..किती हा दुष्ट तर्क
By admin | Published: June 6, 2015 03:06 PM2015-06-06T15:06:16+5:302015-06-06T15:06:16+5:30
शिवशाहीतील मावळे बैल जुंपून नांगरणी करताना उगाचच घाम गाळीत बसत असत, त्याऐवजी त्यांनी सरळ जिल्हा बँकेच्या बारामती शाखेतून ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले असते, तर किती सोयीचे झाले असते, असे विधान समजा कुणी केले तर ते काळाचा विचार करता, कितपत तर्कसंगत ठरू शकेल? - आव्हाडांनी इकडे अंमळ जरा लक्ष द्यावे!
Next
- हेमंत कुलकर्णी
'महाराज’ आणि ‘महाराष्ट्र भूषण’ यावरून आमदार जितेन्द्र आव्हाड आणि अविनाश धर्माधिकारी या विद्वतजनांमध्ये जी चर्चा सुरू आहे, तिच्यात सहभागी होण्याची माझी योग्यता नाही. अकारण लहान तोंडी मोठा घास घेण्याचेही मला कारण नाही. मी एक साधा खर्डेघाशी करीत राहणारा पत्रकार म्हणजे खर्डेनवीस. अत्यंत सामान्य जीव. स्वाभाविकच या विद्वानांची चर्चा आणि विशेषेकरून श्री. आव्हाड यांनी शिवशाहीर (इतिहास संशोधक नव्हे!) ब. मो. पुरंदरे व अविनाश धर्माधिकारी यांची जी चिरफाड केली आहे, ती वाचल्यानंतर माङया मनात माङयासारख्याच काही अतिसामान्य शंका निर्माण झाल्या आहेत.
श्री. आव्हाड यांचा मूळ लेख आणि नंतर त्यांनी धर्माधिकारी यांना दिलेले उत्तर वाचल्यानंतर जाणवते, ते असे की, आव्हाडांच्या मनात महाभारतातील कुंतीविषयी अंमळ अधिकच राग, त्वेष, तिरस्कार आणि घृणा असावी.
‘कुंतीच्या पंक्तीला आपण आईसाहेबांना बसवू पाहता’, ‘आपल्या नोंदीवरून असे वाटते की कुंतीला पाच वेगवेगळ्या पुरुषांकडून झालेले पुत्र हे राजमान्यतेच्या आड आले नाहीत, असे विचार जिजाऊंच्या मनात होते’, ‘कुंतीला पाच मुले कशी झाली हे समजावून सांगा’ यासारखी आव्हाडांची विधाने माङया मनातील समज अथवा गैरसमजाला पुष्टी देणारी आहेत, असे मला वाटते. त्यातूनच जन्मलेल्या या काही शंका.
लहानग्या शिवबाला, जिजाऊ आईसाहेबांनी रामायण आणि महाभारतातील कथा सांगितल्या व त्यांच्यावर चांगले संस्कार केले, हे मीही शाळकरी वयात आणि क्रमिक पुस्तकांमधून वाचल्याचे आठवते. आव्हाड म्हणतात किंवा सुचवितात त्याप्रमाणो ते सारे ‘भटी’ कारस्थान असावे असे मलाही वाटते. कारण इतिहास लिहिणारे तेच, त्यातील वेचे निवडणारे तेच, त्यांना क्रमिक पुस्तकांमध्ये ढकलणारे तेच, त्यांना मान्यता देणारे तेच आणि छापणारेही तेच.
मूळ मुद्दा असा की, मुळात रामायण असो की महाभारत. ही दोन्ही महाकाव्ये आहेत, पौराणिक ग्रंथ आहेत, धार्मिक ग्रंथ आहेत, इतिहास आहे की केवळ भाकडकथांचा पद्यात्मक संग्रह आहे, याबाबत एकवाक्यता आढळून येत नाही. येथे कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ईश्वरी संकल्पनेविषयी काढलेल्या उद्गारांची आठवण होते. ‘मानणा:यांसाठी ईश्वर आहे, आणि न मानणा:यांसाठी तो नाही’! हाच न्याय रामायण आणि महाभारत यांनाही लागू असावा, असे माङया अल्पमतीला वाटते. याचाच दुसरा अर्थ, एक तर ते जसेच्या तसे स्वीकारा अथवा मुळासकट नाकारा. सोयीचे स्वीकारा आणि गैरसोयीचे नाकारा, असे होऊ शकत नाही.
