इमारतींचे आरोग्य जपायचे कसे, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये काय पाहाल?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 10:04 AM2023-07-16T10:04:23+5:302023-07-16T10:06:11+5:30
दोषांचा पाठपुरावा-निदान करून प्रभावी उपचार करणे गरजेचे असते, अन्यथा इमारत दुर्घटनांना आमंत्रणच ठरते.
पावसाळा सुरू झाला की, इमारत कोसळण्याच्या, पडझडीच्या घटनांना सुरुवात होते. इमारतीची योग्य देखभाल वास्तूच्या आयुष्य वृद्धीचा, सुरक्षित राहण्याचा एक उपचार आहे. असे उपचार वेळीच होणे गरजेचे असते. यासाठीच बारकाईने इमारतीचे आरोग्य तपासणे व अचूकतेने त्यातील दोषांचा पाठपुरावा-निदान करून प्रभावी उपचार करणे गरजेचे असते, अन्यथा इमारत दुर्घटनांना आमंत्रणच ठरते.
रवींद्र बिवलकर, वरिष्ठ उपसंपादक
मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी म्हाडा किंवा तत्सम संस्थांकडून मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी तयार होते. स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेने बंधनकारक केले आहे. विविध महापालिका क्षेत्रात तसे आहे अर्थात सर्व पालिका, नगरपंचायती, नगर परिषदा वा ग्रामीण भागात अशी स्ट्रक्चरल ऑडिटची बंधने नाहीत. मात्र बंधने असोत वा नसोत आपले घर सुरक्षित आहे की नाही, हे पाहणेही खरे म्हणजे प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. प्राणहानी, वास्तूची हानी टाळणे, त्यांचे आयुष्य वाढवणे, इमारतीच्या स्थितीचा अंदाज घेणे व तेथील नाजूक वा घातक अशा घटकांना ओळखून त्वरेने ते दुरुस्त करणे, कायदेशीर आवश्यकता लक्षात घेऊन त्यांचे पालन करणे व इमारतीच्या देखभालीसाठी आवश्यक ते उपचार करणे हे सर्वसाधारण स्ट्रक्चरल ऑडिटमागील उद्देश आहेत. इमारत खासगी असो वा सहकारी संस्थेची, तिची वेळोवेळी काळजी घेतली गेलीच पाहिजे.
प्लॅस्टरला तडे जाणे, भेगा पडणे, जमीन खचणे, बीम- कॉलम तिरका होणे, जमिनीवरून चालताना कंपने होणे, पाणी गळतीमुळे छत, भिंती खराब होणे हे साधारण सर्वांना दिसणारे दृश्य स्वरूप आहे. मात्र अनेकदा त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. स्ट्रक्चरल ऑडिट संबंधातील महापालिकेकडे असणारे निकषांचे-निदानाचे स्वरूपही असे प्राथमिकच आहे; पण ते तरी किती स्ट्रक्चरल अभियंते आणि इमारतमालक, धारक बारकाईने पाहतात? तसे जर पाहत असतील तर धोकादायक स्वरूपातील इमारतींच्या संख्येत वाढ नव्हे तर घट झाली असती. त्याची आकडेवारीही देण्याचे प्रमाण ठळक दिसले असते.
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये काय पाहाल?
स्ट्रक्चरल डिफेक्ट नेमके ओळखणे
कोणत्या वस्तूची, घटकाची हानी होत आहे?
दोषांचे रचनेवर झालेले परिणाम व दुष्परिणाम
रचनेतील अतिरिक्त बांधकामे व अतिदाबाचे
दुष्परिणाम ओळखणे
निदान करताना... : काँक्रीटची चाचणी, रिबाउंड हॅमर टेस्ट, अल्ट्रॉसॉनिक टेस्ट, कार्बोनेशन टेस्ट, क्लोराइड टेस्ट, सल्फेट टेस्ट आदी विविध चाचण्यांचीही आवश्यकता असते. त्या चाचण्या होतात का? हे पाहणेही महत्त्वाचे असते.
माणूस जसा वृद्धत्वाकडे झुकायला लागतो, तसे त्याला त्याच्या शरीराच्या तपासणीची, त्यानुसार अचूक निदानाची आणि नंतर सुयोग्य उपचाराची गरज असते. त्यामुळे माणसाचे आयुष्य दीर्घकाळ निरोगी राहते. इमारत, वास्तू आणि स्ट्रक्चरल ऑडिट याचीही तुलना माणसाच्या शरीराशी, तपासणी आणि उपचाराशी आपण करतो. त्यांचे पण आपण तिकडे पालन करणे गरजेचे आहे.
- डॉ. हिमांशू राजे, बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ
इमारतीचा आराखडा, स्ट्रक्चरल आराखडा, त्यातील बारकावे हे जसे हाती हवेत, त्याचप्रमाणे ऑडिट करताना काँक्रिटचे बाह्यस्वरूप कसे व अंतर्गत स्वरूप कसे, हे ओळखण्यासाठी असणारी पारंपरिक, आधुनिक चाचणीची साधने, रसायने वापरली जात आहेत का, याबद्दल आपण माहिती करून घेतली आहे का, हे प्रत्येक इमारतधारक, व्यक्ती, संस्था इतकेच नव्हे तर स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या कंपन्यांनीही खात्रीने पाहायला हवे. शेवटी किंमत माणसाची करायची की येणाऱ्या खर्चाची करायची, त्या नजरेवरच सारे काही अवलंबून आहे, हे नक्की.