सोशल मीडियाचा चकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 06:07 AM2020-08-30T06:07:00+5:302020-08-30T06:10:07+5:30

सोशल मीडिया कंपन्यांचे उपद्व्याप  भयानक व धक्कादायक आहेत.  तुमच्या नकळत तिथे तुमच्या लिखाणावर  कात्री लावली जाते किंवा ते सेन्सॉर केले जाते.  तिथे लिखाणाचे पूर्ण स्वातंत्र्य आहे,   अशा भ्रमात असणार्‍यांना वस्तुस्थिती माहीतच नाही. हल्ली ‘फेसबुक’, ‘ट्विटर’वर किती ‘चाहते’ आहेत  यावर लोकप्रियता ठरवण्याचे नवीन फॅड आले आहे; पण प्रत्येक गोष्ट इथे पैशाच्या मोबदल्यात करता येते. अनेकांनी यामागचे सत्य जगासमोर मांडले आहे.

Hidden secrets in social media... | सोशल मीडियाचा चकवा

सोशल मीडियाचा चकवा

Next
ठळक मुद्देसोशल मीडियात व्यक्तिगत माहिती सुरक्षित नाही हे सिद्ध झाले आहे. गंभीर प्रश्न हा आहे की यापुढे तुमचे घर तरी सुरक्षित राहील का?

- अनंत गाडगीळ

ऐकाहो ऐका.! तो एक जमाना होता की राजे-राजवाडे यांच्या काळात गावात दवंडी पिटून बातमी पसरवली जायची. कालांतराने गेल्या दोन दशकात रेडिओ, वर्तमानपत्रे, टीव्ही यांनी दवंडीची जागा घेतली. आता 21व्या शतकात फेसबुक, ट्विटर, गुगल, यू-ट्यूब, यांनी तर सारे जग व्यापून टाकले आहे. किंबहुना सोशल मीडिया हा आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. 
संगणकाच्या पडद्यावर दिसणार्‍या माध्यमांचे पडद्यामागील उपद्व्याप काय आहेत, याबाबत अनेक वापरकर्ते अनभिज्ञ आहेत. अशा माध्यम कंपन्यांच्या भयानक व धक्कादायक उपद्व्यापांचा प्रसिद्ध लेखक माईक डाइस यांनी आपल्या पुस्तकातून परार्मश घेत सार्‍याची चिरफाड केली आहे. फेसबुकवर जगामधून लिहिले जाणारे लिखाण, प्रत्येक सेकंदाला विशिष्ट सॉफ्टवेअरच्या आधारे सेन्सॉर केले जाते. फेसबुकच्या दृष्टीने लिखाण हे संवेदनशील, आक्षेपार्ह ‘संभाव्य हिंसक’ अथवा ‘तिरस्कार’ निर्माण करणारे आहे की नाही हे पडताळण्यासाठी 2017 मध्ये फेसबुकने 3000 संगणकतज्ज्ञ भरती केले. अशा लिखाणाला तुमच्या नकळत फेसबुक - ट्विटरवर कात्री लावली जाते. सोशल मीडियावर लिखाणाचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, अशा भ्रमात असलेल्या किती जणांना हे उमगले आहे? 


