युद्धाच्या भय-कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 06:00 AM2019-03-10T06:00:00+5:302019-03-10T06:00:02+5:30

युद्धाच्या सुरस गोष्टी सांगणे ही माणसाची अतिशय जुनी सवय आहे. युद्धांमधल्या भीषण संहाराचे चित्र दाखवणारे युद्धपट हे त्या गोष्टींचेच चित्र-रूप! हॉलिवूडमध्ये या युद्धपटांची अस्वस्थ करणारी परंपरा आहे !

How The tradition of war movies developed in Hollywood, describes Rahul Bansode | युद्धाच्या भय-कथा

युद्धाच्या भय-कथा

Next
ठळक मुद्देबालाकोट हल्ल्यानंतर त्यावर चित्रपट बनवण्यासाठी लगबग सुरू झाल्याच्या बातम्या आहेत. त्यानिमित्ताने युद्धपटांच्या हॉलिवूडी दुनियेची एक अस्वस्थ सैर

- राहुल बनसोडे

युद्धाच्या गोष्टी सांगण्याचे माणसाचे कसब तसे फार पुरातन आहे. माणसे हजारो वर्षांपासून युद्धे करीत आहेत आणि त्याच्या सुरस कथा सांगत आहेत. असे म्हणतात की हजारो वर्षांपूर्वी टोळ्यांमध्ये शिकार करीत असताना एखाद्या मोठ्या प्राण्याची शिकार करून पुरुष जेव्हा आपल्या गुहेत परत जायचे तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या स्त्रियांना व लहान मुलांना आपण तो प्राणी कसा मारला ह्याची गोष्ट रंगवून सांगायचे. कित्येकदा ही शिकार करताना टोळीमधील एखाद्या सदस्याने कशा उलटसुलट चुका केल्या होत्या ह्यासंबंधीही चर्चा व चेष्टामस्करी व्हायची. कधीकधी चूक फारच मोठी असली तर ती टोळीतल्या सदस्यांच्या जिवावर बेतायची आणि मग त्या दिवशी आपला टोळीतला सदस्य कसा त्या चुकीमुळे मारला गेला ह्याच्याही गंभीर चर्चा व्हायच्या. शिकारीत सहभागी न होता मागे थांबलेल्या लहान मुलांना आणि स्त्रियांना आपल्या संघर्षाची गोष्ट सांगताना अर्थातच त्यात बरेचदा अतिशयोक्ती व्हायची; पण ह्या अतिशयोक्तीमुळे त्या गोष्टी सुरसही होत असे. युद्धाच्या सुरस गोष्टी सांगणे ही माणसाची अतिशय जुनी सवय आहे; ज्यातून माणसाच्या बोलीभाषेचा बराच मोठा विस्तारही शक्य झाला. सतराव्या शतकाच्या शेवटास झालेल्या फ्रेंच राज्यक्रांतीनंतर जगभरात आधुनिक लोकशाही व्यवस्था येण्याचे मार्ग मोकळे झाले आणि त्यामुळे सैनिकी व्यवस्था आणि युद्धाचे स्वरूप बरेचसे बदलले. राजेशाहीच्या काळात मिथकांच्या स्वरूपात सांगितल्या गेलेल्या युद्धकथांचे स्वरूप पुढे देशसंकल्पनेशी जोडले जाऊ लागले. ज्यातून महायुद्धांची निर्मिती झाली आणि पुढे त्यांच्याही सुरस कथा जन्माला आल्या. ह्या युद्धांच्या समांतर काळात चित्रपटसृष्टीचाही विकास झाला आणि युद्धावरती चित्रपट बनवून प्रत्यक्ष युद्धात सहभाग न घेता प्रेक्षकांना युद्धाची अनुभूती देण्यासाठी अनेक चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. मुळात चित्रपटातले वातावरण अतिशयोक्तीचे असते हे प्रेक्षकांना मान्य असले तरी ही अतिशयोक्ती मनोरंजन करणारी असल्याने प्रेक्षकांना ती हवीहवीशी वाटते. पहिल्या महायुद्धाच्या काळात बनविले गेलेले कितीतरी चित्रपट अशाच अतिशयोक्तीने भरलेले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जमिनीवरच्या युद्धावरती चित्रपट बनविताना ह्या चित्रपटामुळे युद्ध जिंकण्यास कसा उपयोग