आव्हाडांना कोणत्याही कारणाने का होईना कुंती हे पात्र मान्य आहे असे स्पष्टपणो जाणवते. अन्यथा आऊसाहेब आणि कुंती यांच्यातील तुलना त्यांना खटकलीच नसती. मग जर कुंती मान्य असेल तर ती विवाहपूर्व आपल्या पित्याच्या म्हणजे कुंतीभोज राजाच्या घरी असताना (हा पितादेखील तिचा जन्मदाता नव्हेच, जन्मदाता शूरसेन, त्याच्याकडून ती दत्तक गेलेली) तिने दुर्वास ऋषीची मनोभावे सेवा केली आणि त्यांनी प्रसन्न होऊन तिला पुत्रप्राप्तीसाठी सहा वर दिले होते, हेही आव्हाडांना मान्य व्हावे. पण ते त्यांना मान्य नाही. म्हणजे कुमारीमाता होण्यापूर्वीच्या कुंतीला त्या काळातील परिमाण आणि ती माता झाल्याची चर्चा करताना मात्र आजचे परिमाण.
कुंतीला पुत्रप्राप्तीसाठी वर बीर काही मिळाला नव्हता, तर तिने परपुरुषांशी समागम करून आपल्या पोटी पोरे पैदा केली, याचा अर्थ कुंती अकुलीन, कुलटा, स्वैराचारी आणि दुराचारी होती, असे आव्हाडांना वाटते. तसे त्यांनी चक्क सुचविले आहे. आता हे परपुरुष कोण होते, तितके शोधून काढले की सारा उलगडा होऊन जाईल. हरकत नाही. जोवर लोकाना कुंतीच्या जातीचा शोध लागत नाही, तोवर कुणी काही बोलणार नाही. पण तो शोध कधी लागणारच नाही, असेही नाही. कारण अलीकडेच काहींनी सम्राट अशोकाच्या जातीचा
शोध लावला असून त्या जातीच्या म्हणजेच
कुशवाह समाजाच्या भोवती भाजपाने तिच्या
सवय आणि आवडीप्रमाणो गोंडा घोळायला सुरुवातही केली आहे.
कुंतीला पाच पुत्र कसे झाले, व या पुत्रंच्या जन्माचे रहस्य काय, हेही आव्हाडांनी पुरंद:यांनाच विचारले आहे. मुळात महाभारतातील महायुद्धापयर्ंत कुंतीला तीनच मुलगे असल्याचे सारे जग (कुंतीसकट काहींचा अपवाद वगळता) समजत होते. कर्णाच्या जन्माचे रहस्योद्घाटन झाल्यावर तिच्या नावावर चार मुलगे जमा झाले. मग पाचांचा आकडा कुठून आला? तर कुंतीला दुर्वासानी दिलेला मंत्र तिने आपली सवत माद्री हिला दिला व तिच्या पोटी नकुल आणि सहदेव जन्माला आले. याचा अर्थ आव्हाडांची मांडणी जमेस धरायची तर केवळ कुंतीच नव्हे, तर माद्रीदेखील कुलटाच होती!
आता येथे आणखी एक शंका माङया मनात जन्म घेते. विवाहापूर्वीच कुंतीला एक पुत्र झाला होता म्हणजे ती कुमारीमाता बनली होती. या पुत्रचा म्हणजे कर्णाचा तिने त्याग केला. आपले पाप लपविण्यासाठी, असे म्हणू या. पण त्यानंतर तिचा कुरु वंशातील पंडूशी रीतसर विवाह झाला. मग या पंडूपासूनच तिला युधिष्ठीर, भीम आणि अजरुन (आव्हाडांचे गणित जमेस धरता नकुल व सहदेवही) हे पुत्र झाले असे म्हणून आव्हाड तिला संशयाचा फायदा देऊ इच्छित नाहीत. ते सरळसरळ तिला चारित्र्यशून्य म्हणून मोकळे होतात. ते का?
महाभारतातील एका कथेनुसार, पंडू राजा एकदा शिकारीला गेला असता, त्याला एका झुडपाआड हरणाची जोडी दिसली व त्याने त्या जोडीचा वेध घेतला. प्रत्यक्षात ती हरणाची जोडी नव्हती. तर किंदम नावाचे ऋषी त्यांच्या पत्नीसमवेत समागम करीत होते. पंडूच्या ते लक्षात येऊनही त्याने पश्चात्ताप व्यक्त केला नाही, तेव्हा किंदम ऋषींनी त्याला असा शाप दिला की, ज्या क्षणी तू एखाद्या स्त्रीशी समागमाचा प्रयत्न करशील, त्याक्षणी तू मृत्यूला जवळ करशील. झालेदेखील तसेच. वानप्रस्थाश्रमात असताना, सचैल स्नान केलेल्या माद्रीला बघून पंडूच्या भावना चाळवल्या गेल्या व त्याने माद्रीचा विरोध (तिला शाप ज्ञात होता) न जुमानता आपली वासना शमविण्याचा प्रयत्न केला व तिथेच तो मरण पावला. त्यामुळे दिसते ते असे की, आव्हाड किंदम ऋषीच्या शापाची कथा स्वीकारतात आणि कुंतीचे तिच्या पतीशी लैंगिक संबंध येऊच शकत नाहीत, ही कथा (भाकड?) स्वीकारून कुंतीवर परपुरुषांशी शरीरसंबंध प्रस्थापित करण्याचे लांच्छन लावतात.
