Food: आपण रोज किती कांदे, बटाटे खातो? समोर आली डोळे विस्फारणारी आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 11:30 AM2022-04-10T11:30:27+5:302022-04-10T11:31:19+5:30
Onions and Potatoes: स्वयंपाकघरात कांदे आणि बटाटे नसतील, असं साधारणपणे एकही घर आपल्याकडे शोधून सापडणार नाही. आपल्याकडे जवळपास प्रत्येक भाजीत कांदा वापरला जातो आणि बटाट्यापासून बनविलेले पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण खातात. पण कांदे आणि बटाटे आपण नेमके खातो तरी किती? याचा आपण कधी विचार केला आहे का?
- योगेश बिडवई
स्वयंपाकघरात कांदे आणि बटाटे नसतील, असं साधारणपणे एकही घर आपल्याकडे शोधून सापडणार नाही. आपल्याकडे जवळपास प्रत्येक भाजीत कांदा वापरला जातो आणि बटाट्यापासून बनविलेले पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच जण खातात. कांदे आणि बटाटे आता जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नसले तरी त्यांचं गरिबांपासून श्रीमंतांपर्यंतच्या खाद्य संस्कृतीमधील महत्त्व जरासं कमी झालेलं नाही. त्यामुळे साहजिकच या वस्तूंचे भाव वाढले की महागाईबरोबरच तो राजकीय मुद्दा बनतो. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणारे कांदे आणि बटाटे आपण नेमके खातो तरी किती? याचा आपण कधी विचार केला आहे का?
महाराष्ट्रात महिन्याला थोडेथोडके नव्हे तर एक लाख टन कांदे खाल्ले जातात, तर साधारणपणे ६० हजार टन बटाटे खाल्ले जातात. कांदा, बटाट्याचे पुराण येथेच थांबत नाही, हॉटेल व्यवसायात तर त्यांचे सर्वाधिक महत्त्व आहे.
महाराष्ट्रात मुंबई महानगर विभागात (एमएमआर) रोज प्रत्येकी एक हजार टन कांदे आणि बटाटे खाल्ले जातात. त्यानंतर पुणे आणि इतर महानगरांचा क्रमांक लागतो.
५००० वर्षांपासून कांदा शेती
पृथ्वीवर ५ हजार वर्षांपासून कांदा शेती होते. उत्तर पश्चिम भारत, अफगाणिस्तान, तुर्कस्तान, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या डोंगराळ भागात कांद्याच्या उत्पादनास सर्वात आधी सुरुवात झाली. मध्य आशियातील डोंगराळ भाग हे कांद्याचे उत्पत्ती स्थान मानले जाते.
केवळ ५ टक्के बटाट्याचे उत्पादन
महाराष्ट्रात आपण वापर करतो त्याच्या केवळ ५ टक्के बटाटा उत्पादित होतो.
गुजरात आणि मध्य प्रदेशातून आपण ९५ टक्के बटाट्याची गरज पूर्ण करतो. बटाटे केवळ रब्बी हंगामात घेतले जातात.
औषधी गुणधर्म
कांदा हा वात, पित्त आणि कफ या तीनही दोषांच्या विकारांवर गुणकारी आहे. हदयरोग, अतिरक्तदाब तसेच हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्यांनी नियमितपणे कच्चा कांदा खावा.
उकडलेल्या बटाट्याची साल भारतीय उपचार पद्धतीत भाजलेली जखम बरी करण्यासाठी लावतात. भाजलेला बटाटा खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होते.
भारतात कांदा वापर
विभाग महिना (व्यक्ती/किलो)
ग्रामीण ०.८४२
शहरी ०.९५१
नाशिकची दादागिरी
भारतात वर्षभरात दोन ते तीन वेळा कांदा उत्पादन घेतले जाते.
कांदा उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
देशातील १७% उत्पादन नाशिक विभागात आणि १०% उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते.
महाराष्ट्रात देशातील कांदा उत्पादन होते. सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा आदी
जिल्हे कांद्याच्या उत्पादनात आघाडीवर आहेत.
विदर्भ व मराठवाड्यात कांदा उत्पादनात वाढ होत आहे.
महाराष्ट्रात महिन्याला एक लाख टन कांदे आणि साधारणपणे
६०,००० टन बटाट्यांची मागणी
आपल्या शहरात दररोज किती कांदे, बटाटे खातात?
शहर कांदे (टन) बटाटे (टन)
मुंबई एमएमआर १,००० १,०००
पुणे ५०० ४००
कोल्हापूर १२० ४०
नागपूर ३५० ४००
औरंगाबाद १०० ८०
नाशिक २०० ६०
जळगाव १५० २५
सोलापूर १०५ १०
अकोला ६० १०
अहमदनगर ५० १०
महिन्याला एक व्यक्ती साधारण दीड किलो कांदा आणि ८०० ते ९०० ग्रॅम
बटाटे खाते. खाद्यसंस्कृती आणि सामाजिक- आर्थिक स्थितीनुसार यात तफावत आहे.