वार्धक्य पळवायचेय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 06:02 AM2018-12-16T06:02:00+5:302018-12-16T06:05:04+5:30
आपल्या शरीराच्या वार्धक्याचा वेग टेलोमेरच्या लांबीवरून ठरतो. लांबी जास्त असेल तर शरीर तरुण असते. वार्धक्यात टेलोमेरची लांबी कमी होत जाते. तणावामुळे वार्धक्य वाढते, हे सिद्ध झाले आहे; पण माइण्डफुलनेसच्या सरावाने तारुण्य वाढवता येऊ शकते. - कसे?
- डॉ. यश वेलणकर
माइण्डफुलनेस मेडिटेशनच्या नियमित सरावाने अकाली वार्धक्य टाळता येते, वार्धक्याची गती कमी करता येते असे दिसून येत आहे. आपले शरीर म्हातारे होते म्हणजे त्याच्यातील पेशींच्या नवनिर्मितीची क्षमता कमी होते. शरीराच्या प्रत्येक पेशीत गुणसूत्रे असतात. या गुणसूत्रावर एक संरक्षक टोपी असते. त्या टोपीला टेलोमेर म्हणतात. वय वाढत जाते तशी या टेलोमेरची लांबी कमी होत जाते. पेशीतील टेलोमेरची ही टोपी शिल्लक राहात नाही, त्यावेळी नवीन पेशी निर्माण होत नाही. मानसिक तणाव, नैराश्य हे टेलोमेरची टोपी वेगाने झिजण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे असे डॉ. एलिझाबेथ ब्लॅकबर्न यांनी नव्वद साली दाखवून दिले. आपल्या शरीराच्या वार्धक्याचा वेग टेलोमेरच्या लांबीवरून ठरवता येऊ शकतो. लांबी जास्त असेल तर शरीर तरुण असते. वार्धक्य येते तशी टेलोमेरची लांबी कमी कमी होत जाते. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना २००७ साली नोबेल पारितोषिक मिळाले.
२००० साली एलिझाबेथ यांची भेट युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्निया, सानफ्रान्सिस्कोच्या मानसरोग विभागात काम करणाऱ्या डॉ. एलिसा एपेल यांच्याशी झाली. डॉ. एपेल या सायकियाट्रिस्ट. त्या त्यावेळी मानसिक तणावाचा शरीरावर काय दुष्परिणाम होतो याचा अभ्यास करीत होत्या. डॉ. हान्स सेल्ये; ज्यांनी मानसिक तणावाचा शरीरावर होणारा परिणाम प्रथम दाखवून दिला ते आणि डॉ. दीपक चोप्रा यांच्यापासून प्रेरणा घेऊन डॉ. एपेल शरीर आणि मन यांच्या
परस्पर संबंधांचे कोडे उलगडण्याचा प्रयत्न
करीत होत्या. त्यांना डॉ. एलिझाबेथ यांच्या संशोधनाबद्दल माहिती होती. रोजच्या आयुष्यातील ताण-तणावांचा परिणाम शरीराच्या पेशीवर काय होतो याचा अभ्यास त्यांना करायचा होता आणि तेथे या टेलोमेरच्या संशोधनाचा उपयोग होऊ शकेल असे त्यांना वाटत होते. मतिमंद किंवा जीर्ण आजाराने पीडित मुलांच्या माता तणावाखाली असतात. त्यांची तणावाची पातळी आणि टेलोमेरची लांबी यांचा तुलनात्मक अभ्यास करायचा अशी त्यांची कल्पना होती.
जॉन हाफकिन स्कूलमधील डॉ. मारी अर्मानोस हे टेलोमेरच्या विकृतींचा अभ्यास करतात. त्यांनी असे जाहीरपणे सांगितले की वातावरणाचा टेलोमेरवर परिणाम होतोच, याविषयी माझी खात्री झाली आहे. शारीरिक आणि मानसिक वातावरणामुळे टेलोमेरची लांबी कमी होत असेल तर त्यामुळे वार्धक्यात होणारे सांधेदुखी, अति रक्तदाब, मधुमेह, स्मृतिभ्रंश असे अनेक आजार अकाली होऊ शकतात अशी चिंता अनेकांना भेडसावू लागली आहे. त्यामुळे या विषयावर संशोधन करून त्यावर उपाय शोधण्यात अनेकांना रस वाटू लागला. एलिझाबेथ आणि एपेल यांच्या जोडीला जगभरातून पन्नास-साठ साथीदार मिळाले. तणावामुळे कमी होणाºया टेलोमेरच्या लांबीवर होणारा दुष्परिणाम कशाकशामुळे टाळता येऊ शकेल यावर अनेक ठिकाणी संशोधन सुरू झाले. योग्य आहार, व्यायाम, सामाजिक आधार गट या सर्वांचा उपयोग होतो असे आढळून येऊ लागले; पण सर्वाधिक लक्षवेधक उपाय जाणवला तो म्हणजे ध्यान!
