हालो छेतरी गयो...मोदींची दहशत आणि प्रभावालाही ग्रहण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 04:56 PM2017-12-09T16:56:43+5:302017-12-10T07:06:48+5:30
बहुसंख्याक हिंदूंची दादागिरी व अल्पसंख्याकांवरील दहशत याच सूत्रावर मोदींनी गुजरातवरील पकड घट्ट ठेवली होती. गेली १५ वर्षे असंतोष दाबलेला होता, ... आता लोक हळूहळू बोलू लागले आहेत.
- संदीप प्रधान
बहुसंख्याक हिंदूंची दादागिरी व अल्पसंख्याकांवरील दहशत
याच सूत्रावर मोदींनी गुजरातवरील पकड घट्ट ठेवली होती.
गेली १५ वर्षे असंतोष दाबलेला होता, ...
आता लोक हळूहळू बोलू लागले आहेत.
मोदींच्या गोंडस विकास मॉडेलबद्दल ब्र काढायलाही घाबरणारे विकास वेडा झाल्याचे जाहीरपणे बोलू लागल्यावर मोदी-शहांनी पुन्हा
धार्मिक धृवीकरणाचे अस्र बाहेर काढले; पण लोक या प्रयत्नांना
धूप घालताना दिसत नाहीत. वाघ म्हणा की वाघोबा, शेवटी तो
खाणारच म्हटल्यावर जे होते तेच गुजरातेत झाले आहे...
गुजरातमधले वलसाड.
हॉटेलात पोहचलो तर रिसेप्शनवरल्या मॅनेजरशी गप्पा निघाल्या. पण निवडणूक म्हणताच महाशयांनी एकदम विषय बदलला. दोन्ही हात कानाला लावले आणि गुजरातीत म्हणाला, तेवढे सोडून बोला. राजकारणाबद्दल बोलणे आम्हाला वर्ज्य आहे. मालकांचा तसा आदेश आहे.
मग थोड्यावेळाने नोटाबंदी, जीएसटीचा विषय काढला तर दोन्ही खांदे उडवत हसून म्हणाला, तुम्ही मला परत परत तेच विचारले तरी माझे तोंड उघडणार नाही!
हा अनुभव नंतरही गुजरातमध्ये जिथे गेलो, तिथे थोड्याफार फरकाने आलाच आला. गुजरातमध्ये सर्वसामान्य माणसाला राजकारणाबद्दल बोलण्याची इतकी भीती का बरं असावी?
देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये जेव्हा पाच वर्षांमध्ये सत्तापालट होत होती आणि केंद्रात-राज्यांत जेव्हा आघाडीच्या कडबोळ्यांची सरकारे सत्तेवर होती तेव्हा गुजरातमध्ये नरेंद्र दामोदरदास मोदी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या स्वयंसेवकाने स्वबळावर सत्ता संपादन करून दाखवली. अर्थात त्याकरिता अवलंबलेला मार्ग हा विद्वेषाचा, हिंसेचा होता. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा रेल्वेस्थानकाच्या जवळ साबरमती एक्स्प्रेसच्या डब्याला आग लागली. त्यामध्ये कारसेवक जळून खाक झाले.
आता ही आग बाहेरून लावली गेली की आतून लागली याबाबत अनेक चौकशी आयोग, शोध पत्रकार आणि तपासी यंत्रणेत काम केलेल्यांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. मात्र त्या दुर्दैवी घटनेनंतर गुजरातमध्ये न भूतो न भविष्यती अशा दंगली होऊन शेकडो माणसे मारली गेली. गोध्राची घटना व दंगली यामुळे गुजरातमध्ये संघ परिवार, भाजपा व मोद यांना अभिप्रेत असलेले मतांचे धृवीकरण घडवून आणण्यात त्यांना यश आले.
