प्रत्येक क्षण कसा संपूर्ण?
By admin | Published: January 24, 2015 02:50 PM2015-01-24T14:50:59+5:302015-01-24T14:50:59+5:30
एका झेन गुरूंची खूप सुंदर गोष्ट! ते आजारी होते आणि त्यांना कळलंही होतं, आपण फार काही जगणार नाही म्हणून!
Next
>धनंजय जोशी
एका झेन गुरूंची खूप सुंदर गोष्ट! ते आजारी होते आणि त्यांना कळलंही होतं, आपण फार काही जगणार नाही म्हणून! त्यांच्याभोवती सगळे जवळचे शिष्य जमलेले! झेन गुरूंना ‘रोशी’ म्हणतात.
शिष्यांनी विचारलं, ‘रोशी, तुम्हाला काय पाहिजे? व्हॉट वुड यू लाइक?’
रोशींना एक विशिष्ट केक आवडायचा. शिष्यांपैकी एकानं जाऊन तो केक आणला. रोशी आजारी होते, पण आनंदित होते. शिष्यांनी आणलेला केक त्यांनी बघितला. ‘प्लीज,’ ते म्हणाले, ‘आय वुड लाइक अ स्लाइस!’ त्यांच्या शिष्यांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, ‘रोशी, वुई आर सो हॅपी! प्लीज कॅन यू गिव्ह अस यूअर लास्ट वर्ड्स ऑफ टीचिंग? तुमची शेवटची शिकवण आम्हाला पाहिजे जी आमच्या आयुष्यभर उपयोगी पडेल अशी!’ रोशींनी आपल्या शिष्यांकडे बघितलं, हसले, केकचा एक घास घेतला आणि म्हणाले, ‘हा केक फारच सुंदर! माय, माय, हाऊ डिलिशस्!’
पुढच्या क्षणी रोशींनी देह ठेवला.
एका क्षणी ‘हाऊ डिलिशस,’ आणि दुसर्या क्षणी पुढचा प्रवास!
प्रत्येक क्षण हा संपूर्ण कसा जगावा, हे ही गोष्ट शिकवून जाते. कधी-कधी आपल्याला शिकवणीतला सोपेपणा समजत नाही. सोपी गोष्ट आपण उगाचच अवघड करत जातो.
सान सा निम एकदा म्हणाले, ‘ द ग्रेट वे इज इन फ्रण्ट ऑफ युअर डोअर! तुमच्या दारासमोर महा-मार्ग उभा आहे!’
झेन मार्गामध्ये ‘ग्रेट वे’, ‘ग्रेट कम्पॅशन’ (करुणा)’ असे वाक्प्रचार आहेत, ‘ग्रेट’ म्हणजे फार मोठे असं नाही! ‘ग्रेट’ म्हणजे जेव्हा तुमचा ‘मी’पणा संपतो त्या पलीकडचे! तो महामार्ग सापडायला कुठे जायला नको. समोरचं दार उघडलं की, तो मार्ग दिसतो! हे ‘समोरचं दार’ म्हणजे कोणतं? ते दार म्हणजे आपला ‘मी’पणा! ते उघडणं म्हणजे आपला ‘मी’पणा सोडून देणं! मी सान सा निमला विचारलं, ‘पण माझ्या घरामध्ये दारंच नाहीयेत! सगळं मोकळंच! मग काय?’
ते हसून म्हणाले, ‘दॅट इज वंडरफूल! राहू दे तसंच!
(लेखक साधक आणि झेन अभ्यासक आहेत.)