हुरहूर
By admin | Published: November 1, 2014 06:19 PM2014-11-01T18:19:41+5:302014-11-01T18:19:41+5:30
नकाशा मला अगदी खिजवत असे. हे सगळं मला कधी पाहायला मिळणार? ‘जो डोळे भरून जग पाहतो. तोच खर्या अर्थाने जगावर प्रेम करू शकतो’, असं म्हटलं जातं. मग माझं जगावरचं प्रेम हे काल्पनिकच राहणार की काय?- अशी भीती वाटत असे.
Next
डॉ. नीलिमा गुंडी
माझ्या लहानपणी आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत आजोळी जात असू. दुसर्या ठिकाणी महिनाभर राहताना त्या सुमारे पाच वर्षांच्या वयात मला खूप प्रश्न पडत असत. आपण घरचे सगळे इथे आलो आहोत, तर मग आता आपलं घर, वाडा, गाव यांचं काय होणार? ते सगळं तिथून उडून तर नाही ना जाणार? या गावात एरव्ही आपण नसतो. तेव्हा वर्षभर इथलं सगळं कसं चालू असतं? ते आपल्यासाठी थांबलेलं नसतं? एकंदरीत, एका वेळी अनेक ठिकाणी सतत चालू असणारं - आपल्याला न दिसणारं - जगण्याचं रहाटगाडगं मला समजून घेता येत नसे..! माझ्या इवल्याशा मेंदूला या प्रश्नांचा छडा लावता येत नसे. ‘हे सगळं काय आहे?’ हा प्रश्न माझ्या मनात सतत भिरभिरत असे.
शाळेत बहुधा दुसरीत जिल्ह्याचा अभ्यास शिकवला गेला. तेव्हापासून आपल्या घरापलीकडचा गाव, गावापलीकडचा जिल्हा.. असा वाढत जाणारा जगाचा परीघ माझ्या जाणिवेत जमा झाला. तो परीघ मला एकीकडे मोठं करीत गेला आणि त्याच वेळी मनाला हुरहुरही लावीत गेला. एका बालगीतातली ओळ आहे.
‘शाळा ते घर
घर ते शाळा
आम्हा येतो कंटाळा’
किती बरोबर आहे ते! प्रत्यक्षात शाळेमुळे जग किती मोठ्ठं आहे, हे कळत जातं, मात्र मुलांना ‘शाळा ते घर’ या छोट्या रिंगणातच फिरत राहावं लागतं! त्यातून एक अनामिक हुरहुर मनाला लागून राहते. (ती हुरहुर खरं तर आजही मला पूर्णपणे सोडून गेलेली नाही!) शाळेत दर नव्या इयत्तेत माझ्यापाशी रोज नवीन माहिती जमा होत होती. आणि मला अधिकाधिक कोड्यात टाकत होती. टुंड्रा प्रदेशात राहणारी माणसं कशी जगत असतील? मला त्यांचं जीवन जगता येईल का? - असं काहीतरी डोक्यात चालू असे. जगाच्या नकाशातला प्रत्येक कानाकोपरा मला साद घालत असे. ‘नायगारा’ हा शब्द परीक्षेत गाळलेल्या जागेत उत्तरादाखल लिहितानाही मला त्याचा प्रचंड नाद ऐकू येत असे आणि ओढ लावत असे.
हे झाले माहीत झालेल्या जगाबाबतचे! त्यात आणखी भर पडली दूरचे न दिसणारे नि माहीतही नसलेले बरेच काही जगात असते. या नव्या माहितीची! कवी ना. वा. टिळकांची एक कविता आम्हाला पाठय़पुस्तकात होती. त्यातल्या सुरुवातीच्या ओळी आजही आठवतात. त्या अशा
‘एकटे काननी पुष्प वृक्षावरी
शोभते कोणी त्या पाहिले ना जरी’
म्हणजे मलाच काय, तर मनुष्यजातीलाही अजून पायसुद्धा ठेवता आला नसेल, असा कितीतरी भूभाग असेल.. अरण्ये असतील.. त्यात वृक्ष असतील.., ते निसर्गक्रमानुसार फुलाफळांनी बहरत असतील.. आणि आपण कोणीही कधीही ते पाहिलेले नसतील! तरीही ते असतात! अगदी सुखात डोलत असतात!