अर्थात गुजरातमधील दंगली व धृवीकरणाचा इतिहास जुना आहे. १९६९ साली सवर्ण व दलित यांच्यात असेच दंगे घडवून जातीय धृवीकरण करण्यात आले होते. काँग्रेसला दीर्घकाळ गुजरातची सत्ता मिळवून देणारे क्षत्रिय, हरिजन, आदिवासी व मुस्लीम (खाम) हे समीकरण मोडून काढण्यात भाजपाला यश आले. २००२ मधील दंगे हा गुजरातमधील जातीय-धार्मिक विद्वेषी राजकारणाचा परमोच्चबिंदू होता. गुजरात दंग्यांमुळे तेथील विधानसभा निवडणूक काही काळ पुढे ढकलण्याचा निर्णय तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त लिंगदोह यांनी घेतला असता ही बाब मोदींना रुचली नव्हती. लिंगदोह हे ख्रिस्ती असल्याबद्दल टीका करून आपला अल्पसंख्याक विरोध त्यांनी दाखवला होता.
बहुसंख्याक हिंदूंची दादागिरी व अल्पसंख्याकांवरील दहशत हेच मोदींच्या गुजरातच्या सत्तेवरील घट्ट पकडीमागील सूत्र होते. त्या दहशतीमुळेच दिल्लीत मोदींविरुद्ध केंद्रातील मंत्री ब्र काढत नाहीत आणि इकडे गुजरातेत वलसाडमधल्या एका हॉटेलच्या क्षुल्लक मॅनेजरला मिठाची गुळणी घेण्यास भाग पाडले जाते... गुजरातेतला प्रवास यातले ‘नाते’ दाखवतो.
धार्मिक धृवीकरणाच्या आधारे सत्ता प्राप्त केल्यावर आणि सत्तेची पाळेमुळे दहशतीच्या जोरावर पक्की केल्यावर मात्र मोदींनी विकासाचे पाढे घोकण्यास सुरुवात केली. गुजरातमधील महामार्ग भरमसाठ टोल आकारणी करून उत्तम बांधून मोदींनी शेजारील राज्यांना रस्त्यांवरील खड्ड्यावरून हिणवायला सुरुवात केली. मुंबईहून अहमदाबादला जायचे असेल तर वाटेत किमान ११ टोलनाके लागतात व त्यावर ७५० ते ८०० रुपयांचा टोल द्यावा लागतो. मोदींना जेव्हा विकासाची स्वप्ने पडू लागली तेव्हा देशात विजेची तूट होती. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये भारनियमन अपरिहार्य झाले होते. त्यावेळी अन्य राज्यांपूर्वी सिंगल फेजिंग करून भारनियमन नियंत्रित करण्याचे पाऊल मोदींनी उचलले आणि गुजरात भारनियमनमुक्त केल्याचे ढोल पिटले. मोदींकडे एकहाती सत्ता होती तर शेजारील महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांत आघाडीची सरकारे असल्याने टोल आकारणी अथवा सिंगल फेजिंगसारखे निर्णय घेण्यात कालापव्यय झाला.
महाराष्ट्र आणि गुजरात ही सयामी जुळी असल्याने व त्यांची दोन राज्ये झाल्याने देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईत येऊन कधी शेअर बाजारात तर कधी एखाद्या सभागृहात मोदी तास-तासभर गुजरातच्या विकासाचे गोडवे सांगू लागले. मुंबईतील उद्योग, व्यापार क्षेत्रातील आर्थिक शक्ती असलेला वर्ग मोदींची प्रवचने मनोभावे ऐकून त्यांचीच कवने देशभर गाऊ लागला. राजकारणात मार्केटिंग, इमेज बिल्डिंग, मीडिया लायझनिंग वगैरेला किती महत्त्व आहे हे चाणाक्ष मोदींनी देशातील अन्य राजकारण्यांपूर्वी हेरले.
गोध्राकांडानंतर मोदींना राजधर्माचे पालन करण्याची आठवण करून देणारे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००४ मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ‘आता बारी नको, पुष्कळ झाले’, असा निर्वाणीचा सूर लावल्यावर संघ परिवार नव्या चेह-याच्या शोधात होताच. फसलेल्या राम मंदिर आंदोलनाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी वाजपेयी यांच्याकरिता यापूर्वी पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला तिलांजली दिली असल्याने त्यांना २००९ मध्ये तोंडदेखली संधी दिली गेली. मात्र महंमद अली जिना यांच्यावर स्तुतिसुमने उधळणारे अडवाणी संघ परिवाराच्या मनातून उतरले होते.
