आय अॅम मायग्रंट
By admin | Published: December 26, 2015 05:58 PM2015-12-26T17:58:31+5:302015-12-26T17:58:31+5:30
घर सोडून, देशाच्या सीमा ओलांडून आकाशमार्गे, शेकडो मैलांचे रस्ते पार करून,नाहीतर महासागरात आपले तारू लोटून माणसे स्थलांतर करतात! - कुणी सक्तीने, जीव वाचवायला; तर कुणी अधिक चांगल्या भविष्याच्या, स्वातंत्र्याच्या शोधात नवे किनारे शोधतात! - काय असते या माणसांचे आयुष्य? नव्याने खुल्या झालेल्या ‘ऑनलाइन’ जगात भेटतात अशी माणसे! - अशाच एका नव्या अड्डय़ाविषयी!!
Next
>- ओंकार करंबेळकर
बगदादमध्ये मी माझी बायको आणि मुलांबरोबर इतकी वर्षे सुखाने राहत होतो, पण युद्धामुळे आलेल्या परिस्थितीमुळे आमचे जगणे नकोसे झाले. अखेर या घुसमटीमुळे आम्ही इराक सोडण्याचा विचार केला आणि इजिप्तमध्ये अलेक्झांड्रियाला गेलो. पण तेथेही फारसा जम बसला नाही. इराकचा कोणताच दुवा नाही, कोणीही मदतीसाठी नाही अशा स्थितीत इलेक्झांड्रिया आमच्यासाठी फारसे योग्य शहर नव्हते. मग तेथून सरळ अमेरिकेत येण्याचा निर्णय घेतला. एका मित्रच्या साहाय्याने आम्ही आता अमेरिकेमध्ये राहत आहोत. मुलांच्या भविष्यासाठी आम्हाला हे करावेच लागले.
- ही गोष्ट आहे मूळच्या इराकमधील असणा:या अम्मार नावाच्या तरुणाची. इराक आणि सीरियामधील दहशतवादी वातावरणामुळे त्याला देश सोडावा लागला. आपली मायभूमी सोडून परदेशात तीन चार हजार किमी, कधीकधी त्याहून लांब प्रदेशात राहायला जाणो हे कोणालाही फारसे आवडणार नाही. पण काळजावर धोंडा ठेवून आणि भविष्याकडे डोळे लावत अम्मारसारख्या लाखो लोकांनी आपले तारू निर्वासितांच्या लाटांमधून पश्चिमेच्या दिशेने हाकारले.
18 डिसेंबरच्या वर्ल्ड मायग्रंट्स डेच्या निमित्ताने शेकडो स्थलांतरितांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आय अॅम अ मायग्रंट (http://iamamigrant.org/) या नव्या संकेतस्थळाच्या निमित्ताने नुकतेच एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. जॉईण्ट कमिशन फॉर द वेल्फेअर ऑफ मायग्रंट्स आणि इंटरनॅशनल ऑर्गनायङोशन फॉर मायग्रंट्स यांच्या वतीने हे ब्लॉगवजा संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.
अफगाणिस्तान, इराक, सीरिया, भारत, श्रीलंका, पाकिस्तान या देशांमधून गेली अनेक वर्षे पश्चिमेकडे स्थायिक झालेले, आजही स्थायिक होण्यासाठी हात पाय मारणारे लोक या मोहिमेत सहभागी झाले आहेत. स्थलांतरित किंवा निर्वासित म्हणून जगताना होणारा कोंडमारा, नव्या देशाच्या भाषेशी, संस्कृतीशी आणि समाजरचनेशी जुळवून घेताना होणारी कसरत त्यांच्या लहान लहान ब्लॉगवजा लेखनातून व्यक्त होत आहे. पण समस्या असल्या तरी हे लोक प्रचंड आशावादी आहेत. भावी काळामध्ये आपल्याला आणि मायभूला चांगले दिवस यावेत अशी इच्छा व्यक्त करतात आणि ज्या देशाने आसरा दिला त्यांचे मनापासून आभारही मानतात.
