हमो सेशन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 01:00 AM2017-10-08T01:00:00+5:302017-10-08T01:00:00+5:30
पुण्यात स्वारगेटजवळच्या हॉटेलात एक इसम कायम दिसायचा. कोपºयातलं विशिष्ट टेबल अडवून चहा घेता घेता काहीतरी लिखाण करी. हॉटेलमधल्या दुपारच्या बजबजाटात जराही विचलित न होता एक घोट एक शब्द.. या क्रमानं आपलं लिखाण पुढं रेटी. हेच या माणसाचं व्यक्तिमत्त्व. नंतरच्या आयुष्यात अनेक वादळं आली, अनेक तडाखे बसले, पण हा माणूस कधी विचलित झाला नाही. त्याच्या डोळ्यांतलं हसूही कधी लोपलं नाही..
दिलीप कुलकर्णी
नरसोबाच्या वाडीत आम्ही पोहोचलो तेव्हा सूर्य झरझर कृष्णेच्या पाण्यात उतरत होता. तो अस्तंगत होण्याच्या आत आम्ही आणलेला अस्थिकलश कृष्णा-पंचगंगेच्या संगमावर आम्हाला विसर्जित करायचा होता. त्या संथ प्रवाहात तो अस्थिकलश सोडताच मंदपणे हेलकावे खात प्रवाहाबरोबर दूर गेला आणि दिसेनासा झाला.
शेवटच्या दिवसांत ‘हमों’ना नरसोबाच्या वाडीला येण्याची ओढ लागली होती. अखेर त्यांच्या अस्थी तिथं पोचल्या आणि मावळतीच्या सूर्यकिरणांच्या साक्षीने कृष्णार्पण झाल्या.
सुमारे ७० वर्षांपूर्वी आई गेल्यानंतर छोटा हनुमंत, त्याचा मोठा भाऊ बाबल आणि वडील हताश होऊन नरसोबाच्या वाडीला आले होते आणि ज्या आबा रुक्क्यांच्या घरी वर्षभरापूर्वी हनुमंताची मुंज लागली होती, त्यांच्याकडे गेले. मातीशेणानी सारवलेल्या गवताच्या भिंती आणि वर पत्र्याचं छप्पर असलेल्या खोलीत ते तिघं राहिले. तिथंच वडिलांनी दोन्ही मुलांना ‘माधुकरी’ची दीक्षा दिली. आई गेल्यामुळे मुलांनी तुळतुळीत हजामत केली होती पण भोवरा आणि शेेंडी राखलेली होती. वाºयावर ती भुरुभुरु उडत असे. वडील पहाटे लवकर उठत. कृष्णेवर स्नान करून मंदिरातल्या पादुकांना पाणी घालून ते खोलीवर येत आणि मुलांना उठवत. मुलेही उठून नदीवर स्नान करून माधुकरीची वेळ होईपर्यंत मंदिराला प्रदक्षिणा घालीत राहत. एकशे आठ झाल्या की पुन्हा एकशे आठ, त्या झाल्या की पुन्हा...
मध्यान्ह झाली की ओली लंगोटी पंचे नेसून खांद्यावर झोळी घेऊन ते तिघंही निघायचे. उन्हात दोन अडीच तास दारोदार फिरायचं. मिळेल ते अन्न घेऊन ते पुन्हा आबांच्या खोलीवर येत. संध्याकाळी देवळाच्या बाजूला कृष्णेच्या प्रवाहात पाय सोडून अंधारू लागेपर्यंत दत्तस्तोत्र म्हणत ते दिवस कंठीत असत.
ह. मो. मराठे ह्यांचं बालपण अशाप्रकारे कृष्णाकाठी नरसोबाच्या वाडीत गेलं. आमची ओळख झाली ती सुमारे पस्तीस वर्षांपूर्वी. त्यावेळी आम्ही काही जण ‘मनोहर’ साप्ताहिकासाठी काम करत होतो. दुपारी ठरावीक वेळी स्वारगेटजवळच्या एका ठरावीक हॉटेलात संपादकांसह आम्ही सारे चहाला जात असू. त्यावेळी एक इसम एका उंच मोपेडवर मागच्या वाहनांना सतत थांबण्याचे इशारे देत आमच्या अगोदर त्या हॉटेलात येई आणि एका विशिष्ट कोपºयातलं टेबल अडवून चहा घेता घेता काही तरी लिखाण करी. इकडे आमचा हास्यकल्लोळ चालू असताना हॉटेलमधल्या दुपारच्या बजबजाटात जराही विचलित न होता एक घोट एक शब्द, या क्रमानं हा इसम आपलं लिखाण पुढंं रेटी.