शिवाय ते ना स्वबळावर सत्ता आणू शकले ना त्यांना रालोआची मोट बांधता आली. मात्र २००७ मध्ये विकासाचा मुद्दा घेऊन गुजरातच्या प्रयोगशाळेतून तावूनसुलाखून बाहेर पडलेले नरेंद्र मोदी हे संघ परिवाराचे पुढील राजकीय चेहरा होते. २०१२ मध्ये मोदींनी विकासाचा मुद्दा प्रचाराचा मुख्य मुद्दा ठेवून पुन्हा विजय प्राप्त केल्यावर तर त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले होतेच. त्यानंतर २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतील मोदीत्वाची लाट व त्यानंतरचा ताजा इतिहास सर्वश्रूत आहेच.
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा सर्व सूत्रे ही त्यांच्या हाती होती. सरकारने रस्ते सुधारले; पण त्यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री कोण होते ते फारसे कुणाला ठाऊक नाही. गुजरात भारनियमनमुक्त झाले; पण ऊर्जामंत्र्यांचा ठावठिकाणा कुणाला माहीत नव्हता. मोदींचे सरकार हे त्यांच्यापासून सुरू होऊन त्यांच्यापाशीच संपत होते. अमित शहा व आनंदीबेन पटेल यांचा अपवाद वगळता अन्य मंत्री कुणाला फारसे माहीत नव्हते. त्यामुळे गुजरातच्या विकासाची ही झाकली मूठ दाखवून २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाले. केंद्रातील काँग्रेस सरकार राजवटीतील भ्रष्टाचाराबाबतचा रोष, मोदींचे भरमसाठ खर्चिक प्रचारतंत्र आणि सधन ग्राहक असलेल्या बोलक्या मध्यम व उच्च मध्यमवर्गाचा पाठिंबा या बळावर मोदींना यश लाभले.
अंबानी-अदानींपासून अनेकांच्या उत्पादनांचा, गुंतवणुकीच्या योजनांचा ग्राहक हाच मोदींचा चाहता असल्याने ‘मोदी ब्रॅण्ड’ची लोकप्रियता वाढवण्याकरिता, टिकवण्याकरिता या उद्योगपतींनी आपली रसद लावली. मोदी हे काळापैसा बाळगणा-या, करचोरी करणाºयांकरिता रॉबिनहुड आहेत तसेच दिल्लीत बसून गुजरात सांभाळणारे सुपरमॅन आहेत, असा संघ परिवार व भाजपाचा समज झाला असावा. मात्र प्रत्यक्षात मोदींनी गुजरातेत कुणालाच फारसे वाढू न दिल्याने त्यांच्या पश्चात गुजरात आनंदीबेन पटेल व विजय रुपाणी अशा खुज्या, बोन्साय नेतृत्वाच्या ताब्यात गेला. त्यामुळे दहशत, प्रचाराच्या जोरावर बंद ठेवलेली विकासाची मूठ सैल झाली.
गुजरातमधील विकासाचे मॉडेल सपशेल फेल असल्याचे गेली तीन वर्षे सातत्याने उच्चरवात सांगणारे अर्थशास्त्राचे प्राध्यापक प्रा. हेमंतकुमार शाह यांना भेटलो तेव्हा ते स्पष्टपणे म्हणाले, ‘मोदी व त्यांच्या विकासाच्या मॉडेल विरोधात बोलायला बंदी आहे. मी सातत्याने त्याविरुद्ध बोलतो तर कधी मला मोदींचे समर्थक फोन करून सरकारी समित्यांवर येण्याची आठवण करतात तर कधी ‘प्रोफेसरसाब हरेन पंड्या को मत भूलना, अशी धमकी देतात!’
गुजरातमधील ५७ लाख बेरोजगार, गरिबी रेषेखालील ७० लाख कुटुंबे, ६२ टक्के कुपोषित बालके अशी धक्कादायक आकडेवारी आता बाहेर येऊ लागली. नोटाबंदी व जीएसटी लागू केल्याने छोटे व्यापारी, उद्योजक यांना फटका बसून लक्षावधी लोकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळल्याचे वास्तव उघडे पडले. सुरतमधील व्यापाºयांचे नेते जयलाल यांनी ज्या ज्या व्यापाºयांची भेट घडवली त्यांची ओळख करून देताना हे आतापर्यंत कसे भाजपाचे समर्थक होते याची प्रस्तावना करत आणि मग त्या व्यक्तीला बोलते करत.