अम्मारसारखा सीरियाचा युसुफही जर्मनीला आपले भविष्य शोधण्यासाठी आला आहे. युसुफने मॉस्को विद्यापीठात बायोटेक्नॉलॉजीची पदवी मिळविली. काही काळ मॉस्कोमध्ये नोकरीही केली, पण परदेशी नागरिक म्हणून त्याला फारसा पगार तेथे मिळत नव्हता. त्याच्या मते नोकरीसाठी पुन्हा सीरियात जाणो हा प्रश्न येतच नाही इतकी तेथे स्थिती खराब आहे. माङोच काय कोणत्याही क्षेत्रमध्ये तेथे नोकरी करणो अशक्य आहे असे तो म्हणतो. म्हणून त्याने जर्मनीचा रस्ता धरला. इंग्लिश आणि जर्मन या दोन्ही भाषा येत नसल्यामुळे आपला निभाव कसा लागणार, हा प्रश्न सतत त्याच्या मनात येतो. पण ती समस्या आपण सहज सोडवू शकू असे त्याला वाटते. आता तो त्याच्या कागदपत्रंची पूर्तता करण्याच्या मागे लागला आहे. एकदा ते झाले की त्याला भाषा शिकावी लागेल. शक्य तितक्या लवकर मी जर्मन शिकून घेईन असे आत्मविश्वासाने सांगत, तीन हजार किमी अंतरावरील सीरियात शांतता यावी यासाठी तो प्रार्थनाही करतो.
‘एकदा तुम्ही घर सोडून गेलात नंतर मागे पाहिलेच नाहीत. डॉलर्स, युरो, पौंड कमवायला गेलात ना. मग कशाला अश्रू ढाळता? आता संस्कृतीचे कढ यायला लागले तुमच्या मनात. पैसे कमवायला गेलात ना मग मान्य करा ना सरळसरळ, अशी काहीशी भावना देश सोडून गेलेल्या लोकांच्या बाबतीत त्यांच्या स्वदेशातील नागरिकांमध्ये असते. स्वदेशातील आप्त अंतर तयार करून वागायला लागतात, तर ज्या देशात नोकरी- शिक्षणासाठी गेलो त्या देशातील लोक आधीच अंतर ठेवून वागत असतात. अशा दुहेरी कोंडीचा सामना करत आणि चेह:यावर उसने हसू ठेवावे लागते. या प्रकारच्या भावना आय अॅम मायग्रंटमध्ये ब:याच जणांनी व्यक्त केल्या आहेत, तर काही लोकांनी नव्या देशाने पूर्णत: स्वीकारल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या औदार्याला ते दाद देतात आणि स्थलांतरित असल्याचा अभिमानही त्यांना वाटतो.
मार्टा नावाच्या पोलिश मुलीचे आयुष्य अशाच चित्रविचित्र घटनांनी भरलेले आणि तितकेच भन्नाट आहे. मार्टा ही एका शास्त्रीय व जॅझ संगीताच्या इतिहासकाराची मुलगी. थोडेफार शिक्षण पोलंडमध्ये आणि पोलिश भाषेतून झाल्यावर ती इंग्लंडला आली. मग भाषेचा प्रश्न होताच. मी जे. के. रोलिंग्जची हॅरी पॉटरची पुस्तके, चित्रपटांच्या मालिकेतून इंग्रजी शिकले, असे ती गमतीने सांगते. लंडनच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज विद्यापीठात तिने प्रवेश घेतला आणि तिचे आयुष्यच बदलून गेले. दक्षिण आशियाबद्दल तिला प्रचंड प्रेम निर्माण झाले. ते प्रेम इतके वाढीस लागले की ती चक्क भारतवेडी झाली. अभ्यासासाठी ती दोनदा भारतात येऊन गेली. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीवर एक नाटकही तिने दिग्दर्शित केले. खरी गंमत अजून पुढेच आहे. मार्टा त्यानंतर हिंदी शिकली आणि ओडिसी हा नृत्यप्रकारही शिकली. एवढय़ावरच ती थांबली असती तर मार्टा कसली. पठ्ठीने पोलंडमध्ये, इंग्लंडमध्ये ओडिसीचे कार्यक्रमही केले. भारत-लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिने गेली चार वर्षे स्वयंसेवक म्हणून कामही केले आहे. मधल्या काळात कॉफी शॉपमध्ये वेट्रेस म्हणून काम करणो वगैरे गोष्टी ती करतच राहिली. आता पुढचा धक्का, ती सध्या डेव्हलपमेंट मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे. तिला भविष्यात कामगारांचे हक्क आणि महिलांच्या हक्कासाठी काम करण्याची तीव्र इच्छा आहे. हे सगळे इंग्लंडमुळे शक्य झाले. येथील मोकळे वातावरण आणि संधीमुळेच झाले असे तिचे मत आहे. एवढय़ा भन्नाट जगणा:या मार्टाच्या तोंडात केवळ थँक्स टू यूके हेच शब्द असतात.