त्यांची बायपास सर्जरी झाली त्यावेळची गोष्ट. त्यादिवशी अगदी सकाळीच मी हॉस्पिटलमध्ये पोचलो, तेव्हा हा हार्टपेशंट आॅपरेशनसाठी घातलेल्या पेहरावात खाली मान घालून सर्जिकल कॉटवर काहीतरी लिहित बसला होता. नंतर समजलं की ते मृत्युपत्राचा ड्राफ्ट करीत होते. एका खिडकीजवळ ते बसले होते. सर्जन यायला थोडा अवकाश होता. सकाळची कोवळी उन्हे त्यांच्या चेहºयावर पडली होती. चेहºयावरून माझी नजर त्यांच्या पेहरावावर पडली. मला त्यांची ती ड्रेपरी आवडलेली दिसताच त्याही अवस्थेत ते मान वाकडी करून हसायला लागले. म्हणाले, ‘‘टीप बाबा लवकर. आॅपरेशनंतर हा सुंदर डे-लाईट मला दिसेल की नाही शंकाच आहे!’’ असं म्हणून ते खिडकीतून बाहेर बघायला लागले.
मूळचे गोव्याचे असणारे हमो, काही वर्षे मालवणला होते. अक्षरशत्रू असलेले त्यांचे वडील आयुष्यभर तीर्थाटनाच्या निमित्तानं भटकत राहिले. आपल्याबरोबर कुटुंबाचीही त्यांंनी फरफट केली. मोठा भाऊ बाबलशेठ ह्यांचं छोटंसं दुकान होतं मालवणमध्ये. तिथं ते शिवणकाम करीत. उसवलेले धागे प्रेमरज्जूंनी पुन्हा गुंफण्याचं काम आपल्या अधू डोळ्यांखाली त्यांनी आयुष्यभर केलं. लहान भावाला शिकवूृन मोठं करण्याचा घाट याच बाबलशेठनी घातला. त्यासाठी बापाशी उभ्या जन्माचं वैर पत्करलं. ओले पंचे नेसून नरसोबाच्या वाडीत हे दोघे भाऊ माधुकरी मागून राहिले. स्वत: अशिक्षित राहून बाबलशेठनी हनुमंताला शाळेत घातलं.
मराठे हे माझ्या आयुष्याचा एक भाग बनून राहिले होते. १९८७ मधली ही घटना. जानेवारी महिना होता तो! माझ्या नवीन घराचा ताबा घ्यायचा होता. ११०० रुपये कमी पडत होते. आता ही रक्कम कुठून उभी करायची? मी हमोंकडे गेलो. सकाळची वेळ होती. डोक्याला मफलर गुंडाळून ते नेहमीप्रमाणे लिहित बसले होते. ‘मराठेसाहेब, तुमच्या लेखन समाधीत मी व्यत्यय तर आणला नाही ना?’ असं सखाराम गटणे टाइप वाक्य मी बोललो आणि ते काही बोलायच्या आत घाईघाईनं मी पैशांसाठी याचना केली. ते म्हणाले, ‘थांब, एक-दोन दिवसांत मलाही पैशांसाठी बँकेत जावं लागणारच आहे. आता आधी आपण चहा घेऊ हॉटेलात. तुझ्याकडे काही मॅटर असेल सांगण्यासारखं तर सांग, मग आपण बँकेत जाऊ!’
आम्ही बँकेत गेलो. चेक लिहिताना ते म्हणाले, ‘तुला किती अकरा हजार पाहिजेत ना, मला एखादा हजार पुरतील तेव्हा १२ हजार लिहितो काय?’ त्यांना थांबवून मी म्हटलं, ‘मला फक्त अकराशे पाहिजेत’. ‘अरे अकराशे फक्त? हात्तिच्या’. ‘तो शब्द त्यांनी इतक्या तुच्छतेनं काढला की मला ती रक्कम उगाचच लहान वाटायला लागली. पण माझं नवं घर त्या ‘छोट्या’ रकमेअभावी अडलं होतं!
‘अरे, फक्त अकराशेसाठी बँकेत येण्याची जरुरी नाही. तेवढे पैसे माझ्या एखाद्या नाडी नसलेल्या पायजाम्यात पण निघाले असते’ - ते म्हणाले.
‘एक दिवस एक माणूस’ ही अभिनव लेखमाला त्यांनी लिहिली. त्या मालिकेच्या प्रत्येक लेखाच्या वेळी फोटोसाठी मी त्यांच्याबरोबर होतो. त्या लेखांचं पुढं मोठं पुस्तक निघालं. १९९४ मध्ये त्या मालिकेची थट्टा करणारा एक लेख मी दिवाळी अंकात लिहिला. त्यात या संपादकाला मी ‘पराठे’ हे नावं दिलं होतं. आणि एक दिवस ह्या माणसाबरोबर राहून जे काय ‘घडतं’ त्याचं काल्पनिक चित्रण केलं होतं.
तो अंक आणि मिळालेलं त्याच्या मानधनाचं पाकीट मी त्यांच्याकडे घेऊन गेलो. जाहीरपणे त्यांनी तो लेख खड्या सुरात वाचला आणि प्रत्येक पॅरानंतर दिलखुलासपणे टाळी देत राहिले. वाचन संपल्यानंतर ते पैशाचं पाकीट मी त्यांच्यासमोर ठेवलं, ‘मिस्टर मराठे, तुमची व्यक्तिरेखा मी लेखात वापरली म्हणून ही रॉयल्टी मी तुम्हाला देत आहे.’