... आता लोक हळूहळू बोलू लागले आहेत. गेली १५ वर्षे असंतोष दाबलेला होता, असे जयलालभाई सांगत होते. आता शिक्षणाच्या खासगीकरणाविरुद्ध आवाज उठू लागला आहे. पोलीस, कारकून, अंगणवाडीसेविका, आशा वर्कर आदी असंख्य सरकारी नोकºयांचे अत्यल्प मानधनावरील कंत्राटीकरणाचा असंतोष दृग्गोचर झाला आहे. मोदी गुजरातमध्ये असताना ज्या उद्योजक, व्यापाºयांनी त्यांना ‘आपणा माणस’ म्हणून पाठिंबा दिला त्यांची अपेक्षा ही मोदींनी पंतप्रधान झाल्यावरही त्यांचे आर्थिक हित जपावे हीच आहे व होती. आम्हाला जीएसटी लागू करून आर्थिक शिस्त लावू नका, आमचे हिशेब वरचेवर तपासू नका, हाच या मंडळींचा आग्रह होता. मात्र यशाची शिडी चढत वरवर गेलेल्या, स्वयंप्रतिमेच्या प्रेमात पडलेल्या मोदी यांना उत्तर प्रदेशातील घवघवीत यशानंतर अल्पावधीत देशातील निर्णयक्षम, लोकप्रिय पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडली होती.
काही मोजकेच उद्योगपती त्यांच्या गळ्यातील ताईत झाले. त्यामुळे दहशतीवर बंद ठेवलेली विकासाची मूठ सैल झाली, गुजरातमध्ये मोदी ब्रॅण्ड तयार करण्याकरिता हातभार लावणारे स्थानिक उद्योजक-व्यापारी दुरावले. पाटीदारांपासून अनेक मागास जाती-जमाती बोलू लागल्या, आपल्या नेत्यांना पाठिंबा देत उभ्या ठाकल्या. गुजरातमध्ये भरमसाठ टोल लावून महामार्ग उत्तम केले जाऊ शकतात तर गोध्रा शहरातील रस्ते किमान वाहने नीट चालतील, असे बांधले जाऊ शकत नाहीत का, असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. मात्र जो विरोधात आहे, ज्याच्यावर मोदींचा दात आहे अशा व्यक्ती, समूहाला पूर्णपणे दुर्लक्षित करण्याचे हे राजकारण असल्याचे रेहमान हा तरुण सांगत होता. भाजपा व काँग्रेस हे दोन्ही नको असल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वी गोध्रामध्ये आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांची सभा आयोजित करण्याचे तरुण, सुशिक्षित हिंदू-मुस्लीम युवकांनी आता ठरवले आहे.
गुजरातमध्ये फिरताना, सामान्य नागरिकांशी गप्पा मारताना कधी हसत गंमतीने, कधी टोकाच्या विरोधाने आणि बरेचदा उपहासाने बोललेले एक वाक्य अनेकदा ऐकू आले. लोक म्हणतात,
हालो छेतरी गयो!
म्हणजे मेहुण्यावर विश्वास ठेवला; पण त्यानेच सगळी वाट लावली.
आता हा ‘हालो’ कोण ते स्पष्ट विचारायचे नाही, आपण आपले समजून घ्यायचे.
