हे ऑन वाय
By admin | Published: April 29, 2017 09:09 PM2017-04-29T21:09:15+5:302017-04-29T21:09:15+5:30
महाराष्ट्र सरकारला ‘पुस्तकांच्या गावा’ची कल्पना सुचवणाऱ्या इंग्लडमधल्या खेड्याची कहाणी.
Next
>
- यशोदा वाकणकर
नदीच्या काठचं, हिरव्याकंच पठारांनी आणि सभोवतालच्या पर्वतांनी वेढलेलं छोटुकलं गाव. आधी पुस्तकांची दुकानं आली, मग पुस्तकं आणि त्यांच्या मागोमाग पुस्तकांसाठी माणसं आली.
आम्ही पाच-सहा वर्षं युरोपमध्ये होतो, तेव्हा तिथला अनवट निसर्ग, फार गवगवा न झालेल्या जागा, प्रसिद्ध पुस्तकांची दुकानं, लेखकांची घरं आणि लिटरेचर फेस्टिव्हल्स ह्या जागा जास्त पाहिल्या. वाचनवेड्यांची पंढरी असलेल्या जागा. ‘हे आॅन वाय’ त्यातलंच एक.
‘हे आॅन वाय’ ह्या नावाचं एक छोटंसं टुमदार गाव आहे! युनायटेड किंगडमच्या पश्चिमेला वेल्स भागात वसलेलं एक सुंदर गाव. खेडंच म्हणा ना. आणि त्या खेड्याचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी तिथे भरणारं जगातलं सर्वात मोठं लिटरेचर फेस्टिव्हल! अतीव सुंदर गाव. टिपिकल वेल्स भागातली टुमदार उतरत्या छपरांची कौलारू घरं, हिरवीगार कुरणं, उंचसखल पठार रचना ह्या अतिशय सुंदर दिसतात.
हे गाव नदीच्या आग्नेयेला वसलेलं आहे, इंग्लंडमधल्या प्रसिद्ध ब्लॅक माउंटन्सच्या सर्वात उत्तरेला आहे, आणि हा ब्रेकन बेकन्स नॅशनल पार्कचा सर्वात उत्तर-पूर्व भागच आहे. अशा सगळ्या तऱ्हेच्या निसर्गाने चहुबाजूने वेढल्यामुळे हे गाव अजूनच खुलून दिसतं.
लिटरेचर फेस्टिव्हल सुरू होण्याच्या खूप आधीपासूनच ‘हे आॅन वाय’ गाव तिथे जागोजागी असलेल्या पुस्तकांच्या दुकानांबद्दल प्रसिद्ध होतं. १९६२ ह्यावर्षी रीचर्ड बूथ ह्या गृहस्थाने तिथे पहिलं पुस्तकांचं दुकान काढलं. आणि नंतरच्या आठ वर्षांत तिथे एवढी पुस्तकांची दुकानं झाली की बस्स! जिथे तिथे पुस्तकांची दुकानं. जुनी आणि नवी, दोन्ही प्रकारची पुस्तकं. युकेमधलं सर्वात जास्त पुस्तकांची दुकानं असलेलं गाव. आणि त्यामुळे ह्या गावाला ‘द टाउन आॅफ बुक्स’ असंच म्हणतात.