होईल, अधिकाधिक लोकांना युद्धाबद्दल माहिती देऊन त्यांचे समर्थन कसे मिळविले जाईल, ह्या दोन मुख्य बाबींकडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे लक्ष असे. ह्याचवेळी तत्कालीन सेन्सॉरशिपचे नियम, चित्रपट निर्मितीवर सरकार आणि लष्कराचा सहभाग, देशभक्ती, धर्म आणि नैतिकतेच्या व्याख्यांचाही प्रभाव तत्कालीन युद्धपटांवर जाणवतो. शिवाय युद्धातली हिंसा दाखवताना प्रेक्षकाला ‘आपण’ आणि ‘ते’ अशी विभागणी करून त्या हिंसेकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून न पाहाता राष्ट्रभक्तीच्या नजरेतून पाहण्यास प्रेरीत केले जाई. असे चित्रपट मनोरंजक आणि स्फूर्तिदायक असतात. त्यातून भेद, द्वेष आणि त्वेष तयार होऊ शकतो; पण ते युद्धाचे प्रामाणिक चित्रण म्हणता येणार नाही. युद्धाचे प्रामाणिक चित्रण म्हणजे तरी नेमके काय, असा प्रश्न इथे उपस्थित होऊ शकतो. त्याचा मागोवा घेताना जगभरात निर्माण झालेल्या काही युद्धपटांवर नजर टाकावी लागेल.
युद्धाचे व्यापक आणि यथार्थ चित्रण करण्याचा पहिला प्रयत्न १९४३ साली अमेरिकेत बनलेल्या ‘बटान’ या चित्रपटाद्वारे करण्यात आला होता. त्याचे कथानक अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात फिलिपिन्समध्ये बटानद्विपावर केलेल्या युद्धासंदर्भात होते. प्रत्यक्ष युद्ध दाखवताना प्रत्यक्ष रक्त वा थेट हिंसा न दाखवताही युद्धाचे परिणाम योग्य प्रकारे अधोरेखित करण्यात या सिनेमाला यश आले. लवकरच युद्ध संपुष्टात आले आणि जग पडझडीतून सावरण्यास सुरुवात झाली. जगाचे व्यवहार व्यवस्थित ट्रॅकवरती आल्यानंतर काही काळ लोकांना युद्धविषयक चर्चा वा युद्धाच्या आठवणी काढणे नकोसे वाटत होते. महायुद्धात सहभागी राष्ट्रांना हळूहळू सुखाचे चार दिवस आल्यानंतर तिथे युद्धपट निर्मितीची परत सुरुवात झाली. ह्यातले बरेचसे चित्रपट दुसºया महायुद्धात आपल्या देशाने केलेल्या पराक्रमासंबधी होते आणि लोकांना ते आवडतही होते. असे म्हणता येईल की वैज्ञानिक शोधांमुळे उत्पादनांचा वेग वाढला ज्यामुळे बाजारपेठेत स्पर्धा निर्माण झाली आणि त्यातून पहिल्या महायुद्धाची निर्मिती झाली. या महायुद्धामुळेही बाजारपेठेतला संघर्ष थांबला नाही, उलट शस्त्रास्त्र निर्मितीतही अनेक देशांनी प्रगती केल्याने त्यातून दुसºया महायुद्धाची निर्मिती झाली. ज्यात झालेल्या अपरिमित हानीमुळे एका मोठ्या काळासाठी जगाने युद्धाविषयी विचार करणे बंद करून अधिकाधिक शांततामय मार्गाने प्रगती करण्याचे ठरविले. या प्रगतीतून माणासाचे जीवन अधिक सुखकर झाले आणि फावला वेळ वाढल्यानंतर तो घालविण्यासाठी अनेक मनोरंजक कार्यक्रम आणि चित्रपटांसोबत युद्धपटांचीही निर्मिती करण्यात आली. ह्या युद्धपटांच्या राष्ट्रप्रेमी स्वरुपामुळे शांततामय राष्ट्रे पुन्हा एकदा युद्धांना समर्थन देऊ लागली. ज्यातून जगभरात पुढच्या युद्धाच्या शक्यतांची निर्मिती होऊ लागली. अमेरिकन चित्रपट निर्माते, कादंबरीकार आणि वृत्तपत्रांना युद्ध हा कव्हर करण्याचा आकर्षक विषय वाटू लागला; त्याचवेळी लोकांमध्ये असलेल्या युद्धाविषयीच्या आकर्षणाचा निवडणुकांत वापर करण्यासाठी राजकारणी पुढे सरसावले.
