इरोम शर्मिला जेव्हा जम्मू-काश्मीरच्या गावागावात फिरतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:00 AM2018-06-24T03:00:00+5:302018-06-24T03:00:00+5:30

मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांनी जूनच्या पहिल्या आठवडय़ात काश्मीरला भेट दिली होती. रमजानचा महिना. शस्रसंधी झालेली. अशा वातावरणात या धुमसत्या नंदनवनाची अस्वस्थता अनुभवून परतलेल्या इरोम शर्मिलांनी त्यांच्या काश्मीर भेटीतून याच सर्वसामान्य काश्मिरी माणसाच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. हिंसाचाराचं गालबोट लागलेल्या या नंदनवनात अस्वस्थतेबरोबरच आशावादही नांदतो आहे.. या परस्परविरोधी भावनांचा इरोम शर्मिलांनी घेतलेला अनुभव..

Human-right activist Irom Sharmila talks about her travel and interactions with women and youth of Jammu Kashmir | इरोम शर्मिला जेव्हा जम्मू-काश्मीरच्या गावागावात फिरतात..

इरोम शर्मिला जेव्हा जम्मू-काश्मीरच्या गावागावात फिरतात..

googlenewsNext
ठळक मुद्दे इरोम शर्मिलांचं नेमकं काम दर्दपुरा गावातल्या अनेक महिलांना माहिती नव्हतं. पण नाकात नळी घातलेली, अनेक वर्षे  उपोषण करणारी एक खमकी स्त्री- ही शर्मिलांची प्रतिमा अनेकींना आठवत होती. ‘ये वो मणिपूरवाली है ना?’ - अशा उत्सुकतेने शर्मिलांचं गावागावात स्वागत झालं

अमृता कदम

‘तुम्ही मणिपूरमध्ये लष्कराला विशेषाधिकार देणार्‍या कायद्याविरु द्ध गेली सोळा वर्षे लढा दिला, उपोषण केलं; पण उपयोग काय झाला? तुमच्या राज्यासाठी एवढा संघर्ष केल्यावर तुम्ही निवडणूक लढवली; पण तिथेही तुमच्या वाटय़ाला अपयशच आलं. मग तुमचा संघर्ष, तुमचा मार्ग आमच्यासाठी प्रेरणा कसा बनू शकतो?’ - काश्मीरमधील इस्लामिक विद्यापीठातील एका विद्याथ्र्याचा हा थेट प्रश्न इरोम शर्मिला यांना विचारला गेला तेव्हाही त्या निरुत्तर झाल्या होत्या.. त्या घटनेला इतके दिवस उलटून गेल्यावरही या प्रश्नाचं उत्तर त्यांना गवसलेलं नाही. - आणि आता जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरच्या धूसर - धुमसत्या भविष्यात ढकलला गेलेला  ‘तो’ तरुण आणखी कोणत्या प्रश्नांचे भाले उगारून असेल, याचा अंदाज बांधणंही कठीण! काश्मीरशी जोडलेल्या प्रत्येक संवादाला वेढून असणारा हा पेच इरोम शर्मिला यांनी प्रत्यक्ष अनुभवला तो अलीकडच्याच एका काश्मीर भेटीत ! मणिपूरमध्ये लष्कराला विशेषाधिकार देणार्‍या कायद्याविरोधात तब्बल सोळा वर्षे उपोषण करणार्‍या इरोम शर्मिला यांचा काश्मीरशी काय संबंध?
- अगदी अलीकडेच तो जुळवून आणण्याचं श्रेय जातं ‘सरहद’ या संस्थेला 
या संस्थेच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी इरोम शर्मिला काश्मीरला जाणार आहेत, असं ‘सरहद’च्या संजय नहार यांच्याकडून कळलं होतं. काश्मीरच्या वाटेवर असताना इरोम शर्मिला यांच्याशी दिल्लीत भेट झाली. पहिलीच भेट. तोवर शर्मिलांना टीव्हीवर किंवा फोटोतच पाहिलेलं. मणिपूरमध्ये दीर्घकाळ चाललेल्या त्यांच्या उपोषणाच्या काळात जबरदस्तीने अन्नद्रव्य देण्यासाठी नाकामध्ये नळी घातलेला त्यांचा चेहराच डोळ्यांसमोर होता. 
..पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यांनी उपोषण सोडलं, आपल्या चाहत्यांची नाराजी ओढवून घेऊन विवाह केला आणि मणिपूर विधानसभेची निवडणूक लढवून सक्रिय राजकारणाचा अयशस्वी अनुभवही गाठीशी बांधला. आताच्या शर्मिला त्यांच्या ‘प्रतिमे’पेक्षा खूपच वेगळ्या दिसतात. त्या अचानक काश्मीरमध्ये का चालल्या असाव्यात? मणिपूरमधून बाहेर पडून त्या नवीन राष्ट्रीय अवकाश शोधू पाहत असतील का, असे प्रश्न घेऊन दिल्लीतल्या जैन भवनमध्ये त्यांना भेटायला गेले. प्रवासाने  थोडय़ा थकलेल्या दिसत होत्या. अत्यंत सावकाशपणे, शब्द जुळवून त्या बोलत होत्या. पण काश्मीरला जाण्याबद्दलची त्यांची उत्सुकता लपत नव्हती.

