पुण्यातील हॉस्टेल अन् मेस 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 07:00 AM2019-09-22T07:00:00+5:302019-09-22T07:00:10+5:30

पुणे शहरात शिक्षणासाठी, नोकरीनिमित्त येणारा मोठा वर्ग आहे. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था वर्षानुवर्षे करणारी बोर्डिंग  हाऊस आजही सुरू आहेत. त्यातील काहींना तर १०० वर्षांची परंपरा असून, काही नातवंडे आता ती चालवत आहेत....

Hostel and Mess in Pune | पुण्यातील हॉस्टेल अन् मेस 

पुण्यातील हॉस्टेल अन् मेस 

googlenewsNext

- अंकुश काकडे 
बारामती होस्टेल : गोखलेनगरमध्ये १९७८ मध्ये सुरू झालेल्या बारामती होस्टेलची कथा अगदी रंजक आहे. पूर्वी बारामतीत उच्च शिक्षणाची सोय फारशी नव्हती, त्यामुळे ११ वी नंतर मुलं पुण्यात शिक्षणासाठी येत, पण येथे आलेल्या मुलांची राहण्याची, जेवणाची सोय नसल्यामुळे तसेच ही सर्व मुलं शेतकºयांची, त्यामुळे फार खर्च करण्याची त्यांची ऐपत नसे, ही बाब बारामतीतील शेतकºयांनी शरद पवारसाहेबांना सांगितली, त्यांनी शासनाकडे प्रयत्न करून गोखलेनगर येथे २२,००० स्क्वे. फुटाचा प्लॉट मिळवला व तेथे ५ खोल्या बांधण्याचा व १५ विद्यार्थी राहतील अशी सोय करण्याचे ठरले. ही घटना १९७८ मधील. साहेब त्यावेळी मुख्यमंत्री होते. विद्या प्रतिष्ठानचे सेके्रेटरी विठ्ठल मणियार यांनी साहेबांच्या हस्ते भूमिपूजन करायचे ठरवले, पत्रिकाही छापून झाल्या, पण साहेब म्हणाले, माझ्या हस्ते भूमिपूजन करायच्याऐवजी देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई एका कार्यक्रमानिमित्त त्या परिसरात येणार होते, त्यांच्याच हस्ते हे भूमिपूजन करू. मोरारजी देसार्इंनी देखील ते मान्य केले व बारामती होस्टेलचे भूमिपूजन झाले. आणि अवघ्या १० महिन्यांत या ५ खोल्या बांधून झाल्या. १५ विद्यार्थ्यांची राहण्याची सोय झाली, पण पुढे ही जागा कमी पडू लागली. बारामतीतील विद्यार्थ्यांसाठी हे होस्टेल सुरू केले असल्यामुळे त्याचे नावही बारामती होस्टेल असे ठेवले गेले. पण पुढे पुणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी येथे येऊ लागले. त्यामुळे १९८२ मध्ये मोठे होस्टेल बांधण्याचा निर्णय साहेबांनी घेतला आणि पुढच्या ३ वर्षांत ७० खोल्या असलेली २१० विद्यार्थी राहू शकतील अशी इमारत येथे उभी राहिली, पण केवळ होस्टेल करून थांबायचे नाही तर मग तेथे मेसदेखील सुरु झाली. सुसज्ज गं्रथालय, विद्यार्थ्यांचे इतर उपक्रमदेखील तेथे सुरू झाले. १९८७ मध्ये शिवाजीराव काळे हे तेथे व्यवस्थापक म्हणून आले. त्यांनी तेथे उत्तम मेस व त्याचबरोबर रक्तदान, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांचे स्रेहसंमेलन, व्याख्यानमाला असे उपक्रम सुरू केले ते आजपर्यंत सुरू आहेत.
या होस्टेलमध्ये राज्यातून विद्यार्थी येऊ लागले, अनेक जण येथे राहून मोठे झाले. त्यात आयएएस, आयपीएस अधिकाºयांचादेखील समावेश आहे. प्रवीण दराडे, राजेश नार्वेकर, डॉ. संजय भोसले, राजेंद्र मदने, दत्ता शिंंदे, नितीन खाडे, आनंद पाटील, संजय यादव, निळकंठ आव्हाड, अनिल पाटील, दिलीप जावळकर हे आयएएसचे शिक्षण घेत असताना याच होस्टेलमध्ये राहत होते. महेश ढवरे, राजेश पठारे हे होस्टेलचे विद्यार्थी पुढे न्यायमूर्तीदेखील झाले. अशी कितीतरी नावे सांगता येतील, तसेच राजकीय क्षेत्रात पुढे आलेले आ. राहुल कुल, दत्ता भरणे, शिरीष चौधरी, राजेश टोपे, जयकुमार रावळ हे तर राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीदेखील झाले. राजकारणी मंडळी येथे असली तरी शिस्तीच्या बाबतीत विठ्ठल मणियार यांच्यापुढे तेथे कुणाचेच काही चालत नाही.
शारदा निकेतन :
