डिप्रेशनला बाजूला सारून करा दिवाळी आनंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 06:07 AM2018-11-04T06:07:00+5:302018-11-04T06:07:00+5:30

आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग येतात, त्यावेळी आपण आनंदी, उत्साही राहणं आवश्यक असतं. मात्र प्रत्येकवेळी, प्रत्येकाला हे शक्य होईलच असे नाही. त्यासाठी काय कराल?

How to happy in festivals like Deewali? | डिप्रेशनला बाजूला सारून करा दिवाळी आनंदी!

डिप्रेशनला बाजूला सारून करा दिवाळी आनंदी!

Next
ठळक मुद्देसजगता ध्यानाने उदासीनता कमी होते, डिप्रेशन बरे होते. म्हणूनच दिवाळीच्या दिवसातही सजगतेचा अभ्यास चालू ठेवायला हवा.

डॉ. यश वेलणकर

दसरा-दिवाळीचा सण हा उत्साहाचा, आनंदाचा उत्सव असतो. रोषणाई, फराळ, खरेदीची धम्माल असते; पण काहीजणांना हे उत्सवी वातावरणदेखील आनंदी करू शकत नाही. मात्र त्यासाठी सजगतेने काही प्रयत्न करावे लागतात.
मानसिक स्वास्थ्याचा दुसरा निकष म्हणजे परिस्थितीतील ताणांना सामोरे जाताना स्वत:मध्ये योग्य ते बदल करून स्वत:ला सक्रिय आणि उत्साही ठेवणे. असे जर आपण सातत्याने केले तर आनंदी राहण्याची गुरुकिल्ली आपल्याला मिळू शकते.
औदासीन्य म्हणजे डिप्रेशन आणि चिंतारोगाचे विविध प्रकार यासारखा त्रास असेल तर हा निकष पाळला जात नाही. कधी उत्साह वाटणे आणि काहीवेळ निरुत्साह वाटणे हा आपल्या मनाचा स्वभावच आहे. तो आजार नाही. सर्वांनाच तसं होतं. पण असा मूड नसेल तरी आपण आपले रोजचे काम सहसा टाळत नाही. मूड नसण्याचा परिणाम जेव्हा आपल्या दैनंदिन कामांवर होऊ लागतो किंवा हा निरुत्साह सतत दोन वर्षांपेक्षा अधिक काळ टिकून राहातो त्यावेळी तो आजार आहे असे समजले जाते.
नैराश्य ही भावना आहे. ती मला, तुम्हाला, सर्वांनाच कधी ना कधी जाणवत असते. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही की आपण निराश होतो. ते स्वाभाविक आहे पण औदासीन्य या आजारात सतत टिकणारे किंवा अतितीव्र नैराश्य हे एक लक्षण असते. नैराश्याचे आजारात रूपांतर होते त्यावेळी त्याला क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे ज्याला उपचार आवश्यक आहेत असे औदासीन्य म्हटले जाते.
पण केवळ औषधांनी हा आजार पूर्णपणे बरा होत नाही, पुन:पुन्हा डोके वर काढतो. आधुनिक काळात युरोप आणि अमेरिकेत क्लिनिकल डिप्रेशन हा आजार वेगाने वाढत आहे. उत्तर अमेरिकेत या आजारामुळे अकार्यक्षम होणाऱ्यांची संख्या हृदयरोग आणि कर्करोग यांच्यापेक्षा अधिक आहे.
आपल्या देशात ही या आजाराचे प्रमाण खूप आहे, पण त्याचे निदानच होत नाही. व्यसनात अडकलेल्या अनेक माणसांना हा आजार असतो. या आजारावर उपचार म्हणून माइण्डफुलनेस थेरपी मानसोपचारतज्ज्ञांना एक आशेचा किरण वाटतो आहे.
सजगता ध्यान, डिप्रेशनचा पुनरूद्भव टाळण्यासाठी उपयोगी पडते, हे सिद्ध करणारे अनेक अभ्यास झाले आहेत. टीस्डेन आणि मा यांनी केलेल्या एका संशोधनानुसार औषधांना सजगता ध्यानाची जोड दिली, तर एक वर्षाच्या काळात डिप्रेशनचा पुनरूद्भव तीनपटीने कमी होतो.
२००८ मध्ये कुकेन यांनी ब्रिटनमध्ये एक अभ्यास केला. त्यांनी डिप्रेशनमधून बाहेर पडलेल्या रुग्णांचे दोन गट केले. हे रुग्ण अनेक वर्षे डिप्रेशनमध्ये होते, त्यांना पुन:पुन्हा हा त्रास होतो असा इतिहास होता. त्यातील एका गटाला डिप्रेशनवरची औषधे चालू ठेवली आणि दुसºया गटाला ध्यान उपचार सुरू केले आणि औषधांचा डोस कमी केला..
एक वर्षाच्या काळात केवळ औषधे घेणाऱ्या साठ टक्के रुग्णांना पुन्हा त्रास सुरू झाला; पण ध्यान करणाऱ्या फक्त तीस टक्के रुग्णांना हा त्रास पुन्हा झाला. म्हणजेच केवळ औषधे घेण्यापेक्षा त्याला ध्यानाची जोड दिली तर पुन्हा त्रास होण्याची शक्यता निम्म्याने कमी होते हे या अभ्यासाने सिद्ध झाले. याच संशोधनात ध्यान करणाºया ७५ टक्के रुग्णांची औषधे त्यांच्या डॉक्टरनी बंद केली आणि ५३ टक्के रुग्ण पूर्णपणे बरे झाले.
डिप्रेशनचा रुग्ण स्वत:ला अपयशी, कुचकामी, क्षुद्र समजत असतो, त्यामुळेच त्याला उदास वाटत असते. सजगता ध्यानामुळे ही प्रतिक्रि या करण्याची सवय बदलवली जाते. त्यामुळे तो स्वत:चा, स्वत:च्या आजाराचा स्वीकार करू लागतो. कोणतीही शारीरिक किंवा मानसिक वेदना मान्य केली, तिला विरोध कमी केला की तिच्यामुळे होणारे दु:ख कमी होते.
इतर प्राण्यांना वेदना होतात पण हा त्रास मलाच का होतो आहे, मीच कमनशिबी का वगैरे विचार त्यांच्या मनात येत नसावेत त्यामुळे त्या विचारांचे दु:ख त्यांना नसते. त्यामुळे अन्य प्राण्यांना कदाचित नैराश्य येत असेल, कंटाळा येत असेल; पण औदासीन्य हा आजार होत नसतो. इतर प्राणी त्यांचे खाद्य मिळवण्याचे प्रयत्न सोडून देऊन दुसºया भक्षाच्या मागे जातात. कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही म्हण ज्यामधून जन्माला आली असेल तसा प्रसंग येतो त्यावेळी त्यांना नैराश्य येत असते; पण ती घटना संपली की त्यांच्या मनात त्या विषयीचे विचार पुन:पुन्हा येत नाहीत. कारण त्यांचा मेंदू तेवढा विकसित नाही. त्यामुळे त्या अपयशाचे त्यांना दु:ख होत नाही. माणूस मात्र त्याच्या विचारांनी हे दु:ख वाढवून घेतो.
सजगता ध्यानाने परिस्थितीचा स्वीकार करण्याची क्षमता वाढली की उदासीनता कमी
होते, डिप्रेशन बरे होते. म्हणूनच दिवाळीच्या दिवसातही सजगतेचा अभ्यास चालू ठेवायला हवा.