पण केवळ कुंती आणि माद्री यांनाच कशाला घेऊन बसायचे? कुंतीचा पती पंडू, दीर धृतराष्ट्र आणि दुसरा दीर विदुर यांच्या जन्माच्या कथा तरी काय आहेत? धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिच्या शंभर पुत्रंची कथा तरी कोणती आजच्या भाषेतील सोवळी आहे? कौरव-पांडवांचा गुरू द्रोणाचार्य (तोच तो ज्याने एकलव्याचा अंगठा कापून घेतला) याच्या जन्माचे तरी काय? असा द्रोणात वगैरे कोणाचा जन्म होत असतो काय?
जे महाभारताचे, तेच रामायणाचेही. म्हणो भूमिकन्या सीता! असे जमिनीतून मूल जन्माला यायला ते काय शेवग्याच्या शेंगांचे झाड? तरीही सीता पंचकन्यांमधील एक! तिचा कालांतराने झालेला सासरा दशरथ. त्याला म्हणो संतानप्राप्ती होत नव्हती. म्हणून म्हणो त्याने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. पुत्रीकामेष्टी नव्हे! (म्हणजे जेंडर बायसची परंपरा किती प्राचीन याचा हा दाखला. पण तो पुढे महाभारतातही सुरू राहिला. द्रोणाचार्याचा प्रतिशोध घेण्यासाठी द्रुपद राजाने तसाच यज्ञ केला. यज्ञातून एका मुलाचा जन्म झाला. राजाने तत्काळ यज्ञकुंड शांत करण्याचा आदेश दिला. पण त्यातून आणखी एक जीव बाहेर येत होता. ती कन्या होती. द्रुपदाला ती तेव्हा आणि नंतरही नकोशी होती. याच कन्येपायी महाभारत घडले. तिचे नाव द्रोपदी आणि मुलगा बनून जन्मलेला व आजच्या भाषेत ट्रान्सजेन्डर निघालेला तो किंवा ती म्हणजे शिखंडी) तर राजा दशरथाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञाच्या ज्वाळातून तेजस्वी अग्निदेव प्रगटला. त्याने राजाला पायस म्हणजे खीर दिली व ती राण्यांना दे सांगितले. राजाने ती कौसल्येपाशी दिली. कौसल्येने आपमतलबीपणा न दाखविता आपल्या दोन्ही सवतींना दिली आणि मग कौसल्येचा राम, सुमित्रेचे लक्ष्मण व शत्रुघ्न हे जुळे आणि कैकयीचा भरत यांनी जन्म घेतला. असे खीर खाऊन पोरं जन्माला येतात? दैवी वराने मुलगे जन्माला येत नाहीत. त्यासाठी संबंधित स्त्रीने परपुरुषाशी (त्यांचे स्वत:चे पुरुष नपुंसक आहेत, हे येथे गृहीत) समागमच केलेला असतो, हा आव्हाडांचा तर्क स्वीकारल्यानंतर मग रामायण आणि महाभारत यातील एकही स्त्री कुलीन ठरत नाही आणि एकही संतान औरस ठरत नाही. अर्थात त्यांना तसे ठरविण्याला माझा काय, पण कोणाचाच आक्षेप असण्याचे काही कारण नाही.
माङया मनाला स्पशरून गेलेली शंका इतकीच की, जो काही विचार असेल तो तर्कशुद्ध आणि व्यक्तिगत सोयी गैरसोयीचा नसावा. ज्या काळाचा आपण विचार करतो, त्या काळाला, त्याच काळातील परिमाणो लावून विचार करावा.
उद्या जर कुणी, शिवशाहीतील मावळे उगाचच बैल जुंपून नांगरणी करताना घाम गाळीत बसत असत. त्याऐवजी त्यांनी सरळ जिल्हा बँकेच्या बारामती शाखेतून ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले असते, तर किती सोयीचे झाले असते, असे विधान केले तर ते काळाचा विचार करता, कितपत तर्कसंगत ठरू शकेल?
(लेखक ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीचे
संपादक आहेत)