क्वॉरण्टाइन सेंटर्समध्ये महिला किती सुरक्षित?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 06:04 AM2020-08-02T06:04:00+5:302020-08-02T06:05:13+5:30

पनवेलमध्ये क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये  महिलेवर बलात्कार झाला, पुण्यात विनयभंगाचा प्रय} झाला,  इतर शहरातही कमी-अधिक प्रमाणात  असे अनुभव महिलांना येत आहेत. क्वॉरण्टाइन सेंटर ही स्थानिक यंत्रणेची  जबाबदारी आहे, की गृहखात्याची,  की वैद्यकीय विभागाची यावरही अजून एकमत नाही.  ज्या विश्वासानं महिला या ठिकाणी येतात, त्या विश्वासालाच तडा जात असेल तर यंत्रणेचा नव्यानं विचार करण्याची गरज आहे. 

How safe are women in quarantine centers? | क्वॉरण्टाइन सेंटर्समध्ये महिला किती सुरक्षित?

क्वॉरण्टाइन सेंटर्समध्ये महिला किती सुरक्षित?

Next
ठळक मुद्देदुर्दैवाने क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये काही गैरप्रकार घडला तर जबाबदारी कोणाची हा खरा प्रश्न आहे. 

- नेहा सराफ 

शहर : पुणे.
स्थळ : सिंहगड कॉलेजचे होस्टेल.
वेळ : रात्री साडेबारा.
प्रसंग एक :  एका 29 वर्षांच्या महिलेच्या दारावर वॉचमन थापा देतोय. 
प्रसंग दोन : जागेच्या  अभावी एक अनोळखी माणसाची एका कुटुंबाच्या रूममध्ये सोय  केली जाते. ती व्यक्ती या महिलेकडे काही तास बघत बसते.
प्रसंग तीन : महिलेला गरम पाणी आणायला तळ मजल्याहून चौथ्या मजल्यापर्यंत जावं लागतं. तिच्या हातात भरलेली बादली बघून त्या स्थितीत एक तरुण जाणूनबुजून स्पर्श करून ये-जा करतो.
हे सगळे अनुभव वेगवेगळ्या क्वॉरण्टाइन सेंटरवर महिलांना आलेत. बाहेर तर महिलांची छेडछाड, स्पर्श करण्याचा प्रय}, नजरेतून इशारे, ती समोर असताना मुद्दाम ईल शिव्या देणं सुरू असतंच; पण आता कोरोनाबाधित व्यक्तींसाठी उभारलेली क्वॉरण्टाइन सेंटर्सही याला अपवाद राहिलेली नाहीत.
पनवेलमध्ये क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार झाला, पुण्यात विनयभंगाचा प्रय} झाला, इतर शहरातही कमी-अधिक प्रमाणात असेच अनुभव महिलांना येत आहेत. त्यामुळे शेकड्यांच्या आणि हजारांच्या संख्येत आम्ही कसे बेड उभारले, यंत्रणा कशी चोख चालवली जाते, असे गर्वाने सांगणार्‍या प्रशासनाने महिलांच्या या जुन्या; पण अजूनही न सुटलेल्या प्रश्नाकडे एकप्रकारे दुर्लक्ष केलं आहे.
पुण्यात वॉचमन त्रास द्यायला लागल्यावर ती महिला दार बंद असतानाही रात्रभर भीतीने बेडखाली लपत होती. नवरा हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याने आलेला ताण आणि  अचानक समोर ठाकलेला हा प्रसंग. तिने घाबरून घरी फोन केला. नशिबाने त्यांनीही तिच्यावर भरवसा ठेवला; पण क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये मध्यरात्री त्यांनाही येणं शक्य नव्हतं. पोलिसांना फोन केला तर त्यांनी पीपीई किट नाही म्हणत येण्यास नकार दिला. इतकं होऊनही दुसर्‍या दिवशी तिला ना खोली बदलून मिळाली, ना तक्रार कोणी ऐकून घेतली. 
पुढच्या रात्री ‘मला तुमच्या खोलीत राहायला मिळेल का’ म्हणून ती अनेकांना विनंती करत होती. अखेर दया येऊन बाथरूमबाहेर तिला झोपू दिलं. पाच दिवसांनी घटना उघडकीस आली. आरोपीला अटकही झाली आणि महिलेला दुसरीकडे हलवण्यात आलं. 