 ‘काश्मीरबद्दल मी आजवर फक्त ऐकलं/वाचलं आहे. ‘सरहद’च्या कामानिमित्त आता काश्मीरला प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळते आहे, त्याचा खूप आनंद होतोय’ - असं सांगत होत्या. त्या उत्सुक स्वरात थोडा कडवटपणाही होता. ‘आफ्सा’विरोधातल्या प्रदीर्घ लढय़ाचा झालेला विचित्र अंत आणि नंतर निवडणुकीतला दारुण पराभव शर्मिला यांच्या जिव्हारी लागला असणं स्वाभाविकच होतं.  आपला संघर्ष डोळ्यांआड करून मणिपुरी जनतेने आपल्याला नाकारलं यामुळे आलेलं नैराश्य त्यांच्या बोलण्यातून लपत नव्हतं. अशावेळी काश्मीरमध्ये काम करायला मिळणं, हे शर्मिलांसाठी एक आव्हानही होतं आणि पुन्हा एकदा स्वतर्‍ला शोधण्याची संधीही!
‘काश्मीर आणि मणिपूरची परिस्थिती बरीचशी सारखीच आहे. ‘आफ्सा’मुळे दोन्ही राज्यांत असलेलं लष्कराचं अस्तित्व, इथल्या लोकांमध्ये निर्माण झालेली वेगळेपणाची, तुटलेपणाची भावना यांमुळे जम्मू-काश्मिरातल्या लोकांसोबत मला स्वतर्‍ला ‘रिलेट’ करता येईल’ - हा मुद्दा त्यांच्या बोलण्यात वारंवार येत होता. त्याला आशावादाची किनारही होती. शर्मिलांची ओळख ‘आफ्सा’विरोधातील लढय़ामुळे आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे  काश्मीरमध्ये ‘आफ्सा’बद्दल त्या काय भूमिका घेणार? - असा थेट प्रश्न विचारल्यावर शर्मिला म्हणाल्या,  ‘काश्मीरमध्ये केवळ ‘आफ्स्पा’च्या मुद्दय़ावर लक्ष केंद्रित करण्याचा माझा विचार नाही. मी तिथल्या महिलांसाठी प्रामुख्याने काम करणार आहे. कारण कोणत्याही हिंसाचाराचा पहिला बळी या महिलाच ठरतात !’
- एकूणच सगळा मूड ‘चांगलंच आहे, काहीतरी चांगलं होईल’ असा होता. काश्मीरविषयी शर्मिला यांची काही ठोस भूमिका असल्याचे उल्लेख त्यांच्या बोलण्यात सापडेनात. त्यांना स्वतर्‍लाही ते जाणवत असावं. किरकोळ प्रस्तावाचं, नियोजनाचं बोलून त्यांनी भेट आटोपली.  ‘काश्मीरमधून परत आल्यावर मी जास्त काही सांगू शकेन’, असं म्हणाल्या, ते बरोबरही होतं.
मग त्यांचा काश्मीरचा प्रवास झाल्यावर परत भेटायचं ठरलं.