अँड्रय़ू ब्रँट यांचे संशोधन तर याही पुढचे आहे. त्यानुसार गुगल, फेसबुकचे वापरकर्ते विविध संकेतस्थळांवर कोणकोणत्या विषयाला स्पर्श करतात, कुठली माहिती घेतात, यावरून त्या व्यक्ीच्या तब्येतीच्या तक्रारीपासून ते त्याच्या राजकीय विचारधारा, यापर्यंतची सर्व माहिती एकत्र करून ती मोठमोठय़ा कंपन्यांना विकतात. 
सोशल मीडियावरील लिखाणास मिळणार्‍या ‘लाइक्स’ (प्रतिसाद) ठरावीक रकमेच्या बदल्यात निर्माणही करता येतात. ‘स्पॉन्सर’ हे त्याचे गोंडस नाव. ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी देशातील आरोग्यसेवेसाठी ‘ओबामा केअर’ हा लोकप्रिय कार्यक्रम राबविला. बघता बघता त्यास फेसबुकवर 2.25 लाख ‘लाइक्स’ आले. अचानक एका सर्वेक्षणात उघड झाले की मूठभर संगणकतज्ज्ञांनी आर्थिक मोबदल्यापायी हा कृत्रिम प्रतिसाद तयार केला होता. आपल्या देशात तर काही वादग्रस्त, कर्तव्यशून्य व्यक्तींचे फेसबुक-ट्विटरवर लाखो ‘फॉलोवर्स’ आहेत हे न उलगडणारे कोडे आहे ! 
पूर्वी नेत्याच्या सभेला होणारी गर्दी, वक्तृत्वाने होणारे परिणाम अशा विविध बाबींवर त्यांची लोकप्रियता ठरवली जात असे. याउलट हल्ली ‘फेसबुक’, ‘ट्विटर’वर किती ‘चाहते’ आहेत यावर एखाद्याची लोकप्रियता ठरविण्याचे नवीन फॅड आले आहे. डाईस याच्या मते, ही माध्यमं तुमच्या चाहत्यांची संख्या जाणीवपूर्वक कमी दाखवतात, जेणेकरून ती वाढवण्यासाठी तुम्ही खर्च कराल. एक लाख फेसबुक ‘फॉलोवर्स’ होण्याकरिता किमान 3-4 लाख रुपये खर्च करावे लागतात. लोकप्रियता ‘विकत घेण्याचा’ हा नवीन पायंडा!
‘ट्विटर’ हे आता अनेकांसाठी थोडक्या शब्दात मोठा वाद निर्माण करण्याचे माध्यम होत चालले आहे. ट्विटरचा फायदा असा की थोडा वेळ त्यावर लिहून ठेवायचे आणि वाद सुरू झाला की ते पुसून टाकायचे, डिलीट करायचे. लढणारे शब्दांनी लढत राहातात. अशा वाढत्या प्रवृत्तीची मजल कुठपर्यंत जावी तर सिनेनट पॅटन ऑस्वाल्ड, न्यू यॉर्क टाइम्सचे रॉस दावूदयाट, लंडन गार्डियनच्या मनीषा राजेश, या सार्‍यांनी चक्क डोनाल्ड ट्रम्प यांना कुणीतरी आता ‘वैकुंठाला पाठवा’, असे ट्विट केले. टीकेची झोड उठताच अवघ्या काही तासात ट्विटरनेच ते काढून टाकले.  
फेसबुक, ट्विटर, गुगल, सारे सत्ताधार्‍यांच्या दबावाला झुकतात हे लपून राहिलेले नाही. 89 सालच्या तीयाननमेन चौकातील विद्यार्थी आंदोलनापासून ते तिबेट - तैवानच्या स्वातंत्र्याबाबतीत जेवढे म्हणून लिखाण प्रसिद्धीस आले, त्यातील चीनविरोधी मजकूर आम्ही वगळला अशी कबुलीच गुगलने दिली. 2016 साली अमेरिकेत खासदारकीची निवडणूक लढविणार्‍या काही उमेदवारांची गुपितं बाहेर काढणार अशी जेम्स ओकिफ या ‘अँक्टिविस्टने’ घोषणा करताच काही तासातच त्यांचे ट्विटर खाते बंद करण्यात आले. नेमके याउलट, 2012च्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील उमेदवार साराह पालिन यांच्याबाबत ट्विटरवर ईल लिखाण करणार्‍या संगीतकार अँझोलीया बॅनक्सचे खाते मात्र ट्विटरने चालूच ठेवले. गंभीर उदाहरण म्हणजे, हमास व इसिस या दहशतवादी संघटनांच्या लिखाणामुळेच जॉर्डनमध्ये माझ्या नवर्‍याची हत्या झाली असे म्हणत एका अमेरिकन महिलेने ट्विटरवर खटला दाखल केला.  
जगामध्ये दुसर्‍या क्रमांकावरील लोकप्रिय असलेले माध्यम म्हणजे ‘यू-ट्यूब’. ब्रि बाउब्रर यांच्या मोजणीनुसार दर मिनिटाला 400 तास लांबीचे लिखाण जगातून ‘यू -ट्यूब‘वर ‘अपलोड’ केले जाते. एकीकडे यू-ट्यूबच्या स्व-आचारसंहितेनुसार दहशतवादाशी संबंधित लिखाणासोबत जाहिराती दाखविल्या जरी जात नाहीत तरी दुसरीकडे आक्षेपार्ह म्हणून काढून टाकलेला पाश्चिमात्य गायिका जॉईस बाथोर्लीमेवचा व्हिडिओ, तिने कोर्टात धाव घेताच यू-ट्यूबने पुन्हा अपलोड केला. परिणामी दर्शकांची संख्या पन्नास हजारांवरून पाच लाखांपुढे गेली. सोशल मीडिया कंपन्यांच्या धोरणात तारतम्यच नाही हे यामुळे सिद्ध होते. 
सोशल मीडियात व्यक्तिगत माहिती सुरक्षित नाही हे सिद्ध झाले आहे. गंभीर प्रश्न हा आहे की यापुढे तुमचे घर तरी सुरक्षित राहील का? कारण, अमेरिकेत 80 टक्के घरफोड्यांनी, ‘गुगल स्ट्रीट सर्च’द्वारा घरांची टेहेळणी करून मगच डाका टाकला. 
दुर्दैवाने सोशल मीडियातून मिळणार्‍या माहितीवर अजाणतेपणाची झालर असल्यामुळे वापरकर्ते चकवले जात आहेत. ज्ञानाचा अधिपती, र्शीकृष्णाने गीतेत म्हटलेच आहे- 
‘अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुहयन्ति जन्तव:’ 

anantvsgadgil@gmail.com
(लेखक माजी आमदार आहेत.)

Web Title: Hidden secrets in social media...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.