Honeytrap: सुंदरीचा तसला व्हिडीओ कॉल आणि तो...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 09:54 AM2022-04-10T09:54:05+5:302022-04-10T09:54:39+5:30

Honeytrap: अतिश्रीमंतांना सुंदर तरुण मुलीच्या जाळ्यात अडकवून पैसे उकळायचे; यापुरता मर्यादित असलेला हनी ट्रॅपचा धंदा सोशल मीडियामुळे सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचलाय...

Honeytrap: The video call of the beauty and he ... | Honeytrap: सुंदरीचा तसला व्हिडीओ कॉल आणि तो...

Honeytrap: सुंदरीचा तसला व्हिडीओ कॉल आणि तो...

Next

- मनीषा म्हात्रे
(गुन्हेविषयक वार्ताहर, मुंबई) 

धेरीच्या उच्चभ्रू वसाहतीत राहणारा सॉफ्टवेयर इंजीनियर रोहन. मोकळ्या वेळेत सोशल मिडियावर सर्फिंग करत असतानाच फेसबुकवर रिया नावाच्या देखण्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट आली. तरुणीचा फेसबुक प्रेफाईलवरील फ़ोटो पाहूनच तो तिच्या प्रेमात पडला. आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता रोहनने थेट तिची रिक्वेस्ट स्विकारली. फेसबुकवर दोघांमध्ये संवाद रंगला. तिच्या मधाळ संवादात तो स्वतःलाही हरवत होता. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. पुढे व्हॉट्सअँप क्रमांक शेअर होताच तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ कॉल आला. अश्लील संवाद रंगवत रोहनला विवस्त्र होण्यास भाग पाडण्यात आले. पुढे याच व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग सोशल मिडियावर शेअर करण्याची भीती घालून रोहनकड़ून पैसे उकळण्यास सुरुवात झाली. एका व्हिडीओ कॉलमुळे लाखो रूपयांचा फटका बसत खाते रिकामी होण्याची वेळ रोहनवर ओढावली. धक्कादायक बाब म्हणजे १५ दिवसांत रिया याच नावाने ३ उच्चशिक्षित तरुणांना चुना लावण्यात आला होता. सध्या असे अनेक रोहन या टोळक्यांच्या जाळयात अडक़त आहे. काही पुढे येतात तर काही बदनामीच्या भीतीने शांत राहतात.

कोरोनाच्या काळात चार भिंती आड़ कैद झालेल्या मंडळीचा सोशल मिडियावरील वावर वाढला. शाळकरी मुलांच्याही हाती स्मार्टफोन आला. वेळ मिळेल तिथे माणसं फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हाॅट्सॲप यावर वेळ घालवू लागली. व्हर्च्युअल संवाद व्हायला लागला. कधी चेहरा ओळखीचा वाटतोय म्हणून, तर कधी चेहरा आकर्षक वाटतोय म्हणून.  राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमावर्ती भागात अशा सायबर हनी ट्रॅप लावून पैसे उकळणाऱ्या अनेक टोळ्या तयार झालेल्या आहेत. या टोळ्यांमध्ये आठवी ते बारावी पास मुलांना घेतले जाते आणि त्यांना हे गुन्हे करण्याचे रीतसर प्रशिक्षण दिले जाते. इतके दिवस फक्त अतिश्रीमंत लोकांना एखाद्या सुंदर तरुण मुलीच्या जाळ्यात अडकवायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे यापुरता मर्यादित असलेला हनी ट्रॅपचा धंदा सोशल मीडियामुळे सर्वसामान्य माणसांच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे.

पूर्वी सायबर भमट्यांना आपली माहिती मिळवण्यासाठी अटापिटा करावा लागत होता. सध्या मात्र, लाईक, शेअरिंगच्या नादात प्रत्येकाची माहिती उघडपणे ठेवण्यात आल्यामुळे सायबर भामट्यांना ती सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे त्यांचे काम आणखीन सोपे झाले आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारी गेल्या वर्षभरात सेक्सटॉर्शनचे ५४ गुन्हे नोंद झाले. त्यामध्ये ५२ आरोपीना अटक करण्यात आली.  मुंबईत नुकतेच शिवसेनेचे दोन आमदार या जाळयात अडकले होते. पहिल्या घटनेत बदनामीच्या भितीने आमदाराने पैसेही दिले. मात्र, पुढे आणखीन पैशांची मागणी होताच त्यांनी कुर्ला पोलिसांकडे तक्रार दिली. तर, दुसऱ्या घटनेत आमदाराने वेळीच सतर्क होत दहिसर पोलिसांकडे तक्रार दिली. राज्यात असे शेकडो गुन्हे नोंद होत आहे. सतर्क होणे गरजेचे आहे.

असा लावतात सायबर हनी  ट्रॅप..
सुंदर मुलीचा फोटो ठेवून मैत्री करायची. पुढे मधाळ संवादातून नग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करून समोरच्याला तशाच स्थितीत येण्यास भाग पाडायचे. सावज जाळयात येताच याच व्हिडीओच्या आधारे, मॉर्फ केलेल्या फोटोच्या आधारे धमकावून खंडणीची मागणी केली जाते. किंवा पुढे सायबर पोलीस, सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून प्रकरण मिटवण्याच्या नावाखाली फसवणूक होते. तर, काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटून प्रेमाच्या जाळयात ओढून ठग मंडळी पसार होत आहेत.

अशी घ्या काळजी...
सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सची सेटिंग्ज प्रायव्हेट ठेवा. समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. त्यातही अनोळखी, सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाऊंटपासून विशेष सावध राहा. त्यांच्याशी पर्सनल चॅट बॉक्समध्ये चॅटिंग करू नका. अनोळखी क्रमांकावरून आलेला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल स्वीकारू नका. तो क्रमांक लगेच ब्लॉक करा. आपल्याला बदनामीची भीती घालून कोणी ब्लॅकमेल करत असेल तर, तात्काळ पोलिसांकडे तक्रार करा.  
    संजय शिंत्रे, पोलीस अधीक्षक, सायबर विभाग, महाराष्ट्र 
 

Web Title: Honeytrap: The video call of the beauty and he ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.