इतिहासाची शोधयात्रा --- संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:32 AM2018-12-09T00:32:04+5:302018-12-09T00:35:25+5:30
संशोधकांच्या पोतडीत इतिहासाचा खजाना जमा होत असला तरी, त्याची शोधयात्रा तितकीच बिकटवाटेवरची असते. शेकडो वर्षांमागचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडताना दस्तऐवजांचे भक्कम स्तंभ उभे करावे लागतात.
- अविनाश कोळी
संशोधकांच्या पोतडीत इतिहासाचा खजाना जमा होत असला तरी, त्याची शोधयात्रा तितकीच बिकटवाटेवरची असते. शेकडो वर्षांमागचा इतिहास नव्या पिढीसमोर मांडताना दस्तऐवजांचे भक्कम स्तंभ उभे करावे लागतात. जीर्ण, धुळीच्या थरात हरवलेली, दुर्गंधीच्या पसाऱ्यात अडकलेली लाखो कागदपत्रे शोधण्यासाठी मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ‘धूळवाटेवरचा काटेरी प्रवास’ करीत इतिहासाचा एक खजाना लुटला आहे.
मिरज इतिहास संशोधन मंडळाचा ऐतिहासिक खजाना पाहण्यासाठी केवळ राज्यातीलच नव्हे, तर अन्य प्रांतातील व परदेशातील लोक भेट देत आहेत. महाराष्टतील विविध जिल्ह्यातील राजे-रजवाडे, सरदार, इनामदार, सावकार, संस्थानिक, त्यांचे अधिकारी, मंदिर, दर्गा, मशिदींचे पुजारी, गुरव, परंपरागत पौरोहित्य, भिक्षुकी करणारी घराणी, समाज अशा अनेकांचा शेकडो, हजारो वर्षांचा इतिहास कवेत घेत संशोधनाच्या खोल दरीत अजून ही मंडळी फिरत आहेत. सांगली, कोल्हापूर, सातारा, कºहाड, पुणे यासह राज्यातील अनेक जिल्हयातील ऐतिहासिक दस्तऐवज या मंडळाकडे जमा झाले आहेत. मोडी, हळेकन्नड किंवा अन्य भाषांमधील शिलालेख, ताम्रलेख अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून संशोधनाच्या विश्वातील एक महत्त्वाची सफर त्यांनी केली.
पडके वाडे, घरे, संस्थानकालीन दफ्तरखाने, पाटीलवाडे अशाठिकाणी जुन्या कागदपत्रांचा शोध घेतला जातो. जुन्या जीर्ण फोटोंच्या फे्रमला लावलेल्या वृत्तपत्रीय व जुन्या कागदांमधूनही इतिहासाच्या विश्वाची पाने उलगडली जात आहेत. चालुक्यकालीन, पेशवेकालीन, आदिलशाहीच्या काळातील इतिहासही दस्त, शिलालेख, ताम्रलेख, वस्तूस्वरुपातून समोर आला आहे. लाखो कागदपत्रांचा खजाना आज या मंडळाकडे जमा आहे. केवळ कागदपत्रे सापडूनही इतिहास हाती लागला, असे होत नाही. अनेकदा माहीत नसलेली भाषा, लिपी यात हा इतिहास लपलेला असतो. संबंधित भाषातज्ज्ञांकडून त्या कागदपत्रातील तपशिलाचा उलगडा करून नंतर त्याच्या नोंदी करून इतिहासाचे हे पान सजविले जाते.
इतिहास जेवढा रंजक आणि वेधक वाटतो, तितकी त्याच्या शोधाची कहाणी क्लिष्ट, विचित्र आणि त्रासदायी आहे. इतिहासाच्या कागदी लगद्यांना पैलू पाडून अस्सल हिºयासमान दस्त घडविण्याचे काम हे कार्यकर्ते करीत आहेत. सांगलीच्या विजयनगर येथील नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीही याच संशोधन मंडळाकडील जुन्या दस्तांनी सजल्या आहेत. म्हणूनच देशभरातून आणि विदेशातून जुने संदर्भ शोधण्यासाठी अनेक संशोधक, लेखक या संग्रहालयाला भेटी देत आहेत. येथील ऐतिहासिक कागदपत्रांचे विश्व पाहून ते थक्कही होतात. अनेक संशोधकांना घडविण्याचे कामही हे संग्रहालय आणि मंडळ करीत आहे.
एकीकडे कागदपत्रांचा शोध घेत असताना उत्खननातून लेणी व शिलालेखांत दडलेला इतिहास धांडोळणेही सुरू आहे. या संशोधन मंडळाने काही महिन्यांपूर्वी वराडे (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथे इ. स. १०९१ मधील चालुक्यकालीन शिलालेख शोधून काढला होता. त्यानंतर खानापूर तालुक्यातील कोळदुर्ग (पळशी) येथील किल्ल्यावर सुमारे साडेआठशे वर्षांपूर्वीचा कन्नड लिपीतील चालुक्यकालीन शिलालेख मंडळाच्या अभ्यासकांना आढळून आला. एकेकाळी खानापूर परिसरावर असलेल्या जैन धर्मियांच्या प्रभावाची माहिती या शिलालेखातून समोर आली आहे. या शोधामुळे जिल्'ाच्या प्राचीन इतिहासाच्या माहितीत मोठी भर पडली आहे. या मंडळात इतिहास संशोधक मानसिंग कुमठेकरांसह प्रा. गौतम काटकर, रणधीर मोरे, प्रा. मुफीद मुजावर, संग्राम मोरे, बाळासाहेब पाटील हे लोक कार्यरत आहेत.