भारतातून परदेशात राहायला गेलेल्या लोकांच्याही अशाच संमिश्र भावना आहेत. मिहीर नावाचे भारतीय वंशाचे पत्रकार चार दशकांहून अधिक काळ इंग्लंडमध्ये राहत आहेत. कलर्ड मायग्रेशन (गोरे नसणारे स्थलांतरित) मुळेच आपल्या देशाची वाट लागली आहे, अशी डोकी भडकवणारी भाषणो त्यावेळीही तिकडे होत असत. अशा तप्त वातावरणातच मिहीर इंग्लंडमध्ये राहायला गेले होते. अर्थ व क्रीडा पत्रकार म्हणून काम केले. क्रीडा विषयावर 28 पुस्तकेही लिहिली. स्थलांतरानंतर भारत आणि इंग्लंडबद्दल काय वाटते याचा जेव्हा ते विचार करतात तेव्हा त्यांना आपण ब्रिटिश आणि भारतीय दोन्ही आहोत असे वाटते. इंग्लंड हे आता मुख्य घर आणि भारत हे आपले आधीचे घर आहे असे त्यांना वाटते. मिहीर यांच्यासारखी यशस्वी उदाहरणो आता आणखी पुढे येत आहेत. धडपडणा:या स्थलांतरितांसाठी आशेचे किरण, आदर्श म्हणून ते समोर आहेत. मिहीर, मार्टा, अम्मार, युसूफ ही केवळ काही उदाहरणो आहेत. सोशल मीडियामुळे आपल्याला या बांधवांना भेटायची संधी मिळाली आहे. या गोष्टी वाचल्या की तू या देशाचा, वंशाचा, धर्माचा अशी बंधने गळून पडतात आणि एकाच विश्वाचे आपण नागरिक आहोत अशी भावना निर्माण होते. मनातल्या चौकटी मोडून त्यांच्याकडे पाहिले की त्यांच्या कथा आणखीच जवळच्या वाटू लागतात.
नवे बर्म्युडा ट्रँगल
एकेकाळी भूमध्य समुद्र, त्याच्या आसपासची बेटे, किनारे आणि प्रदेश स्वर्गासमान मानला जाई. दुधामधाचा प्रदेश म्हणून ओळखला गेल्यामुळे आणि ऑलिव्ह तेलामुळे व्यापा:यांचाही हा आवडीचा मार्ग होता. मात्र आता याउलट स्थिती झालेली दिसून येते. चांगल्या राहणीमानासाठी (खरे तर जिवंत राहण्यासाठी) आफ्रिकेतील नागरिक देश सोडून गेल्या दोन वर्षात युरोपमध्ये घुसत आहेत. लिबिया ते इटली या भूमध्य समुद्रातील प्रवासात आजवर हजारो विस्थापितांचा बोट बुडून मृत्यू झाला आहे. लाकडी बोटींच्या साहाय्याने नागरिकांची चक्क तस्करी केली जाते. आजवर या बोटी फुटण्याच्या, बोट बुडण्याच्या किंवा डेकखाली घुसमटून मरण्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत. आफ्रिकेतून युरोपात जाण्याच्या रस्त्याप्रमाणो तुर्कस्थानातून युरोपात जातानाही असे अपघात झाले. सीरियन स्थलांतरितांनी तुर्कस्थानमार्गे ग्रीसच्या कॉस, लेसबॉस आणि झामोस बेटांवर जाण्याचा मार्ग निवडला. रबरी बोटी किंवा साध्या बोटींनी या बेटांवर पोहोचविण्याचा एक व्यवसायच सुरू झाला. या प्रवासातही बोटी उलटून निष्पाप लोकांना प्राणास मुकावे लागले. साधारणत: दिवसाला 15क्क् अशा संख्येने निर्वासितांचे लोंढे या बेटांवर आदळू लागले. मृत्यूचे नवे सापळेच आपण यावर्षात भूमध्य समुद्रात शोधून काढले. अपघात थांबविण्यासाठी जे प्रयत्न केले गेले ते एकतर अत्यंत त्रोटक तर होतेच त्याहून या लोकांना कोण स्वीकारणार अशा भावनेमुळे या अपघातांना गांभीर्याने घेतले गेले नाही.