विद्या प्रतिष्ठान, बारामती यांनी पुढे मुलींसाठी कर्वेनगर येथे राज्य सरकारकडून सिलिंगमधील ८० हजार स्क्वेअर फूट प्लॉट घेऊन तेथे फक्त मुलींसाठी अद्ययावत वसतिगृह सुरूकेले. इतर होस्टेलपेक्षा तेथे थोड्या पंचतारांकित सुविधा आहेत, शिवाय महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांतील मुलींचीदेखील येथे शिक्षणासाठी सोय होत आहे. अद्ययावत ग्रंथालय, जिम, स्वीमिंग टँक, गार्डन, टेबलटेनिस, बॅडमिंंटन कोर्ट अशा इतर कुठेही सुविधा आपणास मिळणार नाहीत, त्या येथे आहेत. जवळपास ८८ खोल्या येथे असून, २६४ मुलींची सोय आहे.  सुलेखा देसाई ह्या तेथील काम पाहतात. राजकारणात अतिशय व्यस्त असूनदेखील पवारसाहेब ३, ४ महिन्यांतून एकदा तरी भेट तेथे देतात, अर्थात त्या वेळी विठ्ठल मणियार त्यांच्याबरोबर असतातच.
पूना बोर्डिंग हाऊस :
१९२५ मध्ये सुरू झालेलं पुण्यातील सर्वांत जुनं बोर्डिंग. हे सुरू केलं गुरुराज उडपीकर ऊर्फ मणीअप्पा यांनी. आवटे वाड्यात सुरुवातीच्या काळात ते मणीअप्पांची खाणावळ म्हणूनच प्रसिद्ध होती, त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव रामकृष्ण आणि आता त्यांचे सुपुत्र सुहास हे बोर्डिंग चालवतात. पेरुगेट पोलीस चौकीसमोर पूर्वी तळमजल्यावर असलेल्या या बोर्डिंग हाऊसमध्ये पाटावर बसून जेवणाची सोय होती, तीदेखील १०-१५ लोकांसाठी. पुढे १९६१ मध्ये मणीअप्पांचे निधन झाले. त्यानंतर रामकृष्ण यांनी त्यात बदल करून टेबल-खुर्ची, तीसुद्धा अगदी जुन्या पद्धतीची. पुढे १९७७ मध्ये तेथे इमारत झाल्यानंतर पहिल्या मजल्यावर ते सुरू झालं, पण तेथे नेहमी तास-दीड तास वेटिंग असायचं, पण तेथील चवही वेगळीच, त्यामुळे ग्राहक तेथे थांबून राहत. १९८२ पर्यंत येथे मासिक पास सुरू होते, पण त्यानंतर ते बंद झाले. येथील भाज्या, कमी तेलाच्या, चपात्या एकदम गरम, ही तर त्यांची खासियत. पण दर रविवारी तेथे मिळणारा मसालेभात, आळूची भाजी, बटाट्याची भाजी आजही चाखण्यासाठी अनेक जण येतात. वेटिंग नको म्हणून घरून डबे घेऊन येतात. गुरुवारची कढी-खिचडी, बिरड्याची उसळ, ती इतरत्र कुठेही मिळणार नाही, अशीच होती. आज हे बोर्डिंग सुहास उडपीकर चालवतात. त्यांनी अनेक घटना सांगितल्या, त्या थक्क करणाºया आहेत. १९६५मधील युद्धाच्या वेळी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीमधील सेवकांना तेथून घरी जाण्याची परवानगी नसे. तेव्हा १००-१५० कामगारांसाठी येथून डबा जात असे. १९७२च्या दुष्काळात अमेरिकन गव्हाची चपाती येथे मिळत असे. पण लोक ती आवडीने खात असत. पिंंपरी-चिंंचवड मध्येही दररोज १५०-२०० डबे जात होते, आजही आयटी क्षेत्र वाढलंय, हिंंजवडीला मोठमोठी आलिशान हॉटेल झालीत, पण आजही रविवारी तेथील अनेक जण पूना बोर्डिंगचा डबा घेऊन जातात. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या बोर्डिंगमध्ये येऊन पाटावर बसून जेवत असत. मणीअप्पांशी ते कानडीत बोलत, एखादी भाजी बिघडली तरी अण्णा मोठ्याने कानडीत रागवत, ते पाहून इतर लोक मणीअप्पांना विचारत, पंडितजी का रागावले? तर अप्पा सांगत, नाही, ‘ते रागावले नाहीत, भाजी फारच चांगली झाली असे कानडीत सांगत होते.’ अहो, अण्णाच काय पण सुधीर मोघे, नाना पाटेकर हेदेखील येथे जेवणास आलेले आहेत, शिवाय सध्या मराठी-हिंंदी चित्रपटांचे पुण्यात किंंवा पुण्याजवळपास शूटिंग असते तेव्हा कलावंत मंडळी आमच्याच बोर्डिंगचं जेवण मागवतात. परांजपे नावाचे गृहस्थ गेली ५५ वर्षे दररोज एकवेळचं जेवण येथे येऊन करतात, असे सुहास अभिमानाने सांगतात. नोटाबंदीच्या सुरुवातीस लोकांकडे नवीन नोटा नव्हत्या, त्यामुळे ८-१० दिवस लोकांकडून पैसे न घेता त्यांना आम्ही जेवण दिले. अर्थात त्यांनी नोटा बदलून घेतल्यावर सर्व पैसे चुकते केले, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.

(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Hostel and Mess in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे