हिमालयाचं चुंबकीय आकर्षण!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 12:55 PM2018-06-03T12:55:02+5:302018-06-03T12:55:02+5:30
ओबडधोबड, खाचखळग्यांचा रस्ता अचानक गुळगुळीत डांबरी झाला. गाडी थांबवली तर बाहेर रोंरावणारा वारा! आम्ही धडपडत बाहेर पडलो. तो वारा पिऊन सुनील बेभान नाचू लागला. एक दांडगट अदृश्य हात आम्हाला दरीकडे ढकलत होता. नकळत मी ओरडलो, ‘सुनील, सचिन काळजी घ्या रे!’
- वसंत वसंत लिमये
(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)
रस्त्यावर धुळीचं साम्राज्य असल्यानं, एसी लावून गाडीच्या काचा बंद केल्या होत्या. अचानक मुक्तिनाथकडे जाणारा ७ किमी रस्ता गुळगुळीत डांबरी झाला! बाहेर वाऱ्याचा अस्पष्ट आवाज होता. डावीकडे खाली नदीकडे डोकावून पाहणारं विस्तीर्ण पठार लागलं. तुरळक ढग, निळंभोर आकाश, दिमाखात डोकावणारी हिमाच्छादित शिखरं, साºयांनाच फोटो काढण्याचा मोह अनावर होता. गाडी थांबली. दरवाजा उघडताच वाºयाच्या झोतानं तो फाडकन बाहेर फेकला गेला, तुटेल की काय अशी भीती वाटून गेली. त्या तुफानी वाºयात आम्ही धडपडत बाहेर पडलो. तो गार बेफाम वारा पिऊन सुनीलही (बर्वे) बेभान होऊन चक्क नाचू लागला. एक दांडगट अदृश्य हात आम्हाला दरीकडे ढकलत होता. ‘अरे सचिन (खेडेकर), जरा जपून! काळजी घ्या रे!’ नकळत मी ओरडलो.
दरीच्या कडेपासून जरा दुरूनच साºयांनी पटापट फोटो काढले आणि आम्ही गाडीकडे निघालो. वाºयाचा जोर वाढला होता. ताशी वेग ८० किमी नक्की असेल. ‘व्हेन्चुरी इफेक्ट’.. माझा इंजिनिअरिंग मेदू कुजबुजला. वाºयाबरोबर मोहरीसारख्या बारीक दगडांचा बोचरा मारा सुरू होता. डोळ्यांचा बचाव करण्यासाठी एक हात डोळ्यांवर धरून, वाºयावर भार टाकत पुढे झुकून, आम्ही अडखळती पावलं गाडीकडे टाकू लागलो. गाडीत बसताच धडाधड दरवाजे बंद झाले. चकार शब्दही न बोलता अमितनं स्टार्टर मारला आणि गाडी मुक्तिनाथकडे निघाली. एक किलोमीटर अंतर जात नाही तोच कळ दाबल्याप्रमाणे वारा बंद झाला. आमचा आमच्याच कानांवर विश्वास बसत नव्हता. आम्ही थक्क झालो होतो. हिमालयातील एका महाभूतानं कानफटात दिल्यागत आमची अवस्था झाली होती.
हिमयात्रेच्या तिसºया आठवड्यात, सुप्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे आणि सचिन खेडेकर आम्हाला काठमांडू येथे जॉइन झाले. सुरुवातीच्या दोन आठवड्यात आमच्यावर रुसलेलं हवामान आता हसू लागलं होतं. सोमवारी एका खोलगट दरीत वसलेलं पोखरा येथील रमणीय फेवा सरोवर पाहून आम्ही पुढे निघालो. इथून एरवी माचापुचारे (म्हणजेच मच्छ पुच्छ), आमा दाब्लाम अशी मातब्बर शिखरं दिसतात. आम्ही बेनी या गावापासून, दीड हजार फूट उंच कातळ भिंतीतून मार्ग काढणाºया मस्तवाल काली गंडकीच्या खोºयात शिरलो. अन्नपूर्णा शिखर समूहाला कवेत घेणारी ही उग्र भयंकर नदी. जगातील आठ हजार फूट उंचीवरील चौदा शिखरांपैकी, दिमाखदार ‘धौलागिरी’ आणि ‘अन्नपूर्णा’ शिखर समूह हे मस्तांग खोºयाचं खरं वैभव. १९५० साली मॉरिस हझॉग या फ्रेंच गिर्यारोहकानं अन्नपूर्णा सर केलं, तर १९७० साली ख्रिस बॉनिंग्टन या ख्यातनाम ब्रिटिश गिर्यारोहकाच्या नेतृत्वाखाली अन्नपूर्णेच्या नैऋत्य कड्यावरून नवीन मार्ग शोधून काढला गेला. सत्तरच्या दशकात मला गिर्यारोहणाचं वेड लागलं. तेव्हा हझॉग, हर्मन बुह्ल, जो ब्राउन, बॉनिंग्टन हे मला देवासारखे भासत. त्यांचं मिळेल ते सारं साहित्य आधाशाप्रमाणे वाचून काढलं होतं. माझ्यासाठी गिर्यारोहणातील तो फार महत्त्वाचा संस्कार होता. अशा मान्यवरांच्या कमर्भूमीत, मस्तांग खोºयात फिरताना मी धन्य झालो! माझ्यासाठी हेदेखील या हिमयात्रेचं माहात्म्य होतं!
