मुखपृष्ठ निर्मिती सृजनात्मक प्रक्रिया!
By Bhagyashree.mule | Published: September 17, 2018 05:29 PM2018-09-17T17:29:45+5:302018-09-17T17:31:27+5:30
रविमुकुल आणि पुस्तकांचे मुखपृष्ठ असे समीकरणच बनून गेले आहे. त्यांनी आजवर हजारो पुस्तकांचे मुखपृष्ठ साकारले आहे. मुखपृष्ठ साकारताना त्यांनी निरनिराळ्या माध्यमांचा प्रभावी वापर केला आहे. पुस्तकाचा आशय, गाभा त्या मुखपृष्ठातून परिवर्तित झाला पाहिजे हे सूत्र डोळ्यापुढे ठेवून ते काम करतात. चित्र साकारण्याआधी संपूर्ण पुस्तक वाचून मगच कामाला लागतात. लेखकाने सांगितले म्हणून केवळ कल्पना ऐकून चित्र काढायला घेतले तर ते पुस्तकाला न्याय देऊ शकत नाही असा त्यांचा आजवरचा अनुभव आहे. एका कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये आले असता रविमुकुल यांच्याशी साधलेला संवाद.
तुम्ही मुखपृष्ठकार या क्षेत्राकडे कसे वळलात?
- माझे शालेय शिक्षण सोलापूरच्या संगमेश्वर कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर पुण्याच्या अभिनव कॉलेजमधून चित्रकलेचे शिक्षण पूर्ण केले. अभिनव कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी पुण्यामध्ये आलो आणि रस्त्यावरची शाळा अनुभवली. चित्रकला शिकून येत नाही असे सांगत प्राध्यापकांनी तू बाहेरच शिक्षण घे हा सल्ला दिला. अभ्यासक्र म पूर्ण केला खरा. पण, खरी चित्रकला बाहेरच शिकलो. मला लहानपणापासून वाचनाची आवड आहे. त्यामुळेच मी लेखकाचे म्हणणे समजावून घेऊ शकतो. त्यानुसार मुखपृष्ठ साकारले पाहिजे यावर भर देत गेलो. या क्षेत्रात कुणी गुरु नसतो. तुमची तुम्हाला दृष्टी मिळाली पाहिजे. तुमची चित्र तुम्हाला दिसली पाहिजेत. रेषा सापडल्या पाहिजेत. गुरु फक्त तंत्र देतो. मंत्र तुम्हाला गवसला पाहिजे.
मुखपृष्ठकार म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्यांना काय सांगाल? या क्षेत्रात
किती वाव आहे?
- या क्षेत्रात येऊ इच्छिणाºयांना खूप वाचन, निरीक्षण, चित्रकला यांची आवड पाहिजे. ती नसेल त्यांनी या क्षेत्रात येऊ नये. तुम्हाला पुस्तकाचे आकलन झाले पाहिजे. आपण नवीन काय देऊ शकतो याचा ध्यास असला पाहिजे. हे बौद्धिक क्षेत्र आहे. खूप मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे आणि स्कोपच म्हणाल तर कुठल्याच क्षेत्रात स्कोप नसतो. तो आपण निर्माण करायचा असतो. स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करावी लागते. प्रकाशन क्षेत्राची अवस्था सध्या बिकट आहे. नवीन पिढी फक्त माहितीपर पुस्तकांकडे वळते.
साहित्याकडचा त्यांचा कल कमी झाला आहे. या क्षेत्रात करिअरचे म्हणाल तर समाधान मिळण्याइतके पैसे नक्कीच मिळू शकता. चैन करण्याइतके पैसे कदाचित मिळणार नाही. पण लोक शिकण्याआधीच करिअर, पैसा, ग्लॅमरची स्वप्ने बघतात. व्यक्त होण्याआधी रियाज केला पाहिजे; पण हे लगेच मैफलीत जाऊन गायला बघता. या क्षेत्रात यायचे तर खूप मेहनत करायची तयारी हवी. निरीक्षणशक्ती अफाट हवी. वाचन आणि चित्रकला यांची भूक भागवणारे हे क्षेत्र आहे. या क्षेत्राची साधना आयुष्यभर चालते. ती करण्याची तयारी असली पाहिजे.
