घरोघरी ऑनलाइन परी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 06:04 AM2020-07-19T06:04:00+5:302020-07-19T06:05:17+5:30

ती चहा घेऊन पुन्हा कॉम्प्युटरसमोर बसली.  बरोब्बर दहा वाजता झूम मीटिंग सुरू झाली आणि तिचा फोन वाजू लागला.  सविता मिसचा कॉल होता,  म्हणजे चिनूने अजून शाळेसाठी  लॉग-इन केलं नाही की काय?. 

The hustle and bustle of work from home | घरोघरी ऑनलाइन परी!

घरोघरी ऑनलाइन परी!

googlenewsNext
ठळक मुद्देवर्क फ्रॉम होमची धावपळ आणि गडबड

- मुकेश माचकर

सकाळ झाली.
सरिता जागी झाली.
सविता जागी झाली.
कविताही जागी झाली.
तिघी आपापल्या घरी.
जागी होताच चहा घेऊन सरिता कामाला लागली. सविता आणि कविताही कामाला लागल्या. 
सरिताला स्वयंपाकपाणी आणि घरातली इतर कामं आवरून सकाळी ठीक आठ वाजता कॉम्प्युटरसमोर हजर व्हायचं होतं. जेव्हा ती रोज प्रवास करून शहराच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या ऑफिसला जायची तेव्हा कामावर पोहोचायला 15 मिनिटांपर्यंत उशीर झाला तरी चालायचं. नंतर लेट मस्टर पुढे यायचं. आता हे वर्क फ्रॉम होम नावाचं प्रकरण सुरू झाल्यापासून ही सवलत बंद झाली होती. आठ म्हणजे ठीक आठ वाजताच मीटिंग जॉइन करायचं बंधन होतं. बॉस पुरुष होता, तो स्वत:च्या घरातही ‘बॉस’च असल्याने त्याला फक्त ऑफिसचंच काम करायचं होतं. लिंक क्लिक करून झूमवर मीटिंग जॉइन करायला दोन मिनिटांचा उशीर झाला तरी तो खवचटपणे म्हणायचा, ‘मिसेस दीक्षित, आज उशीर? ऑफिसात रोज लेट येत होता ते चालून जायचं, आता काय घरीच तर आहात ना!’ 
हे घरी असणं, खासकरून घरकाम आणि ऑफिस असं दोन्ही करायला लागणार्‍या बायकांना किती तापदायक आहे, याची कल्पना त्यांना येणं शक्य नव्हतं. संध्याकाळी सहा वाजता लॉगआउट करायला गेलं तरी बॉस निगरगट्टपणे म्हणायचा, ‘हातातली फाइल तरी कम्प्लिट करा की मिसेस दीक्षित! 
आता कुठे तुम्हाला लोकल पकडून घरी जायचंय? घरीच तर आहात की.’ अर्थात त्याला कोरोनाकाळात कधीही नोकरी जाऊ शकते अशी धास्ती दाखवून हाताखालच्या स्टाफकडून आठच्या ऐवजी दहा-बारा तास काम करवून घेण्याशिवाय गत्यंतर नव्हतं, नाहीतर त्याची नोकरी गेली असती!
आठ वाजता कॉम्प्युटरसमोर बसण्याआधी सरिताला तिचा, नवर्‍याचा आणि चिनूचा म्हणजे त्यांच्या लेकीचा नास्ता बनवायचा होता. दुपारच्या चपात्या लाटून ठेवायच्या होत्या. नवरा चहा बनवून घ्यायचा (तिलाही द्यायचा) आणि वरण-भाताचा कुकरही लावायचा. अधेमधे चिनूला मॅगी बनवून द्यायचा आणि प्रसंगी ऑम्लेटही बनवू शकायचा. असा ‘शेफ’ नवरा (ती त्याच्या दसपट पदार्थ बनवत असूनही तिला कुणी कुकही म्हणत नव्हतं) मिळाल्यामुळे ती किती भाग्यवान आहे असं तिची आई आणि सासू दोघीही सांगायच्या सतत. 
नवरा नऊ वाजता त्याच्या कॉम्प्युटरवर कामाला बसण्याच्या आधी चिनूची अंघोळ वगैरे तयारी करून द्यायचा. तिचीही नऊ वाजता ऑनलाइन शाळा सुरू व्हायची आणि मग त्यांचं ऑनलाइन आयुष्यच सुरू व्हायचं. तिघेही एकाच घरातून तीन वेगवेगळ्या जगांमध्ये जायचे.