पण ते पाकीट माझ्या खिशात तसं ठेवत ते म्हणाले, ‘झाली तेवढी थट्टा पुरे आता आणखी नको.’ बायपास सर्जरीनंतरही २०११ साली त्यांना हृदयविकाराचा झटका आला, पण त्याही तडाख्यातून ते वाचले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ते उभे होते. पण ऐनवेळी कोर्टकचेºया झाल्या आणि जामिनासाठी ऐनवेळी पळापळ करावी लागली. अध्यक्षपद हुकले ते हुकलेच! सर्व स्थिरस्थावर झाल्यावर एका सकाळी त्यांनी मला फोन केला. ‘अरे, खूप दिवसांत तुझं फोटोसेशन झालं नाही. खूप दिवसांत मी मोकळेपणी हसलोसुद्धा नाही. तू सेशन करीत असताना हमखास मला हसवतोस!’
त्यांच्या नवीन घराचा पत्ता शोधत मी गेलो. सहाव्या मजल्यावर एका सदनिकेचं दार अर्धवट उघडं होतं. ते ढकलून मी आत गेलो तेव्हा हे माझं ओल्डेस्ट मॉडेल हमो मराठे नावाचं वय (कदाचित) ७५ वर्षे - एक न शोभणारा लाल डगला घालून बसलं होतं. बगळ्यासारखे झालेले शुभ्र केस कपाळावर सारखे येतात म्हणून डाव्या हाताचा तळवा कपाळावर ठेवून उजव्या हातानं डायरीत ते काहीतरी लिहितच होते. माझी चाहूल लागताच त्यांनी लिखाण थांबवलं आणि लेखणी धरलेला हात तसाच हस्तांदोलनासाठी पुढे केला. कृश झालेली शरीरयष्टी आणि त्यामुळे बुजगावण्यासारखा दिसत असलेला तो नवीन लाल डगला! ओठात तेच चांदणं सांडणारं मुक्त अनिर्बंध हसू. पण तरीही हे मराठे वेगळे होते. कारण इतकी वर्षे त्यांनी पोटात दडवून ठेवलेले दोन पाण्याचे ढग आज त्यांना न जुमानता त्यांच्या हसºया डोळ्यांत येऊन थांबले होते.
‘मीट वुईथ माय न्यू पर्सनॅलिटी’ हस्तांदोलनासाठी माझ्या हातात दिलेला हात तसाच ठेवून ते म्हणाले. त्यांच्या हातातली लेखणी काढून घेत ती माझ्या खिशात टाकत मी विचारलं,
‘खूप वर्षांपासून विचारू म्हणतो पण आता विचारूनच टाकतो, हे सतत तुम्ही काय लिहित असता?’ ‘देखना है?’ काही गुपित सांगायचं असलं की त्यांचा स्वर राष्टÑभाषेतून येतो. त्यांनी पुढे केलेल्या तीन/चार डायºया मी सहज चाळल्या.
‘यात तर काहीच मजकूर नाही’ - मी म्हणालो. मग त्यांनी कपाटातून डायºयांची एक मोठी चळतच बाहेर काढली. ‘यातली कुठलीही उघड’ - ते म्हणाले. म्हणजे एकच कादंबरी मराठ्यांनी पुन:पुन्हा लिहिली आहे की काय असं मला वाटून गेलं. अंदाजानं मी एक डायरी उघडली. पण तुटक रेषांखेरीज त्यात काहीच मजकूर नव्हता. ‘ये क्या मांजरा है?’ मीही राष्टÑभाषेतून विचारलं. ‘मांजर, उंदीर काही नाही. माझं अक्षर उंदरा/मांजराच्या पायांसारखं असेल पण शब्दांवरच्या टोप्या स्वच्छ आणि सरळ रेषेत आहेत.’
‘पण टोप्यांखालचे शब्द कुठे गेले?’ - मी म्हणालो. ‘ते अजून लिहायचे आहेत. शब्दांना वर टोप्या दिल्या की ते स्वच्छ रेखीव होतात. शब्द लिहिल्यानंतर त्यांना टोप्या देण्याचं भान मला राहत नाही. तेव्हा या टोप्या मी शब्द लिहिण्याआधीच देऊन ठेवतो’ - मराठे म्हणाले.
अस्थिविसर्जनानंतर काही जुने फोटो शोधण्यासाठी त्यांचं डायºयांचं कपाट मी उघडलं. त्या जुन्या डायºया त्यांनी नीट बांधून ठेवल्या होत्या. डायºयांची एक चळत मी अलगदपणे सोडली. टोप्यांखालचे शब्द वाचण्यासाठी मी अधीर झालो होतो.
मी एक डायरी उघडली. दुसरी उघडली. त्या चळतीतल्या एकूणएक डायºया मी चाळल्या. नीट बांधून ठेवलेल्या त्या सर्व जुन्या डायºया चक्क कोºया होत्या. शब्दन् शब्द अगदी टोप्यांसकट डायºयांमधून निघून गेले होते आणि माणसं सोडून गेलेल्या घरांप्रमाणेच त्या जुन्या डायºयांही रिकाम्या रिकाम्या सुन्या सुन्या झाल्या होत्या...