आदर्श मुखपृष्ठाची प्रक्रिया काय?
- पुस्तकाचा आशय नेमक्या पद्धतीने मुखपृष्ठावर आला पाहिजे, तर ते आदर्श मुखपृष्ठ ठरते. नाहीतर पुस्तकाचा विषय वेगळाच आणि मुखपृष्ठ वेगळेच, कशाचा कशाशी संबंध नाही. आपल्याकडे पुस्तके बंदिस्त करण्याची पद्धत आहे. आपले मुखपृष्ठ इतके प्रभावी असले पाहिजे की त्याला वेगळे कव्हर घालायची इच्छा व्हायला नको.
चित्रकार हा वाचक असला तर त्याच्या मुखपृष्ठात अस्सलपणा उतरू शकतो. पूर्वीचे लेखक चित्रकाराला चित्रकल्पना द्यायचे. त्यावर चित्रकार मुखपृष्ठ करून मोकळे व्हायचे. आधीच्या चित्रकारांना हा प्रकार गैर वाटायचा नाही, कारण ते फारसे वाचनच करीत नसायचे. पण असे वाचन न करता, विषय सखोल समजून न घेता केलेले काम वरवरचे होऊ शकते. मुखपृष्ठ हे वाचन आणि चित्रकलेची भूक भागविणारे क्षेत्र आहे.
पूर्वी या क्षेत्रात कसे काम झाले आहे याचा अभ्यास करून मी त्यात वेगळे, प्रभावी काय करता येईल यावर भर देत गेलो व त्यातून चांगल्या कलाकृती साध्य करू शकलो. हे लक्षात घेऊन काम केले पाहिजे, तर तुम्ही चांगले मुखपृष्ठ साकारू शकता. त्यातून पुस्तकाला न्याय मिळतो, चित्रकार म्हणून तुम्हाला समाधान मिळते आणि वाचकांनाही वेगळे काही बघण्याचा आनंद मिळतो.
या क्षेत्रात एवढी वर्ष तुम्ही काम करत आहात. संस्मरणीय अनुभव काय सांगाल?
- मुखपृष्ठकार म्हणून कामाला लागलो तेव्हापासून खूप चांगले वाईट अनुभव आले. काही इतके भन्नाट होते की चित्र काढावे की हसावे असे व्हायचे. पण ही सृजनात्मक प्रक्रिया आहे. सांघिक काम आहे. लेखक, प्रकाशक, चित्रकार यांनी एकमेकांना स्पेस देत, त्यांच्या मागण्या समजावून घेत काम करावे लागते. ‘श्रीमानयोगी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ साकारताना मी मातीच्या रंगात शिवाजी महाराज रेखाटले. त्यांच्या गळ्यात मुघल शैलीतला अंगरखा घातला. हे चित्र लोकांना आवडले.
त्या चित्रात शिवाजी महाराजांच्या गळ्यात कवड्याची माळ घालायला हवी होती असे मला वाटले. तात्यासाहेब यांच्या एका पुस्तकाचे मुखपृष्ठ केले. ते त्यांना इतके आवडले की त्यांनी त्यांच्या नंतरच्या पुस्तकांनाही माझ्याचकडून काम करून घेतले. आपण शाळेत ज्या लेखकाचे धडे शिकलो, मोठेपणी त्या लेखकाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ काढायला मिळणे यांसारखा दुसरा आनंदच असू शकत नाही.
व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ मी केले. हे त्याचे उदाहरण आहे. हास्यास्पद अनुभव म्हणजे एका लेखकाने दोन फुलस्केप भरून पुस्तकाची कल्पना लिहून पाठवली. वरून मुखपृष्ठात शहरवजा गाव, पक्षी, मित्र, मित्राच्या आईचा मृत्यू अशा अनेक गोष्टी आल्याच पाहिजे हा त्याचा आग्रह होता. अर्थात प्रकाशकांनी नंतर ते सर्व बाजूला ठेवून तुम्ही तुम्हाला योग्य वाटेल ते चित्र काढा असे सांगत तो विषय संपवला; पण असेही अनुभव येतात.