युद्ध जेवढे लांबते तेवढे ते अधिक अलोकप्रिय होत जाते. १९५० साली सैनिकी संघर्षातून सुरू झालेल्या व्हिएतनाम युद्धाने १९६८ साली मोठे स्थित्यंतर पाहिले. प्रत्येक वर्षी सरासरी दोनशे चाळीसहून अधिक दिवस चकमकी घडत होत्या. उच्चशिक्षण घेऊन सैन्यात दाखल झालेल्या कोवळ्या मुलांचे मृतदेह शवपेट्यांमधून अमेरिकेत येत होते. आमच्या मुलांना आता तिथून परत आणा, अशी मागणी काही लोक करीत होते, तर तुमच्या राजकारणात तरुणांचा नाहक बळी जातोय, असे म्हणण्यासही काही लोकांनी सुरुवात केली. अशातच रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाममध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल अमेरिकन लोकांना गाफील ठेवल्याची प्रकरणे बाहेर येऊ लागली. ह्या युद्धाच्या समर्थनार्थ तत्कालीन विरोधी पक्षाच्या भूमिकेवर निक्सन नेहमीच संशय व्यक्त करीत. इतकेच काय एफबीआयमधल्या आपल्या विश्वासू गुप्तहेरांंमार्फत त्यांनी डेमोक्रॅटिक पार्टीच्या राष्ट्रीय कार्यालयातही घुसखोरी केली होती. वॉशिंग्टन पोस्ट आणि द न्यू यॉर्क टाईम्सच्या जागरुक पत्रकारांनी अतिशय धाडसाने निक्सन ह्यांच्या काळ्या करतुतींचा फर्दाफाश केला आणि त्यांना पदच्च्युत व्हावे लागले. सत्यासाठी आपला जीव आणि आपल्या वृत्तपत्राचे भवितव्य धोक्यात घालण्याची जी हिंमत वॉशिंग्टन पोस्टने दाखविली तसेच काहीसे धैर्य आणि हिंमत नवपत्रकार मायकेल हेर यांनी आपल्या ‘डिस्पॅचेस’ या पुस्तकाच्या प्रकाशनातून दाखवून दिली. मायकेल हेर हे व्हिएतनामच्या भूमीवर ‘एस्क्वायर’ मासिकाकरिता युद्धपत्रकार म्हणून रुजू झाले होते. एका सैनिकाला युद्धापूर्वी ज्या प्रशिक्षण प्रक्रि येतून जावे लागते आणि प्रत्यक्ष युद्धभूमीवर नेमणूक झाल्यानंतर जे काही पहावे लागते ते सर्व मायकेल यांना करावे-पहावे लागले. युद्धभूमीवरचे त्यांचे अनुभव आणि घटना त्यांनी ‘डिस्पॅचेस’मध्ये इत्यंभूत लिहून काढल्या. लवकरच या युद्धातून अमेरिकेने माघार घेतली आणि काही काळासाठी लोकांनी युद्धांची आठवण काढणे बंद केले.