या गावात अशी पुस्तकांच्या दुकानांची संस्कृती आणि साहजिकच वाचनसंस्कृती आल्याने अनेक इंग्लिश लेखकसुद्धा ह्या गावी येऊन राहू लागले. वेल्समधल्या प्रसन्न कोवळ्या उन्हाच्या समरमध्ये अनेक लेखक आणि त्यांचे चाहते म्हणजेच वाचनवेडे, एकत्र येऊन गप्पा मारू लागले. त्यांचे आधी छोटे गट बनत गेले, आणि मग त्या छोट्या गटांचा एक खूप मोठा लेखक-वाचक गट बनत गेला. आधी कितीतरी वर्षं दर समरमध्ये अनौपचारिकरीत्या एकत्र येऊन अशा लेखक-वाचकांचे मेळावे भरत होते. पण १९८८ पासून पिटर फ्लॉरेन्स ह्या इंग्लिश लिटरेचरमध्ये मास्टर्स केलेल्या आणि अॅक्टर असलेल्या तरु ण मुलाने हे लिटरेचर फेस्टिव्हल भरवणं सुरू केलं. ‘हे आॅन वाय’ ह्या गावाला तिथले गावकरी प्रेमाने फक्त ‘हे’ म्हणतात. त्यामुळे हा लिट फेस्टसुद्धा ‘हे लिटरेचर फेस्टिव्हल’ झाला. गेली तीस वर्षं ह्या फेस्टिव्हलची धुरा पिटर फ्लॉरेन्स ह्यानेच सांभाळली आहे. पहिला फेस्टिव्हल पीटरने पोकर गेम खेळून साठवलेल्या पैशातून भरवला होता. पण नंतर त्याचं घवघवीत यश बघून त्याला स्पॉन्सर्स मिळत गेले, आणि ह्या फेस्टिव्हलमधूनदेखील पैसे साठू लागले.
दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पुढचे दहा दिवस हा ‘हे लिट फेस्ट’ चालतो. त्या दहा दिवसांत जगातले उत्तमोत्तम लेखक आणि त्याचबरोबर गायक-वादकसुद्धा प्रेक्षकांबरोबर संवाद साधतात. आणि नुसते लेखक नाहीत, तर फिलॉसॉफर, कवी, विचारवंत, इतिहासकार, प्रसिद्ध सिनेतारका, नोबेल पुरस्कार विजेते अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींची तिथे रेलचेल असते. या ‘हे लिट फेस्ट’ला येणारी माणसंसुद्धा ‘हे आॅन वाय’ ह्या निसर्गरम्य गावाचा आणि त्याच्या सभोवतालच्या परिसराचा आस्वाद घेतात. तिथल्या कोवळ्या उन्हात मैलोन्मैल पसरलेल्या हिरवळीवर चालण्याचा किंवा पाय पसरून बसण्याचा आस्वाद घेतात. गावातल्या अनेकानेक पुस्तकांच्या दुकानांना भेटी देतात. तिथली लेखकांची घरं बघून येतात.
सुरुवातीला तर हा ‘हे लिट फेस्ट’ चर्चेसमध्ये, शाळांच्या हॉलमध्ये वगैरे भरायचा. पण नंतर नंतर त्याचं स्वरूप इतकं मोठं होत गेलं की आता तर गावाबाहेरच्या पठारावर, निसर्गाच्या अगदी जवळ, भव्य शामियान्यात भरतं. त्यामुळे त्याची लज्जत अजूनच वाढली आहे. आता तर हा लिट फेस्ट फक्त ‘हे आॅन वाय’ या वेल्समधल्या गावापुरता मर्यादित राहिला नाही, तर मेक्सिको, स्पेन, डेन्मार्क, पेरू, ढाका, कोलंबिया आणि यूकेमधल्या इतरही काही ठिकाणी भरू लागला आहे. ....कुठून कुठून माणसं येतात आणि निसर्गाबरोबर पुस्तकांच्या सान्निध्यात रमून जातात. वाचनवेडी माणसं नेहमी चांगली पुस्तकं, चांगले लेखक, लेखकांच्या मुलाखती ह्या सगळ्याचा शोध घेत असतात. त्या सर्व शोधांबरोबर वाचकांचा ‘स्व-शोध’सुद्धा असतोच. किंबहुना तो अधिक महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळेच हा यूकेमधील वेल्समध्ये भरणारा ‘हे लिटरेचर फेस्टिव्हल’ वाचनवेड्या कुटुंबांना खूप खूप समृद्ध करतो.
(yashoda.wakankar@gmail.com)