आता प्रश्न हा आहे की, ‘उद्या आरोपीने बळजबरीने दार उघडलं असतं तर? ती महिला तर म्हणते, उद्या त्याने काही केलं असतं तर कशावरून माझा मृत्यू कोरोनाने झाला असं दाखवलं नसतं? एक तर मी पॉझिटिव्ह होते आणि अशावेळी पोस्टमार्टेम होत नाही. सांगायचा मुद्दा हा की, ‘क्वॉरण्टाइन सेंटरच्या आतील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी घेण्यास कोणीही तयार नाही. महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी जेवण, नास्ता, इतर सुविधा यात दमून जातात. वैद्यकीय यंत्रणा उपचारात व्यस्त असते. पोलीस आतच येत नाहीत. अक्षरश: ‘रान मोकळं’ या वाक्प्रचाराचा प्रत्यय यावा, अशी स्थिती काही ठिकाणी दिसते. 
आपल्याकडे विशेषत: मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे अशा शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. साहजिक यंत्रणेवर ताण आहे. अशावेळी चार व्यक्ती मावतील अशी खोली दोन व्यक्तींना देणे योग्य नाही हे मान्य आहेच; पण अनेक ठिकाणी नव्या व्यक्तीची सोय करताना पुरुषाला जागा दिली जाते. मात्र त्या खोलीत आधी राहणार्‍या महिलांना त्यामुळे नकळत अवघडलेपणा येतो. कोरोनामुळे अनेकींना थकवाही आलेला असतो. अनोळखी पुरुषासमोर झोपणे नको वाटते. परिणामी त्या दिवसभर अटेन्शन मोडमध्ये असतात. झोपतानाही अगदी सावध झोपतात. ज्यासाठी त्या क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये येतात, तो उद्देशच सफल होत नाही. त्यातच नव्याने आलेल्या पुरुषाच्या सवयी, नजरेतली सूचकता नको वाटते. घरच्यांना सांगता येत नाही आणि सहनही होत नाही.
अजून एक अनुभव म्हणजे अनेक सेंटरमध्ये खालून गरम पाणी, चहा, जेवण रांगा लावून न्यावं लागतं. महिला रांगेत उभ्या असल्या की शिव्या देत एकमेकांना हाका मारायच्या, स्पर्श होईल असं जिन्यातून जायचं. अनेक सेंटरवर महिलांसाठी मजला राखीव नाही. महिलांसाठीचा हॉल भरल्यावर जागा मिळेल तिथे कोंबले जाते. शाळा, होस्टेल, मंगल कार्यालये असतील तर किमान प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे असतात; पण आतमध्ये ते असतीलच याची खात्री नाही. बहुतांश ठिकाणी संबंधित यंत्रणांनी ते बंद करून ठेवलेत. प्रशासनालाही त्याचे काही वाटत नाही.
अनेक सेंटरवर सुरक्षारक्षकांच्या नावानेही ओरड आहे. काही क्वचित ठिकाणी महिला सुरक्षारक्षक किंवा मदतनीस आहेत. बहुतेक ठिकणी कचरा घेण्यासही पुरुषच येतात. एका ठिकाणी तर मासिक पाळीचे वस्र टाकण्यासाठी प्लॅस्टिक पिशवी मिळावी म्हणून महिलेला चारवेळा पुरुष कामगाराकडे मागणी करावी लागली, विनंती करावी लागली. मात्र यासाठी किमान कचराकुंडी ठेवण्याची तसदीही घेतली गेलेली नाही. 
अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे पोलीस, अग्निशमन यंत्रणा यांना प्रतिस्टेशन किमान दोन पीपीई किट देण्यात आलेल्या नाहीत. त्याही गुंतवून ठेवायच्या नसतील तर अत्यावश्यक यंत्रणांसाठी सेंटरवर काही किट आरक्षित का नाही ठेवले जात? उद्या एखादा रुग्ण माथेफिरू निघाला आणि त्याने अचानक दहशत माजवली तर पोलीस किट घेऊन येईपर्यंत काय करणार? आणि पुण्यातल्या उदाहरणाप्रमाणे ते आलेच नाहीत तर? एखाद्या ठिकाणी अचानक आग लागली तर काय करणार? रुग्ण विझवत बसणार का ती आग? सध्या आपत्कालीन आणि गरजेच्या यंत्रणांचीही सोय इथे नाही. आता कोरोना येऊन चार महिने झालेत, लढा सुरूच असला तरी किमान या साध्या गोष्टींकडे लक्षच गेलं नाही, असा दावा चुकीचाच ठरेल. दुर्दैवाने क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये काही गैरप्रकार घडला तर जबाबदारी कोणाची हा खरा प्रश्न आहे. 
क्वॉरण्टाइन सेंटर ही स्थानिक यंत्रणेची जबाबदारी आहे, की गृहखात्याची, की वैद्यकीय विभागाची यावर अजूनही एकमत नाही. घर लहान असलेल्या, इतरांना बाधा होऊ नये म्हणून आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या महिला मोठय़ा विश्वासाने या सेंटरमध्ये येतात, इथे आपण बरे होऊ ही त्यांची भावना तर असतेच; पण सुरक्षित राहू हा विश्वासही असतो. मात्र या विश्वासाला इतक्या सहजपणे तडा जात असेल तर यंत्रणा म्हणून आपण अपयशी आणि निर्ढावलेले आहोत का हा प्रश्न स्वत:ला विचारण्याची वेळ आली आहे.

neha25saraf@gmail.com
(लेखिका लोकमतच्या पुणे आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

Web Title: How safe are women in quarantine centers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.