हॉस्पिटलचे बिल कसे ठरते ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 09:15 AM2019-01-13T09:15:00+5:302019-01-13T09:15:07+5:30
समज-गैरसमज : हॉस्पिटलमध्ये एसीपासून गरम पाण्यापर्यंत आणि नर्सपासून स्वीपरपर्यंत सगळ्या सोयी अपटुडेट हव्या असतात. सगळ्या मशिनरी आणि तपासण्यांच्या सोयी एकत्र पाहिजे असतात आणि बिल मात्र कमी पाहिजे असते.
- डॉ सचिन लांडगे
समाजात एकच गोष्ट वेगवेगळ्या दर्जाची मिळत असते. पैसे देऊन आपल्याला जास्त दर्जाच्या सेवा घेता येतात. चहा पाच रुपयाला पण मिळतो आणि पाचशे रुपयाला पण मिळतो..! आपण आपल्या ‘शौक’नुसार आणि ‘खिशा’नुसार ठरवायचे की टपरीवरचा चहा प्यायचा की ‘ताज’मधला प्यायचा. जसं ‘ताज’ ला चहा पिऊन तुम्ही ओरड करू शकत नाहीत की आम्हाला लुटले म्हणून तसंच ब्रीच कँडी किंवा फोर्टीसमध्ये जाऊन तुम्ही ओरड करू शकत नाही की आम्हाला लुटले म्हणून.
सरकारी हॉस्पिटलमध्ये अगदी पाच रुपयांचा केसपेपर काढला की कसलेही ऑपरेशन होते. इतरही सेवाभावी संस्था आणि ट्रस्टची अनेक हॉस्पिटल अत्यल्प दरात उपचार देतात तिथेही आपण जाऊ शकतो. पण लोकांना हॉस्पिटलमध्ये एसीपासून गरम पाण्यापर्यंत आणि नर्सपासून स्वीपरपर्यंत सगळ्या सोयी अपटुडेट हव्या असतात. सगळ्या मशिनरी आणि तपासण्यांच्या सोयी एकत्र पाहिजे असतात आणि बिल मात्र कमी पाहिजे असते. ‘डॉक्टरांच्या अनुभवानुसार’ किंवा ‘उपलब्ध सोयीसुविधानुसार’ खाजगी हॉस्पिटलचे दरही कमी अधिक होत असतात. त्यात अमुक कोणी लुटतो किंवा कुणी समाजसेवा करतं अशातला भाग नसतो.
दहा बेडच्या हॉस्पिटलसाठी नियमाने अकरा सिस्टर लागतात. अकरा ऐवजी तीनच सिस्टर ठेवल्या, चार ऐवजी दोनच वॉर्डबॉय ठेवले, सगळ्या मशिन्स न घेता फक्त अति गरजेच्या मशिनरी घेतल्या आणि बाकीच्या सुविधा पण जेमतेमच ठेवल्या तर पेशंटचे बिल खूपच कमी ठेवता येतं. याचा अर्थ असा नसतो की जास्त बिलिंग असणारे बाकीचे हॉस्पिटल्स पेशंटला लुटतात. तिथं सुविधा आणि मशिनरी जास्त असतील म्हणून त्यांना तितक्या कमी पैशात उपचार किंवा आॅपरेशन करणे शक्य नसेल, हाच त्याचा अर्थ असतो.
तुमच्या पेशंटला लागो अथवा न लागो, कुठल्याही दुर्घटनेसाठीची जी बॅकअप सिस्टीम असते, ती तर रेडी ठेवावीच लागते ना! गर्भाशयाची पिशवी काढायच्या आॅपरेशनला सगळ्या सुविधा असलेल्या हॉस्पिटलला कमीतकमी वीस हजार लागत असतील समजा. पण अजिबात सोयी सुविधा उपलब्ध नसलेल्या एखाद्या हॉस्पिटलला तेच आॅपरेशन सात हजारात देखील परवडते..!
आता समाज असं म्हणतो की, तिथं तर सात हजारातच आॅपरेशन होतं, मग आमच्या इथले बाकीचे हॉस्पिटल्स किती लुटतात.!! दोन हॉस्पिटलमधील बिलिंगच्या या तफावतीसाठी खूप गोष्टी कारणीभूत असतात. त्याची कल्पना जनसामान्यांना येणं शक्य नाही. म्हणून, माझ्या स्वत:च्या आईचे ऑपरेशन असेल तर मी ऑपरेशन कोणते आहे, त्यासाठी किमान कितपत सुविधा लागतात आणि डॉक्टर कोण आहे यावर हॉस्पिटल ठरवेल.