***
चार दिवसांच्या काश्मीर दौर्‍यावरून शर्मिला परत आल्या, तेव्हा काश्मीरच्या दर्शनाने आणि ‘काश्मिरीयत’च्या अनुभवाने सुखावल्या होत्या. पण काश्मिरी लोकांच्या वेदनांशी आपली नाळ जोडली जाईल, हा जो विश्वास त्यांच्या मनात जाताना होता, त्याला मात्र किंचितसा तडा गेलेला दिसला. तिथे भेटलेल्या तरुण मुला-मुलींनी शर्मिलांच्या एकूण विचारांवर टोकदार प्रश्न उभे केले होते. त्यांच्या प्रदीर्घ लढय़ाच्या कहाणीसमोर यशापयशाची प्रश्नचिन्हं लावली होती. त्यांना खुलासे विचारले होते. त्यांचा भूतकाळ काश्मीरच्या वर्तमानाशी कसा जोडणार, याबद्दल शंका उपस्थित केल्या होत्या.
‘मी सोळा र्वष व्यवस्थेविरु द्ध जो लढा दिला त्याचं या मुलांना फार अप्रूप नव्हतं. त्यांचा हिंसेवरचा विश्वास दृढ होत चालला आहे. आपण आज आपल्या आयुष्याचा जाळ केला, बलिदान दिलं तर निदान भविष्यात कोणाला तरी शांतता मिळेल, असा टोकाचा विचार या मुलांच्या डोक्यात आहे..’ 
..शर्मिला काश्मीरच्या या दर्शनाने अस्वस्थ होऊन सांगत होत्या. एकीकडे दहशतवादी आणि दुसरीकडे लष्कर अशा कात्नीत हे राज्य सापडलं आहे. लष्कराचं जम्मू-काश्मीरमधील अस्तित्व हे मुळात शांततेसाठी असलं, तरी  ‘आर्मी इज नो लॉँगर अ पीस कीपिंग फोर्स देअर’ - हे त्यांचं मत प्रत्यक्ष अनुभवानंतर अधिक पक्कं झालं होतं. काश्मिरी युवकांच्या मनात धुमसत्या रागाला वाजवी कारणं आहेत यावर त्यांचा विश्वास बसला होता आणि या रागाबद्दल शर्मिलांना सहानुभूतीही वाटत होती. त्यांचा राग व्यक्त करण्याचा मार्ग मात्र चुकीचा असल्याचं त्या वारंवार सांगत होत्या.
वर्तमानपत्रात-टीव्हीवरच्या बातम्यांमध्ये दिसणारं आणि  प्रत्यक्षातलं काश्मीर यांच्यात महद्अंतर आहे. दगडफेक करणार्‍या जमावावर पॅलेट गनचा वापर हा असाच मत-मतांतराचा मुद्दा ! लोकांची मतं दोन टोकांमध्ये विभागली गेलेली. शर्मिला यांनीही केवळ ही मत-मतांतरं ऐकली होती; पण या पॅलेट गनमुळे काश्मिरींच्या शरीरावरच नाही, तर मनावरही जे घाव घातलेत, ते त्यांना या भेटीमध्येच पाहता आले. वास्तविक हिंसक जमावाला पांगवणं एवढय़ासाठीच पॅलेट गनचा वापर केला जातो. पण काश्मीरमध्ये पॅलेट गनमुळे गंभीर जखमी झालेल्यांचा आकडा दहा हजारांच्या घरात आहे. त्यातही डोळ्याला किंवा शरीराच्या इतर भागाला गंभीर इजा झालेल्यांची (अधिकृत) संख्या सहा हजारांहून जास्त आहे. अशा परिस्थितीत लष्कराच्या हेतूंविषयी सामान्यांच्या मनातला संशय अधिक बळकट होण्यात गैर काय आहे, असा प्रश्न आपल्या मनात निर्माण झाल्याचं शर्मिला सांगत होत्या.

