ना नोंद, ना मदत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:01 AM2019-09-15T06:01:00+5:302019-09-15T06:05:01+5:30
गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडच्या एका बाजूने पर्लकोटा नदी, तर दुसर्या बाजूने पामुलगौतम नदी वाहते. या दोन्ही नद्या छत्तीसगडमधून येणार्या इंद्रावती नदीला जाऊन मिळतात. निसर्गप्रेमींसाठी ही पर्वणी असली तरी, या तिन्ही नद्यांचे पावसाळ्यातील रौद्र रूप भामरागडसह शेकडो गावांसाठी नरकयातना देऊन जातात. मात्र प्रशासनासह कोणाचेच याकडे लक्ष नाही.
- मनोज ताजने
दरवर्षी पावसाळ्याची चाहूल लागली की त्यांच्या हृदयात धस्स होते. तीन मोठय़ा नद्या आणि जंगल कपारीतून वाहत येणारे अनेक नाले तुडुंब भरून वाहत शेकडो गावांना वेढा घालतात. पुराचे पाणी कधी घरात शिरेल आणि घरातील कोण-कोणते साहित्य त्या पाण्यात स्वाहा होईल याचा काहीही नेम नसतो. अनेकवेळा तर स्वत:चा जीव वाचवणेही कठीण होऊन बसते. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण-पूर्व टोकावरील भामरागड तालुक्याची ही स्थिती आहे. येथील हजारो कुटुंबांना दरवर्षीच्या पावसाळ्यात या परिस्थितीचा सामना करावा लागतो. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग त्यांच्या मदतीला धावून जातो; परंतू त्या पूरग्रस्तांना या परिस्थितीपासून कायमस्वरूपी दिलासा देणार्या उपाययोजना आजपर्यंत झालेल्या नाहीत. याच परिस्थितीत जगणार आणि यातच मरणार, हेच आमचे नशीब आहे, अशी उद्विग्न भावना या तालुक्यातील गावकरी व्यक्त करतात.
गडचिरोली जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेल्या भामरागडचे नाव तसे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही अनेकांना परिचित आहे. प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांचा लोकबिरादरी प्रकल्प याच भामरागडपासून जेमतेम 2 किलोमीटर अलीकडे आहे. या प्रकल्पापासून काही अंतर पुढे गेलो की छत्तीसगडमधून येणारी पर्लकोटा नदी आहे. त्या नदीच्या पैलतीरावर वसलेले मोठे खेडेगाव म्हणजे भामरागड. या गावाच्या एका बाजूने पर्लकोटा नदी, तर दुसर्या बाजूने काही अंतरावरून पामुलगौतम ही नदी वाहते. या दोन्ही नद्या गावापासून पूर्वेकडे काही अंतरावर छत्तीसगडमधून येणार्या इंद्रावती नदीला जाऊन मिळतात. तीनही नद्यांच्या संगमाचे हे ठिकाण खरे तर निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी एक पर्वणीच, पण याच नद्यांचे पावसाळ्यातील रौद्र रूप भामरागडसह शेकडो गावांसाठी नरकयातना देऊन जातात.
यावर्षी 1 जूनपासून आतापर्यंत या तालुक्यात 2500 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे जंगलातील दर्याखोर्यातून वाहत येणारे नाले आधीच तुडुंब भरलेले आहेत. त्यात छत्तीसगडमधून येणार्या तीनही नद्यांना पूर येतो तेव्हा निर्माण होणारी परिस्थिती खूपच विदारक असते.
पर्लकोटाचे विस्तीर्ण पात्र पुराचे पाणी सामावून घेण्यास अपुरे पडते आणि नदीवरचा पूलही पाण्याखाली जातो. एकदा का या पुलावर पाणी चढले की भामरागडसह या तालुक्यातील शेकडो गावांचा उर्वरित जगाशी संपर्क तुटतो. गावातून कोणी बाहेर पडू शकत नाही की गावात कोणी प्रवेश करू शकत नाही. बहुतांश वेळा पुराचे पाणी गावात शिरून घरांनाही व्यापून टाकते. अशावेळी शेकडो कुटुंबांना आहे त्या अवस्थेत आपल्याच घरातून काढता पाय घेत शाळेत, तहसील कार्यालयात आर्शय घ्यावा लागतो. प्रशासकीय यंत्रणेकडून भामरागडवासीयांची दुसरीकडे राहण्याची-जेवणाची व्यवस्था केली जात असली तरी ज्या गावांत कोणीच पोहोचू शकत नाही त्या शेकडो दुर्गम गावांतील नागरिकांचे काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहातो. कितीही गंभीर अवस्थेतील आजारी रुग्ण असेल तरी त्याला आपल्या आजाराला तोंड देत ‘भगवान भरोसे’ राहण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अनेक गर्भवती महिला, बालक, वृद्ध अशा स्थितीत गावातच प्राण सोडतात. दुर्गम गावात अशा अवस्थेत मरणार्यांची तर सरकारदफ्तरी नोंदही होत नाही हे विशेष.