ग्रीस आणि इटली या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था नाजूक टप्प्यावर आहे. बेलआऊट पॅकेजवर असणा:या ग्रीससाठी या लोंढय़ांचे वजन अजिबातच सहन न होणारे होते. जरी हे निर्वासित पुढे पश्चिम युरोप आणि ग्रीसच्या दिशेने जाणार असले तरी त्यांच्यासाठी ते कठीणच गेले. ग्रीसप्रमाणो पूर्व युरोपातील अनेक देशांना निर्वासितांना स्वीकारणो शक्य नव्हते. त्यामुळेच हंगेरीसारख्या देशांनी बंडाची भाषा करून जर्मनीवर दोषारोप करण्यास सुरुवात केली. हंगेरीसकट पूर्व यरोपातील देशांनी इतके दिवस खुल्या असणा:या सीमांना कुंपण घालण्यास सुरुवात केली आणि शेंगेन करारानुसार एका देशातून दुस:या देशात जाण्यासाठी कागदपत्रे, पासपोर्ट ही बंधने वगळण्याच्या अटीला आव्हान निर्माण झाले. एकूणच पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप असे दोन तट यामुळे पडले आणि ही समस्या हाताळण्यात अपयशच आले. प्रसंगी थंडी आणि पावसाचाही स्थलांतरितांना सामना करावा लागला. युरोपने ही समस्या आपल्या दारात आली आहे हे नीट समजून त्यावर एकमुखाने ठोस तोडगा काढणो अपेक्षित होते. पण त्याला म्हणावे तितके यश आले नाही. किंबहुना हा प्रश्न आपला नाहीच अशा नजरेने या समस्येकडे पाहिल्यामुळे अधिकच नुकसान झाले.
संज्ञांमध्ये फरक काय?
स्थलांतरित (मायग्रंट्स), निर्वासित (रेफ्यूजी) आणि आश्रय मागणारे (असायलम सीकर्स) या संज्ञा एकत्र वापरल्या जात असल्या तरी त्यामध्ये फरक आहे. युद्ध, लढाई, यादवीपासून रक्षण करण्यासाठी जे बाहेर पडून दुस:या देशात आश्रय घेतात त्यांना असायलम सीकर्स असे म्हटले जाते, तर निर्वासित हे असे लोक आहेत की ज्यांचा आश्रय मागण्याचा हक्क (क्लेम) मान्य करण्यात आलेला आहे. अर्थात सीरिया आणि आफ्रिकन देशांतून बाहेर पडलेल्या लोकांना एकप्रकारे आधीच रेफ्यूजी दर्जा देण्यात आलेला आहे. कामासाठी, पैसे मिळविण्यासाठी किंवा शिक्षणासाठी स्थलांतर करतात ते स्थलांतरित. मायग्रंट्स. त्यांना कोणतीही मदत आणि विशेषाधिकार दिले जात नाहीत.
मर्केलबाईंची हिंमत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर जगात कोणा नेत्याने स्थान निर्माण केले असेल तर ते जर्मनीच्या अँजेला मर्केल यांनी. सलग दहा वर्षे चॅन्सेलरपदी असणा:या मर्केलबाईंनी युरोपचे नेतृत्व म्हणून जर्मनीकडे पाहिले जावे अशी स्थितीच निर्माण केली आहे. जर्मनीची औद्योगिक भरभराट स्थलांतरितांना खुणावत होतीच; त्यापेक्षा सीरियन निर्वासितांसाठी जास्तच आश्वासक वाटत होती. त्यामुळे जर्मनीला जाण्याचे अंतिम ध्येय त्यांनी डोळ्यासमोर ठेवले. पूर्व युरोपातील देशांनी निर्वासितांचा नुसता विरोधच केला नाही, तर त्यांना अडथळेही निर्माण केले. तेव्हा जर्मनी काहीतरी भूमिका घेईल अशा अपेक्षेने सारे जग त्यांच्याकडे पाहू लागले व या तापलेल्या वातावरणात मर्केल यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आणि सुरुवातीच्या काळामध्ये निर्वासितांसाठी देशाची दारे उघडून कोंडी फोडली. जर्मनीच्या बव्हेरिया प्रांतात मोठय़ा संख्य़ेने सीरियन निर्वासित येऊन दाखल झाले आहेत. पॅरिसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला तरीही मर्केल यांनी आपल्या ओपन डोअर पॉलिसीवरून मागे हटण्यास नकार दिला. सीरियामध्ये शांतता स्थापन होण्याच्या प्रक्रियेत ही ओपन डोअर पॉलिसी महत्त्वाची भूमिका बजावेल हे त्या आजही वारंवार सर्वाना समजावून सांगतात. मुक्तपणाने जीवन जगता येणो हे दहशतवादापेक्षा जास्त शक्तिमान आहे हे आपण युरोपीय सर्व जगाला दाखवून देऊ शकतो, असे त्यांचे मत आहे. मध्य-पूर्व, आफ्रिका आणि आशियातून युद्धामुळे आश्रय मागणा:याचे संरक्षण करणो आपले कर्तव्यच आहे, अशी मर्केल यांची भूमिका आहे.
(लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
onkar2@gmail.com