स्वभावातल्या दोषांना मुरड कशी घालायची? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2021 06:01 AM2021-11-21T06:01:00+5:302021-11-21T06:05:01+5:30

आपल्यावर झालेले संस्कार आणि सभोवतालचं वातावरण यामुळे स्वभावाला वळण मिळतं; पण, मनावर पडलेले हे छाप आणि संस्कार बदलता येतात. स्वभावातले दोष दूर करता येतात आणि गुणांचा परिपोष करता येतो.

How to reduce the flaws in human nature? | स्वभावातल्या दोषांना मुरड कशी घालायची? 

स्वभावातल्या दोषांना मुरड कशी घालायची? 

Next
ठळक मुद्देसंवादातून वादावादी होण्यापेक्षा मनाला जुळवणारी संभाषणं जोपासायला हवीत आणि अशा संवादासाठी, एकमेकांशी भावनिक जवळीक हवी.

- डॉ. राजेंद्र बर्वे

आता मला याचा कंटाळा आलाय. कोविडच्या साथीमुळे आम्हा सर्वांचं कंबरडं मोडलं, म्हणा ना! आता ताठ उभं राहायचं असलं तरी कमरेला बाक आल्यासारखं वाटतंय. मला अनेकदा पु. ल. देशपांडे यांच्या चौकोनी कुटुंबाची आठवण येते. किती गोड आणि मनमिळाऊ कुटुंब होतं ना. आमच्या चौघांच्या चार तऱ्हा.

आमचं एकमेकांवर प्रेम नाही, असं अजिबात नाही, पण सलोखा नाही. प्रत्येक जण आपापल्या कोनात फिट्ट बसलेला. सलोखा वाढण्यासाठी आणि जपण्यासाठी एखादं केंद्र लागतं. वर्तुळाला कसं केंद्र असतं, त्याभोवती सर्व फिरत असतं. केंद्रापासून परिघापर्यंतच्या त्रिज्या समान. आमच्याकडे तसलं काही नाही!

- तुम्ही भूमिती शिकवता का? मी विचारलं.

तुम्हाला कसं कळलं, असे भाव मालतीबाईंच्या चेहऱ्यावर आले.

- ‘तुम्ही अचूकपणे आपल्या कुटुंबाच्या आकाराची आकृती काढली.’

मालतीबाई थोड्या खुशीत आल्या. त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमधील महत्त्वाच्या गुणांकडे मी निर्देश केला होता.

त्या क्षणभर गप्प बसून म्हणाल्या, ‘तुमच्या एका साध्याशा वाक्यानं मला किती रिलॅक्स वाटलं! मला कुठेतरी दिलासा मिळाला.’

- ‘कुठेतरी नाही, तुमच्या मनातल्या भावना ओळखून, त्यातल्या होकारात्मकतेची मी दखल घेतली. त्यामुळे तुम्हाला आपोआप हलकं वाटलं. कारण तुमच्या मनाला समजून घेण्याचा यशस्वी प्रयत्न केला.’

‘याच गोष्टींपासून मी वंचित आहे. केवळ माझ्या कुटुंबीयांनी याची दखल घेतलेली नाही, असं नाही. मीही आत्मवंचना करते. स्वत:वर दोष ओढवून घेण्याची माझी सवय माझ्या आईकडून वारसा हक्कानं मिळाली असावी.’ - त्यांच्या चेहऱ्यावर खिन्न हसू आलं.

- ‘आधी ती खिन्नता पुसून टाकू. आपला स्वभाव वारसा हक्काने निर्माण होतो, असं नाही. आपल्यावर झालेले संस्कार आणि सभोवतालचं वातावरण या घटकांमुळेही स्वभावाला वळण मिळतं.’ पण, मनावर पडलेले हे छाप आणि संस्कार बदलता येतात. स्वभावातल्या दोषांना मुरड घालता येते आणि गुणांचा परिपोष करता येतो.’

‘तुमचं मराठी खूप छान आणि सोपं, अगदी सहज वाटतं,’ मालतीबाई खिन्नता पुसून म्हणाल्या.