त्र्याऐंशी साली व्हेनेझ्युयेलाच्या ग्रेनडा बेटावरचे आक्र मण वगळता अमेरिकेने जगाच्या इतर भागात सैनिकी हस्तक्षेप वा युद्ध केले नाही. जगभर व्हिसीआर वापरणाऱ्यांची संख्या वाढू लागली होती आणि लोक व्हिडीओ कॅसेटचा संग्रह करीत होते. १९८७ सालच्या जून महिन्यात मायकेल हेर यांच्या पुस्तकावर आधारित ‘फुल मेटल जॅकेट’ हा चित्रपट प्रकाशित झाला आणि युद्धाचे वास्तव लोकांना पहिल्यांदाच पहायला मिळाले. हिंसा, रक्त, मृतदेह, शरीरांची विटंबना, सैनिकी तरुणांची लैंगिक घुसमट, युद्धात निशस्त्र लोकांची केली जाणारी कत्तल, स्त्रिया व मुलांच्या हत्या अशा अनेक युद्धजन्य गोष्टी लोकांनी पडद्यावर पाहिल्या. हा चित्रपट अधिकाधिक प्रामाणिक आणि युद्धाचे वास्तव चित्रण करणारा कसा होईल यावर दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थेने अपार मेहनत घेतली. लवकरच हा चित्रपट व्हिडीओ कॅसेटवर रीलिज झाला आणि ही कॅसेट भाड्याने घेण्यापेक्षा ती विकत घेण्यावर लोक जास्त भर देऊ लागले. बदलत्या राजकारणात युद्धाचे राष्ट्राभिमानी चित्रण करण्यापेक्षा वास्तव आणि यथार्थ चित्रण करणे जास्त फायद्याचे असू शकते याची जाणीव चित्रपट निर्मात्यांना झाली आणि त्यातून अधिकाधिक मानवकेंद्री युद्धपटांच्या निर्मितीची एक नवी लाट अमेरिकेत आली.
यातला सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा ‘शिंडलर्स लिस्ट’ हा स्टीव्हन स्पिलबर्ग यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट नोव्हेंबर १९९३ मध्ये प्रदिर्शत झाला. दुसºया महायुद्धात छळ छावण्यांत ज्यू लोकांवर झालेल्या अन्वयित अत्याचारावर या सिनेमाचे कथानक आधारित होते. मृतदेहांचा खच पडणे म्हणजे नेमके काय आणि त्यांचा ढीग लागणे म्हणजे काय आणि या ढिगात एखाद्या लहान मुलीचे हरवून गेलेले शव नजरेने सापडणे असे आतून हादरवून टाकणारे अनेक प्रसंग या सिनेमात होते. सिनेमातली हिंसा इतकी जास्त होती की ती रंगित पडद्यावर पहाणे कुणालाही शक्य झाले नसते त्यामुळे हा सिनेमा कृष्णधवल रंगात शूट करण्यात आला. अलीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हा सिनेमा रंगित करून पहाण्याचे प्रयत्न काही लोकांनी केले; परंतु सर्वसाधारण लोकांनी हा सिनेमा रंगित करून पाहिल्यास त्यांच्या मानिसक स्थितीत प्रचंड बदल होऊन त्यांना वेड लागू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ‘शिंडलर्स लिस्ट’नंतर तीन वर्षांनी आलेला ‘लाइफ इज ब्यूटिफुल’ आणि दशकभराने आलेला ‘द पियानिस्ट’ हे दोन सिनेमेही दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांवर झालेल्या अत्याचारांवर प्रभावी प्रकाश टाकू शकले. एव्हाना ‘द फुल मेटल जॅकेट’ येऊन एक तपाहून जास्त काळ लोटला होता आणि व्हिएतनाम आणि दुसर्‍या महायुद्धासंबंधी अनेक सत्ये आणि संशोधने बाहेर आली होती. युद्धाचे काटेकोर चित्रण करण्याचे स्टीव्हन स्पिलबर्ग यांनी ठरवले. त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ हा १९९८ साली आलेला सिनेमा आजही दुसर्‍या महायुद्धाचे सर्वात प्रामाणिक चित्रीकरण समजला जातो. यापूर्वी व्हिएतनाम युद्धावर बेतलेल्या ‘फॉरेस्ट गम्प’ या सिनेमात मुख्य भूमिका केलेल्या टॉम हँक्स यांनी ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’मध्येही मुख्य भूमिका केली