यावर्षी 5 वेळा पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढले. पण गेल्या 3 सप्टेंबरपासून ते 10 सप्टेंबरच्या सकाळपर्यंत सतत 7 दिवस भामरागडसह अनेक गावांमध्ये निर्माण झालेली पूरपरिस्थिती तेथील नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी होती. 6 सप्टेंबरपासून पुराचे पाणी गावात शिरल्याने 70 टक्के भामरागड पुराच्या पाण्यात होते. अनेक घरांचा तळमजला पूर्णपणे पाण्यात बुडाला होता. पुराचे पाणी गावात झपाट्याने शिरत असल्याने पहाटेच्या साखरझोपेत असलेल्या दीडशेवर कुटुंबांना आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने, स्थानिक पोलीस पथकांनी घराबाहेर काढत सुरक्षित स्थळी हलविल्याने त्यांचा जीव वाचला; पण घरातील धान्य, भांडी-कुंडी, महत्त्वाची कागदपत्रे पुराच्या पाण्यात स्वाहा झाली. तहसीलदार कैलास अंडील यांनी सर्व स्थलांतरित नागरिकांना आर्शय देत त्यांच्या जेवणापासून तर पांघरण्यासाठी ब्लँकेटपर्यंत सोय करून दिली. प्रयास महिला बचत गटाच्या महिलांनीही जेवणाची व्यवस्था करण्यासाठी मोलाचा हातभार लावला.
सात दिवसांनी पुराचे पाणी ओसरल्यानंतर लोकांनी चिखलातून मार्ग काढत घराची वाट धरली. त्यावेळी तेथील विदारक स्थिती मन हेलावून टाकत होती. पुन्हा एकदा आपल्या नशिबाला दोष देण्यापलीकडे त्या गोरगरीब नागरिकांच्या हाती काहीही नव्हते. घराघरांत आणि रस्त्यांवर साचलेला चिखल साफ करण्यासाठी गावातील युवक, व्यापारी, सामाजिक संघटनांसह लोकबिरादरी प्रकल्पाच्या युवा कार्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी अनिकेत आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली हातभार लावला. आता गावातील संभावित रोगराईचा सामना करण्यासाठी, निर्जंतुक केलेले शुद्ध पाणी लोकांना मिळण्यासाठी आरोग्य विभागाला कसरत करावी लागणार आहे.
जिथे माणसांना जगण्यासाठी अशा संकटांचा सामना करावा लागतो तिथे त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचे काय हाल होत असतील याचा तर विचारही करू शकत नाही. हातावर आणून पानावर खाणार्या गोरगरीब आदिवासींना निसर्गाच्या या प्रकोपाला दरवर्षीच असे तोंड द्यावे लागते; पण त्यांना कायमस्वरूपी दिलासा केव्हा मिळणार? याचे उत्तर ना प्रशासनाकडे आहे, ना लोकप्रतिनिधींकडे.
एकीकडे कोल्हापूर-सातार्याच्या पूरग्रस्तांकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष वेधले जाते, पण दरवर्षी मोठी हानी सहन करणार्या या आदिवासींना ‘पूरग्रस्त’ म्हणून जाहीर करून शासकीय मदतीचा लाभ देण्यातही हात आखडता घेतला जात असल्याचे पाहून त्यांचा कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न कोणत्याही संवेदनशील मनाला अस्वस्थ केल्याशिवाय राहात नाही. या गावकर्यांच्या नि:शब्द चेहर्यावर शेवटी एकच प्रश्नार्थक भाव उरतो, सांगा, आम्ही जगायचं कसं?’.
का निर्माण होते पूरस्थिती?
पुरामुळे इंद्रावती नदीचा प्रवाह वाढला की पर्लकोटा नदीचे पाणी या नदीत सामावले जात नाही. परिणामी ते अडून भामरागडमधून येणार्या नाल्याच्या वाटेने गावात शिरते आणि हाहाकार उडतो. शिवाय पर्लकोटा नदीवर असलेला कित्येक वर्षांपूर्वीचा जुना पूल ठेंगणा आणि अरुंद आहे. त्यामुळे नदीला पूर आला की हा पूल पाण्याखाली जाऊन शेकडो गावांचा संपर्क तुटतो. विशेष म्हणजे या परिस्थितीत केवळ रहदारीच नाही, तर वीजपुरवठा आणि मोबाइल नेटवर्कही बंद पडते. केवळ पोलीस आणि महसूल विभागाकडे असलेले सॅटेलाइट फोन एवढेच संपर्काचे एकमेव माध्यम असते.
.तर वाचता येईल पुरापासून!
या ठिकाणी उंच पूल बांधल्यास पूरपरिस्थितीतही भामरागडसह शेकडो गावांचा संपर्क सुरू राहू शकतो. दुसरीकडे नदीच्या काठाकडील भागात राहणार्या कुटुंबीयांना सुरक्षित ठिकाणी जागा देऊन तिथे त्यांचे स्थलांतर करणे गरजेचे आहे. याशिवाय पुराचे पाणी गावात शिरू नये यासाठी मजबूत अशी संरक्षक भिंत बांधून पाण्याला तिथेच थोपवणे शक्य आहे. लगतच्या तेलंगणा राज्यात अनेक ठिकाणी तेथील सरकारने अशा पद्धतीने संरक्षक भिंती उभारून पुराच्या पाण्यापासून गावांचे संरक्षण केले आहे. तोच प्रयोग येथेही केला तर दरवर्षी होणार्या या पूरपरिस्थितीमधील नुकसान, जीवित आणि वित्तहानी बर्याचअंशी कमी करणे शक्य होणार आहे.
manoj.tajne@lokmat.com
(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)