या दौर्‍यात इरोम शर्मिलांनी कनन पोशपुरा गावाला भेट दिली. गावातल्या एका अनाथाश्रमामध्ये त्या गेल्या होत्या. ‘आम्ही रमजानच्या पवित्न महिन्यात गेलो होतो, त्यामुळे त्यांनी आमचं खूप छान आतिथ्य केलं. पण तरीही अनाथाश्रम पाहून आत कुठेतरी खूप तुटल्यासारखं वाटलं.’ - शर्मिला सांगत होत्या.
 इरोम शर्मिलांसोबत त्यांचे पती डेस्मंड कुथिनो हेदेखील काश्मीरला गेले होते. त्यांनी संभाषणात भाग घेत सांगितलं, ‘इस्लाममध्ये अनाथाश्रम ही संकल्पनाच नाही. एखाद्या मुलाचे पालक दिवंगत झाले तर त्या मुलाची काळजी त्याचे बाकीचे कुटुंबीय घेतात. ही माहिती मलाही नवीन होती.’
- पण तरीही जम्मू-काश्मीरमध्ये अनाथालयं आहेत. 1989 साली खोर्‍यात केवळ एक अनाथाश्रम होता. आज त्यांची संख्या आहे 40.


या राज्यात जवळपास सव्वा लाख मुलं अनाथ आहेत. याचा अर्थ रक्तपातामुळे भळभळणार्‍या या राज्यात हिंसाचारामुळे एका पिढीला कोणी वाली राहिला नाही असाच होतो. 
धुमसत्या परिस्थितीचा आणखी एक बळी म्हणजे इथल्या स्त्रिया. इरोम शर्मिलांनी ज्या दर्दपोरा गावाला भेट दिली, ते गाव पाकिस्तानच्या सीमारेषेपासून अगदी जवळच आहे. हे गाव ‘विडोज हब’ म्हणूनच ओळखलं जातं. विधवांचं गाव ! - एखाद्या गावाची ही अशी ओळख करून देणं हेच किती असंवेदनशील वास्तव ! दर्दपोरामधल्या बायकांना भेटण्याचा शर्मिलांचा अनुभव मात्र खूप वेगळा आणि सुखद होता. आपल्या दुर्‍खांना बाजूला सारून त्यांनी शर्मिलांचं स्वागत केलं. त्यांना शर्मिलांमध्ये आशेचा एक किरण दिसत होता. तीनशे ते चारशे महिलांनी शर्मिलांची भेट घेतली. घरातला कर्ता पुरु ष गमावलेला, गावाचं पाकिस्तानच्या सीमेला लागून असणं, त्यामुळे सततच्या अस्थिरतेची धास्ती, अत्यंत प्रतिकूल हवामान आणि त्यामुळे रोजगाराच्या संधींचा अभाव अशा अनेक अडचणी या महिलांनी शर्मिलांना सांगितल्या.
आमच्याशी गप्पा मारून शर्मिला खूप भावुक झाल्या. ‘आपकी बात लेके आगे तक जाऊँगी’, असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं आहे. - सईदा मीर सांगत होत्या. सईदा ‘सरहद’ या संस्थेसाठी समन्वयक म्हणून काम करतात. ‘आम्ही इथल्या महिलांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होता यावं यासाठी जे उपक्र म राबवत आहोत, त्याला शर्मिलांच्या चेहर्‍यामुळे बळकटी मिळेल, असा विश्वास सईदा यांना आहे. इरोम शर्मिलांचं नेमकं काम दर्दपुरा गावातल्या अनेक महिलांना माहिती नव्हतं. पण नाकात नळी घातलेली, अनेक वर्षे  उपोषण करणारी एक खमकी स्त्री- ही शर्मिलांची प्रतिमा अनेकींना आठवत होती. ‘ये वो मणिपूरवाली है ना?’ - अशा उत्सुकतेने शर्मिलांचं गावागावात स्वागत झालं. अनेक वर्षापासून परिस्थितीशी झगडा करणार्‍या काश्मिरी महिलांना हस्तोद्योगाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी देणं गरजेचं आहे, असं शर्मिलांना वाटतं.
आपल्या जम्मू-काश्मीर भेटीमध्ये शर्मिलांनी तत्कालीन मुख्यमंत्नी मेहबूबा मुफ्तींची भेट घेतली होती. आपल्या व्यस्त वेळापत्नकातून वेळ काढून मुफ्तींनी शर्मिलांना वेळ दिला होता. राज्यातल्या महिलांसाठी शर्मिला काय करू शकतात, यासंबंधी या बैठकीत चर्चा झाली. लष्करी कारवाईमध्ये जे निरपराध लोक मारले गेले आहेत, त्यांच्या विधवांना लष्कराकडूनच मदत देण्यात यावी, अशी मागणी शर्मिला यांनी मेहबूबा मुफ्तींकडे केली होती.
..आता जम्मू-काश्मीरमधली सगळी राजकीय समीकरणं बदलली आहेत. भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यावर मेहबूबा मुफ्तींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सरकार पडलं आणि राज्यात राष्ट्रपती राजवट आली. त्यामुळे आता शर्मिला यांना मिळालेली सरकारी आश्वासनं पूर्ण होण्याची शक्यताही मावळली आहे. पण मुळात इरोम शर्मिला किंवा ‘सरहद’ संस्थेचं काम हे राजकीय गणितांच्या पलीकडचं असल्याने केवळ सरकारी पाठिंब्याअभावी ते अडून राहाणार नाही, अशी शक्यता आहे.
‘परिस्थिती गुंतागुंतीची आहे. नाजूक आहे. स्फोटकही आहेच. या परिस्थितीत जम्मू-काश्मीरमधल्या लोकांच्या राजकीय अपेक्षांपेक्षा सामाजिक आणि भावनिक गरजा जास्त आहेत.  त्यांच्यातील वेगळेपणाची भावना दूर करून त्यांना आधार देणं, आम्ही तुमच्यासोबत आहोत असा दिलासा देणं जास्त गरजेचं आहे,’ - इरोम शर्मिला सांगत होत्या.
त्यासाठी नजीकच्या काळात पुन्हा पुन्हा जम्मू-काश्मीरच्या प्रवासाचा त्यांचा बेत आहे.
त्या दुखावल्या, धुमसत्या राज्याशी आपल्या वेदनेची नाळ जोडण्याची आस घेऊन इरोम शर्मिला एक नवा प्रवास सुरू तर केला आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती उद्भवली तरी जो वसा आपण घेतला आहे, तो न सोडण्याचा अनुभव त्यांना आहे.. तोही थोडाथोडका नाही तर तब्बल सोळा वर्षाचा! 


(लेखिका  ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीमध्ये वार्ताहर आहेत)

 

Web Title: Human-right activist Irom Sharmila talks about her travel and interactions with women and youth of Jammu Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.