कसे राहाल उत्साही, आनंदी?
१- सजगता ध्यान आपल्याला क्षणस्थ होण्याची सवय लावते. औदासीन्य आजारात भूतकाळ आणि भविष्य यांचेच विचार सतत येत असतात. ती सवय ध्यानाच्या नियमित अभ्यासाने कमी होते.
२- आपण श्वासावर किंवा संवेदनांवर लक्ष पुन:पुन्हा केंद्रित करतो त्यावेळी मनात तेच तेच येणारे विचार कमी होतात. डिप्रेशनमध्ये तेच तेच निराशाजनक विचार पुन:पुन्हा येत असतात.
३- सजगता ध्यानाच्या अभ्यासाने कोठे
लक्ष केंद्रित करायचे ती नियंत्रण क्षमता (सिलेक्टिव्ह अटेन्शन) वाढते. परिस्थितीचा आणि स्वत:चा स्वीकार करण्याची
प्रवृत्ती वाढते.

क्लिनिकल डिप्रेशनचे प्रकार
१- मेजर डिप्रेशन : यामध्ये माणसाची दैनंदिनीच बिघडते. सर्व व्यवहार बिघडतात. तो कामावर जात नाही, अभ्यास करू शकत नाही, झोपून राहतो पण झोप लागत नाही, नीट जेवत नाही, त्याला पूर्वी आवडत असणाºया गोष्टी, कृती आवडेनाशा होतात, त्याचे कशातच मन रमत नाही, सतत रडत किंवा चिडत राहतो, सतत दारू पिऊ लागतो. कुणाशी बोलत नाही, हसत खेळत नाही, एकटाच बसून किंवा झोपून राहातो. आत्महत्येचे प्रयत्न करतो.
२- पर्सिस्टंट डिप्रेशन : यामध्ये इतकी तीव्र लक्षणे नसतात पण नैराश्य सतत दोन वर्षे टिकून राहाते. या दोन वर्षांत मधे काहीकाळ मेजर डिप्रेशनचा असतो. इतर वेळी नैराश्याची सौम्य लक्षणे असतात.
३- बायपोलर डिसआॅर्डर : सर्वसामान्य सर्वच माणसात उत्साह आणि निरुत्साह आलटून पालटून येत असतो. पण या रुग्णांत उत्साह आणि निरुत्साह यांच्या लाटा खूपच उंच आणि खोल येतात. त्याचा दैनंदिन कामांवर परिणाम दिसतो त्यावेळी त्यावर उपचार आवश्यक असतात. उपचार करून घेतल्याने हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो.

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)
manthan@lokmat.com

Web Title: How to happy in festivals like Deewali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.