मान्यवरांवरून आठवलं, सचिन आणि सुनील हे मान्यवर, मित्र म्हणून या यात्रेत सामील झाले होते. तरीही सुरुवातीस उगाचच मनावर एक दडपण होतं. दोघांच्याही वागण्यात तसं काहीच नव्हतं. रूपा लेकच्या काठावरील डोंगराच्या माथ्यावर असलेल्या रूपाकोट आणि मुक्तिनाथच्या थोड्या अलीकडे असलेल्या झारकोट मुक्कामी कांदे-बटाटे कापण्यापासून, ‘केबीआर’ (कांदा बटाटा रस्सा) बनविण्यापर्यंत सारी कामं अत्यंत आवडीने त्या दोघांनी केली. असा प्रवास, असं रहाणं पहिल्यांदा करत असूनही, कुठलीही तक्रार नव्हती. गप्पा, सचिनचं अभिवाचन आणि सुनीलची गाडीतली गाणी अशी धमाल चालली होती. बहुतेक वेळी, अशा लोकप्रिय मंडळींना साधंसोपं, सामान्य माणसाप्रमाणे राहणंदेखील मुश्कील असतं. सचिन तर अनेकदा कॉलर वर आणि तोंडावर रूमाल असा गर्दीच्या ठिकाणी वावरत होता. नेपाळात हिंदीत डब केलेले तमिळ सिनेमे पाहून लोक सचिनला ओळखत असत आणि मग सेल्फीसाठी गराडा!
मुक्तिनाथ मंदिर पार्किंगपासून दीड किलोमीटर आणि सहाशे फूट उंचीवर आहे. मुक्तिनाथ हे विष्णूचं देवस्थान आहे १२,००० फूट उंचीवर. म्हणूनच विरळ हवामानाची सवय नसल्यानं, मस्ती न करता सर्वगोष्टी सावकाश करणं गरजेचं होतं. अशा वेळेस ‘त्यात काय मोठंसं’, अशा उत्साहाला आवर घालावा लागतो. दर्शन घेऊन परत येत असलेल्या, कमरेत वाकलेल्या दाक्षिणात्य भाविक जख्ख म्हातारीकडून स्फूर्ती घेऊन मी मंदिरात पोहचलो. हिमालयात बहुतेक ठिकाणी, ‘ताडाताडी कोरबे’ म्हणत भांडत असावेत, अशा आवाजात बोलणारे बंगाली, अगम्य भाषेत बोलणारे अफाट श्रद्धाळू दाक्षिणात्य आणि आपली मराठमोळी माणसं हमखास आढळतात. हिमालयाचं चुंबकीय आकर्षण हा समान धागा!
सिक्कीमपासून नेपाळपर्यंत येताना, नकळत बदलत जाणारं हिमालयाचं रूप स्तिमित करणारं होतं. सिक्कीमला एक ओलसर हिरवागार हिमालय भेटतो. नेपाळमध्ये हिमालयाची भव्यता जाणवते. दोन्ही ठिकाणी बायकाच काम करण्यात आघाडीवर दिसतात. तशाच त्या नटण्या-मुरडण्यातही अतिशय हौशी! सिक्कीमची स्वच्छता नेपाळात हळूहळू गायब होऊ लागली. खूप प्रमाणात वृक्षतोडही जाणवते. खूप पूर्वी केलेले रस्ते आता पार खराब झालेले आढळतात आणि यात हायवेदेखील सामील आहेत. पर्यटन हा इथला महत्त्वाचा व्यवसाय; पण त्यात बाजारूपणा जास्त दिसतो. लोभीपणा बºयाचदा डोंगरी आदरातिथ्याला कुरतडताना दिसतो. सेवाभाव हा पर्यटन व्यवसायाचा गाभा आहे, याचा विसर पडताना आढळतो. देश अजूनही तसा गरीब आहे आणि अनेक सुधारणा होण्याची गरज आहे. हे असलं, तरी आम्हाला बासू, लतीफमियाँ, खंडुरी अशी अनेक प्रेमळ नेपाळी मंडळी भेटली, याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.