ङ्घआज सकाळी दहा वाजता चिनूची तोंडी परीक्षा होती आणि परीक्षा घेणार होती सविता मिस. सविता ही चिनूची टीचर होती.ङ्घतिचंही वेळापत्रक बरंचसं सरितासारखंच होतं. फक्त ती सरिताइतकी ‘भाग्यवान’ नसल्यामुळे कुकरही तिलाच लावावा लागत होता आणि चहाही बनवून ठेवावा लागत होता. तिच्या छोट्याशा घरातली एकमेव बेडरूम ही तिची क्लासरूम होती. तिचा नवरा कामासाठी हॉलमध्ये बसत होता. तिचा मुलगा मिनूही हॉलमध्ये बसूनच ऑनलाइन शाळेत जायचा. 
ङ्घइकडे सरिताने नेहमीप्रमाणे सगळं आवरून ऑफिसच्या मीटिंगमध्ये आठ वाजता लॉग-इन केलं. बॉसने बरोब्बर सकाळी दहाच्या महत्त्वाच्या क्लायंट मीटिंगमध्ये तिचं नाव नोंदवून टाकलं, ‘सर, माझ्या मुलीची ओरल एक्झ्ॉम आहे, हे मी काल सांगितलं होतं. मला अध्र्या तासाचा ब्रेक हवा होता साडेनऊला,’ असं सांगितल्यावर बॉस म्हणाला, ‘मिसेस दीक्षित, तुम्ही ब्रेक मागितला आहे, असं मी माझ्या बॉसना सांगितलं तर ते तुम्हाला कायमस्वरूपी ब्रेक द्यायला सांगतील.’ विषय कट झाला. साडेनऊच्या दहा मिनिटांच्या टी ब्रेकमध्ये तिने नवर्‍याला सांगितलं, ‘आजचा दिवस चिनूच्या ओरलकडे लक्ष द्यायला लागेल तुला. मला इम्पॉर्टन्ट मीटिंग आहे. आता लगेच तिला अंघोळीला ने. पटापट उरका. बरोब्बर 9.55ला लॉग-इन कर. नंतर गोंधळ नको.’ 
नवर्‍याने कामातून डोकंही वर न काढता मान डोलावली. त्याला ऐकू तरी गेलं होतं की नाही कोण जाणे!
ती चहा घेऊन पुन्हा कॉम्प्युटरसमोर बसली. बरोब्बर दहा वाजता क्लायंटबरोबर मीटिंग सुरू झाली आणि बॉसच्या प्रस्तावनेच्या वेळीच तिचा फोन वाजू लागला. सविता मिसचा कॉल होता, म्हणजे चिनूने अजून लॉग-इन केलं नाही की काय? अजून सरिता म्यूट होती म्हणजे मीटिंगमध्ये बोलणं सुरू झालं नव्हतं. तिने खुर्चीवर रेलून दार हलकेच उघडून बाहेर पाहिलं. नवरा चिनूला मोबाइलवर लॉग-इन करून देण्याच्या खटपटीत होता. दोघांनी बाथरूममध्ये नक्कीच टाइमपास केला असणार, एकत्र गाणी गायली असणार! ‘अरेच्चा, ओरल एक्झाम आहे,’ हे दोघांच्याही नंतर लक्षात आलं असणार. मग सगळीच घाई झाली असणार.ङ्घत्याने फक्त शर्ट घातलंय शाळेचं तिला, स्कर्ट घातलेलं नाहीच. कुठलीतरी स्लॅक चढवलीये, तीही उलटी! हरे राम! दीर्घ श्वास घेऊन सरिताने कॉल घेतला, सविता मिसने विचारलं, ‘अजून चिन्मयीने लॉग-इन नाही केलंय. बरी आहे ना ती?’ 
सरिता ओशाळल्या स्वरात म्हणाली, ‘होतेच आहे दोन मिनिटांत. मी जरा आज.’ 
सविता पलीकडून हसून म्हणाली, ‘इट्स ओके. आज तुम्ही मीटिंगमध्ये असणार आणि तिची जबाबदारी पप्पांवर असणार, हो ना!’
सरिता म्हणाली, ‘हो हो, पण, हे तुम्हाला कसं कळलं?’ 
सविता काहीच बोलली नाही. तिच्याही घरातल्या हॉलमध्ये मिनू आणि त्याचा पप्पा आताच लॉग-इन करत होते आणि सविताच्या सायलेंट करून ठेवलेल्या फोनवर मिनूच्या वर्गशिक्षिकेचा, कविता मिसचा कॉल ब्लिंक होत होता!

mamnji@gmail.com

 (लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

 

Web Title: The hustle and bustle of work from home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.