गुजरातमधील हे बदललेले चित्र ही आपल्या २०२२ पर्यंत पंतप्रधानपदी राहण्याच्या महत्त्वाकांक्षेकरिता धोक्याची घंटा असल्याचे लक्षात आल्यावर मोदी व शहा खडबडून जागे झाले. मात्र तोपर्यंत तोट्यातील शेतीला सबळ पर्याय न मिळाल्याने अस्वस्थ असलेले व कंत्राटी सरकारी नोकºया मिळवण्यातील भ्रष्टाचारामुळे गांजलेले पाटीदार हार्दिक यांच्या नेतृत्वाखाली बरेच पुढे गेले होते. दलित व क्षत्रिय हेही सक्रिय झाले होते. क्षत्रिय, दलित, आदिवासी व पाटीदार यांचे (खाप) हे नवे जातीय समीकरण जमवून काँग्रेस गुजरातमध्ये पुन्हा पाय रोवण्याचा प्रयत्न करू पाहत आहे हे पाहिल्यावर मोदींनी वेड्या विकासाचा मुद्दा अडगळीत टाकत धार्मिक आधारावर धृवीकरणाचे प्रयत्न सुरू केले. व्हॉट्सअॅपवर संदेश, व्हिडिओ पसरवणे, राहुल गांधी यांच्या धर्मापासून जवाहरलाल नेहरू यांच्या लग्नपत्रिकेपर्यंतच्या उठाठेवी करणे असे १५ वर्षांपूर्वी केलेले उद्योग पुन्हा आरंभले. मात्र लोक या प्रयत्नांना धूप घालताना दिसत नाहीत.
वाघ म्हणा की वाघोबा, शेवटी तो खाणारच म्हटल्यावर जे होते तेच झाले आहे. शिवाय इतर जाती मोदींना आव्हान देत आहेत म्हटल्यावर मुस्लिमांनीच का भेदरून जावे?
गेल्या २२ वर्षांच्या सत्ता काळात गुजरातमधील भाजपा बिघडली आहे. अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. अमित शहा-आनंदीबेन पटेल यांच्यापासून सुरू झालेला सत्तासंघर्ष तळागाळापर्यंत पोहोचला आहे. तरीही गुजरातच्या निवडणुकीचे निकाल काय लागतील ते लागलीच सांगता येणार नाही. मात्र यापूर्वी मोदींच्या गोंडस विकास मॉडेलबद्दल ब्र काढायलाही घाबरणारे आता विकास वेडा झाल्याचे जाहीरपणे बोलू लागले आहेत. भाजपाने उमेदवारी दिली नाही म्हणून बंडखोरी करण्यास न धजावणारे बिनधास्त बंडखोर म्हणून रिंगणात उडी मारून मोकळे झाले आहेत. मोदींच्या सभांकडे पाठ फिरवणारे हार्दिक पटेलच्या सभांमध्ये गर्दी करू लागले आहेत. आता ही गर्दी मतांमध्ये परावर्तित करेल, अशी लाट गुजरातमध्ये उसळेल किंवा कसे ते आताच सांगता येत नाही.
गेल्या २२ वर्षांत केडर तुटलेली काँग्रेस देशाची सत्ता सांभाळणाºया मोदी, भाजपा व संघाच्या फौजेला मात देईल, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. मात्र मोदींची भाषा बदलली आहे, भाजपाच्या तंबूत घबराट पसरली आहे आणि मोदी ब्रॅण्डची व्हॅल्यू घसरण्यास गुजरात निवडणुकीपासून सुरुवात झाली तर संघ परिवाराला योगी आदित्यनाथ नावाचे नवे प्रॉडक्ट गवसले आहे.
दहशतीचा ‘अस्त’?
मोदी आपल्या विरोधकांवर किती बारीक लक्ष ठेवून असतात त्याचे एक उदाहरण एका ज्येष्ठ पत्रकाराकडून गप्पांच्या ओघात कळले. ते सांगत होते, मोदी प्रारंभी गुजरातमध्ये प्रचारक होते. नंतर त्यांना विरोध झाल्याने दिल्लीत धाडण्यात आले. या काळात मोदींच्या कार्यशैलीबद्दल मी बरेच विरोधी लेखन केले होते. सुमारे दहा वर्षे गेल्यावर मोदी पुन्हा गुजरातमध्ये मुख्यमंत्रिपदावर आले तेव्हा भेट झाली. पहिल्या भेटीत मोदींनी प्रश्न केला की, ‘पिछले महिने खरीदी नई स्कूटर कैसे चल रही है?’ मोदींच्या या प्रश्नावर मी चाट पडलो!’
- मोदी दिल्लीत असताना त्या पत्रकाराच्या आयुष्यात घडलेल्या सर्व छोट्या-मोठ्या घटनांची बित्तंबातमी त्यांच्याकडे होती. निवडणूक निकाल काहीही लागले तरी मोदी नावाची दहशत ही निवडणूक संपवणार आहे, असे पत्रकार बोलून गेला.