एलिझाबेथ आणि त्यांच्या सहकाºयांनी शांभला येथे तीन महिने ध्यान वर्गात सहभागी झालेले आणि प्रतीक्षा यादीत असलेले यांच्या टेलोमेरची लांबी यांचा तुलनात्मक अभ्यास केला, त्यामध्ये ध्यान वर्गात सहभागी झालेल्या माणसांच्या टेलोमेरचे प्रमाण तीस टक्के जास्त नोंदवले गेले. स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तींच्या सेवेत असणाºया माणसांचा असाच एक अभ्यास झाला. दिवसात बारा मिनिटे असे आठ आठवडे ध्यान केलेल्या माणसांच्या टेलोमेरेझचे प्रमाण तसे
न करणाºया माणसाच्या तुलनेत खूप अधिक मिळाले. डॉ. डीन आॅर्निश यांनी प्रोस्टेट कर्करोग झालेल्या रुग्णांना ध्यान आणि जीवनशैलीतील बदल करायला लावले आणि पाच वर्षांनी म्हणजे २०१३ मध्ये असे बदल केलेले आणि न केलेले यांच्यातील तुलनात्मक अभ्यास प्रसिद्ध केला. त्यामध्येदेखील प्रोस्टेट कर्करोगाची वाढ पूर्ण थांबली होतीच पण टेलोमेर आणि टेलोमेरेझ यांची लांबी आणि प्रमाण वाढले होते. हे सर्व परिणाम पाहून डॉ. एलिझाबेथ स्वत:देखील ध्यान करू लागल्या. त्यांनी सान्ता बार्बरा येथे सहा दिवसांचा ध्यान वर्ग केला. सप्टेंबर २००६ मध्ये एका कार्यक्र मात त्यांनी दलाई लामांची भेट घेतली. दलाई लामांनी त्या कार्यक्र मात एलिझाबेथ यांचा ‘मेडिसिन बुद्ध’ असा उल्लेख आणि गौरव केला. ध्यानाने मिळणारी मनाची शांतता त्यांना आवडली, नेहमीच्या धकाधकीच्या कामात ध्यान माझ्या मनाला ऊर्जा आणि तजेला देते असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या एका रिसर्च पेपरची सुरुवात त्यांनी बुद्धाचे एक वचन उद्धृत करून केली... ‘शरीर आणि मनाच्या आरोग्याचे रहस्य हे भूतकाळात घोटाळत राहण्यात किंवा भविष्याविषयी काळजी करत राहण्यात नसून शहाणपणाने वर्तमान जगण्यात आहे.’
ध्यान वर्तमानात जगायची कला शिकवते, त्यामुळे अनावश्यक तणाव कमी होतो आणि या तणावामुळे येणारे अकाली वार्धक्य टाळता येते, वार्धक्याची गती कमी होते.
तणावामुळे दहा वर्षांनी वृद्ध !
तणावाची पातळी आणि टेलोमेरची लांबी यांचा तुलनात्मक अभ्यास करायचा अशी डॉ. एपेल यांची कल्पना होती. या पायलट स्टडीसाठी मानसिक तणावाखाली असणाºया वय वर्षे तीस ते चाळीस या वयोगटातील अठ्ठावन्न स्रिया त्यांनी निवडल्या. त्याच वयाच्या आणि तशाच आर्थिक स्थितीतील; पण आपल्यावर तणाव नाही असे सांगणाºया तेवढ्याच स्रियांचा गट कण्ट्रोल ग्रुप म्हणून त्यांनी निश्चित केला. या सर्वांच्या रक्ताची तपासणी करून टेलोमेरची लांबी मोजली. परीक्षणाचा निकाल अगदी स्पष्ट होता, एपेल यांचा अंदाज खरा ठरला होता.
१. तणावामुळे सर्वाधिक अस्वस्थ असलेल्या स्त्रीच्या टेलोमेरची लांबी सर्वात कमी होती.
२. त्या लांबीनुसार ती तिच्या वयापेक्षा दहा वर्षे अधिक वृद्ध झालेली होती.
३. तणाव कमी असलेल्या कण्ट्रोल ग्रुपमधील स्रियांच्या टेलोमेरची लांबी सरासरीने जास्त होती.
४. मानसिक तणावाचा परिणाम केवळ प्रकृतीवरच नाही तर शरीराच्या पेशींवर आणि वार्धक्याच्या गतीवर होतो हे या पायलट स्टडीमधून लक्षात आले.
या संशोधनाचा एक फायदा झाला. या क्षेत्रामध्ये अनेक संशोधकांना रस वाटू लागला. स्किझोफ्रेनियाने आजारी असलेल्या माणसांचे नातेवाईक, मानसिक आघातानंतरच्या तणावाचे रुग्ण (पीटीएसडी), औदासीन्याचे रुग्ण यांच्यातील टेलोमेरची लांबी मोजण्याचे अनेक प्रयोग जगभर सुरू झाले. तणावामुळे शरीरात वाढणारे कोर्टिसोल रसायन टेलोमेरवर दुष्परिणाम करते हे सिद्ध झाले.
(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे अभ्यासक आहेत.)
manthan@lokmat.com