येथ एक असे आधारू

By Admin | Published: June 7, 2014 07:15 PM2014-06-07T19:15:55+5:302014-06-07T19:15:55+5:30

या जगात देण्यासाठी प्रेमाहून अधिक मोठी गोष्ट कुठलीच नाही. प्रेम देणे हे सर्वस्व देण्यापेक्षा कमी नसते. प्रेम दिल्यावर द्यायला काहीच उरत नाही आणि देणाराही उरत नाही.

Here is a base | येथ एक असे आधारू

येथ एक असे आधारू

googlenewsNext
>स्वामी मकरंदनाथ 
 
'आत्मदीप’ ही लेखमाला सुरू होऊन वर्ष झाले. आज समारोपाचा लेख लिहीत आहे. 
या वर्षभरात मला आपल्यापुढे अध्यात्मविद्येबद्दल काही विचार मांडता आले. अध्यात्मविद्येला भगवंतांनी ‘अध्यात्मविद्या विद्यानाम्’ असे संबोधून स्वत:ची विभूती म्हणून वर्णिलेले आहे.
परमार्थ, आदर्श जीवन, नाम, ध्यान, श्रवण आदी साधना, संतसंगती, सद्गुरू, सद्गुरुमहिमा अशा अनेक साधकोपयोगी विषयांचा समावेश या लेखमालेमध्ये झालेला आहे. परमार्थाची फारशी तोंडओळख नसलेल्या वाचकांनादेखील या लेखांचा निश्‍चितच लाभ झाला. 
माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ यांच्या पवित्र चरणांपाशी बसून झालेल्या श्रवणाच्या आधाराने माझी परमार्थाची वाटचाल घडली, माझ्या विचारांना वळण मिळाले, मला साधनेची गोडी लागली. त्यांच्या कृपेने आलेल्या प्रचितीच्या बळावरच मी बोलतो. ही लेखमालादेखील त्याचीच परिणती आहे. 
या लेखमालेचे सर्वदूर महाराष्ट्रात स्वागत झाले. अनेकांनी फोनद्वारा अथवा प्रत्यक्ष भेटून लेख आवडल्याचे माझ्यापर्यंत पोहोचविले. भगवंत म्हणतात, ‘ईश्‍वर: सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।’ आपल्या सर्वांच्या हृदयात वास करून असणार्‍या ईश्‍वराला ही सेवा पोहोचली, असे मी समजतो. 
‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाचे मी आभार मानतो. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रातील लक्षावधी वाचकांची सेवा करण्याची ही संधी मला मिळाली. 
माझी ही अल्पशी वाड्मयीन सेवा फार अद्वितीय घटना वगैरे मुळीच नाही, याची मला जाणीव आहे. याद्वारे गीता-ज्ञानेश्‍वरी तसेच ज्ञानोबादी संतांच्या कल्याणकारी विचारांची उजळणी करण्याचा प्रयत्न मात्र या जीवाच्या हातून; अल्पस्वल्प का होईना; घडला, हे निश्‍चित!
खरे तर ही लेखमाला म्हणजे हजारो मुमुक्षू साधकांना प्रेमासहित परमार्थ विचार देणार्‍या माझ्या सद्गुरूंचा गौरव आहे. सर्मथ म्हणतात, 
ईश्‍वरी प्रेम अधिक।
प्रपंच संपादणे लौकिक।
सदा सन्निध विवेक। 
तो सत्त्वगुण।। 
ईश्‍वरावर प्रेम असावे. त्याही पुढे जाऊन नेहमीच विवेक धारण करून शक्य तितका उत्तम लौकिक आणि प्रपंच संपादन करावा. हे सर्व सत्त्वगुणापोटी घडते. माझे परमगुरू पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचीही शिकवण अशीच होती.
धन, सुत, दारा असो दे पसारा। 
नको देऊ थारा आसक्तिते।। 
..स्वामी म्हणे राहे देही उदासीन।
पाहे रात्रंदिन आत्मरूप।।’
असे ते त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात. स्वामी माधवनाथांचे जीवन अगदी असेच होते. 
मी त्यांच्या जीवनावरून शिकलो, की या जगात देण्यासाठी प्रेमाहून अधिक मोठी गोष्ट कुठलीच नाही. प्रेम देणे हे सर्वस्व देण्यापेक्षा कमी नसते. त्यांच्या जीवनाकडे पाहून मला समजले, की प्रेम दिल्यावर द्यायला काही उरत नाही आणि देणाराही उरत नाही. स्वामीजींनी साधक वर्गाला जे काही पारमार्थिक धन दिले, ते प्रेमासहित दिले. अगदी रामकृष्ण परमहंसांसारखे! माझा हा छोटासा लेखनप्रपंच स्वामीजींनी दिलेल्या प्रेमाच्या अधिष्ठानावरच झाला आहे. जिथे ज्ञानेश्‍वरमहाराजांसारखे संतसम्राट उद्गार काढतात, 
एरवी तरी मी मूखरु। जरी जाहला अविवेकु। 
तरी संतकृपादीपकु। सोज्ज्वळु असे।। 
तिथे माझ्यासारख्याने काय बोलावे? मात्र त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले, तर 
परी येथ येक असे आधारु।। तेणेचि बोले मी सधरु। 
जे सानुकूल श्रीगुरु। ज्ञानदेवो म्हणे।। 
मला माझे गुरु अति अनुकूल आहेत. त्यामुळेच हे लेखनकार्य माझ्या हातून झाले, असे वाटते. या लेखनाचा शेवट औपनिषदिक प्रार्थनेने करतो.
सर्वेऽपि सुखिन: सन्तु। सर्वे सन्तु निरामया:।
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्‍चित् दु:खमाप्नुयात्।।’
।। हरि ú तत् सत्।। 
(लेखक पुणेस्थित असून, नाथ संप्रदायातील 
स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक 
अधिकारी आहेत.)
(समाप्त)

Web Title: Here is a base

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.