Health: तुमचं लिव्हर फॅटी आहे का?

By संतोष आंधळे | Published: April 16, 2023 12:59 PM2023-04-16T12:59:29+5:302023-04-16T13:00:07+5:30

Health: दरवर्षी 19 एप्रिल हा जागतिक यकृत दिन म्हणून साजरा केला जातो. यकृताच्या आजारासंबंधी जनजागृती आणि निरोगी यकृताचे महत्त्व या विषयावर चर्चा घडवून आणली जाते. त्यानिमित्ताने...

Health: Do you have fatty liver? | Health: तुमचं लिव्हर फॅटी आहे का?

Health: तुमचं लिव्हर फॅटी आहे का?

googlenewsNext

- संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी 
त्ते पे सत्ता या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा एक सीन आहे. त्यात ते सांगतात दारू पिने से लिव्हर खराब होता है. त्यांचा हा सीन आणि डायलॉग त्यावेळी जबरदस्त गाजला होता. त्यानंतर दारू पिणाऱ्या व्यक्तींना मिश्कीलपणे हा डायलॉग ऐकवला जायचा. परंतु वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते लिव्हर केवळ दारू पिणाऱ्यांचेच खराब होत नाही, तर न दारू पिणाऱ्यांचेही खराब होऊ शकते. त्याला वैद्यकीय भाषेत नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) असे म्हणतात. 

अनेकजण नियमितपणे वर्षातून आरोग्य तपासणी करतात. त्यावेळी त्यांना त्यांच्या सोनोग्राफीच्या चाचणीत अनेक वेळा लिव्हर (यकृत) फॅटी असल्याचे निदान केले जाते. दारू न पिताही लिव्हर फॅटी कसे काय, हा प्रश्न अनेकांना पडतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दारू न पिणाऱ्या अनेक व्यक्तींना फॅटी लिव्हर असण्याची शक्यता असते. मेटाबोलिक सिंड्रोममुळे शक्यतो रुग्णांना लिव्हरचा आजार होत असतो. मेटाबोलिक सिंड्रोम म्हणजे विविध आजारांचा समूह. हा सिंड्रोम असलेल्या व्यक्तींना मधुमेह, उच्च कोलेस्ट्रेरॉल, लठ्ठपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब असे आजार असतात. भारतात एकूण लोकसंख्येपैकी २० ते ३० टक्के व्यक्तींना हा आजार आढळून येतो. यकृत हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव असून शरीरातील उजव्या बारगड्यांमध्ये असतो. चयापचय आणि पचनसंस्थेतील सर्व क्रियांमध्ये लिव्हर मोठी भूमिका बजावत असते. शेकडोंपेक्षा अधिक कार्ये या अवयवामार्फतच केली जातात. त्याकरिता लिव्हरच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याच्या कार्यात बिघाड झाल्यास परिणाम शरीरावर दिसून येतो. 

वैद्यकीय क्षेत्रातील सध्याच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या आजाराचे फॅटी लिव्हर किंवा त्या पुढील आजारांच्या पायऱ्यांचे निदान करणे सहज शक्य आहे. लिव्हर फायब्रोसिस झाला आहे, की नाही हे तपासण्यासाठी सोनोग्राफी सारखीच ‘फायब्रोस्कॅन’ ही तपासणी मोठ्या रुग्णालयात उपलब्ध आहे. यावरून किती प्रमाणात लिव्हरची हानी झाली हे कळण्यास मदत होते. त्यावरून औषधोपचाराने या आजारावर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. मात्र सिरॉसिस झाल्यानंतर मोठा काळ औषधोपचार आणि पथ्यपाणी पाळण्यात जातो. अनेक वेळा मग डॉक्टरांच्या नियमित फेऱ्या आणि सतत चाचण्या कराव्या लागतात. काही वेळा त्याचे कार्य थांबल्यास मग यकृताच्या प्रत्यारोपणाशिवाय (लिव्हर ट्रान्सप्लान्ट) पर्याय नसतो.

अनेकदा तपासणीशिवाय फॅटी लिव्हरविषयी कळत नाही. फॅटी लिव्हरवर वेळीच उपचार न केल्यास त्याचे रूपांतर लिव्हर फायब्रोसिस व नंतर लिव्हर सिरॉयसिसमध्ये होते. मात्र फॅटी लिव्हरचे निदान होताच जीवनशैलीत योग्य बदल केल्यास हा त्रास घटू शकतो. नियमित व्यायाम, वजन कमी करणे, योग्य आहार घेणे, जंक फूड टाळणे इत्यादींचे काटेकोर पालन केल्यास फॅटी लिव्हरची समस्या दूर होऊ शकते. दारू पिणाऱ्यांना हाच धोका संभवतो. त्यांनीसुद्धा फॅटी लिव्हर आढळून आल्यास दारू पिणे तत्काळ थांबबावे. अन्यथा धोके संभवतात.  
- डॉ, आभा नागराल, लिव्हरविकार तज्ज्ञ, जसलोक हॉस्पिटल 

मेटाबोलिक सिंड्रोमव्यतिरिक्त हेपेटायटिस वा काही दुर्मीळ आजारांमुळे फॅटी लिव्हर होऊ शकते. विशेष म्हणजे, ज्या लिव्हर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया आम्ही करतो त्यात ६० टक्के प्रमाण (एनएएफएलडी) रुग्णांचे असते, तर २५ टक्के रुग्ण हे दारू प्यायल्याने लिव्हर खराब झालेले असतात. त्यामुळे दारू पीत नाही, म्हणजे लिव्हरचा त्रास होणार नाही, हे डोक्यातून काढून टाका.  
- डॉ रवी मोहंका, लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन, सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल 

लिव्हर बिघाडाची लक्षणे 
 पोटात पाणी साठणे 
 पायावर आणि चेहऱ्यावर सूज येणे
 रक्ताच्या उलट्या होणे
 सतत झोप येणे
 गुंगी येणे 
 दैनंदिन कामे करताना थकवा येणे 
 मळमळ होणे
 भूक कमी होणे
 सतत पोटात दुखणे

Web Title: Health: Do you have fatty liver?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.