होती. लवकरच शतक बदलले, उच्चकोटीच्या तंत्रज्ञानामुळे अधिक प्रभावी युद्धपट बनविणे शक्य झाल्यानंतर हॉलिवूडने पुन्हा आपला मोर्चा युद्धपटांकडे वळविला. युद्धपटांच्या या तिसऱ्या लाटेत मनोरंजन, राष्ट्रभक्ती आणि राजकारणाचे पुन्हा एकदा प्रयोग सुरू झाले. दुसºया महायुद्धात जपानने अमेरिकेवर केलेल्या हल्ल्याचे चित्र २००१ मध्ये प्रदिर्शत झालेल्या ‘पर्ल हार्बर’मध्ये मांडण्यात आले. अमेरिकेने जपानी भूमीवर केलेल्या संघर्षावर ‘फ्लॅग्ज आॅफ अवर फादर्स’ नावाचा चित्रपट २००६ साली आला. या सिनेमाच्या अनेक फ्रेम्समध्ये राष्ट्रभक्तीचे केले गेलेले उदात्तीकरण आजही युद्धाला समर्थन देणारे लोक फोटोशॉप करून आपल्या प्रचारासाठी वापरत असतात. कुठल्याशा टेकडीवर चार-पाच सैनिक झुकून अमेरिकेचा झेंडा उभारीत आहेत अशा स्वरूपाचे पोस्टर आणि दृष्य या चित्रपटात होते. आज जगभरात युद्धज्वराने ग्रासलेल्या लोकांना हा फोटो अमेरिकेचा झेंडा फोटोशॉप करून त्याऐवजी त्या देशाचा झेंडा टाकून दाखविला जातो. ‘फ्लॅग्ज आॅफ अवर फादर्स’ हा सिनेमा अमेरिकन दृष्टिकोनातून बनविला गेला होता. युद्धाच्या दुसºया बाजूला असलेल्या जपानच्या दृष्टिकोनातून याच चित्रपटाचा दुसरा भाग ‘लेटर्स फ्रॉम आयोवा जीमा’ या नावाने बनविण्यात आला. २००६ साली आलेल्या या सिनेमानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात केलेल्या सैनिकी कारवाईवरती युद्धपट बनविण्यासाठी हॉलिवूड सरसावले. अफगाण युद्धाचे बºयाच अंशी व्यवस्थित व्हिज्युअल दाखविणारा ‘द हर्ट लॉकर’ २००८ साली प्रदर्शित झाला आणि त्यानंतर युद्धपट निर्मितीवरून हॉलिवूडने आपले लक्ष कमी केले.
युद्धाविषयी हॉलिवूडने तयार केलेला शेवटचा प्रभावी सिनेमा ‘डंकर्क’ आहे. आपल्या सैनिकांच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या टॉम हँक्स यांचा ‘ग्रे हाउंड’ हा चित्रपट लवकरच येऊ घातला आहे. दरम्यान जगाची सद्य:परिस्थिती पाहता हॉलिवूडला लवकरच सिनेमा बनवावे इतपत चांगले युद्ध कुठेतरी दिसून येईल. यावेळी हॉलिवूडला ते सरकारच्या आगोदरही दिसू शकत.े युद्ध किती वाईट असते याचे चित्रण अनेक सिनेमांमध्ये जसे असते तसेच युद्ध सरकारी षडयंत्र कसे असते याचे विनोदी चित्रण ‘टॉप गन’ आणि ‘वॅग द डॉग’ चित्रपटांत दाखविण्यात आले आहे. याशिवाय अनेक प्रादेशिक युद्धांचे प्रादेशिक भाषेतले सिनेमेही दर महिन्याला रीलिज होतच असतात. या सर्व सिनेमांच्या यादीत एक महत्त्वाचे नाव सुटले आहे. युद्धपटांविषयी लेख लिहिताना १९८८ साली जपानने बनविलेला ‘ग्रेव्ह आॅफ द फायरफ्लाईज’ या इंग्रजीसह अनेक भाषांत डब झालेल्या चित्रपटाचा उल्लेख अनेक चांगले लेखक नेहमी टाळीत असतात. (हा चित्रपट इंटरनेटवर https://vimeo.com/309589781) या लिंकवर मोफत उपलब्ध आहे.) या सिनेमात नेमके असे काय आहे की त्याचा नुसता उल्लेखदेखील एखाद्या माणसाला प्रचंड व्यथित करू शकतो हे प्रत्यक्ष तो चित्रपट पाहिल्याशिवाय कळणारे नाही. जगात ज्या कुणी हा चित्रपट पाहिला आहे त्याची दुसऱ्यांदा हा चित्रपट पाहण्याची हिंमत झालेली नाही.
(लेखक मानववंशशास्त्राचे अभ्यासक आहेत.)

rahulbaba@gmail.com

Web Title: How The tradition of war movies developed in Hollywood, describes Rahul Bansode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.