यक्तिगत स्वरूपाचा नसे़ त्याचा संबंध त्यांच्या निर्णयांशी असायचा़ मराठवाड्यातला जायकवाडी प्रकल्प शंकररावांच्याच काळात मार्गी लागला़ अर्थात नगर-नाशिकच्या राजकारण्यांनी हे धरण कधी भरू दिलं नाही़
वरकरणी रुक्ष वाटणारे शंकरराव हे तसे रसिक होते़ अशोक चव्हाणांच्या बाबतीत ती रसिकता जितकी उघड दिसली, तितकी त्यांचे वडील असलेल्या शंकररावांच्या बाबतीत दिसली नाही इतकेच़ शंकरराव क्रिकेटचे चाहते होते़ शास्त्रीय संगीतातही त्यांना रस होता़ ते मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर गाण्याच्या मैफली होत़ पण शंकररावांनी आपल्या व्यक्तिगत आवडीनिवडी, स्वभावाचे निराळे पैलू, कठोर चेहऱ्यामागची सहृदयता यांचे दर्शन घडविण्यात स्वारस्य ठेवले नाही़ ही तुलना नव्हे, पण पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने मला एक जुनी गोष्ट आठवली. कविवर्य कुसुमाग्रजांनी ज्याबद्दल-
ती अजिंक्य छाती ताठर अन् रणशील
जी पाहून सागर थबके परते आत
असे शब्द साकारले त्या लोकमान्य टिळकांच्या गिरगाव चौपाटीवरील पुतळ्याच्या अनावरणाला पंडित नेहरूंचे न येणे त्यावेळी आचार्य अत्रेंनी कमालीचे गाजवले होते. त्याच काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी नांदेडमधील समारंभाला हजेरी लावून शंकररावांची उंची अधोरेखित केली.
मला आजही लख्ख आठवते, १९७२ पर्यंत शंकररावांकडे शेती आणि वीज ही खाती होती. नंतर त्यातले ऊर्जा खाते गेले आणि फक्त कृषी शिल्लक राहिले. पण त्याबद्दल त्यांनी कधी अवाक्षर काढले नाही़ शंकररावांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, चारित्र्यवान नेत्यांमध्ये त्यांचे नाव अग्रणी राहिले. त्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही़ त्याचवेळी ते पक्षात आवडते नेते होऊ शकले नाही. कार्यकर्त्यांसाठी ते पॉवरफुल होते, पण हृदयाच्या जवळ नव्हते. मुख्यमंत्रिपदी बसलेला हा माणूस प्रशासनावर मांड थोपून अक्षरश: अॅडिशनल चीफ सेक्रेटरी असल्यासारखा काम करायचा. असे गुण असूनही ते नोकरशहांनाही कधी प्रिय नव्हते. ना राजकारण्यांमध्ये लोकप्रिय. जे. बी. डिसूझा मुख्य सचिव असताना शंकररावांनी एक फाईल त्यांच्या अंगावर फेकली होती. त्यानंतर डिसूझा पुन्हा कधीही शंकररावांच्या दालनात गेले नाही. पण शंकररावांना त्याची फारशी फिकीर नव्हती.
(चार दशकांहून अधिकच्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत.)