मस्तांग खोºयात जाण्यासाठी पोखरा येथे परमिट काढावे लागत. तिथे आम्हाला सांगण्यात आलं की आमची गाडी घेऊन ‘बेनी’च्या पुढे जाता येणार नाही. स्थानिक भाड्याची गाडी करावी लागेल. अधिक चौकशी केल्यावर, उलटसुलट माहिती मिळाली. ‘गिरिजा’ गाडीनेच प्रवास करायचा असा माझा हट्ट होता. काहीशा संभ्रमावस्थेतच आम्ही बेनीच्या दिशेनं निघालो. बेनीमध्ये कुणीच आम्हाला हटकलं नाही. आमच्याकडे परमिट होतं, त्यामुळे आमच्या आशा बळावल्या. वाटेत रस्त्याच्या कामांमुळे बराच उशीर झाला. परमिटच्या गोंधळातून बाहेर पाडण्यासाठी, जमलं तर ‘तातोपानी’च्या पुढे जायचं असा आमचा निर्णय झाला. एव्हाना उडणाºया धुळीसोबत काळोख होत आला होता.
रातकिड्यांच्या किर्र संगीताची साथ होती. दाटून येणाºया अंधारात, हिंदकळत नाचणाºया पिवळ्या प्रकाशात पाईन वृक्षांचं दाट जंगल, गाडीचा धडधडाट, वाटेत दिसणारे दगडधोंडे, आता ओळखीचे झाले होते. सकाळपासून दहा तासांचा प्रवास झाला होता. सगळ्यांचीच अंगं अगदी आंबून गेली होती. ‘लोकहो, आपला आपोआप व्यायाम आणि मसाज होतो आहे!’ असं सुनील दुपारीच म्हणाला होता. नियोजनात मागेपुढे होत होतं. ‘सगळ्यांच्या सहनशक्तीचा मी अंत पाहतो आहे का?’ ‘कसे आहात?’ अशा प्रश्नाला, ‘हं’ असं पुटपुटलेलं एकाक्षरी उत्तर आलं. आपण घातलेला हा सगळा घाट, बेत झेपणार आहे का? छे, साहस म्हटलं की असं होणारच! मित्रांबद्दल वाटणारी काळजी, आपली प्रतिमा, एकमेकांच्या क्षमतेबद्दल असलेले अंदाज, अशा अनेकविध विचारांचं काहूर गलबताप्रमाणे चाललेल्या गाडीत माझ्या मनात आंदोळत होतं. संध्याकाळची ही वेळच विचित्र असते. अमितच्या न कुरकुरता गाडी चालविण्याच्या कौशल्याचं कौतुक वाटत होतं. ‘पुढे जावं की नाही’ अशा प्रश्नानं माझा हॅम्लेट झाला होता. ‘आपण आता लवकरच थांबूया!’, मी निर्णय घेतला. ‘थकाली किचन’ अशा ‘लेते’ गावातील हॉटेलात आम्ही मुक्काम केला. नाव अगदी समयोचित होतं! सारेच भराभर जेवणं उरकून, दिवसभरात खिळखिळ्या झालेल्या हाडांचा हिशेब जमविण्यासाठी झोपायला निघून गेले.
सोनेरी पहाटेने गुदगुल्या करत आम्हाला जागं केलं. तो दिवसच बहारदार होता. हॅम्लेट गायब झाला होता. पुढल्या तीन दिवसात मुक्तिनाथाचं दर्शन झालं. अन्नपूर्णा, धौलागिरी, टुकूचे, निलगिरी, थोरुंगत्से अशा अनेक मातब्बर शिखरांचं लखलखीत दर्शन, बदिर्या अभयारण्यात ‘वाघोबा’चं दर्शन असं काय काय तरी घडलं! अनिश्चिततेच्या भोव-यात असतानादेखील, ‘सारं काही ठीक होईल’ असा विश्वास बाळगून, नशिबावर हवाला न ठेवता स्वत:च निर्णय घेण्यात शहाणपण असतं. यालाच कदाचित श्रद्धा म्हणत असावेत. या साºया प्रवासात आचार्य सचिन (खेडेकर) यांचं एक बोधवाक्य माझ्या मनात घोळत होतं - ‘जगात देव आहे आणि त्याचं आपल्याकडे लक्ष आहे!