- ‘व्वा, तुम्ही पटकन शिकलात! मला वाटतं, तुमच्या मूळ स्वभावाला उजाळा मिळाला.’ - मी हसत म्हटलं.

क्षणकाळात वातावरण निवळलं.

‘माझा स्वभाव काटेकोर आणि व्यवस्थित, तर माधवरावांचा स्वभाव तापट. माझा मुलगा मिलिंद तसा अबोल. फारसं न बोलणारा, पण मनातल्या मनात नाराज असावा. मंजिरी आताच १७-१८ वर्षांची, तीही तापट आणि हळवी. मिलिंद इंजिनीअर आणि घरून काम करण्यात वाकबगार. आता ऑफिसात जायची परवानगी मिळाली तरी घरूनच काम करतो. विचारलं तर म्हणतो, ‘मला लोकांशी बोलता येत नाही आणि आवडतही नाही. कोविडच्या काळात माधवरावांचा संताप कमी झाला खरा, पण आता पुन्हा चिडचिड सुरू. काही मनासारखं होत नाही, हे त्यांचं टुमकं. मंजिरी बोलघेवडी. खूप मैत्रिणी, पण कोणी काही बोललं तर लगेच दु:खी होते, रडते, उदास होते. तिला आवर घालता येत नाही.’ मी काटेकोर म्हणजे सगळं व्यवस्थित व्हायला पाहिजे म्हणून धडपडते. त्यासाठी सतत काम करते, पण त्यामुळे दमतेदेखील. बरे, माझ्या व्यवस्थितपणाचं कुणाला कौतुक म्हणाल, तर शून्य. उलट त्याबद्दल कटकट केली जाते. तेही तसं बरोबरच आहे म्हणा, कारण मी ‘हे इथे का?’ ते तिथे का ठेवलं?.. या प्रश्नांना सगळे कंटाळतात.’

- ‘मालतीबाई, घरोघरी मातीच्या चुली. पु. ल. देशपांडे यांनी चौकोनी कुटुंबाचं मजेशीर वर्णन केलंय, पण प्रत्यक्ष कुटुंबात भावनिक असंतुलन आणि धुसफुस, काही प्रमाणात भावनिक ताणतणाव असणार, पण, चौघांची तोंडं चार दिशांना असंही असायला नको!

‘मग काय असायला हवं?’ मालतीबाई उत्सुकतेनं म्हणाल्या.

- ‘सुसंवाद असायला हवा. संवादातून वादावादी होण्यापेक्षा मनाला जुळवणारी संभाषणं जोपासायला हवीत आणि अशा संवादासाठी, एकमेकांशी भावनिक जवळीक हवी. भावना समजून घ्यायला हव्यात. भावनांचे ‘चूक की बरोबर?’ अशा पकारे वर्गीकरण चुकीचं ठरतं. फक्त कोणकोणत्या भावना मनाला आनंददायी किंवा त्रासिक नाहीत ना, याचा लेखाजोखा करायला हवा.

- म्हणजे? मालतीबाई.

- यालाच इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावना ओळखणे, समजणे आणि त्यांचं संवादामार्फत व्यवस्थापन करणे, हे काही कृत्रिम नाही. उलट ते कुटुंबात जवळीक आणि स्नेह निर्माण करतं.

इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय?

१) स्वत:च्या भावना ओळखणे, त्यांचा पोत, त्यांची तीव्रता जाणणे. भावनांचे नामाधिरण करणे. भावना स्वीकारणे.

२) स्वत:च्या भावनांची तीव्रता, कमी-जास्त करता येणे, त्यांचं व्यवस्थापन करून त्याच्या अभिव्यक्तीचं कौशल्य कमावणे.

३) स्वत:बरोबर इतरांच्या भावना, त्यांचे हावभाव, देहबोली, वावर आणि सवयी यांच्याकडे टीकात्मक वृत्तीने न बघता समजून घेण्याचा प्रयत्न करणे.

४) इतरांच्या भावना स्वीकारून, त्यांच्यामधला बोचरेपणा टाळून अधिक सामाजिक कौशल्य जोपासणे.

(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)

drrajendrabarve@gmail.com

Web Title: How to reduce the flaws in human nature?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.