बनावट औषधांच्या सापळ्यातून कसं वाचाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 06:15 AM2018-10-07T06:15:22+5:302018-10-07T06:15:22+5:30

एकीकडे बनावट औषधांचं प्रमाण वाढतंय, तर दुसरीकडे रुग्णांचा जीव धोक्यात येतोय. अशावेळी ग्राहकानं काय काळजी घ्यायची?

How to avoid fake drug trafficking? | बनावट औषधांच्या सापळ्यातून कसं वाचाल?

बनावट औषधांच्या सापळ्यातून कसं वाचाल?

Next

- कैलास तांदळे

बरं वाटत नसलं, कुठला आजार झाला, की लगेच आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर आपल्याला औषधं लिहून देतात, आपण केमिस्टकडे जातो आणि औषधं घेऊन येतो.

पण आपण नेमकं काय घेतोय हे आपल्याला माहीत असतं? जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे, बनावट औषधांचा काळाबाजार खूपच फोफावलाय आणि भारतात तर त्याचं प्रमाण महाप्रचंड, म्हणजे बाजारात विकल्या जाणा-या औषधांपैकी 20 टक्के औषधं एकतर कमअस्सल किंवा बनावट असतात! जगातली तीस टक्के बनावट औषधं भारतातून येतात असंही त्यांचं म्हणणं आहे. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉर्मस अँण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम)नं तर फार पूर्वीच यासंबंधात इशारा दिला आहे.

पण मग ग्राहक म्हणून यासंदर्भात आपण काय करू शकतो?

खरंतर अजूनही यासंदर्भात फारसे पर्याय ग्राहकांकडे उपलब्ध नाहीत. तरीही काही काळजी आपल्याला घेता येईल. त्यामुळे बनावट औषधांच्या त्रासापासून ग्राहकांना वाचता येऊ शकेल आणि ग्राहक म्हणून आपली कर्तव्यंही बजावता येतील.

1 मुख्यत: सर्दी, खोकला, डोकेदुखी या आजारांवरच्या औषधांमध्ये सर्वात जास्त बनावटगिरी आढळते.

2 डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय न मिळणारी औषधं आणि प्रीस्क्रिप्शनशिवाय मिळू शकणारी (ओव्हर द काउण्टर) औषधं अशी ढोबळ वर्गवारी औषधांमध्ये करता येते.

3 त्यात पुन्हा शेड्यूल एक्स,  एच, एनआरएक्स अशी वर्गवारी होते. या वर्गातली औषधं डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय मिळू शकत नाहीत. अँण्टिबायोटिक्स, झोपेच्या गोळ्या, मानसिक आजार, मधुमेह, रक्तदाब वगैरे आजारांवरची औषधं सर्वसाधारणपणे यात येतात. 

4 अँस्पिरिन, लोशन, बाम, पॅरासिटॅमॉल. यासारखी औषधं डॉक्टरांच्या प्रीस्क्रिप्शनशिवाय मिळू शकतात; पण तरीही मनानं औषधं घेणं टाळावंच.

5 ज्या दुकानांत रजिस्टर्ड फार्मासिस्ट प्रत्यक्ष हजर आहे, तिथूनच औषधं घ्यावीत. ब-याचदा त्यांच्या जागेवर इतरच कोणीतरी बसलेलं आढळतं.

6 कुठलंही औषध विकत घेताना काही गोष्टी आवर्जुन तपासा. औषधांवर लाल रंगाची रेघ आणि शेड्यूलची काही वॉर्निंग त्यावर आहे का, हे पाहा. ही औषधं कधीही मनानं घेऊ नका. अर्थातच एक्स्पायरी डेटही पाहायलाच हवी.

7 औषधांची बनावटगिरी होऊ नये म्हणून ब-याचशा कंपन्यांनी आता बारकोड पद्धत सुरू केली आहे; पण त्यावरही काही भामट्यांनी उपाय शोधून काढले आहेत.

8 मोठमोठय़ा ब्रॅण्डची किमान तीनशे औषधं अशी आहेत, ज्यांची बनावटगिरी जास्त होते.

9 यावर उपाय म्हणून आता या औषधांवर 14 अंकांचा एक कोड नंबर आणि एक मोबाइल नंबरही छापला जाणार आहे.

10 काही शंका असेल तर ग्राहकांनी फक्त हा कोड नंबर त्या मोबाइलवर एसएमएस करायचा.

11 त्या औषधाची सत्यता तर संबंधित कंपनी सांगेलच; पण त्याचबरोबर कंपनीचं नाव, पत्ता, औषधाचा बॅच नंबर, हे औषध कधी तयार झालं आणि त्याची एक्स्पायरी डेट अशी सर्व माहिती ग्राहकाला एसएमएस करेल. त्यामुळे बनावटगिरी लगेच लक्षात येऊ शकते.

12 औषधांच्या संदर्भात एक सरकारी धोरणही येऊ घातलं आहे. त्यानुसार एक इ-पोर्टल तयार केलं जाणार आहे. जी औषधं तयार होतील, तेवढीच औषधं या पोर्टलवर जातील. ही औषधं कोणत्या डिस्ट्रिब्यूटरकडे, कोणत्या रिटेलरकडे आणि किती ग्राहकांकडे गेली हा सर्व तपशील एका क्लिकवर मिळू शकणार आहे. पण त्यासाठी अजून थोडा अवकाश आहे. 

(अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन)

Web Title: How to avoid fake drug trafficking?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.