सतत चहूबाजूंनी विराट होत जाणारा हा जगाचा नकाशा मला अगदी खिजवत असे. हे सगळं मला कधी पाहायला मिळणार? ‘जो डोळे भरून जग पाहतो. तोच खर्या अर्थाने जगावर प्रेम करू शकतो’, असं म्हटलं जातं. मग माझं जगावरचं प्रेम हे काल्पनिकच राहणार की काय?- अशी भीती वाटत असे. तरुण वयात प्रवास करायला लागल्यावर माझ्या मनातली ही बोच जरा कुठे कमी झाली. आंध्र, कर्नाटक, ओडिशा, आसाम, बंगाल, नेपाळ अशा प्रदेशांच्या मी जेव्हा सहली केल्या, तेव्हा नवनव्या निसर्गरूपांची अद्भुतता मनाला भूल पाडत राहिली. मनात ओळी स्फुरल्या.
‘कुठे महाकाय शिळा
स्वयंभू शिल्पासारख्या पसरलेल्या
कुठे दर्यांच्या आर्त हाका
दूरवर घुमत राहिलेल्या,
कुठे सूर्याची तप्त मुद्रा,
कुठे बर्फाची स्निग्ध पाखर
कुठे लाटांचा शुभ्र पिसारा,
कुठे अनोखी शांतता नीरव!’
ही सगळी निसर्गरूपे माझ्या मनोविश्वाचा भाग बनून गेली. त्यामुळे माझे मन अजूनही एक पोरखेळ खेळते. घरात बसल्याबसल्या मी मनाने काही क्षण या दूरच्या प्रदेशाची सैर करून येते. ती सैर मला काही काळ आनंद देते. पण मन काही प्रश्नांनी अडूनच बसते. आपण एका वेळी एकाच ठिकाणी का राहू शकतो? पाचही ज्ञानेंद्रियांनी मिळून आपल्याला जाणवते ते, किती र्मयादित? अलीकडे विज्ञानतंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे आपल्या भोवतालचं जग अधिकच मोठं होत चाललं आहे. काही काळानंतर जगाच्या नकाशात अवकाशाचाही समावेश होईल, कोणी सांगावे! माणूस चंद्रावर पोहोचला. तेव्हा पृथ्वीच्या पलीकडचं जग नव्यानं आपल्या जाणिवेत घुसलं. तिकडची माती, तिकडचे वारे- त्यांचे आपल्याला वेध लागले. या प्रश्नांची उत्तरे मंगळावर डेरेदाखल झाली! या सतत वाढणार्या जगामुळे एकीकडे श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय आणि दुसरीकडे मात्र आपण आणखी लहान ठिपक्याएवढे होतोयं, असंही वाटतंय. हे सगळं आपण कसं पाहणार? - ही हुरहुर आजही माझा पिच्छा पुरवत आहे. अशा मन:स्थितीत मला कविवर्य गोविंदाग्रज यांची एक ओळ आठवते. ते लिहून ठेवतात-
‘मी श्वासास धनी, अखंड फिरतो वारा भरारा तरी.’ बारा महिने, चोवीस तास भोवताली हवा खेळत असताना आपण एका क्षणी फक्त एकच श्वास घेऊ शकतो. माणसाची ही अटळ र्मयादा कवीला बेचैन करते.
एकंदरीत, माझी ही हुरहुरदेखील आपल्या समृद्ध कविकुलाकडून मला मिळालेला वारसा आहे तर! या कल्पनेनेही नकळत मन सुखावते. आणि या हुरहुरीमुळे सतत जगाशी जोडले जाण्याची तहान मनात कायम राहते. ही गोष्टही कमी मोलाची नाही. याची जाणीव झाली, की मन नकळत शांत होत जाते.
(लेखिका ज्येष्ठ समीक्षक आहेत.)